स्वराज्य संकल्पक महाराजा फर्जंद शहाजी राजेंनी प्रथम पासुनच स्वराज्याचे स्वप्न पाहिले, ते जोपासले आणि आपल्या स्वप्नपुर्ती साठी आपल्या पुत्राच्या मनात स्फुलिंग चेतवले. ज्यावेळी जिजाऊ आणि बाल शिवबावर पुण्याच्या जहागिरीची जवाबदारी सोपवली (इ.स.१६३६) त्यावेळी शिवबा अवघे सहा वर्षाचे होते. त्यावेळी शिवबाची साथ देण्यासाठी शहाजी राजेंनी जी माणसं निवडली होती, त्यामधे शहाजी राजांना आपली निष्ठा वाहिलेले मोसे खो-याचे वतनदार श्री. बाजी पासलकर हे प्रमुख होते.
मित्रांनो मी खलिल शेख, आज याच स्वामीनिष्ठ बाजी पासलकरांच्या हौतात्म्याची थोडक्यात माहीती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आवडल्यास नेहमी प्रमाणे तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. आणि काही चुकत असल्यास ( व्याकरण सोडुन) मार्गदर्शन करावे.
बाजी हे मोसे खोऱ्यातील मोसे बु.गावचे रहिवासी. मोसे खोऱ्यातील निगडे मोसे पासून ते सांगरून आणि डावेजपासून ते धामण-ओव्होळ पर्यंतची जवळपास ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती. ही वतनदारी आदिलशहा कडील होती. मोसे खो-याचे वंशपरंपरेने वतनदार असणा-या बाजी पासलकरांच बारा मावळात खुप वजन होतं. त्यांचा शब्द सहसा कोणी डावलत नसे. शिवाय त्या भागातील किचकट तंटे, भांडणे वादसुद्धा बाजींच्या पुढाकाराने सोडवली गेल्याच्या ब-याच घटनांची नोंद इतिहासात सापडते. बाजींना मुलगा नव्हता. एक मुलगी होती सावित्रीबाई, जिचा विवाह रोहिडखो-याचे वतनदार कारीचे कान्होजी नाईक जेधे यांच्याशी झाला होता. म्हणजे शिवरायांचे जे सर्वात जवळचे कट्टर अनुयाई होते बाजी पासलकर आणि कान्होजी नाईक जेधे हे सासरे- जावयी होते.
बारा मावळातील या दोन मातब्बरांनी शिवरायांना जहागिरीची घडी व्यवस्थित बसवण्यापासुन, स्वराज्य स्थापनेपासुन ते आपल्या अंतापर्यंत फक्त तन-मन-धनानेच नव्हे तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताचा शेवटचा थेंब सांडेपर्यंत साथ दिली!
शिवरायांनी वयाच्या १४व्या वर्षी (इ.स.१६४४) रोहिडेश्वरावर रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळी पण शिवरायांच्या तरुण सवंगड्यासह बाजी पासलकर आणि कान्होजी जेध्यांसारखे अनुभवी सहकारी पण उपस्थित होते.
आसपासच्या विखुरलेल्या वतनदारांना एकत्रित करुन त्यांना एका छत्राखाली आणण्याची जवाबदारी स्विकारुन ती अत्यंत उत्तम रित्या बाजींनी पार पाडली. शिवरायांनी तोरणागड ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. नंतर हळु-हळु आसपासचे लहान-मोठे किल्ले स्वराज्यात सामिल होऊ लागले. यासर्व घटनांचे साक्षिदार आणि साथिदार बाजी होते. शिरवळचे ठाणे व सुभाममंगळचा छोटेखानी किल्ला पण अशाच प्रकारे स्वराज्यात आला. त्यावरचा आदिलशाही अंमलदार होत मियां रहिम अहमद. त्याने आदिलशहा कडे विस्तृत तक्रार केली. प्रथम आदिलशहाने दुर्लक्ष केले. पण जसे शिवरायांना स्वराज्यासाठी साथ देणारे होते, तसेच शिवरायांमुळे आपली जहागिरी,वतनदारी नष्ट होईल या भितीने शिवरायांना विरोध करणारे पण होते. त्यांनी पण तक्रारी केल्या.तेंव्हा आदिलशहाने फत्तेखान नावाच्या आपल्या सरदाराला शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्यावर धाडले! सोबत नामी -गिरामी सरदारांना आपापल्या सेनेसह फत्तेखानासोबत जायचा हुकुम केला. त्यामधे मिनाद शेख,रतन शेख शरीफशाह, मताजी घाडगे, बजाजी निंबाळकर, बाळाजी हैबतराव, फाजलशाह, आणि अश्रफशाह हे सरदार होते. जवळ-जवळ १५ते २० हजाराची सेना होती!
त्याच दरम्यान पुरंदर किल्यावर आदिलशाहीचे पिढिजात किल्लेदार असणारे महादजी निळकंठराव सरनाईक यांच्या मुलांमधे अधिकारा साठी भाऊबंदकीचा वाद चालला होता. त्याचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करुन घेत महाराजांनी पुरंदर ताब्यात घेतला.(हे एक वेगळं आणि मोठं प्रकरण आहे, ते नंतर शेअर करीन.) आणि फत्तेखानाचा सामना करण्याच्या इराद्याने महाराज ससैन्य पुरंदरावर दाखल झाले. याचे कारण पण तसेच आहे, शिवनिती नुसार शत्रुला आपल्या सिमेच्या बाहेरच रोखणे, कारण शत्रु जर सिमेच्या घुसला तर त्याचे भयंकर परिणाम आम जनतेला आणि सामान्य शेतक-यांना भोगावे लागतात!! शिवरायांनी आपल्या बरोबर पुरंदरावर आणलेल्या जमावात बाजी पासलकर,कान्होजी जेध्यांसारखी वयोवृद्ध अनुभवी मंडळी तर होतीच, पण, बांदल, झुंझारराव देशमुख,शिळमकर देशमुख आपपाल्या मंडळीसह हजर होती. शिवाय गोदाजी जगताप, भिमजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, कावजी मल्हार यासारखे तरुण, फुरफुरत्या बाहुंचे सहकारी होते. एकुण जमाव अंदाजे ३००० च्या आसपास असावा.
फत्तेखानाला जशी खबर लागली की शिवराय पुरंदरावर आले आहेत, त्याने लगेच आपला मोर्चा पुरंदरच्या दिशेने वळवला, आणि मजल-दर-मजल करत तो पुरंदरच्या जवळ १० कोसावर असणा-या बेलसर गावी पोहोचला, आणि बेलसरच्या पुर्वेला असणा-या क-हा नदीच्या काठी आपली छावणी टाकली, आणि आपला एक सरदार बाळाजी हैबतरावास शिरवळचा भुईकोट किल्ला ताब्यात घेण्यासाठी ससैन्य पाठवले. बाळाजीस विनासायास किल्याचा ताबा मिळाला (किंवा दिला गेला, कारण असे घडल्यास फत्तेखान थोडासा बेसावध राहिल, आणि घडलेही तसेच), नंतर सारासार विचार करुन महाराजांनी कावजी मल्हारच्या नेतृत्वाखाली निवडक मंडळीना शिरवळचे ठाणे परत ताब्यात घेण्यासाठी रवाना केले त्यात गोदाजी जगताप, भीमजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर इत्यादी वीरांचा समावेश होता. ज्यावेळी स्वराज्याची ही सेना शिरवळ जवळ पोहोचली त्यावेळी त्या सुभानमंगळगढीतून बाळाजी हैबतराव आणि त्याची आदिलशाही सेना स्वराज्य सेनेला येताना पाहत होती. त्यांनी पण स्वराज्य सेनेचा सामना करण्याची जय्यत तयारी केली. ज्या वेळेला स्वराज्याची सेना शिरवळच्या गढीच्या तटाला भिडली त्यावेळी वरून आदिलशाही सेनेने यांच्यावर मोठमोठाली दगड, बैलगाड्यांची चाके, उखळे, जळते पलीते, मुसळे, उकळते तेल, निखारे वगैरेनी त्याच्यावर वरुन मारा केला! परंतु अत्यंत तयारीत असणाऱ्या मराठा सेनेने त्या सर्वांचा सामना करत शिरवळच्या गढीच्या तटाला खिंडार पाडले. खिंडार पाडल्या नंतर स्वराज्य सेना त्या खिंडरातून आज शिरली. आणि त्यांनी एकच हाहाःकार माजवला! बाळाजी हैबतरावास कावजी मल्हारने गाठले, पहिल्याच झटक्यात संभाजी इंगळे यांनी २५, पोळांनी १२, चोरांनी १४, घाडगे यांनी २३ आणि वाघाने १६ तर कावजी मल्हारनी शत्रूचे एकूण १९ योद्धे ठार केले! त्यानंतर मराठा सेनेचा वाढता जोर पाहून आदिलशाही सेना मागे सरकू लागली त्याच वेळेत कावजी मल्हारने भाल्याच्या प्रचंड प्रहार करुन बाळाजी हैबतरावास ठार केले. बाळाजी हैबतराव पडलेला पाहिल्यानंतर आदिलशाही सेनेनी हत्यारं खाली ठेवली आणि शरण आली! त्याच्या नंतर शिरवळच्या गढीची व्यवस्था लावून जे शरण आलेत त्यांना घेऊन मराठा सेना पुरंदरच्या वाटेस लागली. पुरंदरला आल्यानंतर शरण आलेल्यांना महाराजांनी सोडून दिले, आणि ह्या घटनेनंतर थोडा वेळ काढुन एके दिवशी रात्री दुसरी तुकडी पुरंदरच्या पूर्वेस बेलसर गावात असणाऱ्या फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने निघाली. त्या ठिकाणी गेल्यानंतर रात्री संपूर्ण निरव शांतता होई पर्यंत स्वराज्याची तुकडी फत्तेखानाच्या अजस्त्र अजगरासारख्या झोपलेल्या छावणीच्या पूर्वेच्या दिशेला लपून बसली आणि रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी स्वराज्य सेनेने फत्तेखानाच्या छावणीवर हल्ला केला. इतका सुसाट आणि जबरदस्त हल्ला होता की पहिल्याच हल्ल्यात पाच सहाशे गनीम कापले, आणि एकच गदारोळ माजला आदिलशाही सेनेला अंधारात काहीच कळत नव्हते! काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आलं की शत्रूंने हल्ला केलेला आहे! फत्तेखानापर्यंत ही खबर गेली,फत्तेखान उठला, तो पण थोडा भांबावला परंतु त्वरित सावध होत त्यांने आपल्या सेनेला हत्यारे घेऊन विरोध करण्याचा आदेश दिला. ज्या वेळेला मराठा सेनेने पाहिले की शत्रू जागा होतो आहे आणि विरोध करण्याच्या तयारीत आहे, त्यावेळेला लढता लढता स्वराज्य सेना हळूहळू मागे सरकु लागली. या स्वराज्य सेनेबरोबर एक स्वराज्याच्या झेंड्याची तुकडी होती. स्वराज्याच्या जरीपटक्याची, आणि स्वराज्याचा जरीपटका हातात घेऊन एक मावळा एका घोड्यावर बसलेला होता. ज्या वेळेला शत्रू सेनेने त्या झेंड्याच्या तुकडीला पाहिले त्या वेळेला शत्रू सेनेतील काही सैनिक त्या झेंड्याच्या तुकडीकडे धावत सुटले आणि त्यांनी त्या झेंडेक-याला घेरले त्याला घेरल्यानंतर त्या झेंडेक-याकडे जायला प्रत्येक शत्रु धडपडत होता. आणि मराठ्यांच्या तुकडीतील प्रत्येक मावळा एका डोळ्याने शत्रूशी लढत होता, लढताना एका डोळ्याने झेंडेक-याकडे पाहत होता. काहीही झाले तरी तो झेंडा खाली पडू नये, तो आपल्या स्वराज्याची शान आहे, आपल्या स्वराज्याचा अभिमान आहे. तो झेंडा जमिनीवर पडता कामा नये! असा विचार प्रत्येक जण करत होता. त्या सेनेत एक वीर होता ज्याने शत्रूशी लढता लढता त्या झेंडेक-याच्या तुकडीकडे मुसंडी मारली आणि झेंडेक-या पर्यंत पोहोचेपर्यंत पाच सहा गनिम कापले परंतु त्या झेंडेकर्यावर एका शत्रुने मागून वार केला आणि तो झेंडेकरी घोड्यावरून खाली पडू लागला तितक्यात हा वीर चपळतेने त्या झेंडेक-यापर्यंत पोहोचला, जमिनीवर पडत असलेला झेंडा त्याने आधांतरी तोलला आणि जखमी झालेल्या झेंडेक-याला आपल्या घोड्यावर घेऊन तो मागे फिरला! त्यानंतर स्वराज्य सेनेच्या तुकडीतील जवानांनी आपल्या झेंडेक-याला त्या संकटातून बाहेर काढले आणि स्वराज्याची सेना धावत पळत पुरंदरावर पोहोचली. झेंडा खाली पडून न देता अभिमानाने मिरवत किल्ल्यावर परत आणला म्हणून शिवरायांनी त्या झेंडेक-यास "सर्जेराव" हा किताब बहाल केला तो झेंडेकरी दुसरा तिसरा कोणीही नसून बाजी पासलकरांचा नातू, कान्होजी जेध्यां पुत्र बाजी जेधे होत. ज्यांना शिवरायांनी सर्जेराव हा किताब दिला जे पुढे स्वराज्यात बाजी सर्जेराव जेधे या नावाने प्रसिद्धीस पावले.
त्यानंतर पुरंदरावर विजयाचा जल्लोष साजरा केला गेला. परंतु इकडे चिडलेल्या फत्तेखानाने पहाटे पहाटेच पुरंदरावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. आणि आपली सेना घेऊन तो पुरंदराच्या दिशेने निघाला. पुरंदराच्या पायथ्याशी आल्यानंतर त्याने व्युह रचना केली. सेनेच्या आघाडीस मुसेखान, पिछाडीस फत्ते खान स्वतः, डाव्या अंगास बजाजी निंबाळकर, तर उजव्या अंगास मताजी घाडगे. आणि फत्तेखान सर्वांच्या मागे राहून युद्धाचे नेतृत्व करू लागला! वरून स्वराज्य सेना हे सर्व पाहत होती. परंतु खालुन वरती फक्त निरव शांतता दिसत होती. फक्त मैदानी युद्धाचा अनुभव असलेल्या आदिलशाही सेनेला डोंगर चढताना खूपच त्रास होत होता. कसेबसे धापा टाकत आदिलशाही सैन्य पुरंदरचा अवघड डोंगर निम्मा चढून वर आले. वरुन स्वराज्य सेना हे सर्व पाहत होती. जोपर्यंत माराच्या टप्प्यात शत्रूसेना येत नाही तोपर्यंत मराठा सेना आणि पुरंदर शांतच होता. ज्या वेळेला माराच्या टप्प्यात शत्रूसेना आली वरुन अचानक मोठमोठ्या शिळा, दगडं त्यांच्यावर ढकलण्यात आली. आणि त्या दगडांच्या मारामुळे काही जागेवरच ठार झाले, काही डोंगरावरून कडेलोट केल्याप्रमाणे खाली पडले. संपूर्ण पुरंदरचा डोंगर रक्तबंबाळ झाला होता! तरी पण फत्तेखान आपल्या सेनेला स्फूर्ती देत ओरडत वरती चढण्याचे आदेश देत होता. आणि आघाडीला असलेल्या मुसेखान सुद्धा आरडाओरडा करत आपल्या शिपायांना स्फुरण देत वर चढत होता. शत्रुसैन्य टप्प्यात आल्यानंतर अचानक पुरंदरचे मुख्य द्वार उडून एक तुकडी आदिलशाही सेनेवर तुटून पडली. समोरासमोर गाठ पडताच गोदाजी जगतापांनी प्रथम मुसेखानाला गाठले. सिदोजीने अश्रफशहाला धरले, मिनादशेखला भैरोजी चोराने, तर मताची घाटगेला भीमजी वाघाने गाठले. पुरंदरच्या उतरंडीवरच लढाई सुरू होती. मुसेखानाला आणि त्याच्या सेनेला स्वराज्य सेना वर येऊ देत नव्हती. तर आपल्या सैन्यावर काही आघात होऊ नये म्हणून मुसेखान मराठा सेनेला खाली जाऊ देत नव्हता.
याच हातघाईच्या लढाईत गोदाजी जगतापांनी मुसेखानाच्या छातीत आपला भाला सपकन खुपसला, आणि त्याच ताकतीचा असणारा मुसेखानाने तो भाला आपल्या छातीतुन आपल्याच हाताने खपकन बाहेर काढला आणि त्याचे दोन तुकडे करून फेकून दिला! आणि गोदाजी जगतापांवर वार केला. तो वार गोदाजींना निसटता लागला! चिडलेल्या गोदाजींनी असा जबरदस्त प्रतिवार केला की मुसेखान निम्म्यातुन फाडून टाकला! खांद्यापासून खाली मध्यापर्यंत फाटलेला मुसेखान खाली पडला. त्याला पडलेला पाहताच आदिलशाही सेना धीर खचून पळून जाऊ लागली. आणि आपल्या सेनेला पळताना पाहून सेनेचा सेनापती फत्तेखान त्यांच्याही पेक्षा जास्त वेगाने माघारी पळत सुटला! मी मी म्हणणारे आदिलशाही सरदार दरकदार युद्ध मैदान सोडून पळून जाऊ लागले! हे पाहिल्यानंतर मराठ्यांच्या एका छोट्याशा तुकडीने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्या तुकडीमधे बाजी पासलकर पण होते. पुरंदरच्या पायथ्यापासून सासवड गावापर्यंत त्यांचा पाठलाग चालू होता. परंतु सासवड जवळ गेल्यानंतर ज्यावेळेला शत्रू सेनेने पाहिलं की आपला पाठलाग करणारी तुकडी छोटीशीच आहे, त्यांनी फिरून या स्वराज्याच्या छोट्याशा तुकडीवर प्रतिहल्ला केला. घनघोर युद्ध सुरू झाले आपल्या सवंगड्यांसह चवताळलेले बाजी शत्रुसेनेवर असे काही तुटुन पडले की जणुकाही पिढ्यानपिढ्याचा साचलेला राग, घृणा एकाच झटक्यात बाहेर पडली असावी. आणि आज आलेला एकही शत्रु जिवंत जाता कामा नये. जिवाची पर्वा न करता हा वयोवृद्ध योद्धा गनिमांच्या गराड्यात शिरला. आणि नको व्हायचे तेच घडले. त्या युद्धात ६५ वर्षाचा एक तरुण तरतरीत योद्धा धारातीर्थी पडला! तो योद्धा म्हणजे वीर बाजी पासलकर! स्वराज्याचे पहिले धारातीर्थ वीर बाजी पासलकर!! स्वराज्याच्या उभारणीसाठी स्वराज्याच्या पायाभरणीत आपल्या रक्ताचा अभिषेक करणारे वीर बाजी पासलकर!!! बाजींची समाधी आज सासवड जवळ कुंभारवाडा येथे आपल्याला बघायला मिळेल. बेलसर गावात बाजींचे स्मृतीस्थळ आहे. बाजींना वंशपरंपरागत यशवंतराव ही पदवी होती, त्यामुळे या समाधीला यशवंतबाबांची समाधी म्हणून ओळखले जाते. पुण्याजवळील वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजी पासलकरांचे नाव देऊन गौरवण्यात आले. बाजी पासलकरांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोड वर आहे. अशा प्रकारे स्वराज्याचे पहिले युद्ध स्वराज्य सेनेने छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली जिंकले. परंतु स्वराज्याचा एक अनमोल हिरा, आणि काही मोती गमावले गेले याचा सल शिवरायांच्या मनात कायम राहिला. स्वराज्यासाठी स्वराज्याच्या पहिल्या युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या स्वराज्याच्या अग्नीकुंडात आपल्या प्राणाची आत्माहुती देणाऱ्या वीर बाजी पासलकर आणि त्यांच्यासारख्या अनामिक हुतात्म्यांना माझा मानाचा मुजरा, आणि मनोभावे वंदन.
तर मित्रांनो हा लेख आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट मध्ये सांगा- खलील शेख
No comments:
Post a Comment