भाग १
लेखक ::सतीश राजगुरे
मध्य
भारतातील एक प्रमुख व महत्वाचे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. पण तुम्हाला
हे माहीत आहे का की प्राचीन काळी या शहराचे नाव 'नागपूर' नव्हे तर
'फणींद्रपूर' होतं? चला तर जाणून घेऊ या.
नागपूरचे प्राचीन नाव 'फणींद्रपूर' असल्याचा
उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. 'फणा' म्हणजे नागाने
फुत्कारलेले तोंड! आजही पूजापाठ करणारे जुने ब्राह्मण मंत्रांमध्ये
'फणींद्रपूर' असाच या शहराचा उल्लेख करतात, हे विशेष! 'फणींद्र मणीप्रकाश' या नावाने एक वृत्तपत्रही पूर्वी नागपुरात प्रसिद्ध होत असे.
दुसरे जानोजी भोसले यांच्या प्रोत्साहनामुळे लक्ष्मणराव कामाठी यांनी १८६७ मध्ये 'फणींद्र मणीप्रकाश' हे वर्तमानपत्र स्वतःच्या शिळाप्रेसवर काढले होते. त्याकाळात हे सर्वात गाजलेले वृत्तपत्र होते. इंग्रज मिशनरीजकडून सुरू असलेल्या विशेषत: रेव्हरंड हिस्लॉप यांनी चालवलेल्या धर्मांतर मोहिमेविरुद्ध या पत्रात लेखन करण्यात येत होते. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चिडून जानोजी भोसल्यांना दंडही केला होता.
अर्थात 'नागपूर' असो किंवा 'फणींद्रपूर' दोन्ही नावांमध्ये साधर्म्य मात्र आढळते. नागंडचा/सापाचा या शहराशी जुना संबंध असावा. त्यामुळे नागावरून 'नागपूर' किंवा नागाच्या फण्यावरून 'फणींद्रपूर' हे नाव पडले असावे.
या शहराचे 'नागपूर' हे नाव कसे पडले, याबाबत मात्र अभ्यासकांमध्ये वेगवेगळी मते असल्याचे दिसते.
काहींच्या मते, या परिसरात पूर्वी 'नागफणी'
वनस्पतीचं मोठं जंगल होतं. ही वनस्पती ग्रामीण भागांत आजही आढळून येते.
त्यामुळे नागफणीच्या जंगलावरून नागपूर/ फणींद्रपूर हे नाव पडलं असावं.
No comments:
Post a Comment