विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 October 2023

गडदेवता म्हणजे गडाचा आत्मा

**



गडदेवता म्हणजे गडाचा आत्मा**
सह्याद्रीच्या कुशीतील कोणत्याही गडावर एखादी गडदेवता किंवा गडदेव हा हमखास आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी गडनिर्माण करतानाच सर्वप्रथम गडदेवतेची स्थापना करण्यात येई व मग गड बांधण्यास सुरूवात होत असे. ज्या गडांवर वाघावर स्वार देवी तुम्हास दिसते, त्या गड परिसरात पूर्वी दाट जंगल होते व त्या परिसरात वाघाचा वावर होता हे आपण समजूनच जायचे. या वाघापासून गड निर्माण करणार्यांना त्याची भिती वाटू नये म्हणून वाघावर स्वार असणार्या देवीची तिथे स्थापना करण्यात आली. त्यातून त्या देवीचे नाव पडले वाघजाई. आजही आपणास रसाळगड, कावळा किल्ला, विशाळगड अशा अनेक गडांवर वाघजाई दिसते. गडावर बंबाळं रान असेल तर त्या रानातून जाणार्याला भय वाटू नये म्हणून जी देवी दुर्गनिर्मात्याने स्थापली तिचे नाव पडले रानजाई. गडावर पाण्याचं तळं असायचं. त्याकाळी गडावरचा पाण्याचा तलाव म्हणजे गडाचा प्राण. त्या तळ्याची रक्षणकर्ती म्हणून जिची स्थापना करण्यात आली ती म्हणजे, तळजाई. अशा एक ना अनेक कथांनी गडावरची देवी मंदिर जागृत दैवत झाली. सुधागडावरील भोराई, रांगण्यावरील रांगणाई, तोरण्यावरील मेंगाई व तोरणजाई, कर्नाळ्यावरील कर्णाई देवी, राजगडावरील जननी, पद्मावती देवी , रायगडावरील शिर्काईदेवी अशा एक ना अनेक देवता त्या त्या गडावर हजारो वर्षे वास करून आहेत. या खरंतर स्थळीय देवता. त्यांचा अधिकार त्या गडापुरता. गडावर काय करायचे झाले तर या देवतांचा कौल घेऊनच पुढे काम करण्यात येत असे. म्हणूनच त्यांना 'गडाची अधिष्ठाती' म्हणून मान मिळत असे.
शिवकालात या देव—देवतांची पूजा तिन्ही त्रिकाळ करण्यासाठी पुजारी नेमला जात असे. नऊरात्रातील नऊ दिवस गडावर मोठी धामधूम असे. दसरा येण्याअगोदर गडावरील तणकट, झाडोरा, गवत काढून गड नाहता केला जात असे. मूर्तीवर शेंदूर चढवला जात असे, मंदिराच्या छताची शाकारणी होत असे त्यामुळे साहजिकच दसर्या अगोदरची गडावरची धामधूम अनुभवण्यासारखी असे. या काळात भजन किर्तन, आरत्या यांनी मंदिर परिसर दणाणून जाई. गड पुन्हा नव्याने जणू जिवंत होत असे. विजयादशमीला गुळवणी पोळ्याचे जेवण व खंडेनवमीला शस्त्रपूजा, करून मांसाहारी जेवण हा प्रघातच असे. देवीची पालखीतून छबिन्याची मिरवणूक, त्या मिरवणुकीपुढे मर्दानी खेळ, लेझीम, ढोल—ताशे, हलगी — घुमक्या व झांजा वाजवून सण साजरा होत असे. असा हा गडावरील दसरा अनुभवण्याची गोष्ट होती.
पुढे काळ बदलला गडांचे महत्व कमी झाले मग साहजिकपणे गडदेवीच्या पुजा अर्चेत खंड पडला. तरीही आज अखेर प्रतापगडच्या भवानीमातेचा ऊत्सव, सुधागडच्या भोराईचा ऊत्सव, पारगडाच्या आई भवानीचा ऊत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. या समयाला गडाचे परंपरागत मानकरी ऊत्सवास आवर्जून ऊपस्थित राहतात व देवीला नमन करतात. पण बाकीच्या गडांवर तशी शांतताच असते. अशावेळी गड संवर्धन करणार्या संस्थांनी शिवप्रेमींसह गडदेवतेस वंदन करावे. मिळेल त्या रानफुलांनी देवीचे मंदिर सजवावे. दिव्यांची आरास करावी, मंदिर झाडलोट करून आंब्याच्या डहाळ्यांनी ते सजवावे. जे काही अन्न केले असेल त्याचा गडदेवतेस नैवेद्य दाखवावा. जमेल तशा आरत्या कराव्यात. जणू गडाला पुनश्चः जिवंत करावे.
आमच्या रांगण्याला पावसाळ्यात तसे जाणे धोक्याचे. त्यामुळे आम्ही कधीही दुर्गसंवर्धनासाठी गडावर गेलो की रांगणाईची पूजा, नैवेद्य, आरत्या हा बेत फिक्स असतो. दिवसभर गडावर श्रम करून संध्याकाळी देवळात परत आल्यावर देवीची केलेली पूजा मनःशांती मिळवून देते. धावत—पळत गडदर्शन करणार्यांना हे सुख अनुभवता येत नाही पण गडावर एखादी रात्र काढून गडदेवतेची पूजा केली की खरोखर मनाला अपार असा आनंद देऊन जाते. गड जगणं, अनुभवणं ही एक कला आहे, या कलेला धावत—पळत गड बघणारे मुकतात व नुसतचं पाय दुखणं घेऊन घरी परततात. पण ज्यांना गड राहून अनुभवायचा असतो ते गडजागरणाचा वरील प्रयोग करून भरल्या मनाने, अनुभवाची शिदोरी घेऊन आनंदाने गड सोडतात. हा आनंद वाचण्यापेक्षा, फोटोत बघण्यापेक्षा तेथे जाऊन जगण्यातील मजा अनुभवण्यात खरी खुमारी असते.
आपला नम्र — भगवान चिले.

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...