विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 November 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य ⚔🗡भाग - 8

 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी

📜⚔ अग्निदिव्य ⚔🗡भाग - 8

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜
अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

_📜🗡भाग - 8⃣📜🚩🗡___

_🚩📜🚩___

एकदा उद्दिष्ट निश्चित झाल्यावर योजना ठरण्यास वेळ लागला नाही. नेहमीच्या पद्धतीने आणि उत्साहाने भराभरा तपशील ठरत गेला. जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या. मात्र नेताजींनी अवाक्षरसुद्धा उच्चारले नाही. अपमान त्यांच्या जिव्हारी लागला होता. संतापाने मस्तक भणाणून गेले; अर्थात भरमसलतीत महाराजांवर राग व्यक्त करणे शक्यच नव्हते. मात्र त्यांची नाराजी आणि संताप मुद्रेवर स्पष्ट दिसत राहिला. संतापाने सोडलेले सुस्कारे ऐकू येत राहिले. पण महाराजांनी त्याची दखल घेतली नाही. इतरांनीसुद्धा तिकडे दुर्लक्ष केले.


नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कामकरी, कातकरी, हेटकरी, वंजारी आदींच्या वेषात गडावर माणसे पेरावी. त्यांनी मोक्याच्या जागा हेरून ठेवाव्यात. त्या जागांच्या आसपास संशय येणार नाही अशा पद्धतीने रात्रीचा मुक्काम करावा. मध्यरात्रीच्या दरम्यान सरदरवाजावर महाराजांनी एल्गार करावा; त्यामुळे उडालेल्या धांदलीचा फायदा घेत गडात घुसून राहिलेल्या शिबंदीने एकदम उठाव करून हेरलेल्या जागांचा ताबा घ्यावा. एका टोळीने ऐन सरदरवाजावर गोंधळ उडवून देऊन दरवाजा उघडावा आणि महाराजांच्या सैन्याला आत घ्यावे. याच सुमारास नेताजींनी अचानक येऊन आपल्या तुकडीनिशी महाराजांची कुमक करावी आणि गड फत्ते करावा असा बेत मुक्रर झाला.


गडाचा आदिलशाही किल्लेदार अतिशय शूर, सावध आणि इमानदार म्हणून ख्यात होता. म्हणून मुख्य हल्ला महाराजांनी स्वत: करण्यास सर्वांनी विरोध केला. नेताजींनी पहिला हल्ला करून किल्लेदाराचा ताज्या दमाचा जोर अंगावर घ्यावा आणि निकराच्या समयी महाराजांनी कुमक करून कर्त करावी, असे सर्वांचे म्हणणे पडले. महाराजांनी त्या बेतास साफ नकार तर दिलाच पण नेताजींनी सुचविलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने चार तिखट बोलसुद्धा सुनावले.



सारा तपशील निश्चित करून मसलत संपली. काही मंडळींना तातडीने छावणी सोडून पुढे जाण्याचे आदेश महाराजांनी दिले.


मसलत बरखास्त झाली. मुजरे घालून एकेक जण निघून गेला. सरतेशेवटी नेताजी जड अंत:करणाने उठले. खालमानेनेच त्यांनी मुजरा केला. नजर किंचित उचलली. महाराजांच्या नजरेत नजर मिसळली. ये मनीची खूण त्या मनी पटली. दोघांच्या मुद्रेवर स्मित उमटले. पण फक्त अर्धा क्षणच. पायात मणामणाच्या बेड्या असल्यागत चालत नेताजी बाहेर पडले.


समोर भेटेल त्या शिपाई-प्याद्यापासून सरदार-मुत्सद्द्यापर्यंत ज्याला त्याला नेताजी आपल्या अपमानाची बोच उघडपणे बोलून दाखवीत राहिले. आपला उद्वेग आणि संताप लपविण्याचा ते किंचितही प्रयत्न करीत नसत. या साऱ्या गोष्टी महाराजांच्या कानी गेल्याशिवाय राहणे शक्यच नव्हते. नेताजी वठवीत असलेली बतावणी पाहून महाराज संतुष्ट झाले. त्यांनी दुर्लक्ष करण्याची बतावणी सुरू ठेवली. रिवाज वगळता दोघांचे भेटणे-बोलणे बंदच झाले. परिणामी, इतर मुत्सद्दी आणि अधिकारी नेताजींना टाळू लागले.


महाराजांची योजना मंजूर झाली. मंजूर झालेला खजिना, गला आणि दारूगोळा मोरोपंतांनी त्याच दिवशी ताब्यात घेऊन पन्हाळ्याच्या वाटेने पुढे रवाना केला. अन्य छावण्यांमधून शिबंदी गोळा करण्यासाठी नेताजींनी छावणी सोडली. रातोरात मसलत बसून हल्ल्यासाठी शिवरात्रीचा मुहूर्त पक्का झाला. मिर्झाराजांचा निरोप घेऊन महाराजांनी दुसऱ्याच दिवशी छावणी सोडली. बरोबर पाचव्या दिवशी महाराज पन्हाळ्याच्या परिसरात पोहोचले. ठरलेल्या बेताप्रमाणे कातकरी वगैरेंच्या वेषातल्या मावळ्यांच्या तुकड्या गडावर रवाना झाल्या.



महाराजांची ही पन्हाळा मोहीम सपशेल फसली. किल्लेदार अतिशय सावध तर होताच, पण त्याला कशी कोण जाणे हल्ल्याची खबर मिळाली होती. महाराजांनी गडात घुसविलेली मंडळी एकजात पकडली गेली. मात्र या गोष्टीचा सुगावा त्याने महाराजांना शेवटपर्यंत लागू दिला नाही. महाराजांचा एल्गार होताच त्याने सरदरवाजाच्या आतल्या बाजूस गोंधळ उडाल्याचे नाटक करून स्वत:च दरवाजा उघडला. महाराजांची फौज गडात आतपर्यंत घुसू दिली.


या हल्ल्याला गडकऱ्यांनी नुसते चोख प्रत्युत्तर दिले असे नाही तर हल्ला साफ मोडून काढला. गडकऱ्यांचा आवेग एवढा जबरदस्त होता की, एक हजार मावळा कामी आला. नेताजी वेळेपर्यंत पोहोचले नाहीत. त्यांची वाट पाहत झुंजत राहणे शक्यच नव्हते. मोठ्या शिकस्तीने विशाळगडाकडील दिंडी उघडण्यात मावळ्यांना यश आले. सपाटून मार खाऊन महाराजांना विशाळगडाकडे पळून जावे लागले. आदिलशाहीविरुद्ध मराठ्यांचा हा पहिलाच पराभव. त्याउपर एक हजार मावळ्यांनी हकनाक जीव गमावले. ही गोष्ट महाराजांच्या जिव्हारी लागली. नेताजी समयास पावते तर कदाचित पारडे फिरू शकले असते.


कामात कुठेतरी कुचराई करण्याची मसलत जरी महाराजांची होती, तरी मोहिमेत कुचराई कधीच अपेक्षित नव्हती. आणि त्या कुचराईचे मोल हजार मावळ्यांच्या प्राणाने चुकवावे हे तर कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरणारे नव्हते. अशी गफलत नेताजी जाणूनबुजून करणे कधीच शक्य नव्हते. नक्की काहीतरी घोटाळा झाला होता. काही असो, नेताजी वेळेवर पोहोचले नाहीत ही वस्तुस्थिती कायम राहते. नुकसान झाले होते. मोहिमेत दारुण पराभव पदरी आला होता. महाराज खरोखर संतापले होते.
विशाळगडावर नेताजी महाराजांसमोर पावते झाले. महाराजांच्या दिलात संताप आणि नजरेत अंगार होता. त्या नजरेला नजर देण्याची हिंमत नेताजींमध्ये उरली नव्हती. संतापाने थरथरणाऱ्या ओठांमधून तीक्ष्ण आवाजात वीज कोसळल्यासारखा एकच प्रश्न बाहेर उमटला–
समयास का पावते झाला नाहीत?


नेताजींकडे उत्तर नव्हते. पायतळी नजर गुंतवून ते गप्पच राहिले. महाराजांनी नेताजींना सरनोबतपदावरून तडकाफडकी बरखास्त केले. कुडतोजी गुजरांच्या पगडीवर सरनोबतीचा चांदवा चढला. त्यांना नवा किताब मिळाला. ‘प्रतापराव’. सरनोबत प्रतापराव गुजर.
क्रमश:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...