अजातशत्रू शाहू
( भाग - ३ )
लेखन ::संजय क्षीरसागर
उपलब्ध
माहितीवरून असे दिसून येते कि, मोगलांच्या ताबेदारीत राहून शाहूने आपले
राज्य परत मिळवायचे होते. शाहू मोगलांशी एकनिष्ठ राहावा म्हणून त्याची आई
येसूबाई, दोन्ही राण्या, संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग इ. सर्व नातलग आजमने
आपल्या सोबत ओलिस म्हणून ठेवले. शाहूला मोगल बादशाहीतर्फे दक्षिणच्या सहा
सुभ्यातुन चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याची मोकळीक दिली होती पण
यासाठीचे अधिकृत फर्मान त्यास नंतर देण्यात येईल असे सांगण्यात आले.
सारांश, ताराबाईच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठी सरदारांना घरच्या भांडणात
गुंतवण्यासाठी व आपल्या भावांना सत्ताप्राप्तीसाठी त्यांची कसलीही मदत न
मिळावी या हेतूंनी प्रेरित होऊन आजमने मुद्दाम शाहूला कैदेतून मोकळे केले
असे म्हणता येते. कारण, शाहूला आपले राज्य मोगलांच्या विरोधात लढून नाही
तर आपल्या चुलतीच्या विरोधात लढून मिळवायचे होते. यदाकदाचित शाहू -
ताराबाई युती झाली तर त्या युतीचा आपणांस उपद्रव होऊ नये यासाठी शाहूचा
परिवार मोगलांनी ओलिस धरला. याशिवाय मोगलांशी एकनिष्ठ राहिल्यास
दक्षिणच्या सहा सुभ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीची सनद शाहूला देण्याचे
प्रलोभनही दाखवण्यात आले. मोगली कैदेतून सुटून शाहू बाहेर पडला तेव्हा
जवळचा सेवकवर्ग अपवाद केल्यास त्याच्यासोबत ना सैन्य होते ना खजिना !
बीजागड
उर्फ बढवाणी नावाचे संस्थान नर्मदेच्या दक्षिणेस होते. तेथील राजपूत
संस्थानिक मोहनसिंग रावळ हा अलीकडे मराठी सरदारांच्या मदतीने मोगलांशी लढत
होता. याच मोहनसिंगांच्या मदतीमुळे नेमाजी शिंदे वगैरे सरदार नर्मदापार
माळव्यावर चालून जात होते. शाहूचा या मोहनसिंगाशी स्नेहसंबंध होता. मोगली
छावणीतून बाहेर पडताच शाहू मोहनसिंगाकडे आला. तेथून जुजुबी मदत घेऊन तापी
किनाऱ्यावरील जमीनदार अमृतराव कदम बांडे याच्या सोबत शाहू महाराष्ट्राच्या
रोखाने निघाला. महत्त्वाची बाब म्हणजे याच काळात मल्हारराव होळकर हा कदम
बांड्यांकडे शिलेदारी करीत होता व पुढील काळात बढवाणीच्या संस्थानिकाच्या
मदतीने नर्मदेच्या परिसरात त्याने आपला जम बसविला.
No comments:
Post a Comment