विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 October 2023

🚩कवयत्री, दूरदर्शी दिपाबाईसाहेब व्यंकोजीराजे भोसले

 

" 🚩

कवयत्री, दूरदर्शी दिपाबाईसाहेब व्यंकोजीराजे
भोसले🚩
व्यंकोजीराजे हे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू .शहाजी राजांच्या धाकट्या पत्नी तुकाबाईसाहेब यांच्या पोटी व्यंकोजीराजे यांचा जन्म महाराष्ट्रात झाला .तुकाबाईसाहेब यांचे माहेर तळबीडकर मोहित्यांचे. सन 1631मधे शहाजीराजे कर्नाटकात निघुन गेले ,त्यावेळी आपले जेष्ठ पुत्र संभाजी ,पत्नी तुकाबाई , व्यंकोजीराजे व त्यांच्या पत्नी दिपाबाईसाहेब यांनाही सोबत नेले. कर्नाटकातील बंगळूर जहागीर संभाजीराजांकडे सोपवली होती. पण त्यांचा कनकगिरीच्या लढाईत आकस्मिक मृत्यू घडल्याने पुढे शहाजीराजांच्या निधनानंतर व्यंकोजीराजे कर्नाटकातील सर्व जहागिरीचे व मालमत्तेचे वारसदार बनले .पुढे आदिलशहाच्यावतीने व्यंकोजी राजांनी मदुरेच्या नायकाकडून तंजावरच हस्तगत केले व स्वतःच ते ठिकाण बळकावून त्यांनी तेथे नवी राजधानी स्थापन केली.(स.1676) पण बंगलोरहून तंजावरला राजधानी हलविल्याने व्यंकोजी राजांचे बेंगलोर कडे दुर्लक्ष होऊ लागले. परिणामी शेजारच्या म्हैसूरच्या नायकाकडून ती गिळंकृत होण्याचा धोका उत्पन्न झाला .म्हैसूरकरांच्या घशात ती जहागीर जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांना तातडीने पावले उचलावी लागली.
आदिलशहाशी शत्रुत्व पत्करून ,त्यांचेच राज्य पोखरून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्याची स्थापना केली.तेंव्हा अशा राज्यावर आदिलशहाने आपल्या सरदारांच्या साह्याने स्वार्यामागून स्वार्या केल्या.. काही प्रसंगी खुद्द व्यंकोजीराजे ही आदिलशाही फौजातून शिवाजी महाराजांच्या राज्यावर चालून आल्याचे दिसते. याचा अर्थ आदिलशाही सुलतानाची सेवा इमानेइतबारे करण्यासाठी आपल्या बंधु विरुद्धच्या स्वारीत सामील होण्याचीही दिक्कत त्यांना नव्हती.! अशा परिस्थितीत बंधूत सलोख्याचे संबंध राहणे शक्य नव्हते.
शिवाजी महाराजांहून व्यंकोजी राजांची प्रकृती भिन्न होती.पिता शहाजी राजे यांच्या अंगी असामान्य व कल्पकता हे जे गुण होते ते पुरेपूर शिवाजी महाराजांच्या ठायी उतरले होते .पण व्यंकोजीराजे या गुणांना पारखे झाले होते .दक्षिणेतील अनेक जाहागीरदारांसारखे आपणही मुस्लिम सुलतानाची सेवाचाकरी करून जमेल तेवढे हीत साधावे, त्यातच समाधान मानावे अशी व्यंकोजी राज्यांची भूमिका होती. त्यांनी ही भूमिका सोडून आपल्या उद्योगाचे अनुकरण करावे आणि तुंगभद्रेपलीकडे नव्या स्वतंत्र
मराठी राज्याचा पाया घालावा अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती .पण ती फलद्रूप होईना .अशा परिस्थितीत महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या बंधूकडे आपल्या पित्याच्या जहागिरीचा व मालमत्तेचा अर्धा वाटा मागितला! पण व्यंकोजीराजे राजी होईनात .उलट महाराष्ट्रातील राज्यात ते अर्धी वाटणी मागू लागले !महाराज म्हणाले की एक पुण्याची जाहागिर सोडली तर बाकीचे राज्य मी स्वतः कमविले ,त्यात वाटणी कशी देता येईल?
उभय राजबंधुत एकता होऊ शकली नाही .तेव्हा शहाजीमहाराजांच्या जहागिरीचा प्रदेश जसा जमेल तसा शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात आणला. आणि महाराष्ट्रातील राजकारणाची निकड झाल्याने ते त्वरेने इकडे निघाले .मागे महाराजांच्या फौजेवर व्यंकोजीराजांनी चाल केली. पण त्यांचा पुरा मोड झाला .हे वर्तमान मार्गातच तोरगल प्रांती महाराजांना समजले .तेव्हा त्यांनी व्यंकोजीराजांस जे खरबरीत पत्र लिहिले आहे ते पत्र मराठ्यांच्या इतिहास साहित्यात मोठे प्रसिद्ध आहे .या पत्रातून शिवाजी महाराजांचे व्यंकोजीराजासंबंधीचे विचार व जहागिरीच्या वाटणी संबंधीची भूमिका स्पष्टपणे दिसून येते. या पत्रामध्ये महाराजांनी गृहकलह बरा नव्हे ,आम्हीतरी वडीला प्रमाणे आत्तापर्यंत तुम्हाला सांगितले .आत्ताही सांगतो. ऐकाल तर बरे.तुम्हीच सुखी व्हाल .नाही ऐकाल तर तुम्हीच कष्टी व्हाल.
व्यंकोजीराजांवरील विजयानंतर कोलेरून नदी पार करून तंजावरवर स्वारी करावयास सज्ज असणाऱ्या आपल्या रघुनाथ पंडित, संताजी भोसले व हंबीरराव मोहिते या सेनाअधिकाऱ्यांना महाराजांनी तातडीने पत्रे रवाना केली. "व्यंकोजीराजे आपले धाकटे बंधू आहेत .मूलबुद्धी केली .त्यास तोही आपला भाऊ .त्यांचे रक्षण करा ,त्यांचे राज्य बुडवू नका "
व्यंकोजी राजांच्या पत्नी दीपाबाईसाहेब या फार दूरदर्शी व अत्यंत प्रौढ बुद्धीच्या होत्या .तुकाबाई राणीसाहेब यांच्या त्या भाचीच होत्या. त्यांनीच एकोजीराजांची समजूत काढली.दिपाबाईसाहेबांची योग्यता नि:संशय थोर होती.' धर्माची ध्वज दिव्यरूप लतिका ' 'नीतीची अति यौगता ' म्हणजे दिपाबाईसाहेब.त्या अत्यंत सुंदर कविता करत होत्या.महाराजांना या आपल्या भावजयीबद्दल आदर व कौतुक वाटत असे.महाराजांनी आपल्या या वहिनीला बेंगलोर, होसकोटे ,व शिरे हे प्रांत चोळीबांगडीसाठी देऊन टाकले होते.दिपाबाईसाहेबांनी आपल्या पतीस समजावून गृहकलह टाळण्याच्या दृष्टीने समझोत्यास तयार केले होते. लवकरच उभय राजबंधूत तह घडून आला .महाराजांनी कोलेरून नदीच्या दक्षिणेकडील राज्य व्यंकोजीराजांकडे ठेवले. नदीच्या उत्तरेकडील महाराजांनी जिंकून घेतलेल्या प्रदेशास व्यंकोजीराजांनी मान्यता दिली. एकोजी राजांनाही जिंजीनजीकचा सात लाखांचा मुलूख महाराजांनी दूधभातासाठी म्हणून देऊन टाकला. या नंतरच्या काळात व्यंकोजीराजांना राज्यकारभारात उदासीनता प्राप्त झाली. ही वार्ता समजताच व्यंकोजी राजांनी ही मरगळ झटकून कार्यप्रवण व्हावे, म्हणून वडीलकीच्या नात्याने महाराजांनी परत पत्र धाडले व त्यांची समजूत काढली. व्यंकोजीराजांनी संघर्ष केला तरी त्यांच्याविषयी कटुता न बाळगता त्यांच्या कल्याणाचाच विचार महाराजांच्या मनात रेंगाळत राहिला. शेवटपर्यंत व्यंकोजीराजांविषयीचे महाराजांचे प्रेम कमी झाले नाही .दिपाबाई साहेबांच्या मुळेच दोन राज बंधूतील प्रेम कायम राहिले.अशा या दिपाबाईसाहेबांना आमचा मानाचा मुजरा
🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩
लेखन ::डाॅ सुवर्णा नाईक-निंबाळकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...