भाग ३ 
लेखक ::सतीश राजगुरे
त्याकाळातील रघुजी भोसल्यांचे राज्य आणि उत्पन्न असे होते.
१. देवगड प्रांत (नागपूरसह) - ३० लक्ष
२. गढा मंडला - १४ लक्ष
३. होशंगाबाद, शिवनी, माळवा, चौरागड - ७ लक्ष
४. मुलताई - २ लक्ष
५. वऱ्हाडचे निम्मे उत्पन्न, गाविलगड, नरनाळा - ३० लक्ष
६. ओरिसा व मांडलिक संस्थाने - १७ लक्ष
७. चंद्रपूर - ५ लक्ष
८. छत्तीसगड व मांडलिक संस्थाने - ६ लक्ष
◆ देवगड-
  यामध्ये छिंदवाडा, बालाघाट हे घाटावरील मुलुख तसेच नागपूर, भंडारा वगैरे 
 घाटाखालचा मुलुख यांचा समावेश होता. हा सर्व प्रदेश देवगडच्या 'बख्तबुलंद'
  या गोंड राजाचा होता. तो पहिल्या रघुजीने मिळवला होता. या सुभ्यात 
शिवनीचा  पठाण जहागीरदार व खैरागड, राजनांदगाव, छुईखदान वगैरे मांडलिक येत 
होते.
◆ गढा मंडला-
  हे गोंडांचे सर्वात जुने असलेले राज्य तेव्हा सागरच्या मराठ्यांच्या  
ताब्यात होते. या मुलुखाकरिता भोसल्यांचा आणि पेशव्यांचा अनेक दिवस झगडा  
सुरू होता. परंतु खर्ड्याच्या लढाईनंतर हा मुलूख भोसल्यांच्या ताब्यात आला.
◆ होशंगाबाद, शिवनी, माळवा, चौरागड-
  होशंगाबाद हे नर्मदेच्या उतारास असलेले मोक्याचे ठाणे होते. ते भोपाळच्या
  नबाबाच्या मूळ पुरुषाने देवगडच्या राजापासून लष्करी मदत देण्याचे कबूल 
करून  मिळवले होते. १७९६ मध्ये दुसरा रघुजी भोसले याने तेथील किल्ला लढून 
मिळवला  होता. १७९९ मध्ये नर्मदा ही भोसल्यांची सरहद्द ठरली. इंग्रजांकडे  
आल्यानंतर मात्र तेथे लष्कराची छावणी कायमचीच झाली.
◆ मुलताई, बैतुल, बदनूर -
  हा भाग मूळ 'देवगड' राजाचा भाग होता. मुलताई येथे भोसल्यांनी एक सुभेदार 
 नेमला होता. या भागांत सावळीगड, भवरगड, खेरडा इत्यादी डोंगरी किल्ल्यांचा 
 समावेश होता.
◆ गाविलगड व नरनाळा-
  हे दोन्ही किल्ले पहिल्या रघुजीने १७५१ मध्ये जिंकून घेतले होते. याचे  
सर्व उत्पन्न भोसल्यांना मिळत असे. त्यावेळी साठ-चाळीस असा उत्पन्नाचा  
प्रकार नव्हता. नरनाळ्याचा किल्लेदार अकोट येथे राहत होता. १७७५ मध्ये  
निजामाने हे किल्ले मुधोजीकडून घेतले होते. पण मुधोजी एलिचपूरला गेल्यावर  
त्याने ते किल्ले परत मिळवले. गाविलगड येथे अडचणीच्या वेळी भोसले आपला  
खजिना ठेवत असत. १८०३ च्या तहाने बाकीचा वऱ्हाड निजामाच्या ताब्यात आला, पण
  गाविलगड भोसल्यांकडेच होता. पुढे १८१८ मध्ये झालेल्या तहानुसार तो  
आप्पासाहेबांकडून इंग्रजांकडे आला.
◆ ओरिसा आणि मांडलिक संस्थाने-
  हा प्रांत सध्याचे बालासोर, कटक आणि जगन्नाथपुरी हे तीन जिल्हे मिळून  
होता. जगन्नाथाचे देऊळ या प्रांतात असल्यामुळे या भागाला विशेष महत्त्व  
होते. त्याकाळी ओरिसातील महानदीच्या काठाकाठाने कटकवरून रायपूर, रतनपूरास  
येऊन तेथून पश्चिमेस नागपुराला येण्याचा रस्ता होता. कटक प्रांत १८०३  
पर्यंत भोसल्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर वऱ्हाडबरोबर हा प्रांत सुध्दा 
 निजामाकडे व त्यानंतर इंग्रजांकडे आला.
◆ चंद्रपूर-
  पूर्वी हा सुभा गोंडांच्या ताब्यात होता. पहिल्या रघुजीने तो मिळवला. या 
 सुभ्यात चांदा जिल्हा, औंढी, अंबागड चौकी या जमिनदाऱ्या व माणिकदुर्गचा  
किल्ला येत असे. नागपूरच्या खालोखाल या प्रांताला किंमत होती. तेथे बरेच  
उद्योगधंदे आणि व्यापार चालत असत. त्याकाळी दक्षिणेकडून येणारा नारळ,  
सुपारी, मीठ इत्यादी माल प्रथम येथे येत असे. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे  
वऱ्हाडातून कापूसही येत असे. चांदा येथे विणकर लोकांची मोठी वस्ती होती.  
येथील कापड देश-विदेशात पोहोचत असे.
◆ छत्तीसगड सुभा-
  यामध्ये छत्तीस लहान-मोठे किल्ले व गढया येत होत्या. त्यात फक्त रायपूर  
आणि रतनपूर ही मोठी शहरे आणि भोवतालचा मुलूख हा खूप महत्वाचा आणि  
उत्पन्नाचा भाग होता. बाकीचा मुलूख जंगली व नापिकीचा असल्यामुळे त्यातून  
फारसे उत्पन्न येत नसे. राज्याच्या वाटणीत हा सुभा बिंबाजीला मिळाला होता. 
 ते स्वतः रतनपूरला रहात असत. पण ते सगळ्यात नाराज होते. कारण हा भाग नुसता
  तांदूळ पिकवणारा असून दुसरे काही उत्पन्न नव्हते. १७९० मध्ये सिरगुजा हे 
 डोंगरी संस्थान भोसल्यांच्या लष्कराने घेतले होते. यामध्ये सिरगुजा, जसपूर
 व  उदेपूर यांचा समावेश होता. येथून भोसल्यांना तीन हजार रुपये खंडणी मिळत
  होती. काशी, गया, मिर्झापूर व बंगाल प्रांतातून नागपुरास येण्याचा रस्ता 
 तेथून असल्यामुळे तो सांभाळून त्याची आवकजावक करण्याची जबाबदारी  
सिरगुजाच्या मांडलिकावर होती. कोरिया हे लहानसे संस्थानही छत्तीसगड सुभ्यात
  होते.
◆ संबलपूर-
  हे संस्थान भोसल्यांचे मांडलिक म्हणून होते. आजूबाजूला दहा ते पंधरा लहान
  संस्थाने होती. याशिवाय बस्तर हे मोठे संस्थान व कांकर व कालाहंडी ही 
लहान  संस्थानेही या सुभ्यात मोडत असत. १८०३ च्या देवगावच्या तहाने 
भोसल्यांना या  सर्व संस्थानांवर पाणी सोडावे लागले.
विदर्भाचे आद्य इतिहासकार कै.यादव माधव काळे म्हणतात-
मराठी साम्राज्यात अगर हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांच्या ताब्यात यावेळेस एवढ्या मोठ्या विस्ताराचा प्रदेश नव्हता. "रघुजी भोसल्यांच्या अंगी पहिला रघुजी अगर महादजी शिंद्यांप्रमाणे धडाडी, पराक्रम, बुद्धिबळ व संघटन चातुर्य असते तर तो संपूर्ण हिंदुस्थानातील अत्यंत प्रबळ असा संस्थानिक झाला असता व हिंदुस्थानच्या राजकारणात त्याचा शब्द निर्णायक ठरला असता!"
सामान्यपणे
  मध्य भारतातील तत्कालीन विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांसह 
 मध्यप्रदेशातील जबलपूर, शिवनी, गढा-मंडला, छपरा, रेवा, सिरगुजा, 
होशंगाबाद,  बैतुल हा प्रमुख भूभाग, छत्तीसगडमधील रायपूर, रतनपूर व 
ओरिसा-कटक हे  प्रांत नागपूरकर भोसल्यांच्या नियंत्रणाखाली होते. जो 
रेसिडेंटच्या  माध्यमातून हळूहळू ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली जाऊन पुढे 
ब्रिटिश  साम्राज्याचा भाग बनला.
संदर्भ/माहितीस्रोत:
नागपूर राज्याचा अर्वाचीन इतिहास-डॉ. श.गो.कोलारकर, गो.मा.पुरंदरे, विकासपीडिया, विकिपीडिया



No comments:
Post a Comment