सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग ११
ऑगस्टमध्ये
बहादूरखानाने नळदुर्गाला वेढा दिला परंतू तो देखिल बहलोलखानाने उधळून
लावला. कुत्बशहाने यावेळी बहलोलखानाला मदत केली. मात्र पुढे मुघलांशी अधिक
वैर नको म्हणून ते सैन्य घेऊन मादण्णा परत निघून गेले. हळू हळू विजापूरचे
बडे दख्खनी सरदार कुत्बशहाकडे जाऊ लागले. बहादूरखानाने मोठ्या चलाखीने
कुत्बशहाला आपल्याकडे खेचले. सिद्दी मसाऊद, सर्जाखान सारखे आदिलशाहीतून
कुत्बशाहित गेलेले मातबर सरदारहि आपल्या घोळात घेतले. पठाणां विरुद्ध
त्याने दक्षीणेतील हर एकाला उठवायला सुरुवात केली. इतकेच कश्याला ज्यांचा
सूड उगवण्यासाठी त्याने खवासखानशी नाते जोडण्यापर्यंत राजकारण केले त्याच
छत्रपती शिवरायांची त्याने मदत मागवली. महाराजांनाही बहलोलचा गाशा
गुंडाळायचा होता शिवाय कोकणात जिंकलेला प्रदेश निर्वेध करायचा होता.
महाराजांनीही चार हजारांची फौज दिली पाठवून. आता बहादूरखानाकडे अफाट फौज
जमली. मात्र हे बघून मुघल सैन्यातले पठाण अस्वस्थ झाले, कारण विजापूर एका
पठाणाच्या ताब्यात आले होते. विशेषत: दिलेरखान पठाण. त्याने बहलोलखानाशी
आतून संधान बांधले व त्याला सल्ला दिला ’तूर्तास लढाई टाळ, बहादूरखानाशी तह
कर, पुढे हे सैन्य पांगेल तेव्हा बहादूरखानाला इथून हाकलवून देता येईल!’
बहलोलने तो सल्ला ऐकून बहादूरखानाला निरोप पाठवला. मी आपल्या शब्दा बाहेर
नाही. मी औरंगजेबाचा चाकर आहे. हवे तरे मी भेट घ्यायला तयार आहे. या एका
निरोपाने सगळा नूर बदलला. बहादूरखान बेसावध झाला. वरुन दिलेरनेही त्यावरती
मुघली पठाणांचा दबाव टाकला. बहादूरखानाने तह केला. त्याने दक्षीणी
मुसलमानांना गोड शब्दांत वाटेला लावले. मात्र त्यांची नाराजी कमी
करण्यासाठी सर्जाखानच्या हाताखाली सैन्य देऊन विजापूरचा मुलुख हस्तगत
करण्याचीहि कामगिरी त्यावर सोपवली. दक्षीणी फौजा मुघलांपासून तोडण्यात
दिलेर यशस्वी झाला.
या
सगळ्या गुंतागुंतीच्या राजकारणात बहादूरखानची मुत्सद्देगिरी शेवटच्या
क्षणी कमी पडल्याने पठाण दख्खनच्या राजकारणातून कायमचे निपटून काढण्याची
संधी गेली. मात्र या निमित्ताने दक्षीण्यांची एक फळी उभी रहायला सुरुवात
झाली. पठाणांविरुद्ध एक चिड दख्खन मध्ये पसरली. दिलेरखानही पठाण असल्याने
त्यालाहि कुणाची साथ मिळेना. या सर्व अस्थिर वातावरणात एकाच गोष्टिची कमी
होती एका म्होरक्याची जो दक्षीणेतील राज्यकर्त्यांना एकत्र आणून एक भक्कम
फळी निर्माण करेल. ती पोकळी भरण्याची ताकद त्यावेळी एका व्यक्तीकडेच होती -
श्री शिवछत्रपतींकडे.
(क्रमश:)
- सौरभ वैशंपायन
No comments:
Post a Comment