विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 25 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - १२ )

 

अजातशत्रू शाहू
( भाग - १२ )
लेखन ::संजय क्षीरसागर
स. १७१५ ते १७१८ पर्यंत हुसेनअली सय्यदने दक्षिणच्या सुभेदारीचे काम पाहिले. राजारामच्या काळात शंकराजी मल्हार हा सचिवपदाचे काम पाहत होता. पुढे त्याने राजकारण त्यागून काशीला प्रयाण केले. तेथे काही काळ व्यतीत करून त्याने दिल्ली दरबारात मराठी पक्षाची बाजू मांडण्याचे काम केले. या शंकराजीस हुसेनअलीचा कारभारी म्हणून बादशाहने नियुक्त केले. हुसेनअली दक्षिणेत आला तेव्हा या शंकराजी मार्फत त्याने शाहूशी सलोखा साधण्याचा प्रयत्न केला व या प्रयत्नांचे फलित म्हणजे (१) मोगल बादशाहीतर्फे शाहूस शिवाजीच्या राज्याचा वारस म्हणून मान्यता मिळाली. (२) त्याव्यतिरिक्त शाहूच्या अधीन असलेल्या मराठी सरदारांनी अलीकडे जो मुलुख संपादन केला, त्यावरील शाहूच्या मालकीस मंजुरी मिळाली. (३) शाहूच्या परिवारास कैदेतून मुक्त करण्याचे मान्य केले. (४) दक्षिणच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार शाहूला मिळाला. याबदल्यात शाहूने पुढील अटी मान्य केल्या -- (१) चौथाईच्या बदल्यात पंधरा हजार फौज मोगल बादशाहीच्या मदतीस पाठवावी. सरदेशमुखीच्या बदल्यात मोगल मुलखातील चोऱ्या वगैरे उपद्रवांचा बंदोबस्त करावा. (२) मोगल बादशहाला दरसाल दहा लक्ष खंडणी देणे. (३) कोल्हापूरच्या संभाजीस शाहूने उपद्रव देऊ नये. स. १७१८ आमध्ये हा तह ठरला व या तहास मोगल बादशाहची मान्यता मिळवण्यासाठी हुसेनअली सय्यदसोबत बाळाजी विश्वनाथ व प्रमुख मराठी सरदारांना स. १७१८ च्या अखेरीस शाहूने दिल्लीला पाठवले. स. १७१९ च्या मार्चपर्यंत दिल्लीत अनेक उलाढाली होऊन अखेर तहावर बादशाही शिक्कामोर्तब झाले. स. १७१९ मध्ये शाहूचा सर्व परिवार दक्षिणेत येउन पोहोचला. तब्बल १० - १२ वर्षांनंतर येसूबाईची व शाहूची भेट झाली.


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...