विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 23 October 2023

नागपूरकर भोसले व इंग्रज यांच्यात झालेल्या अकोल्यातील अडगाव येथील युद्धाची विस्तृत माहिती भाग ३

 


नागपूरकर भोसले व इंग्रज यांच्यात झालेल्या अकोल्यातील अडगाव येथील युद्धाची विस्तृत माहिती
भाग ३
लेखन :सतीश राजगुरे
वऱ्हाडात घट्ट पाय रोवण्याच्या व सत्ता स्थापनेच्या उद्देशाने इंग्रजांचा वऱ्हाड प्रांतातील हा पहिलाच विजय मानला जातो. कारण या विजयामुळे नागपूरकर भोसल्यांच्या इतर प्रांतावरही सहजतेने अधिकार मिळवता येतो, असा विश्वास वेलस्लीला आला. त्यातूनच भोसल्यांच्या ताब्यातील समृध्द किल्ला 'गाविलगड' हस्तगत करण्याचा बेत इंग्रजांनी आखला. अडगावच्या युद्धामुळे मराठ्यांमधील एकीही समोर आली. अडगाव येथे झालेल्या लढाईच्या वेळी नागपूर प्रांताचा रेसिडेंट एल्फिन्स्टन उपस्थित होता.
शिरसोली गावचे ज्येष्ठ नागरिक व तत्कालीन पोलीस पाटील केशवराव खोटरे पाटील यांनी दिलेली माहिती व अकोला जिल्हा गॅझेटियरमध्ये केलेले वर्णन असे आहे-
त्यावेळी शिरसोली गावची लोकसंख्या साधारणपणे २००० होती. मुख्य लढाई गावाला लागून असलेल्या पूर्वेकडील ओसाड जमिनीवर झाली. आता तेथे बाभळीचे जंगल वाढलेले असले तरी पूर्वी हा भाग मोकळा होता. येथील जमिनीची माती पांढरी आहे. म्हणून त्या जागेला 'पांढरी' असेही म्हणतात. येथून जवळच सातपुड्यातून येणारी विद्रूपा नदी सुध्दा वाहते. त्यावेळी तोफेच्या गोळ्यांनी गावातील एका मंदिराच्या भिंतीवर पडलेली भगदाडे काही वर्षांपूर्वीपर्यंत दिसत होती. इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे पडक्या अवस्थेतील थडगे गावापासून दीड कि.मी. उत्तरेला आहे. त्याच्या दक्षिणेला आणखी एक इंग्रज अधिकारी मारला गेल्याचे सांगितले जाते.त्यावेळी शिरसोली गावास मोठी तटबंदी, बुरुज आणि दोन भक्कम प्रवेशद्वार होते. युद्धाच्या वेळी आजूबाजूच्या खेड्यातील लोकही सुरक्षेसाठी या गावात येऊन राहिले होते. सात दिवसात दोन्हीकडच्या सैन्यातील एकही सैनिक गावात फिरकला नाही व गावचे फारसे नुकसान झाले नाही. प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे युद्ध सात दिवस चालले. लढाईच्या त्या सात दिवसात गाव आणि लोक सुरक्षित राहिले. इंग्लंडमधून अनेक इतिहास संशोधक, अभ्यासक शिरसोली येथील युद्धभूमिला दरवर्षी आवर्जून भेट देतात. आपल्या देशात हे ऐतिहासिक युद्ध स्थळ मात्र पूर्णतः दुर्लक्षित असून स्थळाचा अद्यापपर्यंत तरी काहीच विकास झालेला नाही.
अडगाच्या लढाईनंतर वेलस्लीने निजामाच्या मदतीने गाविलगडवर आक्रमण केले. त्यावेळी बेनीसिंग राजपूत हा गाविलगडचा किल्लेदार होता. १३ ते १५ डिसेंबर १८०३ असे तीन दिवस इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झालेल्या गाविलगडच्या लढाईत इंग्रजांचा विजय झाला. यानंतर नागपूरकर भोसले व इंग्रज यांच्यात १७ डिसेंबर १८०३ रोजी जो तह झाला, तो 'देवगावचा तह' म्हणून प्रसिद्ध आहे.
या तहानुसार रघुजी भोसले यांनी बंगाल मधील युद्धातून जिंकलेले कटक, दक्षिण वऱ्हाड, संबलपूरचा प्रदेश व पुढे पाटणाही जनरल वेलस्लीला देऊन टाकला. त्यामुळे ओरिसा, बिहार आणि बंगालवर असलेली मराठ्यांची सुमारे अर्ध्या शतकाची सत्ता संपुष्टात आली. अडगावच्या युद्धातील पराभव शिद्यांनाही खूप महागात पडला. ३० डिसेंबर १८०३ रोजी 'अंजनगाव सुर्जी' येथे झालेल्या तहात त्यांना आपल्या ताब्यातील अनेक प्रदेशांवर पाणी सोडून तो प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीस द्यावा लागला.
संदर्भ -
१. अकोला जिल्हा गॅझेटियर
२. वऱ्हाडचा इतिहास- या.मा.काळे
३. वऱ्हाडचा स्वातंत्र्य लढा
एका इंग्रज अधिकाऱ्याचे थडगे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...