*छ्त्रपती संभाजी महाराजांचे दानपत्र*
म.म.दत्तो वामन पोतदार यांनी हे दानपत्र प्रथमतः उजेडात आणले. भा. इ. सं. मंडळाच्या १५व्या वाढदिवसाला प्रकाशित करण्याचा हेतूने या इ.स. १९२८ मध्ये या दान पत्राबद्दल लिहून ठेवले होते परंतु ते प्रकाशित करण्यापूर्वी त्यांचे निधन झाले. पुढे मंडळाने आवश्यक टीपांसहीत हे दानपत्र प्रकाशित केले. डॉ. कमल गोखले यांनी आपल्या शिवपुत्र संभाजी या ग्रंथात या दानपत्राचा उल्लेख आलेला आहे. अलीकडे डॉ. सदाशिव शिवदे यांनी ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा आणि डॉ. केदार फाळके यांनी छ्त्रपती संभाजी महाराजांची राजनीती या पुस्तकात अर्थासहित व टीपांसहीत छापलेले आहे.
•दानपत्र विषयक :-
१) प्रस्तुत चे दानपत्र संभाजी राजे यांनी जामदग्न्यगोत्री आश्वलायनसूत्री ऋग्वेदांतर्गत शाखाध्यायी कऱ्हाडे ब्राह्मण परशुराम क्षेत्रातील कुडाळ येथील नगरोपाध्याय बाकरे, नामदेवभट्ट यांचे पुत्र, महाशय सर्व मांत्रिकात श्रेष्ठ यांना दिलेले आहे. हे दानपत्र राज्याभिषेक शक ७, श. १६०२ भाद्रपद शु १३ इ. स. २७ ऑगस्ट १६८० चे आहे. राज्यपद प्राप्त झाल्या नंतर हे दानपत्र करून दिलेले आहे.
२) दानपत्र हे ३००cm लांब असून २३.५cm रुंद आहे. एक कागद ५०cm लांबीचा असून ५ ठिकाणी जोडलेला आहे. कागदपत्र पोर्तुगीज बनावटीची असून त्यावर वेलबुट्टी व पानांची नक्षी आहे.
३) पत्राच्या शिरोभागी देवदेवतांना अनुलक्षून श्लोक वगैरे आहे. परंतु पसरल्या मुळे तो नीटसा दिसत नाही. त्या श्लोकाचा अर्थ पुढीप्रमाणे:-
श्री
डोक्यावरील जटांना स्पर्श केल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या, त्रैलोक्यनगरीच्या मूलस्तंभस्थानी असलेल्या शंकराला नमस्कार असो.
ब्रह्मामध्ये ज्याचा आनंद आहे, परमसुखद, कैवल्याची मूर्ती, सुख-दुःखादी द्वंद्वांच्या पलीकडे असणाऱ्या, आकाशासमान (व्यापक), तत्वमसि इत्यादी उपनिषदांतील वाक्यांनी बोध होणाऱ्या, एकमेव, नित्य, विशुद्ध, स्थिर, सर्वज्ञानाला साक्षीभूत असलेल्या, संकल्प-विकल्पांच्या पलीकडील, सत्व, रज, तम, या त्रिगुणांच्या विरहित असलेल्या सद्गुरूला मी नमस्कार करतो.
४) त्यानंतर महाराजांचा १६ बुरजी पिंपळपानी शिक्का असून त्याखाली दोन ओळींचा मजकूर आहे. अक्षर वळणदार असून ते दस्तुरखुद्द संभाजी राजे यांचे आहे. व लिहिलेल्या मजकुराचा अर्थ ' शिवराज पुत्र म्हणजे शिवाजी महाराज यांचा मुलगा संभाजी राजा या लिहिलेले मान्य आहे '.
५)पत्रावर रघुनाथ नारायण हणमंते यांनी लेखनालंकार हा शेरा मारला आहे. तर शुभमस्तू ही दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव यांच्या हस्तकक्षरातील. पत्राच्या सुरवातीला डाव्या बाजूस प्रल्हाद निराजी यांची मुद्रा आहे. तर पत्राच्या प्रत्येक जोडावर मर्यादा हा शिक्का आहे.
•पत्रातील ऐतिहासिक उल्लेख:-
१)' हैंदवधर्मजीर्णोद्धारणकरणधृतमतिः '
सदरचे विशेषण शहाजी राजांना लावले आहे. शहाजी राजे यांनी हैंदवधर्म जीर्णोद्धाराकरिता नेमके काय केले ते सांगता येत नाही. शहाजी राजे यांच्या उपलब्ध ५४ पत्रांपैकी तब्बल १४ पत्रे ही मोरया गोसावी यांना इनाम व दानधर्म विषयक आहेत. शिवाय शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव देवस्थानाची व्यवस्था नीट रहावी म्हणून त्या गावची पाटिलकी आपल्या नावे त्याने करून घेतली होती.[या पाटिलकी संबंधीचे पत्र मी वाचलेले नाही. त्यामुळे डॉ. ग. ह. खरे यांनी संपादित केलेल्या शि.च.सा १४ मध्ये हा उल्लेख जसाच्या तसा इथे देत आहे.] या खेरीज दानपत्रात शहाजी राजांनी मंदिरांचे रक्षण केले, माहुली गडावर छत्र धारण करून व शत्रू सेनेला जर्जर करून स्वामी धर्माचे रक्षण केले [महाबली दुर्ग्रहन] असे नमूद आहे.
२)'देवब्राह्मणप्रतिपालक' :-
सदरहू विशेषण शहाजी राजे यांचे वडील आणि शिवरायांचे आजोबा मालोजी राजे यांच्या साठी वापरले आहे. मालोजी राजे यांनी शिखर शिंगणापूर येथे स्वखर्चाने तलाव खोदून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष हटवून येणाऱ्या भाविकांची पाण्याची समस्या दूर केली [शिखरवामीशंभुमहादेव].
३)' म्लेंच्छक्षयदिक्षित' :-
म्लेंच्छांच्या क्षयाची दीक्षा घेतलेले माझे वडील आहेत असे संभाजी राजे म्हणतात. शिवरायांनी अफजलखानाला बीचव्याने मारले असे ते सांगतात [अफजल्लक्षस्थलोद्दालनविछूछालन]. या शिवाय बादशहाचा मामा याचे ही मर्दन त्यांनी केले ज्याप्रमाणे जयद्रथचे पार्थाने केला.[सुरत्राण मातुळ]
४)'विजयपुराधिश्वरभागानगरेशादिछ्त्रपतीप्रार्थ्य.....शिवराजपुत्रेण' :-
विजापूरचा बादशाह, आणि भागानगर चा निजाम (कुत्बशहा) हे छत्रपतींच्या पराक्रमाचा आश्रय घेऊ इच्छितात. आंब्याच्या मोहराप्रमाणे ज्याचे पाय पिवळे झाले आहेत, क्षत्रियकुलावतंस भोसले कुळसागरात चंद्राप्रमाणे शोभायमान पृथ्वीलोकांतील जणू काही इंद्र छ्त्रपती शिवरायांचा पुत्र आहे. या शिवाय यात मंत्र्यांचा उल्लेख दुष्ट असा केला आहे. दिलेरखाना [दलेलासुर] सोबत भूपाळगड घेतल्याचा उल्लेख आहे. यात कवी कलश याचा उल्लेख ज्याच्या प्रोत्साहनामुळे ज्याच्या डोळ्यांना लाली आली आहे असा केला आहे. यावरून राज्यप्राप्ती कलशने महाराजांना मदत केली असावी असे एकूण दिसते.
अश्या ऐतिहासिक माहितीने भरलेले हे दानपत्र. भोसलेंच्या ४ पिध्यांबद्दल सांगून जाणारा हा कागद ऐतिहासिकदृष्ट्या निश्चित महत्त्वाचे तर आहेच शिवाय संभाजी महाराज यांनी स्वतः विदित केल्यामुळे अधिक महत्त्वपूर्ण आहे.
संदर्भ:- १) शिवपुत्र संभाजी:- डॉ. कमल गोखले
२) ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा:- डॉ सदाशिव शिवदे
३)भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक वर्ष ६१ अंक:- २-४
४)छ्त्रपती संभाजी स्मारक ग्रंथ:- डॉ. जयसिंगराव पवार
फोटो :- संभाजी महाराज यांचे दानपत्र
No comments:
Post a Comment