स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेली लढाई !!
१६८२ साली औरंगजेब हा स्वराज्यावर चालून आला तेंव्हा पोर्तुगीजांनी मोगल सैन्याला आपल्या मुलखातून जाण्यास परवानगी दिली होती तसेच मराठ्यांविरुद्ध मोगलांना मदत करण्याचे धोरण ही पोर्तुगीजांनी ठरवले होते. तेंव्हापासून मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात चकमकी सुरु होत्या. याचाच प्रत्यय म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी साधारण एप्रिल १६८३ मध्ये १० हजार घोड़दळ आणि २ हजार पायदळ घेऊन उत्तर कोकणातील वसई वैगेरे भागात पोर्तुगीजांची दाणादाण उडवून दिली तसेच पोर्तुगीजांच्या ताब्यातील तारापुरवर देखील हल्ला करुन ते जमीनदोस्त केले. चौलच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा दिला आणि करंजा, पंचबेट देखील ताब्यात घेतले.
चौलच्या वेढ्यास शह देण्यास पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या फोंडा किल्ल्यावर स्वारी केली पण मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याचे आक्रमण परतून लावले या युद्धात छत्रपती संभाजी महाराज स्वता लढत होते. मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याचे खुप नुकसान केले, अनेक लोक कापून काढले कहर तो काय या युद्धात व्हाईसरॉय हा दोनवेळा प्राणानिशी वाचला. मराठ्यांनी दिलेल्या शिकस्तेमुळे ११ नोव्हेंबर १६८३ रोजी पोर्तुगीज सैन्याने माघार घेतली.
पोर्तुगीजांना वाटत होते की चौलला वेढा घातल्यानंतर आणि फोंडा प्रकरणानंतर छत्रपती संभाजी महाराज मागे फिरतील पण छत्रपती संभाजी महाराज गोव्यात अजुन आतमध्ये शिरले आणि २४ नोव्हेंबर १६८३ रोजी स्टेफिन म्हणजेच जुवे बेटावर हल्ला चढ़वला आणि मराठ्यांनी ते बेट जिंकून घेतले. जुवे बेट मराठयांनी जिंकलेले पाहुन विजरेई आल्व्हारो याने दुसऱ्या दिवशी आपल्या चारशे पाचशे सैन्यासह बेटावर हल्ला चढ़वला पण मराठ्यांच्या घोड़दळास भिऊन पोर्तुगीज सैन्य नदीच्या तिराकडे पळ काढू लागले आणि मराठ्यांनी हे जुवे बेट आपल्या काबीज करुन घेतले.
- राज जाधव
No comments:
Post a Comment