अजातशत्रू शाहू
( भाग - २ )
लेखन ::संजय क्षीरसागर
३
नोव्हेंबर १६८९ ते ८ मे १७०७ -- जवळपास १७ - १८ वर्षे शाहू मोगलांच्या
नजरकैदेत राहिला. या प्रदीर्घ अवधीत त्याचे बालपण शत्रूच्या गोटांत गेले.
मोगलांच्या मेहरबानीने जे काही शिक्षण मिळाले तेवढेच. औरंगजेबाने शिवाजीचे
नाव बदलून शाहू तर केलेच पण त्याचे लग्नही लावून दिले. शाहूच्या बाबतीत
नेमका कोणता निर्णय घ्यावा याविषयी औरंगजेबाची चलबिचल चालली होती. संभाजीला
पकडून ठार केले, रायड जिंकला, राजाराम परागंदा झाला तरी स्वराज्याचे
एकांडे शिलेदार अजून लढत होते. अशा परिस्थितीमध्ये शाहूला मुस्लिम करून
त्यास स्वराज्यात परत पाठवावे कि आहे त्याच स्थितीत म्हणजे त्याचे धर्मांतर
न करताच मोगल बादशाहीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन स्वराज्यात रवाना
करावे अथवा मारून टाकावे किंवा मरेपर्यंत त्यास कैदेतच ठेवावे ! नेमके काय
करावे ? औरंगजेब्ची याच बाबतीत मती गुंग झाली होती.
आपल्या
मृत्युपूर्वी शाहूला त्याने झुल्फीकारखानसोबत स्वराज्यातील किल्ले
ताब्यात घेण्याच्या मोहिमेवर रवाना केले होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला
नाही. मोहिमेसाठी बाहेर पडलेल्या शाहूला आपल्या ताब्यात घेण्यास मराठी
सरदार उत्सुक होते परंतु शाहू मात्र बाहेर पडण्यास राजी नसल्याचे दिसून
येते. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचे निधन झाल्यावर त्याच्या मुलांमध्ये
बादशाही तख्तासाठी तंटा निर्माण झाला. त्यावेळी शाहू शहजादा आजमच्या
गोटांत होता. शहजादा मुअज्जम हा उत्तरेत असून कामबक्ष विजापुराकडे होता.
औरंगजेबाचा दफनविधी उरकून आजम, मुअज्जमचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तरेत
रवाना झाला. त्याच्या सोबत शाहू व त्याचा परिवार देखील होता. शाहुच्या
बाबतीत कोणताही निर्णय न घेता त्यास कैदेतच ठेवण्याचा आजमचा आरंभी बेत
होता. परंतु आजमच्या कित्येक राजपूत व मुस्लिम सरदारांनी आणि त्याची बहिण
झीनतुन्नीसाबेगमने शाहूला कैदेतून सोडण्याची आजामला गळ घातल्याने काही
अटींवर ८ मे १७०७ च्या आसपास शाहू माळव्यातील शाही छावणीतून बाहेर पडून
दक्षिणच्या वाटेला लागला.
No comments:
Post a Comment