विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 23 October 2023

नागपूरकर भोसले व इंग्रज यांच्यात झालेल्या अकोल्यातील अडगाव येथील युद्धाची विस्तृत माहिती भाग १

 


नागपूरकर भोसले व इंग्रज यांच्यात झालेल्या अकोल्यातील अडगाव येथील युद्धाची विस्तृत माहिती
भाग १
लेखन :सतीश राजगुरे
नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्यात अकोला जिल्ह्यातील अडगावनजीक तीन मैल दक्षिणेस असलेल्या शिरसोली गावाजवळ २९ नोव्हेंबर १८०३ रोजी जी तुंबळ लढाई झाली ती 'अडगावची लढाई' म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. आसई पाठोपाठ अडगाव येथे इंग्रजांशी झालेल्या दुसऱ्या लढाईतही मराठा सैन्याने मार खाल्ला.
इंग्रज-मराठा यांच्यात झालेल्या या द्वितीय युद्धात इंग्रजांनी शिंदे व भोसले यांच्या विरोधात स्वतंत्र आघाडी उघडली होती. सर्वप्रथम शिंद्यांचा बराच प्रदेश इंग्रजांनी काबीज केला. कर्नल जेम्स स्टिव्हन्सन याने आधी बुऱ्हाणपूर जिंकून घेतल्यानंतर मध्यभारतातील अतिशय महत्वाचा अशिरगड किल्लाही जिंकून घेतला. या विजयामुळे इंग्रजांचा वऱ्हाड प्रांतात शिरण्याचा मार्गच जणू मोकळा झाला व त्यांनी नागपूरकर भोसल्यांच्या विरोधात आघाडी उघडली.
दुसरीकडे इंग्रज वऱ्हाडवर आक्रमण करणार ही बातमी रघुजी राजे भोसले यांना लागताच त्यांनीही सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली. वऱ्हाडातील गाविलगड हे भोसल्यांचे सर्वात मोठे ठाणे होते. वऱ्हाडातील हा सर्वात मोठा किल्ला 'भोसल्यांची तिजोरी' म्हणून ओळखला जात असे.
त्यामुळे इंग्रज सैन्य याच किल्ल्यावर आक्रमण करेल, हा इंग्रजांचा मनसुबा रघुजीने ओळखला. लगोलग भोसल्यांनी आपले सैन्य बाळापूर येथे गोळा केले. शिंदे यांचे सैन्य देखील मलकापूर मार्गे वऱ्हाडात पोहोचले. त्यानंतर दोघांचे सैन्य वऱ्हाड प्रांताच्या संरक्षणासाठी गाविलगडाच्या पायथ्याशी असलेल्या आकोट येथे दाखल झाले. कर्नल स्टिव्हन्सन याच्या आदेशावरून मेजर जनरल ऑर्थर वेलस्ली ह्याने लोणार, मेहकर व राजूरचा घाट या मार्गाने सैन्याची जमवाजमव करून वऱ्हाड प्रांतावर हल्ल्याचा बेत आखला. इंग्रजांचे सैन्य ज्या परतवाडा भागात थांबले तो परिसर 'एलिचपूर कॅम्प' म्हणून ओळखला जात असे.
वऱ्हाड प्रांतावर हैदराबादच्या निजामाचा अंमल असल्यामुळे त्यालाही भोसल्यांच्या दिवाणी अधिकाराला आवर बसावा, असे वाटत होते. त्यावेळी निजामातर्फे अचलपूरचा नबाब अंमलदार म्हणून वऱ्हाड प्रांतात कारभार पाहत होता. त्यामुळे अचलपूरचा नबाब सलाबतखानच्या सहाय्याने निजामाचे सैन्य गाविलगड किल्ल्यापर्यंत पोहोचले. स्टिव्हन्सन व वेलस्ली यांचे सैन्य एकत्रित आल्याने इंग्रजांची ताकदही वाढली. त्यातच निजामाने सुध्दा सहाय्य केल्याने इंग्रजांचा विजयाचा मार्गच सुकर झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...