विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 2 October 2023

रत्नजडित पगडीधारी छत्रपती शाहू आणि पगड्यांचा इतिहास !

 

रत्नजडित पगडीधारी छत्रपती शाहू आणि पगड्यांचा इतिहास !
लेखन ::मालोजीराव जगदाळे


आजपर्यंत उपलब्ध असलेल्या छत्रपती शाहू यांच्या सर्व चित्रात शाहूराजांचे मस्तक हे पगडी किंवा पागोटे विहीन होते आणि पेहराव विरक्तअवस्थेतील होता. परंतु येथील उपलब्ध चित्रात प्रथमच शाहू छत्रपती यांच्या मस्तकावर रत्नजडीत पगडी दिसत असून त्यांचा पेहराव सुद्धा राजेशाही आहे , पूर्ण वस्त्रांसह अंगावर अनेक आभूषणे दिसत आहेत. छत्रपतींच्या मागे सरसेनापती (शिष्टाचाराप्रमाणे ) खंडेराव दाभाडे आसनस्थ झाले आहेत. शाहूंच्या एका हातावर पक्षी आहे ( शाहू छत्रपतींचे पक्षी - प्राणी प्रेम सर्वश्रुत आहे )
हे चित्र आमचे मित्र अभिषेक कुंभार Abhishek Kumbhar आणि सरदार दाभाडे यांचे वंशज सत्यशीलराजे दाभाडे यांच्या सहकार्याने उपलब्ध झाले आहे .छत्रपती शाहू यांनी विशेष प्रसंगी खंडेराव दाभाडे यांच्या वाड्याला भेट दिली त्या वेळी हे चित्र काढण्यात आल्याचे सत्यशीलराजे यांनी सांगितले .
छत्रपती शाहूंच्या पगडीपासून प्रेरणा घेत . पगडबंदांनी शिंदेशाही , होळकर, गायकवाडी पगड्या बांधण्यास आरंभ केल्या-असाव्यात . याव्यतिरिक्त मोगली-पगडी,राजस्थानी-पगडीपेशवाई पगडी असे पगडीचे वेगवेगळे प्रकार प्रचारात होतेच . या बहुतेक पगड्या पिळाच्या असत.
राजासाठी पगडी,जिरेटोप,मंदिल,किमोंश यांचे महत्व अनन्यसाधारण होते. दोईवरील मंदिल काढून शत्रूसमोर ठेवणे म्हणजे स्वतःचे राज्यच शत्रूला देणे होय.
आभूषणांइतकीच किंवा त्याहूनही अधिक पुरुषवर्गाची पगडी महत्त्वाची होती. आज आपल्याला पगडी आणि पागोट्यांचा विसर पडला असला,तरी ती एके काळी सर्वस्व होती. इतकेच नव्हे तर, कुटुंबाचा मान-सन्मान, घराण्याची इभ्रत, घराण्याची प्रतिष्ठा, दर्जा,धर्म,रुबाब, ऐट असे सर्वांगीण गुण पगडीत समाविष्ट असत. म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या पायावर पगडी ठेवणे म्हणजे आपले सर्वस्व गमावल्याप्रमाणेच होते.
१० व्या शतकात पगड्या शंकर-पाळ्याच्या आकाराच्या असत.मध्य-युगीन काळात मोगल पद्धतीच्या पगड्या प्रचलित झाल्या.त्या उंच,गोल, टोपीभोवती तलम कापडाचालांबलचक पट्टा गुंडाळून बनविल्या जात.दिल्लीचा बादशहा, निरनिराळ्या प्रांतांचे सुलतान पगड्या अतिशय उंची,रेशमी, विविध रंगांच्या बनवून घेत.त्यावर रत्ने, मोती, माणके, हिरे, जडविलेले असत. मुस्लिम स्त्रियांच्या धार्मिक पगड्या हिरव्या रंगाच्या असत.
महाराष्ट्रात मराठेशाहीतही अनेक नामांकित पगड्या दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांची पगडी ‘जिरेटोप‘ या नावाने प्रसिद्ध आहे. ती मागे झुकलेली असून वर निमुळती होणारी होती.मागील बाजूस वळलेला मोत्यांचा घोस बसविलेला असे.
पुणे हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर असल्याने पेशव्यांच्या आश्रयाने पुण्यात स्थायिक झालेल्या मंडळींत पगडीचा वापर अधिकच होता.त्यामध्ये कापडाच्या रंगाची विविधताही भरपूर असे. आकाशी, तपकिरी, किरमिजी आणि लाल रंगाची रसिकांची निवड असायची, म्हणून बुधवारपेठेत अनेक पगडबंद (पगडी बांधणारे) आपली दुकाने थाटून बसलेले होते.
पुढे लाल रंगाची अनेक स्तरांची, मध्यावर कोकी (टोकदार उंचवटा) असलेली आणि बेताच्या आकाराची, सुबक बांधणीची पगडी हीच पुण्यात लोकप्रिय झाली आणि तीच पुणेरी पगडी पुण्याचे वैशिष्ट्य ठरली. १९३० पर्यंत पुणेरी पगडीचा वापर केला जाई. हळुहळू लोकमान्य टिळकांनंतर गांधींचे वर्चस्व राज-कारणात व समाजात वाढत गेले, तसतसे गांधी टोपी हेच शिरोभूषण लोकप्रिय झाले व पगडी ही धार्मिक कार्यात,लग्नादी समारंभात,कीर्तनात वापरली जाऊ लागली.संगीत व नाटकाच्या आरंभी सूत्रधाराच्या प्रवेशात पगडी असे.
कालौघात पगडीच्या वापराला मर्यादा आली, तरीही तिच्या वापराचे जणू व्रतघेतल्याप्रमाणे काहींनी ती वापरात ठेवली. अजूनही अनेक सण समारंभात राजघराण्यातील,सरदार घराण्यातील लोक पगडी घालताना दिसतात .
पगडी च्या अनन्यसाधारण महत्त्वामुळे छत्रपती शाहूंनी केलेला पगडी अथवा मंदिलाचा त्याग हा मराठ्यांच्या आणि छत्रपती घराण्याच्या इतिहासात उठून दिसतो.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...