भाग २
लेखन ::सतीश राजगुरे
पण हळूहळू भारतीय उपखंडात आपले स्थान निर्माण करणाऱ्या इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात ढवळाढवळ करायला सुरुवात केल्यामुळे परिस्थिती बदलली. यावरून दोन्ही इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये वाद सुरू झाला. अडगावची लढाई (29 नोव्हेंबर 1803) जिंकल्यानंतर 17 डिसेंबर 1803 रोजी इंग्रज आणि मराठे यांच्यात देवगावचा तह झाला. त्यानंतर रघुजी भोसले द्वितीय यांनी आपल्या दरबारात ब्रिटिश अधिकाऱ्याची नियुक्ती स्विकारल्यानंर त्याला सैन्याची चौकी असलेल्या सीताबर्डी गावात एक निवासस्थान देण्यात आले. इंग्रजांनी येथे आल्यानंतर एक रेसिडेन्सी बांधली.
1811 च्या अखेरीस पेंढाऱ्यांनी नागपूरवर हल्ला केला तेव्हा भोसल्यांनी इंग्रजांना हस्तक्षेप करण्यास सांगितले. इंग्रजांना आशा होती की त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि सैन्याच्या तैनातीमुळे भोसल्यांशी त्यांचा कायमचा तह होईल आणि त्यांना नुकसानभरपाई म्हणून भरपूर पैसे मिळतील. पण भोसल्यांनी हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. परंतु जेव्हा पेंढाऱ्यांनी नागपूरचा उत्तर भाग जाळला तेव्हा तेथील ब्रिटिश रहिवाशांनी इंग्रजांना मदतीचे आवाहन केले. पण बेरारहून मदत येण्यापूर्वीच पेंढारी पळून गेले. तरीही, भविष्यातील संभाव्य हल्ल्यांचे धोके लक्षात घेऊन ब्रिटिशांनी रेसिडेन्सीभोवती आपले सैन्य तैनात केले.
1816 मध्ये रघुजी-द्वितीयच्या मृत्यूनंतर त्यांचा अपंग मुलगा परसोजी याने सत्ता हाती घेतली. त्यानंतर नागपूर दरबारात सक्षम उत्तराधिकारी गादीवर बसवण्यासाठी सत्तासंघर्ष सुरू झाला. या संघर्षादरम्यान, मुधोजी भोंसले प्रथम (1816-1818) यांनी ब्रिटिशांची मदत घेतली आणि त्यांच्याशी एक तह सुध्दा केला. पण 1817 मध्ये परसोजी मरण पावला आणि मुधोजी शासक बनले तेव्हा त्यांनी इंग्रजांना आपल्या प्रदेशातून हाकलून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पेशवे आणि शिंदे यांच्यासोबत एक योजना बनवली.
इंग्रज जेव्हा पेंढारी युद्धात (1817-18) व्यस्त होते, तेव्हा मराठ्यांनी एकत्र येऊन 26 नोव्हेंबर 1817 रोजी सीताबर्डीवर हल्ला केला, ज्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. 16 डिसेंबर 1817 रोजी सक्करदरा येथे दोघांमध्ये आणखी एक लढाई झाली, ज्यात इंग्रजांनी पुन्हा विजय मिळवून नागपूर ताब्यात घेतले. त्यानंतर 6 जानेवारी 1818 रोजी आणखी एक तह झाला. तहातील शर्तीनुसार इंग्रजांनी सीताबर्डी टेकड्या, गाव आणि आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. यानंतर भविष्यात संभाव्य युद्धांची भीती लक्षात घेता इंग्रजांनी सीताबर्डी येथे किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी 11 एकर जमीन निवडण्यात आली. त्याठिकाणी नागपूर सब्सिडियरी फोर्स तैनात होती. किल्ल्याचा आराखडा मद्रास पायोनियर डिव्हिजनने तयार केला होता.
No comments:
Post a Comment