सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग ४
मात्र
रणदुल्लाखानाच्या मृत्युनंतर विजापुर दरबारात शहाजीराजांना भक्कम पाठींबा
राहिला नाही. त्यांच्या विरुद्ध कट शिजू लागले. १६४८ च्या कर्नाटक स्वारीत
त्याची परीणीती शहाजीराजांना अटक करण्यात झाली. त्याचे झाले असे की
पेनुकोंडाचा राजा श्रीरंगराज हा फार महत्वाकांक्षी होता. विजयनगरचे लयाला
गेलेले साम्राज्य पुन्हा स्वत:च्या अधिकाराखाली उभे करण्याचे स्वप्न तो बघत
होता. त्याचीच सुरुवात म्हणून त्याने जिंजी, तंजावर आणि मदुरा या
संस्थानिकांवरती आक्रमण केले. मदुरेच्या त्रिमलनायकाने कुत्बशहाला मदतीला
बोलावले. कुत्बशहाचे सैन्य मीर जुमल्याच्या अधिपत्याखाली पेनुकोंड्यात
शिरले. श्रीरंगराज आपल्या मांडलिक राजाकडे आश्रयासाठी पळून गेला. मात्र
मदुरेच्या त्रिमलनायकाने पायावरती धोंडा पाडून घेतला होता. पेनुकोंड्याच्या
नंतर कुत्बशहाने जिंजीवरतीही चाल केली. कुत्बशहाचा पवित्रा लक्षात घेऊन
तंजावरच्या वेंकटनायकाने कुत्बशाहीशी तह केला. त्रिमलनायक एकाकी पडला. आता
त्याने विजापूरशी संधान बांधले. वजीर मुस्तफाखान स्वत: कर्नाटकात खाली
उतरला पण उलट त्याने कुत्बशहाशी हातमिळवणी करुन राक्षसतागडीप्रमाणे सगळे
काफिर संपवले पाहिजेत ह्याच उद्देशाने ते पुढे सरकू लागले. तेव्हा
शहाजीराजांनी अंतस्थपणे त्रिमलनायकाला धीर दिला व स्वत:चे वजन वापरुन या
संस्थानिकांना अभय दिले. अर्थातच त्रिमलनायका बरोबर कावेरीपट्टणचा जगदेव,
म्हैसूरचा चामराज वोडियार, बेदनूरचा वीरभद्र हे शहाजीराजांना वश झाले.
अप्रत्यक्षपणे शहाजीराजांनी कर्नाटक हस्तगत केले होते. मुस्तफाखानास हे सहन
झाले नाही. त्यांनी शहाजीराजांना जिंजीच्या वेढ्यात सामिल व्हावे अशी
आज्ञा दिली. शहाजीराजांनी ’माझे सैन्य थकले आहे, माझ्याकडे धान्य देखिल
नाही, मी या कारणाने बंगरुळास परत जात आहे मग तुम्ही परवानगी द्या अथवा नका
देऊ!’ याच शब्दात तो आदेश कोलून लावला. मात्र शहाजीराजांना थेट हात
लावण्याची एकाचीही बिशाद नव्हती. म्हणूनच आधी शहाजीराजांशी मैत्रीचे नाटक
करुन त्यांचा विश्वास संपादन करुन शहाजीराजांना २५ जुलै १६४७च्या पहाटे
बेसावध असताना जिंजी नजिक अटक केली. हि बातमी बंगरुळास संभाजीराजे व
राजगडावरती शिवाजीराजांना समजले. स्वराज्यावरील पहिले संकट आले तेच
दख्खनच्या राजकारणाची पार्श्वभूमी घेऊन. अर्थात या संकटाला शिवरायांनी
पुरंदरवरती व संभाजीराजांनी बंगरुळात मोठ्या धीराने व अक्कलहुशारीने तोंड
दिले व शहाजीराजांची सुटका झाली. अर्थात त्याबदल्यात संभाजीराजांना कंदर्पी
व बंगरुळ तर महाराजांना कोंडाणा आदिलशाहीस द्यावा लागला होता.
No comments:
Post a Comment