विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 November 2023

वीरगळ म्हणजे काय

 


वीरगळ म्हणजे काय?
भारतामध्ये स्मारके बनवण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ही स्मारके स्तंभ, तुळशी वृंदावन, विष्णुपाद, शिवलिंग, छत्री, समाधी मंदिरे, मूर्ती, इत्यादी स्वरूपात घडवलेली आपल्याला पाहावयास मिळतात. याच स्मारकांच्या प्रकारांपैकी एक म्हणजे वीरगळ होय.
एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरमरण आले असता त्या प्रसंगाचे ज्या दगडावर अथवा शिळेवर अंकन केले जाते त्या शिळेस "वीरगळ" असे म्हणतात.
इंग्रजी मध्ये याला "Hero Stone" असे म्हणतात. ही संकल्पना मूळची दक्षिण भारतातील आहे. बहुतांशी वीरगळ हे कर्नाटक राज्यामध्ये आढळतात. कानडी भाषेमध्ये यास “वीरकल्लू” म्हणून ओळखले जाते.
वीर म्हणजे मरण पावलेला शूरवीर आणि कल्लू म्हणजे दगड. मराठी मध्ये सुद्धा गळ म्हणजे दगड. वीरगळ हा स्मारकाचा प्रकार कर्नाटकमध्ये उदयास आला असावा असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे वीरगळ हा शब्द सुद्धा मूळ कानडी भाषेतील शब्दावरून आला असावा असे म्हणता येईल.
वीरगळांचे अनेक प्रकार आहेत. परंतु सामान्यतः एखाद्या वीरगळावर अंकित केलेल्या घटनांचा क्रम हा सारखाच राहतो. एका वीरगळाला काही कप्पे किंवा स्तर असतात. या स्तरांची संख्या २, ३, ४ किंवा अगदी ८ सुद्धा असू शकते. परंतु प्रामुख्याने तीन स्तर असलेले वीरगळ बहुसंख्येने आढळून येतात. एक वीरगळ अभ्यासताना त्याचे स्तर खालून वर या क्रमाने अभ्यासणे योग्य ठरते. म्हणजे सर्वात खालचा स्तर हा प्रथम व सर्वात वरचा स्तर अंतिम समजावा. यामुळे अंकित केलेल्या घटना कालानुक्रमे समजतात.
प्रस्तुत छायाचित्रामधील वीरगळ तीन स्तरांचा आहे. यामधील सर्वात खालच्या स्तरात युद्ध प्रसंग कोरलेला दिसून येतो. या स्तरातील डाव्या बाजूला इतर वीरांच्या तुलनेने जो आकाराने थोडा मोठा दिसतो, त्याच वीराच्या स्मरणार्थ ही शिळा घडवलेली आहे. ज्या वीराची वीरगळ असते तो शक्यतो डाव्या बाजूला दर्शविलेला असतो. तसेच त्याचे शौर्य अधिक स्पष्टपणे दाखवण्यासाठी काहीवेळा त्याला इतारांच्या तुलनेने थोडे मोठे दर्शविले जाते. उजव्या बाजूला शत्रुपक्ष अंकित केला जातो.
दुसऱ्या स्तरामध्ये त्या वीराचे स्वर्गगमन दर्शविले आहे. या स्तरामध्ये मध्यभागी वीर असून त्याच्या दोन्ही बाजूला त्याला स्वर्गात घेऊन जाणाऱ्या दोन अप्सरा आहेत. युद्धावेळी वीरमरण आलेला योद्धा स्वर्गात जातो असा प्राचीन भारतीय संस्कृती मध्ये समज होता. या संबंधी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आढळतो.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।
युद्धात मारला गेलास तर स्वर्ग मिळेल आणि युद्धात जिंकलात तर पृथ्वीचे राज्य भोगावयास मिळेल. म्हणूनच हे कुंतीनंदन! तू युद्धासाठी निर्धाराने उभे राहा. (भग्वद्गीता, अध्याय २ श्लोक ३७).
त्यामुळे तत्कालीन श्रद्धेप्रमाणे तो वीर युद्धात मरण पावल्यामुळे स्वर्गाला गेला असे समजून हे अंकन केले गेले असावे असे समजण्यास हरकत नाही.
या शिळेच्या सर्वात वरच्या अर्थात अंतिम स्तरामध्ये हात जोडून बसलेला वीर दिसून येतो. त्याच्या शेजारी एक शिव पुजारी शिवलिंगाची पूजा करताना दर्शविला आहे. तसेच या शिवलिंगासमोर भगवान शंकरांचे वाहन असणारा नंदी देखील आहे. या स्तराला मोक्षाचा स्तर असेही म्हणले जाते. कारण या स्तरामध्ये वीर आपले आराध्य असणाऱ्या देवतेची पूजा करताना दर्शविला जातो. या वीरगळातीळ वीराचे आराध्य दैवत भगवान शंकर आहेत. याचबरोबर "यावतचंद्रदिवाकरौ" अर्थात जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तो पर्यंत या वीराची कीर्ती राहो असा निर्देश देण्यासाठी सूर्य व चंद्र देखील कोरलेले आहेत.
संदर्भ:
इतिहासाचे मूक साक्षीदार: वीरगळ आणि सतीशिळा; अनिल किसन दुधाणे
महाराष्ट्रातील वीरगळ; सदाशिव टेटविलकर
लेख:- वीरगळ: शौर्यगाथा प्राचीन दख्खनची

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...