विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 November 2023

पिंगोरीकार शिंदे सरकार घराणे दोन शिलालेख त्यांचा इतिहास

 




पिंगोरीकार शिंदे सरकार घराणे दोन शिलालेख त्यांचा इतिहास
आणि मराठेशाहीतील योगदान!!!!!!
१. वाघजाई देवी मंदीर शिलालेख..
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वेल्ह्या जवळ असलेल्या मौजे पिंगोरी गावातील ग्वाल्हेरकर शिंदे घराण्याचे ग्रामदैवत असलेल्या वाघजाई देवीच्या सभा मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंदिरात गणेश पट्टीच्या वर कोरलेला आहे . शिलालेख उठाव स्वरूपाचा असून ५ ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहे .शिलालेखावर बरेच वर्ष रंग रंगोटी केल्यामुळे पूर्ण अक्षरे मुजून गेली आहेत तसेच काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पूर्ण पणे पुसट होवून खराब झालेली आहेत. छाप घेतला असता पूर्ण अक्षरांचे ठळकपणे वाचन करता येत आहे
गावाचे नाव : मु .पो .पिंगोरी,ता.पुरंदर , जि.पुणे
शिलालेखाचे वाचन :
१. श्री सके १७३४ अंगी
२. रा नाम सवछरे कार्ति
३. क श्रु || १ श्री वाघाई
४. चरणी वीठोजी सुत बापू
५. जी राव सीदे पा. निरंतर अस
जी.पी.एस. :१८. २२ ” १२ ’ ४१ ,७४. १२ ’’५१ ’ १६
शिलालेखाचे स्थान : वाघजाई मंदिराच्या मुख्य गाभारा प्रवेश द्वारावर गणेश पट्टीवर आहे .
अक्षरपद्धती : उठाव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : श्री वाघजाई देवीचे मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - सके १७३४ अंगीरा नाम सवछरे कार्तिक श्रु. १
काळ वर्ष : एकोणीसावे शतक - गुरुवार दि . ०५ नोव्हेबर १८१२
कारकीर्द:-दुसरा बाजीराव पेशवा.
व्यक्तिनाम : विठोजी शिंदे ,बापुजीराव शिंदे पाटील
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे ,श्री अनिकेत राजपूत
अर्थ : शालिवाहन शकाच्या - सके १७३४ व्या वर्षी अंगीरा नाम संवत्सरात श्री वाघजाई देवी चरणी तत्पर असलेले विठोजी सुत बापुजी शिंदे पाटील यांनी कार्तिक शुद्ध १ म्हणजेच गुरुवार दि . ०५ नोव्हेबर १८१२ या दिवशी मौजे पिंगोरी येथे श्री वाघजाई देवीचे मंदिराच्या ओवऱ्याचे बांधकाम केले किवा त्याचा जीर्णोद्धार केला
प्रकाशन :-एशियाटिक सोसायटी प्रबंध –पुणे जिल्ह्यातील शिलालेख -२०१२
शिलालेखाचे महत्व :- राणोजी शिंदे पासून उत्तर मराठेशाही पर्यत स्वराज्याशी एकनिष्ठ असणारे हे महाराष्ट्रातील ग्वाल्हेर कर शिंदे हे घराणे होय यांच्या कित्येक पिढ्या या महाराष्ट्रासाठी विविध ठिकाणी लढाईत खर्ची पडल्या ,पानिपतची लढाई असो किवा दिल्ली स्वारी असो .कोणी ना कोणी पराक्रम गाजवला आहेच .शिलालेखात असलेले विठोजी शिंदे हे उत्तरे कडील कर वसुलीचे काम त्यांनी केले आहे .त्यांचा मुलगा बापुजीराव याने तलवारीच्या जोरावर राजस्थान मध्ये वचक निर्माण केला होता .स्वताच्या मूळ गावी आपल्या कुळ देवतेचे वाघजाई देवीचे मंदिर बांधून किवा त्याचा जिर्णोधार करून एक सामाजिक आणि लोकहिताचे धार्मिक काम त्यांनी केल आहे .आपल्या पूर्वजांचा सार्थ पराक्रम ,धार्मिक वृत्ती ,दान धर्म ,लोकहिताचे सामाजिक कार्य याचा वारसा बापुजीराव शिंदे यांनी जोपासला आहे हेच या शिलालेखाचे महत्व आहे .
संक्षेप :- सके –शके ,सवछरे-संवत्सरे श्रु –शुद्ध ,सीदे –शिंदे ,पा –पाटील
संदर्भ -(IE VII -२७)
२.पिंगोरी येथील मठाची बारव शिलालेख-पिंगोरी
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वेल्ह्या जवळ असलेल्या मौजे पिंगोरी गावातील शिंदे घराण्याचे ग्रामदैवत असलेल्या वाघजाई देवीच्या बाजूने जो ओढा गेला आहे तिथे पिंगोरी वेल्हा रोडवर गावाच्या स्मशान भूमी शेजारी प्रसिद्ध अश्या मठाची बारव आहे त्या बारवेच्या पायऱ्या उतरल्या कि मुख्य कमानी वर कोरलेला आहे . शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ५ ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहे शिलालेखावर बरेच वर्ष दुर्लक्ष झाल्यामुळे पूर्ण अक्षरे मुजून गेली आहेत .तसेच काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पूर्ण पणे पुसट होवून खराब झालेली आहेत.शेवटची ओळ पूर्ण तुटलेली आहे छाप घेतला असता पूर्ण अक्षरांचे ठळकपणे वाचन करता येत आहे
गावाचे नाव : मु .पो .पिंगोरी,(मठाची विहीर )ता.पुरंदर , जि.पुणे
शिलालेखाचे वाचन :
१. श्री शके १६५३ परिधावी नाम
२. सवतसरें श्रावण वद्य सेव
३. टीदिसी काम सपत राजेश्री
४. कोयाजी वलद वाघोजी पा
५. टील सीदे याचे वीस रुपये
६. २०००.एकदर खर्च झाला असे
जी.पी.एस. :१८. २१ ” ४५ ’ १० ,७४. १२ ’’४१ ’ ३०
शिलालेखाचे स्थान ;- मठाच्या विहरीच्या पायऱ्या उतरल्या कि समोर कमानीवर दगडी शिळा बसवली आहे .
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : २०२०रु . रक्कम खर्च करून बारव बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - सके १६५३ परिधावी नाम(विरोधी कृत पाहिजे ) संवत्सरे श्रावण वद्य १४
काळ वर्ष : अठरावे शतक – २० ऑगस्ट १७३१ –शुक्रवार
कारकीर्द:-थोरले शाहू महाराज
व्यक्तिनाम : राजेश्री कोडांजी शिंदे ,वाघोजी शिंदे पाटील
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे
अर्थ : शालिवाहन शकाच्या - सके १६५३ व्या वर्षी परिधावी नाम (विरोधी कृत पाहिजे) संवत्सरात पिंगोरी येथील राजेश्री वाघोजी शिंदे पाटील यांचा मुलगा कोडांजी शिंदे पाटील यांनी श्रावण वद्य १४ शेवटचा दिवस म्हणजेच २० ऑगस्ट १७३१ –शुक्रवार श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी भाद्रपद अमावसेच्या आदल्या दिवशी विहरीचे संपूर्ण काम संपवले .म्हणजेच विहरीचे काम पूर्ण केले .या सर्व बांधकामाकरिता एकूण खर्च २०२० रुपये लागला . .
शिलालेखाचे महत्व :- या विहरीला मठाची विहीर म्हणतात या विहरीची रचना फार वैशिष्ठ्य पूर्ण आहे . संपूर्ण पणे तीन टप्प्यात विहरीचे बांधकाम असून विहरीच्या आत शिव मंदिर आहे तसेच इतर देवतांच्या मुर्त्या त्यात ठेवलेल्या आहेत .विहरीचे बांधकाम पूर्ण पणे वीटकामात असून जागोगाजी कोरीव काम केले आहे .पिंगोरी गावाचे मूळ पुरुष भुलोजी शिंदे यांचे पत्र वाघुजी शिंदे ,यांचा पुत्र राजेश्री कोंडाजी शिंदे पाटील यांनी २०२० रूपये खर्च करून ही विहीर वेळेच्या आधी पूर्ण केली आहे .शिलालेखात संवत्सर संपले असून नवीन संवत्सर चालू झाले आहे .त्यात यांनी या विहरीचे काम पूर्ण मोठी रक्कम करच करून केले आहे .विशेष म्हणजे श्रावण महिना संपायच्या आत हे काम त्यांनी युद्ध पातळीवर पूर्ण करून योग्य मुहूर्त साधलेला दिसतो.या शिलालेखात पिंगोरीकार शिंदे घराण्यची एक वेगळी शाखा आलेली आहे .त्या शाखेची माहिती या लेखातून नव्याने मिळालेली आहे .मराठेशाहीच्या सुरुवातीच्या काळात विहरी सारखे समाज उपयोगी एक चांगले कार्य मोठी रक्कम खर्च करून केले आहे .हेच या शिलालेखाचे महत्व आहे .
संक्षेप :- :- सके –शके ,सवछरे-संवत्सरे, शावन –श्रावण ,सीदे –शिंदे ,
संदर्भ -(IE VI -२६५ )
पिंगोरीकर शिंदे सरकार घराणे इतिहास व त्याचे मराठे शाहीतील योगदान.
१.छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी अनेक मराठा घराण्यांनी अमूल्य कामगिरी बजाविली त्यापैक एक शिंदे घराणे होय,पिंगोरी गावचे देशमुख शिंदे क्षत्रिय कुळातील असून यांचा उल्लेख महाराजा शहाजीराजे यांच्या कार्यकाळा पासून येतो.
२.छत्रपती शाहु महाराज यांच्या लष्करात श्रीमंत सरदार भोलाजी शिंदे होते, हे या गावचे मूळ पुरुष होय.,या घरण्यातील अनेक शुर वीरांचा इतिहास पानाचा आड़ गेला आहे, पिंगोरी गावातील खऱ्या अर्थाने नावा रूपास आले ते श्रीमंत सरदार फिरंगोजी शिंदे.
३.फिरंगोजी शिंदे हे पुरंदर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पिंगोरी गावचे पाटील होते .सरदार महादजी शिंदेंच्या पदरी असलेले,शिंदेशाहीच्या सोबत ते उत्तर हिंदुस्थानात जे मराठा सरदार आले, त्या मराठा साम्राज्य विस्तारासाठी अमूल्य कामगिरी बजावणारे महत्वपूर्ण व्यक्तिमत्व होय .याच ,फिरंगोजी शिंदे व त्यांच्या वारसदारांचा इतिहास हा अज्ञातच राहिला.
४.फिरंगोजी शिंदे हे ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याचे शुर योद्धे आणि लष्करी अधिकारी होते, मराठा साम्राज्याचा उत्तर भारता मध्ये विस्तार होत गेला आणि माळव्यात मराठे हुकूमत गाजवू लागले या मध्ये प्रमुख एक सरदार फिरंगोजी शिंदे चा उल्लेख येतो .
५.पिंगोरीचे शिंदे हे ग्वाल्हेरच्या सरदार जहागिरदारात "पिंगोरकर शिंदे साहेब" नावाने ओळखले जात,शिंदे शाहीच्या अनेक मोहिमा मध्ये फिरंगोजी शिंदे यांनी पार पाडल्या आहेत .
६.बालवयातच सैनिकी शिक्षणाचे बाळकडू मिळाल्याने फिरंगोजी शिंदे यांचे नाव मराठा दौलतीतील मातब्बर सरदार म्हणून नाव लौकिक होता . उत्तरेतील अनेक मोहीमा त्याच्या नेतृत्वाखाली फत्ते झाल्या होत्या,
७.फिरंगोजीरावांना खंडेराव आणि विठोजीराव हे दोन पुत्र होते,थोरले पुत्र खंडेराव आणि फिरंगोजी एका लढाई मध्ये मारले गेले,पुढे विठोजीरावांना सरदारकी मिळाली,सीतामहू येथे ते शिंदेशाहीच्या वतीने कर वसूल करत,याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला,सध्या त्या ठिकाणी त्यांची छत्री समाधी उभारण्यात आलीआहे .
८..विठोजीरावांना बापूजीराव,गमाजीराव,आणि खंडेराव असे तीन पुत्र होते पुढे बापूजीराव आणि गमाजीरावांना सरदारकी मिळाली,दौलतराव शिंदेची मर्जी संपादन करून नावा रुपास आले ते बापूजीराव,बापूजीराव ही खासी असामी यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर राजस्थानात जबरदस्त वचक निर्माण केली होती .
९. दौलतराव शिंदे यांनी मेवाड या ठिकाणी सरदार अंबूजी इंगळे आणि बापूजी शिंदे यांना सुभेदार नेमले,लागलीच मेवाड ची १६ लक्षांची कर वसुली केली,१८०६ ते १८१७ पर्यंत ते राजस्थानातच होते,
१०.राजस्थान मधील मेवाड,अजमेर जयपूर जोधापुर ही ठाण्यांची कर वसुली प्रामुख्याने बापूजी शिंदे करत,जयपूरकरच्या शासक जगतसिंह याने इंग्रज सेनापती लॉर्ड लेक यांच्याकडे दौलतरावांच्या विरोधात मदत मागितली होती याला वठणीवर आणण्यासाठी दौलतरावांनी कंबर कसली, १८०८ ते १८१० या तीन वर्षाचा काळात दौलतरावांनी जयपूरचा मुलुख जाळून पोळून उध्वस्त केला,
११.ही मोहीम आटपून दौलतराव ग्वाल्हेरला आले,बापूजीराव ही अजमेर येथेच तळ ठोकून होते,१८०८ ते१८१७ पर्यंत जयपूरवर स्वाऱ्या आणि खंडणी वसूल करण्यात कोणतीच कसूर ठेवली नाही,दौलतराव राजस्थान मधून निघून गेल्या नंतर जयपूर राजाकडून कर सुरूळीत भेटेल म्हणून दोन वर्षे वाट पाहिली,आणि नंतर सतत जयपूरवर आक्रमण केले,जयपूरकरांचा कालाकांकर आणि टोडारी या दोन ठिकाणी राजपूत सैन्याचा बापूजीरावांनी निर्णायक पराभव केला,जयपुरकरांनी फूस जोधापुरच्या राणाने लावून दिली त्याने शिंदेशाहीचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला,या वेळी दौलतराव स्वकीयांचा बंड मोडण्यात व्यस्त होते याचा फायदा जोधापुरकर राणा घेऊ पहात होत पण तो सफशेल फेल गेला, जयपूरकर आणि जोधापुरकर सैन्याने संयुक्त आक्रमण केले पण त्याचा बिमोड बापूजीराव,लखबादादा लाड यांनी केला,व राजस्थानावर पुन्हा मराठयांचे वर्चस्व निर्माण झाले,
१२..मध्य भारतातील रतलाम, सीतामऊ सैलाणा,भोपाल ही संस्थाने देखील१८१८पर्यंत शिंदे शाहीच्या पंजाखालीच होती,याची सुभेदारी बापूजीरावांना होती,यांनी आपल्या गावी असलेल्या पिंगलाई देवीचा जीर्णोद्धार केला असून प्रवेश द्वारा वर दरवाजा अर्पण केल्याचा शिलालेख असून ग्वाल्हेर दरबारातून पिंगोरीकर शिंदे साहेब यांना पालखी,छडी,घोडा आदी लवाजमा,खिलत देवून मान सन्मान करण्यात आला..!
१३.बाबूगढ़ अजमेर येथील बालाजी मंदिरांची निर्मिती सरदार फिरंगोजी शिंदे पिंगोरीकर यांनी आपल्या अजमेर जहागिरित केली मंदिराच्या गाभाऱ्यात बालाजी मूर्ती सोबत मारुतीरायाची मूर्ती आहे..!!, ते महादजी शिंदेंचे अत्यत विश्वासु सरदार होय,
१४.दिल्लीदिग्विजय, जाट राजपूत,यांच्या वर नियंत्रण,माळवा विजय या असंख्य कामगिरी त्यांनी पार पाडल्या,असमान्य पराक्रमुळे मराठेशाहीत त्यांचा वेगळाच दबदबा होता.शिंदे शाही दप्तरा मध्ये पिंगोरिकर शिंदे यांचा पत्र व्यवहार उपलब्ध आहे.
१५.सरदार फिरंगोजी शिंदे यांची उपलब्ध असलेल्या चित्रावरून त्याची शरीररिष्ठी म्हणजे धिप्पाड देह, रंग सावळा,डोळे टपुरे, पीळदार मिश्या मस्तकी शिंदे शाही पगड़ी,मस्तकी भंडारा आहे .या वरून त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व सिद्ध होते .पिंगोरी स्थित त्यांच्या अनेक जुन्या वास्तु, वाडे, हुड समाधी, छत्र्या आहेत.ग्वाल्हेरकर शिंदे यांचा वाडा पाहणाऱ्यांचे लक्ष वेधुन घेतो,मजबूत तटबंदी ,महाकाय प्रवेशद्वार आज शेवटच्या घटका मोजत आहेत.वाड्यालगत एक समाधी आहे या समाधीवर एका दगड़ा मध्ये त्या वीर पुरुषाचे शिल्प कोरले आहे. प्राथमिक अंदाज सदर समाधी ही श्रीमंत सरदार फ़िरंगोजी शिंदे सरकार यांची असावी आणिइतर बाकी काही समाधीचे गूढ़ उलघडेल नाही,यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
संदर्भ :- १.दौलतराव शिंदे कार्य आणि कर्तृत्व काळ- लेखक व्ही. आर. कथर्डेकर.
२.तवरीख ए जगिरदारान ग्वाल्हेर-
३.अलीजाहबहाद्दर महादजी शिंदे :-डॉ.पी .एन. शिंदे
४.पिंगोरीकार शिंदे घराणे माहिती ;- श्री शेखर शिंदे सरकार
@©शिलालेख माहिती आणि संकलन –श्री अनिल दुधाणे.
टीप...सदर कार्यात प्रसाद शिंदे ,विश्वजीत शिंदे ,निखिल व स्वप्नील गायकवाड .शेखर शिंदे . नाना शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...