नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य ⚔🗡भाग - 9
नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
_📜⚔🗡भाग - 9⃣📜⚔🚩🗡___
_⚔🚩⚔📜🚩___
खाली मान घालून
नेताजी मुक्कामाकडे निघून गेले. त्यांच्या चर्येकडे बघवत नव्हते. त्यांनी
स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. त्यांच्याकडून कुचराई झाली होती. त्याचे मोल
पराभवात आणि मावळ्यांच्या प्राणात चुकते झाले होते. आदिलशाहीकडून पहिला
पराभव. अत्यंत लाजिरवाणा, दारुण पराभव आणि तोसुद्धा दस्तूरखुद्द महाराज
झुंजत असताना. नेताजी आपली फौज घेऊन कोकणातून पन्हाळ्याकडे येत होते.
किल्लेदाराने किल्ल्याच्या परिसरात ठेवलेली फिरती गस्त चुकविण्याच्या नादात
जरा लांबचा फेरा घ्यावा लागला होता. त्यातून वाघदरीतून सरदरवाजाच्या
दिशेने येताना अंधारात दिशाभूल झालेली. पण या सबबी सरनोबतास समर्थनीय
नव्हेत. कारण योजना आखताना या बाबींचा विचार करूनच काळ-काम-वेगाचे गणित
मांडायचे असते आणि दुर्दैव म्हणजे नेमके याच प्रसंगी ते चुकले. नेताजींचे
मन आतल्याआत आक्रंदत होते–
काय करू? नेमकी
कुठे गफलत झाली तेच समजत नाही. महाराजांना तोंड कसे दाखवू? त्यांची समजूत
कशी पटवू? सारे सरदार, पंतमंडळ, फौज प्यादे सारी मंडळी मावळ्यांच्या हत्येस
मलाच जबाबदार धरणार. कोणत्या प्रकारे त्यांची समजूत काढू? देवा शंभू
महादेवा, खंडेराया हा कलंक कसा धुऊन काढू? आई जगदंबे, लेकराला यातून तूच
सोडीव.
दोन संपूर्ण
दिवस आणि तीन रात्री नेताजी खोलीतून बाहेर आले नाहीत. अन्न नाही, पाणी
नाही. फक्त खंत, खंत आणि खंत. सोबत्यांनी हाका मारल्या, सेवकांनी नाकदुऱ्या
काढल्या; पण त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. अधूनमधून येणारे
वस्तूंच्या फेकाफेकीचे आवाज आणि मधूनच भिंतीवर बुक्क्या मारल्याचा वा डोके
आपटल्याचा आवाज हीच तेवढी जाग बाहेरच्यांना जाणवत राहिली.
हळूहळू
महाराजांचा राग शांत झाला. नेताजीकाकांसारखा जबाबदार असामी अशी हलगर्जी
करणे शक्य नाही याची त्यांना जाणीव झाली. महाराज आपल्या सवंगड्यांशी एवढे
तादात्म्य झाले होते की, नेताजींचे आक्रंदन त्यांच्या मनास स्पर्शू लागले.
पण आता काय करावे? घडणारे घडून गेले होते. नुकसान होऊन चुकले होते. आता
पर्याय एकच. नेताजींबरोबर योजलेले राजकारण पुढे चालविणे. महाराजांनी
बहिर्जीला एकांतात बोलावून घेतले. महाराजांच्या महालातून बहिर्जी निघाला
तेव्हा रात्रीचा दुसरा प्रहर टळत होता. निजानीज होऊन गेली होती. बहिर्जी
थेट नेताजींच्या मुक्कामावर पोहोचले. शिपाई-प्यादे, सेवक सर्वांना त्यांनी
दूर उभे केले. दाराशी येऊन त्यांनी कानोसा घेतला. नेताजींच्या येरझारांचा
पदरव स्पष्ट जाणवत होता. त्यांनी हलकेच थाप मारली आणि कवाडाशी तोंड नेऊन
हलक्या पण स्पष्ट स्वरात त्यांनी साद दिली–
सरनोबत, सरकार, दार उघडा. मी बहिर्जी. म्हाराजांचा सांगावा घेऊन आलोया. सरकार, दार उघडा.
काही क्षण गेले.
हलकेच दार किलकिले झाले. भकास मुद्रेचे आणि तारवटल्या डोळ्यांचे
सरनोबतांचे ते रूप पाहून बहिर्जीचे काळीज चरकले. झटकन खोलीत शिरून त्याने
कवाड लावून घेतले. हाताला धरून नेताजींना विस्कटलेल्या पलंगावर बसविले.
खोली पार अस्ताव्यस्त झाली होती. स्वत:वरचा संताप नेताजींनी खोलीतील
वस्तूंवर काढल्याचे स्पष्ट दिसत होते. तिवईवरच्या फुलपात्रापासून
पलंगावरच्या गादीपर्यंत एकही वस्तू जागेवर नव्हती. भिंतीशी उडून पडलेली
ठाणवई उचलून बहिर्जीने जागेवर ठेवली. हातातला दिवा ठाणवईवर ठेवून तो
नेताजींकडे वळला. ते जमिनीवर नजर खिळवून निश्चल बसून होते. आश्चर्याने
स्तंभित झालेला बहिर्जी त्यांना आपादमस्तक न्याहाळीत राहिला. रणमर्द
सिंहाचे हे विकल रूप त्याने कधी कल्पिलेसुद्धा नव्हते. अखेर बहिर्जीनेच
शांततेची तार तोडली.
सरकार, म्या लईच
लहान मानूस. काय अन् कसं झालं इचारपूस करन्याचा चाकराला अधिकार न्हाई.
सोपवलेलं काम चोख बजावायचं त्येवढंच चाकराला ठावं. म्हाराजांचा सांगावा
हाये, घडलं ते घडून ग्येलं, आता त्येला उपाय न्हाय. तव्हा त्येचा इचार करणं
सोडून द्या. आम्हास भेटन्याची गरज नाही. जे जसं ठरलं ते तसंच पुढं चालवणं.
जगदंबा कृपेनं यशाचे धनी व्हाल तव्हा पुन्हा भेट व्हईलच.
विजेचा धक्का
बसावा तसे त्यांनी बहिर्जीकडे पाहिले. झटकन उठून भिंतीचा आधार घेत त्यांनी
पाठ फिरविली. भले थोरले वडाचे झाड चक्रीवादळात घुसळून निघावे तसे गदगदणारे
सरनोबत बहिर्जी विस्मयाने पाहत राहिला. पाठीवरून फिरविण्यासाठी त्याचा हात
क्षणभर वर उचलला गेला, पण मर्यादेचे भान येऊन आपसूकच खाली आला. नेताजींना
तसेच सोडून पाय न वाजविता तो खोलीबाहेर आला. कवाड तसेच अर्धवट उघडे ठेवून
तो झपाट्याने निघून गेला.
बहिर्जीची वाट पाहत महाराज जागेच होते.
बोला नाईक! काय झालं?
म्हाराज, नेताजी
सरकारांनी मनाला लईच लावून घेतलंया. पार कोलमडून ग्येल्याती. बघवत न्हाई.
येवडा डोंगरासारखा, वाघाच्या काळजाचा गडी, पर बाईमानसावानी रडला वो.
व्हटातून शबुद फुटंना त्येंच्या.
ते ठीक आहे. मेलेल्या मावळ्यांचे प्राण असे डोळ्यांतून पाणी काढल्याने परत येणार नाहीत. सांगावा सांगितला? जवाब काय?
जी. जसाच्या तसा
सांगावा सांगितला पर नेताजी सरकार जवाब देन्याच्या परिस्थितीत नव्हतं.
भिंतीला डोकं टेकून नुसतं हुंदकत ऱ्हायलं. वाढूळ वाट पायली आनि परत फिरलो.
म्हाराज…
बहिर्जी घुटमळला. महाराजांची डावी भुवई वर चढली.
म्हाराज, म्या
लई छोटा मानूस. आपल्याला काय सांगायचा मला अधिकार न्हाय. तेवडी माजी लायकी
बी न्हाय, पर म्हाराज सरनोबतांची हालत पायली, काळजाचं पार पानी झालं.
त्येंची भूल पदरात घ्या. त्येंना कौल द्या.
महाराजांची भेदक
नजर बहिर्जीच्या नजरेला भिडली. अगदी क्षणभरच. जणू काळीज आणि मस्तक भेदून
आरपार गेली. थंडगार घामाची धार मणक्यांतून कंबरेवर उतरली. जीभ पार टाळ्याला
चिकटली.
माफी मायबाप, माफी. गलती झाली.
खालमानेने मुजरा करीत पाठ न वळविता बहिर्जी झटक्याने महालाबाहेर निघून गेला.
बहिर्जी
गेल्यावर बऱ्याच वेळाने नेताजी भानावर आले. पण सुन्नपणे तसेच पलंगावर बसून
राहिले. उघडे कवाड पाहून दबकत दबकत हुजऱ्या खोलीत आला. त्याच्या चाहुलीने
नेताजींनी मान वर केली. कसेबसे तोंडातून शब्द आले–
पाणी…
उलट्या पावली
हुजऱ्या बाहेर गेला आणि पाण्याचे तांब्या-भांडे घेऊन धावतच परत आला. एका
घोटातच तांब्या रिकामा झाला. गार पाणी पोटामध्ये गेल्यावर काही क्षण नेताजी
डोळे मिटून स्वस्थ बसून राहिले. त्यांच्या मुखातून निघालेला अस्पष्टसा
शब्दसुद्धा ध्यानातून निसटू नये म्हणून कंबरेत झुकून हुजऱ्या तिष्ठत
राहिला.
हजामाला बोलाव. स्नानाची व्यवस्था कर.
धनी, येवढ्या राती?
चौकश्या नकोत.
थाळ्यांची व्यवस्था करायला सांग आणि महिपत, खाशाब्या, सुभान्या अन्
गोदाजीला सांगावा धाड. म्हणावे, असाल तसे दाखल व्हा. आत्ता या क्षणी.
जी धनी.
पुऱ्या तीन
दिवसांनंतर धनी स्वत:हून जेवायला मागतात, माणसांना बोलावतात, याच आनंदात तो
बिचारा चाकर लगेच कामाला लागला. हजामत आणि स्नान आटोपून नेताजी थाळ्यावर
बसत असतानाच बोलावलेली माणसे समोर हजर झाली. पहाऱ्यावरील शिपायाला,
कोणालाही आत न सोडण्याची सख्त ताकीद देऊन त्यांनी कवाड लावून घेण्यास
सांगितले.
जेवणे झाली?
जी धनी.
मी जर माझ्या सोबत चला म्हणून सांगितले, तर चलणार?
असं का इचारता धनी? तुमचा शबुद वलांडला तर प्राण कुडीत ऱ्हायाचे न्हाईत.
त्याची खात्री
आहे म्हणूनच बोलावून घेतले. पण आताचा मामला नाजूक आहे. नेहमीच्या
शिरस्त्यातला नाही. कदाचित मनाला न मानवेल. स्वराज्य सोडून महाराजांपासून
दूर, मी जिथे जाईन तिथे, जेव्हा जाईन तेव्हा येणार? जिथे राहीन तिथे, जसा
राहीन तसे, राहणार? एकही प्रश्न न विचारता साथ देण्याचे, इमान न सोडण्याचे
वचन देणार? कदाचित पुन्हा बायका-पोरांत परत येता येईल न येईल; मान्य कराल?
द्या वचन.
आमचं इमान
कवाचंच आपल्या पायी हाय धनी. पन आज असं पुन्यांदा इचारतायसा म्हन्जी बाब लई
गंभीर असनार. आनि सोराज्यापासून, म्हाराजांपासून दूर जायाचं? काय उमगना
झालंय बगा.
आजवर
स्वराज्याविरुद्ध महाराजांच्या शब्दाबाहेर या हातांनी काही घडलेले नाही,
स्वप्नांतसुद्धा कधी घडणार नाही या गोष्टीची तुम्हा सर्वांना खात्री आहे
ना?
जी सरकार.
मग प्रश्न नकोत.
आपण जे करायला निघालो आहोत ते वरकरणी विरोधी दिसत असले, तरी… तरी ते
स्वराज्यासाठी आणि महाराजांच्या हितासाठीच असेल याची पक्की खूणगाठ मनात असू
द्या. इतके दिवस स्वराज्याचे बिनीचे शिलेदार आणि सरनोबतांची खास माणसे
म्हणून मिरवलात, कौतुक करवून घेतलेत, मानमरातब झेललेत; आता निंदानालस्ती
झेलण्यास सज्ज व्हा. आज स्वराज्य आणि महाराज तुमच्या प्राणांची आहुती मागत
नाही, तर अब्रू, इभ्रत आणि सन्मानाची किंमत मागत आहेत, असे समजा. ही जणू
आपली सर्वांचीच सत्त्वपरीक्षा आहे. मान्य असेल तर या भाकरीची शपथ घ्या.
नसेल तर विसरून जा. मात्र एक गोष्ट नीट ध्यानात घ्या, आत्ता या क्षणी परत
फिरण्याची मुभा असली, तरी नंतर परतीचा मार्ग नाही. या खोलीतून यातला एक
शब्द जरी बाहेर फुटला, तरी स्वराज्याशी गद्दारी केल्याचे पाप माथी घेऊन
कडेलोटाला सामोरे जावे लागेल. अर्ध्यातून साथ सोडून परतलात तरी भविष्य तेच.
पूर्ण विचार करा आणि निर्णय घ्या.
नेताजींचे बोलणे संपताक्षणी चौघांनी झटकन पुढे होऊन समोरच्या तसराळ्यातील भाकर उचलून हाती घेतली. एकमुखाने चौघे बोलले–
धनी, भाकरीची आण
घेतो. तुमा विषी न कधी सोंशय व्हता, न कधी मनात किंतू येईल. जे कराल ते
अंती गोमटंच असनार. येक डाव सावली साथ सोडंल, पर आमची साथ सुटनार न्हाई.
का? कशापाई? असा सवाल जबानीवरच काय पन मनात बी उमटनार न्हाई. जे कराल ते
कितीही इपरीत दिसत असलं तरी अंती सोराज्याच्या नि म्हाराजांच्या काजाचंच
आसंल या श्रद्धेनं जिवात जीव हाय तवर साथ करू. यात कुचराई व्हनार न्हाई.
मान-पान, इभ्रतीचा इचार करनार न्हाई, घर-संसाराची परवा करनार न्हाई.
भाकरीची, जिवाची, इमानाची आन.
शाबास रे माझ्या
वाघांनो! माझा विश्वास सार्थ ठरला. लगोलग घोडी तयार करा. लांब मजलीच्या
पडशा बांधा. मात्र बोभाटा नको. येरवाळी गडाचे दरवाजे उघडताच आपण गडातून
बाहेर पडणार आहोत. गोदाजी, हडपा उघड. माझा कसा रुपयांनी भरून दे. तुमच्या
प्रत्येकाच्या कंबरेला मोठी रक्कम ठेवा. माझ्या पडशीत दरबारी कापडाचा एक
जोड असू देत. या आता.
पूर्व
क्षितिजावर सूर्याची पहिली किरणे उमटताच बुरुजावरून तोफ उडाली आणि
विशाळगडाचा कोकण दरवाजा सताड उघडला. त्याच क्षणी पाच स्वार भरवेगात
गडाबाहेर पडले. हवालदाराने अन् मावळ्यांनी सरनोबतांना ओळखून मुजरे घातले पण
माना वर होईतो घोडी पार नजरेआड झाली होती. नेताजी पालकर चार स्वार सांगाती
घेऊन कोकण दरवाजाने गडाबाहेर पडल्याची खबर लगोलग महाराजांना पावती झाली.
सदरेवर येताच, हीच खबर प्रतापरावांनी सर्वांसमोर सादर केली. महाराज काही
बोलले नाहीत. काही वेळ फक्त डोळे मिटून स्वस्थ राहिले. त्यांच्या चर्येवर
क्षणभर विषादाची आणि खिन्नतेची छटा उमटून गेल्याचे जाणकारांना जाणवले.
विशाळगडावरून
नेताजी सुटले ते थेट नेसरीची खिंड ओलांडून रुस्तमेजमाच्या छावणीत दाखल
झाले. शिवाजीने मोगली आश्रयाने आदिलशाहीविरुद्ध स्वतंत्र मोहिमा उघडल्याने
त्याचा प्रतिकार करण्यासाठी रुस्तमेजमा छावणी ठोकून सज्ज होता. नेताजी
पालकर येतोय अशी खबर येताच भराभरा हुकूम सोडून रुस्तमेजमाने फौज हत्यारबंद
करवली. पण मग मागाहून खबर आली की, फक्त चार स्वार सांगाती घेऊन नेताजी सडा
येतोय. पन्हाळ्यावर झालेल्या पराभवाचा ठपका ठेवून शिवाजीने नेताजीला
सरनोबतीतून बरखास्त केल्याच्या खबरा मोगल व आदिलशाही दरबार अन् छावणीत
उतरल्या होत्या पण इतक्या तडकाफडकी नेताजी बाजू बदलेल अशी अटकळ कोणाला आली
नव्हती; त्यामुळे रुस्तमेजमाने जरा बिचकतच नेताजींची भेट घेतली. वर्षे
लोटली तरी अफजलवधाचा धसका सर्वांच्या मनात कायम होता.
नेताजींनी, महाराजांना सोडून आल्याचे सांगताच रुस्तमेजमाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.
खानसाहेब, राजे
स्वराज्य स्थापण्यास निघाले म्हणून शिर तळहाती घेऊन त्यांची साथ केली. ते
स्वप्न आता वाऱ्यावर विरले. राजेच मोगलांच्या चाकरीत धन्यता मानू लागले.
आम्हास अपमानित केले. या मनगटात स्वतंत्र दौलत उभारण्याची रग आणि ताकद
रतीभरसुद्धा कमी नाही. चाकराचे पडचाकर होऊन राहण्यापेक्षा आपणसुद्धा शाही
खिदमत करून दौलत कमवावी अशी मनशा बाळगण्यात गैर ते काय? आम्ही आदिलशाहीत
मनसबदार होऊ इच्छितो. आमच्यासाठी आपण शहाकडे रदबदली करावी.
रुस्तमेजमा
खुळचट दरबारी नव्हता. त्याने फारच सावध प्रतिक्रिया दिली. कोणतेही स्पष्ट
वचन न देता त्याने नेताजींना छावणीत ठेवून घेतले आणि आदिलशहास सविस्तर
खलिता पाठविला मात्र त्यात स्वत:ची शिफारस किंवा मत न नोंदविण्याचा सावध
पवित्रा त्याने कायम ठेवला.
शिवाजीवर
चिडलेला प्रतिशिवाजी चाकरीत येतो म्हटल्यावर अली आदिलशहा आणि बड्या बेगमेस
मोठा आनंद झाला. अली आदिलशहाने दस्तूरखुद्द दस्तखतीचे पत्र, पोशाख, कट्यार,
तलवार, शिरोपाव नेताजींसाठी रवाना केले आणि त्यांना विजापूर दरबारात
सन्मानाने पाचारण केले. रुस्तमेजमाने सिद्दी सरवरच्या हाताखाली एक हजार
स्वार आणि पाचशे पायदळ नामजद करून नेताजीस विजापुराकडे रवाना केले.
क्रमश:
No comments:
Post a Comment