छत्रपती राजा"राम" महाराज आणि विजयादशमी...!!
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोगल बादशहा औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. औरंगजेबाच्या या प्रचंड आक्रमणाचा प्रतिकार करत असतानाच छत्रपती संभाजीराजे अचानकपणे कैद झाले. पुढे त्यांची मोगली छावणीत अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. मराठा स्वराज्यावर भयानक संकट कोसळले. स्वराज्यातील गडकोट-ठाणी शत्रूच्या हाती पडू लागली, रायगडाला वेढा बसला. त्या वेढ्यातून छत्रपती राजाराम महाराज निसटून पन्हाळ्यावर आले. तेव्हा पन्हाळ्यालाही मोगलांचा वेढा बसला. अशा बिकट परिस्थितीत विजयादशमीचा सण आला. हा सण छत्रपती राजाराम महाराजांनी पन्हाळगडावर कसा साजरा केला‚ याचे वर्णन त्यांच्या पदरी असणाऱ्या केशवपंडित नावाच्या एका कवीने राजारामचरितम या ग्रंथात केले आहे. तो म्हणतो −
‘‘ प्रातःकाळी राजाने आवश्यक विधी उरकून देवब्राह्मणांचे पूजन केले व चतुर्विध अन्न सेवन केले. नंतर सायंकाळी आपण स्वतः गजावर आरूढ होऊन‚ अश्वारूढ झालेले मंत्री‚ मुख्य सेनापती‚ त्याचप्रमाणे दुसरे सेनानायक‚ पायदळ‚ पायदळाचे नायक‚ गजांवरून व अश्वांवरून लढणारे योद्धे‚ ब्राह्मण‚ क्षत्रिय‚ वैश्य शूद्रादी इतर लोकांसह सुंदर खोगिरांनी युक्त‚ उंच व भूषित केलेले घोडे झुलीने व लोलक घंटादिकांनी अलंकृत केलेले व तज्ज्ञांनी शिकविलेले असे मोठे हत्ती पुढे चालत असता‚ तो राजा विजयादशमीच्या सुमुहूर्तावर निघाला. नंतर ईशान्य दिशेस असलेल्या शमी वृक्षाचे व आपट्याचे विधिपूर्वक पूजन केल्यानंतर कवींनी स्तुती केलेला असा तो महोत्साही व तेजस्वी राजा आपल्या मंदिरात परतला. तेथे उदार अंतःकरणाच्या व प्रेमवर्धन करणाऱ्या त्याच्या स्त्रियांनी त्याला निरांजनांनी ओवाळले.’’
वरील वर्णनात कवीचा काव्यात्मक प्रतिभेचा भाग वगळला तरी छत्रपती विजयादशमीच्या मुहूर्तावर कशा वैभवाने व थाटाने शमी वृक्षाच्या पूजनासाठी आपल्या प्रासादाबाहेर पडत असत याची कल्पना आपण करू शकतो. खुद्द शिवछत्रपतींच्या विजयादशमीच्या मिरवणुकीचे वर्णन आपल्या हाताशी नाही. पण छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील या मिरवणुकीवरून रायगडावरील शिवछत्रपतींच्या विजयादशमीच्या मिरवणुकीचे चित्र आपण आपल्या नजरेसमोर आणू शकतो...
संदर्भ - डॉ. जयसिंगराव पवार, मराठेशाहीचे अंतरंग
No comments:
Post a Comment