विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 25 October 2023

जागर_मराठेशाहीचा_जागर_स्री_शक्तीचा: 💐 आजच्या नवव्या महादुर्गा बायजाबाई शिंदे

 

#

जागर_मराठेशाहीचा_जागर_स्री_शक्तीचा
:
💐 आजच्या नवव्या महादुर्गा बायजाबाई शिंदे
नववी माळ बायजाबाईसाहेब शिंदे यांच्या चरणी अर्पण 💐
मराठेशाहीमधे राजमाता जिजाऊ, येसूबाई राणीसाहेब, महाराणी ताराराणी ,सरसेनापती ऊमाबाई साहेब दाबाडे यांच्यानंतर जे नाव इतिहासामध्ये आदराने घेतले जाते ते सर्वात सुंदर दक्षिण लावण्यवती व धुरंदर राजकारणी गाल्हेरच्या राणी बायजाबाई शिंदे यांचे..
या राणीने मराठेशाहीच्या राजकारणात जो धुमाकूळ घातला तो इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. पण मराठ्यांनी या बायजाबाई शिंदे साहेब यांची साधी दखलही घेतली नाही.
बायजाबाई शिंदे या गाॅल्हेरच्या राणीसाहेब . यांचा जन्म कागलकर घाडगे घराण्यातील .त्यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. बायजाबाई साहेब या अत्यंत सुंदर व देखण्या होत्या. घोड्यावर बसण्यात त्या अत्यंत पटाईत होत्या. बायजाबाई शिंदे यांना कित्येक इतिहासकारांनी "दक्षिणची सौंदर्यलतिका 'अशी संज्ञा दिली आहे. इंग्रज लेखकांनी बायजा बाईंना( ब्युटी ऑफ डेक्कन ) असे म्हटलेले आहे. राजस्थानातील कृष्णकुमारी इत्यादी लोकप्रसिद्ध लावण्यवतीच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठी राज्यकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले, त्याच प्रमाणे बायजाबाईंचे लग्नसुद्धा महाराष्ट्रातील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झाले .
अनेक सरदारांनी सर्जेरावांचे मन वळवून बायजाबाईंचे लग्न दौलतराव शिंदे यांच्याशी लावून दिले. हे लग्न पुणे मुक्कामी मोठ्या थाटामाटात पार पडले होते. लग्न झाल्यानंतर बायजाबाई आपल्या पतीबरोबर लष्करात असत. त्या सर्व राजकारण जातीने पाहात होत्या.
दौलतराव शिंदे यांचा १८२७ साली मृत्यू झाला. तत्पूर्वी आपला राज्यकारभार बायजाबाई यांनीच सांभाळावा अशी दौलतराव शिंदे यांची इच्छा होती. त्यामुळे बायजाबाई यांच्याकडे गाल्हेरच्या सर्व कारभाराची सूत्रे आली.
दौलतराव यांच्या मृत्यूनंतर या महादजी शिंदे यांच्या सुनेने म्हणजेच बायजाबांईनी दत्तक न घेता सर्व कारभार आपल्या हातात घेतला .परंतु त्यांनी संस्थानचा कारभार पाहण्यासाठी दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिकांची इच्छा होती . तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट यांनीही व्यक्त केली होती. नागरिकांच्या ईच्छेखातर बायजाबाई यांनी पाटलोजी शिंदे यांचे पुत्र मुगुटराव यांना १२ व्या वर्षी दत्तक घेतले. बायजाबाई यांची राजकीय कारकीर्द फक्त ६ वर्षे पर्यंत होती.
.सरासरी सहा वर्ष त्यांची राजकीय कारकीर्द गाजली होती .परंतु तेवढ्या अवधीमध्ये त्यांनी मोठ्या दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालवला. बायजाबाई शिंदे या अतिशय तेजस्वी सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असे म्हटले आहे. मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी "बायजाबाई शिंदे यांचा कारभार पाहता त्यांनी उत्तराधिकारी व्हावं हा दौलतरावांचा विचार किती बरोबर होता हे समजते.
बायजाबाई या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या ,अशा आशयाचे वर्णन १८३३ साली प्रसिद्ध केले होते. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही ज्ञानकोशात विशेष स्थान देऊन त्यांचे वर्णन लिहिले आहे.
बायजा बाईंच्या नशिबी पुढे पुढे वनवासच आला. १८३३ साली बायजाबाई यांना अटक करण्याच्या हालचाली होत असतानाच बायजाबाई राजवाड्यातून निसटल्या आणि त्या हिंदुराव यांच्या वाड्यात आश्रयाला गेल्या .तेथून त्यांनी ब्रिटिश रेसिडेंट कॅव्हेंडिश यांच्याकडे मदत मागितली. परंतु या सर्व खटाटोपात जनकोजी शिंदे यांचे पारडे जड ठरले. आणि बाईजाबाईना गाॅल्हेर सोडावे लागले.
१८४० ते १८४५ अशी पाच वर्ष बायजा बाईंना नाशिकमध्ये काढावी लागली. १८४४ साली जनकोजी शिंदे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी जयाजीराव शिंदे यांना दत्तक घेऊन राज्यकारभार सुरू केला. त्यानंतर बायजाबाई पुन्हा ग्वाल्हेरला आल्या.
दुसऱ्या बाजीराव यांना जी मुलगी बहात्तराव्या वर्षी झाली तिचे नाव बयाबाई साहेब उर्फ सरस्वती साहेब. पेशव्यांच्या मृत्यू बरोबर पेशवे घराण्याचे औरस पुरुष समाप्त झाले. मागे उरली ती एकमेव निशाणी दुर्दैवी बयाबाई साहेब .वडिलांच्या मागे ती ६६ वर्षे जिवंत होती .बायजाबाई शिंदे यांनी मोठ्या कौतुकाने या लहान मुलीचे लग्न त्यांच्याच एका सरदार पुत्राबरोबर ठरवले. व आपल्या राजवाड्यात मोठ्या थाटामाटात हे लग्न लावून दिले.
पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदे सरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणीसाहेबांनी बांधलेले आहे .
१८५७ च्या युद्धापूर्वी अनेक गावांमध्ये काही माणसे चपात्या किंवा पोळ्या घेऊन जायची व गावकऱ्यांना एकत्र करून या चपात्या खाण्याची पद्धत होती. हजारो गावांमधून अशा चपात्या युद्धापूर्वी पोहोचवल्या गेल्या .प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले तर सैन्याला रसद पुरवठा कसा करायचा याची योजना चपात्यांचा वाटपातूनच बायजाबाई यांच्या विचारातूनच साकारली गेली .
बायजाबाई यांनी १८५७ च्या युद्धाचा वेळी खुप मोठा यज्ञ केला होता. यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली . अनेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करु लागले. या यज्ञाचा हेतूच गोपनीय माहिती गोळा करण्याचा होता.१८५७ चे स्वातंत्र्यसमर फसले पण या राणीसाहेबांचा दबदबा मात्र चोहीकडे टिकून राहिला.
.पुढे राज्यात जनकोजी शिंदे व बायजाबाई यांचा बेबनाव होऊन राज्यात बंड झाले. बंडाची परिसमाप्ती होऊन सर्वत्र शांतता झाल्यावर बायजाबाई जाऊन गाॅल्हेरमधे राहिल्या .तेथेच त्याचे निधन झाले .
काही विद्वानांनी यांच्याबद्दल जे उद्गार काढले आहेत,ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करतात .तत्कालीन 'मुंबई गॅझेटमध्ये,बायजाबाई यांचे जे मृत्यू वृत्त आले त्यात असे म्हटले होते की ," बेगम सुमरू ,नागपुरची राणी, झाशीची राणी ,लाहोरची चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिद्ध स्त्रियांमध्ये ही राजस्त्रीहि आपल्या परीने प्रख्यात असून हिने अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोड्यावर बसून टक्कर दिली होती"
अशा या शूर व तेजस्वी सौदामिनीचा वृद्धापकाळामुळे २७ जून १८६३ साली ग्वाल्हेर मध्ये मृत्यू झाला. ग्वाल्हेर संस्थानाच्या कारभाराच्या वाटचालीत त्या सहा दशकांहून अधिक काळ साक्षीदार राहिला.
🙏अशा या शूर व धाडसी बायजाबाई साहेब यांना नवव्या माळेचा मान जातो 🙏
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...