विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 November 2023

*छत्रपति शिवरायांच्या हयातीत त्यांच्या बद्दलच्या कृतज्ञेपोटी काढलेले दगडी शिल्प.*

 *छत्रपति शिवरायांच्या हयातीत त्यांच्या बद्दलच्या कृतज्ञेपोटी काढलेले दगडी शिल्प.* ‌‌‌‌‌ 




 दक्षिण दिग्विजय मोहिम आटोपुन तिथे सगळी कडे स्वराज्याची व्यवस्था लावत, आपले अधिकारी नियुक्त करत तब्बल दोन वर्षा नंतर महाराज स्वराज्यात परतत होते. परतीच्या मार्गावर धारवाड जवळील बेलवडी नावाचे छोटेसे गाव लागले. स्वराज्याच्या नियमा प्रमाणे आणि महाराजांच्या आज्ञेनुसार कुठलिही गरजेची वस्तु फुकट किंवा लुटुन, जोर-जबरदस्ती करुन घ्यायची नाही. बेलवडी गावाजवळ स्वराज्याच्या सेनेचा मुक्काम होता. त्यावेळी बेलवडी आणि त्याच्या आसपासच्या काही गावांची जहागिरी येसाजी देसाई यांच्या कडे होती. एक दिवस काही मराठा शिपाई दुध आणण्या साठी गावात गेले, पण गावक-यांनी त्यांना दुध दिले नाही. म्हणुन त्याच दिवशी रात्री मराठा सेनेने गावातील काही दुभती जनावरे उचलुन आणली. ज्यावेळी येसाजीला ही बातमी कळाली त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता मराठ्यांच्या छावणीतील काही बैलं पळवुन नेले! विषयाने विषय वाढत गेला. मराठास सेनेतील एक तुकडी आपली बैलं आणायला गावात गेली, येसाजींनी बैलं त्यांच्या गढीत बांधुन ठेवलेले होते. दोन्ही सैन्यात लढाई झाली. येसाजींच्या प्रखर प्रतिकारामुळे मराठ्यांनी निकराचा हल्ला चढवला त्या युद्धात येसाजी कामी आले, परंतु येसाजींची पत्नी मल्लमा देवी यांनी युद्धाची सुत्रे आपल्या हाती घेऊन मराठा सेनेचा आणखी तिखट प्रतिकार केला. त्यामुळे मराठा तुकडी माघारी फिरली. महाराजांना ही खबर कळताच त्यांनी काही सुचना देऊन सरदार सखुजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जास्तीचे सैन्य पाठवले. या मोठ्या तुकडी पुढे मल्लमादेवीचे सैन्य काही टिकले नाही. आपली हार होताना दिसताच मल्लमा देवी जवळच्या जंगलात पळुन गेल्या. सखुजी गायकवाड़ांनी त्यांचा पाठलाग करुन जंगलातुन त्यांना पकडुन आणले आणि महाराजां पुढे हजर केले. ईथपर्यंत सगळं ठिक होतं. पण ज्यावेळी मल्लमा देवी गरजली की " राजन तुमच्या बद्दल खुप ऐकलं होतं, तुमचं रयतेवरचं प्रेम, तुमचं स्रीदाक्षिण्य, तुमचं काटेकोर कायदेपालन, परंतु आज तुमच्याच एका सरदाराने माझं स्रीत्व हिसकावलं, माझ्याशी गैरवर्तन केले!!" हे ऐकताच महाराजांचा रागाचा पारा चढला. परंतु त्यांनी लगेच निर्णय घेतला नाही! संपुर्ण प्रकरणाची शहानिशा करुन ख-या-खोट्याची पडताळणी करुन सखुजी गायकवाडास जबर शिक्षा सुनावली. मग वेळ आली मल्लमादेवीची, मल्लमाने आपला गुन्हा कबुल केला,त्यावेळी त्यांच्या कडे त्यांचे दुधपिते तान्हुले बाळ होते, मल्लमा पुढे म्हणाल्या "राजन माझ्या गुन्ह्याची आपण जी सजा द्याल ती मी भोगायला तयार आहे, पण माझ्या या बाळाचा काय गुन्हा आहे?, त्याचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा". तेंव्हा महाराजांनी थोडा वेळ विचार केला आणि मल्लमादेवींच्या बाणेदारपणा आणि खरेपणावर खुश होऊन त्यांनी त्यांना जवळ बोलावले, त्यांचे बाळ आपल्या कडे घेतले त्याला मांडीवर घेऊन आपल्या शिपायाला दुधाने भरलेली वाटी आणि चमचा मागवला, आणि त्या बाळास चमच्याने दुध पाजताना महाराज म्हणाले " देवी तुमच्या पराक्रमाने, बाणेदारपणाने आणि खरेपणाने तुमचे सर्व गुन्हे धुऊन काढले आहेत, म्हणुन तुमची जप्त केलेली जहागिर आम्ही तुम्हास सन्मानाने परत केली जात आहे, आणि आजपासुन आपण आमच्या भगिनि आहात, आम्ही आपणास सावित्रीबाई म्हणु आणि तुमचा पुत्रास त्याच्या दुध- भाकरी साठी म्हणुन जास्तीची दोन गावं ईनाम देत आहोत!! मल्लमा देवी उर्फ सावित्रीदेवी भाराऊन गेल्या. काही दिवस मुक्काम करुन महाराज स्वराज्यात निघुन गेले, परंतु सावित्रीदेवी च्या मनातुन ती घटना काही केल्या जात नव्हती! शेवटी त्या कृतज्ञतेतुन थोडेसे उतराई व्हावे या भावनेने सावित्री देवींनी त्या घटनेची साक्ष देणारे शिल्प बनवुन घेतले, जे दोन प्रकारात विभागलेले आहे, ज्यात वरच्या भागात महाराजांची घोड्यावर स्वार झालेली हातात ढाल तलवार घेतलेली सुंदर मुर्ती आहे, मागे एक चामरधारी शिपाई आहे आणी शेजारी दोन हत्यारबंद शिपाई आहेत. तर दुस-या आणि खालच्या भागात महाराज आपल्या मांडीवर बाळाला घेऊन बसलेत आणि त्यांच्या एका हातात वाटी असुन दुस-या हातात चमचा आहे, जणु काही ते बाळास चमच्याने दुध पाजत आहे, आणि शेजारी सावित्री देवी हात जोडुन कृतज्ञता व्यक्त करत उभ्या आहे. अश्या प्रकारचे शिल्प बनवुन कर्नाटकातील यादवाड मधिल हनुमान मंदिरात स्थापन केले. जे आजही तेथे पहायला मिळते. बरीच वर्ष, शतकं म्हंटल तरी चालेल तेथील स्थानिकांना त्या शिल्पाचं महत्व माहित नव्हत किंवा कळत नव्हत, पण अली कडे काही वर्षापासुन महाराष्ट्रातुन बरीच शिवभक्त आणि पर्यटक त्या शिल्पास पहायला जात असल्यामुळे स्थानिक लोक त्या शिल्पाची थोडीफार काळजी घेताना दिसतात, त्या शिल्पा साठी स्वतंत्र स्थान असावे असे वाटते कारण महाराज हयात असताना दुस-याने कृतज्ञता म्हणुन ज्यांचे शिल्प तयार केले गेले ते जगातील एकमेव महापुरुष महाराज आहेत. काही चुकत असल्यास वाचकां कडुन मार्गदर्शनाची अपेक्षा आहे जय शिवराय, खलिल शेख

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...