निष्ठा म्हणजे काय जर कुणी विचारलं तर असंख्य मावळ्यांची नाव आपल्या समोर येतात पण मराठ्यांच्या समृद्ध इतिहासातील एक महान आणि सर्वोच्च निष्ठावंत म्हणजे #जोत्याजी_कृष्णाजी_केसरकर.
जोत्याजी केसरकर हे कोल्हापुरातील पुनाळ गावचे,पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेलं हे छोटसं गाव.छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी जवळचे म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात सापडतो.छत्रपती शिवाजी राजे,छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती थोरले शाहू राजे या 3 राजांच्या पदरी निष्ठा अर्पण करणारा #जोत्याजी_केसरकर हा एकमेव मावळा.
छत्रपती संभाजी राजांना मुघलांनी धोक्याने गपचूप कैद केले,होईल तितक्या लवकर संभाजी राजांना गुप्तपणे मुघली मुलखात घेऊन जायची गडबड चालू होती.संभाजी राजांना पकडल्याची बातमी वाऱ्याच्या वेगासारखी पुनाळ गावात पोहचली आणि जोत्याजी च्या काळजात वणवा पेटला.
जोत्याजी नेहमी संभाजी राजांच्या सोबत अंगरक्षका सारखे असायचे,नेमकं या वेळी राजांनी त्यांना सोबत नेलं नाही आणि हा प्रसंग घडला.जोत्याजींनी घोडी सज्ज केली पाहता पाहता 100 मावळा सज्ज झाला.आप्पाशास्त्री दिक्षित आणि जोत्याजी केसरकर संभाजी राजांना वाचवण्यासाठी सज्ज झाले.मुखरबखानाचा तळ बत्तीस शिराळा जवळ पडला होता.एका बाजूने जोत्याजी आणि एका बाजूने आप्पा शास्त्री दिक्षित दोन तुकड्या करून 100मावळे घेऊन हजारो मुघलांच्या सैन्य सागरात आपल्या राजाला वाचवण्यासाठी शिरले.लढणाऱ्या मावळ्यांना मृत्यू समोर दिसत होता पण प्रत्येकाच्या पहाडी छातीत असलेल्या काळजात त्यांच्या संभाजी राजे त्यांना दिसत होता.जीवाची पर्वा न करता 100 मावळा आपल्या राजाला शोधत होता.आप्पा शास्त्री दिक्षित पडले त्यांना वीरमरण आलं.हळूहळू निष्ठवंतांची गर्दी कमी होऊ लागली.निष्ठवंतांच्या लालभडक इनामी रक्ताच्या अभिषेकाने ती 32 शिराळ ची भूमी पवित्र झाली.आपल्या राजाच्या रक्षणासाठी त्या तळावर 100 मावळे कमी आले.एकमेव जोत्याजी केसरकर जखमी अवस्थेत कसतरी त्या वेढ्यातून बाहेर पडले ते थेट रायगडावर आले.
दुर्गराज रायगडावर सगळे काळजीत होते.तोच जुल्फिकार खान नावाचा एक मुघल सरदार रायगडाला वेढा देऊन बसला.महाराणी येसूराणी यांनी राजाराम राजांचा राज्याभिषेक करून त्यांना जिंजी कडे पाठवून दिले.
रायगडावर राजांचा कुटुंब कबिला होता.संभाजी राजांना वीर मरण आलं सारा रायगड हळहळला.8 महिने रायगड लढला.सारी रसद संपली आणि रायगड मुघलांच्या ताब्यात द्यायची वेळ आली तेव्हा राज परिवार सोडता सर्वांना सुखरूप सोडणार होते.
जोत्याजी केसरकर सुद्धा रायगड किल्ल्यावरून सुटणार होते पण जोत्याजीच्या काळजातली निष्ठेची ज्योत त्यांना येसूराणी आणि बाळ शिवाजी राजांना सोडून जायला तयार न्हवती.स्वतःहून जोत्याजी कैद झाले आणि आपलं उर्वरित आयुष्य संभाजी महाराजांच्या पुत्राची सेवेत घालवण्यासाठी ते मुघलांच्या कैदेत गेले.
ओरगजेबाने बाळ शिवाजी च नाव शाहू ठेवलं,त्यांना 7 हजारी मनसबदारी दिली.त्यांच्या पदरी कैदेत असलेले जोत्याजी केसरकर कायम ठेवले.जवळजवळ 18 वर्ष शाहू राजांच्या सोबत जोत्याजी केसरकर ढाली सारखे उभे राहिले.रुस्तुमराव जाधवरावांच्या मुलीचा विवाह शाहू राजांसोबत लावून द्यायला जोत्याजींनी मद्यस्ती केली होती.
शाहू राजांसोबत कैदेत वाट्याला आलेली सुख दुःख भोगत जोत्याजींनी शाहू राजांच्या मनात स्वराज्याची धग आणि मावळ्यांच्या पराक्रमाचा कथा कायम ठेवत ठेवल्या त्यातूनच शाहू राजांच्या मनात राजा बनायची ऊर्जा निर्माण झाली.शाहू राजांचे शिक्षक म्हणून जोत्याजींनी कामगिरी पार पाडत शाहू राजांच्या रूपाने एक सक्षम आणि धोरणी,राजकारणी,कार्यक्षम राज्यकर्ता घडवला.
एक कथा सांगितली जाते.औरंगजेबाच्या छावणीत सरपण शिल्लक न्हवत औरंगजेब इतका गरीब झाला होता की सरपण विकत ग्यायला सुद्धा त्याच्याकडे पैसे न्हवते.आशा वेळी शाहू राजांना सुद्धा उपासमार सहन करावी लागत होती तेव्हा एकदा आई जगदंबे चा पोत जाळून त्यावर जोत्याजींनी भात शिजवला होता.ही फक्त एक कथा सांगितली जाते.त्याला काही संदर्भ सापडले तर तशी पोस्ट येईल.
पुढं औरंगजेब मेल्यावर शाहू राजांच्या सोबत 200 लोकांची सुटका झाली.येसूराणी आणि राजपरिवरातील काही लोक ओलीस म्हणून मुघल दिल्लीला सोबत घेऊन गेले.
जोत्याजी केसरकर शाहू राजांच्या सोबत महाराष्ट्रात आले.शाहू राजांनीं अवघ्या एक वर्षात स्वतःचा राज्याभिषेक केला.त्यात राजांच्या बीनीच्या हत्तीवर स्वराज्याच जरी पटका भगवा घेऊन छत्रपतींच्या सैन्याच नेतृत्व करायची जबाबदारी जोत्याजी केसरकर यांच्या सोपवली.
1719 मध्ये शाहू राजांनी आखलेल्या दिल्ली मोहिमेत जोत्याजी केसरकर होते.दिल्लीच्या बदशहासोबत झालेल्या तहाची काही कागदपत्रे आणि सनदा मिळायला उशीर होणार होता तेव्हा जोत्याजी दिल्लीत एकटे थांबले आणि सर्वात शेवटी सनदा घेऊन सुरक्षित स्वराज्यात आले.
थोरले शाहू राजांसोबत कैदेत 18 वर्ष असल्याने जोत्याजी केसरकर अजून अविवाहित होते.शाहू राजांनी जोत्याजींना लग्न करायचा सल्ला दिला.जोत्याजींचं लग्न झालं.जोत्याजींनी सरदेशमुखी होती.केदारजी, मनोजी आणि भवानी ही जोत्याजी केसकरांची अपत्ये शाहू राजांनी जोत्याजींच्या मृत्यूनंतर या मुलांना आगासखेड परगण्यातल्या सेवगावची देशमुखी दिल्याचं पत्र शाहू दप्तर मध्ये पाहायला मिळत.शाहू राजांनी जोत्याजीच्या स्मरणार्थ सातारा शहरात केसरकर पेठ निर्माण केली ती आजही पाहायला मिळते.
आशा या महान स्वामिनिष्ठ मावळ्याची समाधी/स्मारक पुनाळ गावात आहे.
लेखन - #मंगेश_गावडे_पाटील
संदर्भ -
1) शाहू दप्तर
2)शेडगावकर भोसल्यांची बखर
3) छत्रपती थोरले शाहू महाराज चरित्र
No comments:
Post a Comment