विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 2 October 2023

छत्रपतींशी जोडला गेलेला 'चर्चगेट' चा रंजक इतिहास !

 





छत्रपतींशी जोडला गेलेला 'चर्चगेट' चा रंजक इतिहास !
ईस्ट इंडिया कंपनीने १६६८ पासून मुंबईत बस्तान बसवलं असलं तरी कंपनीचा मुंबईतुन चालणारा व्यापारउद्योग तेजीत यायला १६८३ पासून सुरुवात झाली होती. १६८३ ते १७०७ हा काळ इंग्रज आणि मराठे दोहोंसाठी संघर्षांचा ठरला. छत्रपती शाहूंच्या रूपाने मराठ्यांना छत्रपती मिळाला, शाहूंनी मराठा राज्यास अनेक सेनानी जोडण्यास सुरुवात केली होती. मराठ्यांचं आरमार ताब्यात असलेले सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सुद्धा शाहूराजांच सार्वभौमत्व मान्य केलं आणि त्यांच्या सेवेत रुजू झाले.
आपल्या बलाढ्य आरमाराने अरबी समुद्रात धुमाकूळ घालणारे कान्होजी आंग्रे मुंबईकर इंग्रजांची जहाजे ताब्यात घेणे ,मोठी खंडणी वसूल करणे या मोहिमांमुळे सर्वात मोठी डोकेदुखी ठरले होते.आता प्रत्यक्ष छत्रपती शाहूंचा डोक्यावर हात असल्याने कान्होजींविरुद्ध मोहीम काढणे इंग्रजांना अवघड जाणार होते. त्यात १७१३ साली शाहूराजे आणि कान्होजी आंग्रे यांच्यात महत्वाची बैठक झाली , यावेळी शाहूराजेंनी कान्होजींचा जंगी सत्कार केला. यादरम्यान दोघांमध्ये जी बोलणी झाली,तह झाला त्यातील एक कलम म्हणजे 'फिरंग्यास धुळीस मिळवणे' हे होते.
या कलमामुळे लंडन मध्ये बसलेल्या कंपनीच्या संचालकांना मुंबईच्या संरक्षणासंदर्भात काळजी वाटू लागली, त्यातच मुंबई च्या गव्हर्नर ने कंपनीला कळवले कि मुंबईच्या संरक्षणासाठी हालचाल करणे गरजेचे आहे. यावर निर्णय घेऊन मुंबई वाचवण्यासाठी कंपनीने ' carte blanche' म्हणजे सर्वाधिकार बॉम्बे प्रेसिडेन्सीला दिले. १७१५ साली गव्हर्नरपदी आलेल्या चार्ल्स बून ने तात्काळ यावर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
मुंबईतील इंग्रज, व्यापारी आणि ५०,००० लोकसंख्या यांचे छत्रपती शाहूंपासून रक्षण करण्यासाठी गव्हर्नर बून याने तत्कालीन मुंबई भोवती मोठी संरक्षक भिंत बांधली आणि त्यांना जोडणारे 3 दरवाजे बनवले अपोलो गेट , बझार गेट आणि चर्चगेट . १७१५ ते १७२० साल पर्यंत बांधकाम चालू होते.
चर्चगेट हे अपोलोगेट आणि बझारगेट च्या मधोमध होते, सेंट थॉमस चर्च पासून फक्त १०० मीटर्स अंतरावर असल्याने या दरवाज्याला चर्चगेट नाव दिले गेले. या चर्च चा आराखडा हा मुंबईचा पहिला कंपनी गव्हर्नर जॉर्ज ओक्सएन्डेन ने बनवला होता.
सध्या मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले 'चर्चगेट' हे नाव पण मुंबई शहराचे १८६०-१८७० दरम्यान पुन्हा विस्तारीकरण करण्यात आले आणि त्यासाठी चर्चगेट पाडले गेले. त्यामुळे आधुनिक मुंबईकराने कधीच चर्चगेट पाहिले नाही. जिथे चर्चगेट होते बरोबर त्या ठिकाणी फ्लोरा फाउंटन उभारले गेले जे आजही तिथे आहे. आज चर्चगेट नाही पण ज्याच्या नावाने चर्चगेट नाव झाले ते सेंट थॉमस चर्च सुद्धा आजही तिथे आहे (हॉर्निमन सर्कल, टाउन हॉल समोर) .
चर्चगेट च्या उभारणीचे संपूर्ण धागेदोरे छत्रपती शाहूंपर्यंत जाऊन मिळतात. मराठ्यांनी एकेकाळी मुंबई मिळवण्यासाठी केलेली मोर्चेबांधणी सुद्धा यातून दिसते. लहान गोष्टीत ,वास्तूत रंजक इतिहास लपलेला असतो. मध्यंतरी कोणीतरी म्हणून गेलं कि मुंबई आणि मराठ्यांचा काय संबंध म्हणून ? पण जॉर्ज ऑक्झेनडेंन मुंबईचा पहिला गव्हर्नर व्हायला आणि मुंबईत पहिली व्यापारी वसाहत स्थापन व्हायला सुद्धा शिवराय अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरले ...ते नंतर कधीतरी विस्ताराने लिहीनच...
लेखन - मालोजीराव जगदाळे
संदर्भ -
1. Oriental Commerce; Or the East India Trader's Complete Guide
2. India office records , 1721
3. India office records, 1713
4. Marg Magazine ,Vol 18, 1964
चित्रे - १. चर्चगेट चे १८६० च्या दशकातील छायाचित्र
२. चर्चगेट चे १८६० च्या दशकातील छायाचित्र (from inside)
३. सेंट थॉमस चर्च
४. चर्चगेट रेल्वे स्टेशन, चर्चगेट उभे असणारे स्थान आणि सेंट थॉमस चर्च चा नकाशा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...