विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 21 December 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग -12

 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜
अग्निदिव्य
📜🗡भाग -12📜🚩🗡
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
_🚩📜🚩___


जपून रे बाबांनो. शिवबा, अरे आजवर तुम्ही एवढी धाडसे केली. कधी रोखण्याचे मनातसुद्धा आणले नाही; प्रोत्साहनच दिले.
पण आताशा जीव राहवत नाही रे बाबा. शिवाजीची आई होणे सोपे नाही एवढे बरीक खरे!
चिंता करू नये आईसाहेब. शहजाद्याचा इतमाम राखण्याच्या सख्त सूचना बादशहाने प्रत्येक ठाणेदारास आणि अंमलदारास दिल्या आहेत. शिवाय गाझी बेग नावाच्या एका बड्या सरदाराला आम्हास आग्र्यास सुखरूप घेऊन येण्याची कामगिरी सोपवली आहे. याव्यतिरिक्त खुद्द मिर्झाराजांनी आमच्या संरक्षणासाठी त्यांच्या अत्यंत विश्वासाच्या, त्यांच्या रक्ताच्या माणसास, तेजसिंह कच्छवास पुरेशा शिबंदीसह थेट आग्र्यापर्यंत आमच्यासोबत राहण्यास नामजद केले आहे. असे वाटते की, आई भवानी मिर्झाराजांचे राजकारण यशस्वी करून स्वराज्यास कौल देणार. या कारणे चिंता सोडावी.

पण त्याला औरंगजेब म्हणतात बाबा. सख्ख्या भावांचे आणि पुतण्याचे जीव घेताना, बापाला कैदेत टाकताना त्याचे हात थरथरले नाहीत. आपण तर वैरीच त्याचे. एखादा गाफील क्षण सारे उलटेपालटे करून जायचा.
आपली ही शिकवणच आम्हास हरहमेश सावधान ठेवत असते. त्याच संबंधीच्या खबरा घेऊन पहाटे कर्माजी आला होता. आग्र्याहून निसटायचे तर मदतीचे ठाव तयार हवेत. शत्रुप्रदेशातून शेकडो कोसांच्या मजला मारणे थट्टा नव्हे. ती सारी तजवीज पूर्ण होत आली आहे.
सदर बसल्याची वर्दी घेऊन हुजऱ्या आला.

-
आईसाहेबांना सोबत घेऊन महाराज सदरेकडे निघाले. नऊ वर्षांचे छोटे शंभूराजेसुद्धा आबासाहेबांचे बोट धरून सदरेवर दाखल झाले.

शंभूराजांची सदरेवर उपस्थिती कौतुकाचाच विषय होती. काही पळे त्यांच्या कौतुकात गेल्यानंतर सदरेच्या कामकाजास सुरुवात झाली.
खास दरबाराच्या आमंत्रणाच्या नव्या बादशाही फर्मानाची चर्चा होऊन नव्याने कार्यक्रम पक्का झाला. दरबाराच्या आदल्या दिवशी आग्र्यास पोहोचण्याचे संधान ठेवून होळी पौर्णिमेऐवजी फाल्गुन शुद्ध नवमीस राजगडावरून प्रस्थान ठेवण्याचा नवा मुहूर्त काढण्यात आला. मग विचार सुरू झाला– साहित्य आणि साजसामान कसे घ्यावे. निराजी रावजी म्हणाले–

महाराज, आलमगिराने शहजाद्याचा दर्जा बहाल केला आहे. तेव्हा तो इतमाम आपणसुद्धा राखला पाहिजे. हुजरातीच्या आणि जिलिबीच्या पथकाचे पोशाख अगदी एकसारखे आणि भपकेबाज असावेत. लोक सेवकाच्या कपड्यांवरून धन्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात.
अक्षी बरुबर म्हाराज. आता येवड्या मरातबानं जानार म्हनल्यावर डेरं, राहुट्या पन अगदी बैजवार हव्यात. नेहमी स्वारीवर तर आपुन उघड्या माळावरच मोकळ्या आबाळाखाली ऱ्हातू. या खेपेस ते सोभायचं नाय. खासा डेरा पन नावाजन्याजोगा व्हायास हुवा. पन म्हाराज, कुटुंबकबिला नग संगती.
तुमचे अगदी बरोबर आहे सर्जेराव. ही काही तीर्थयात्रा नव्हे.
बायकामाणसांची जोखीम सोबत बाळगणे रास्त नाही.
स्वारीत एखादा सुलक्षणी हत्ती असावा. प्रस्थान ठेवताना आणि वाटेतील शहरांमध्ये प्रवेश करताना खाशा स्वाऱ्या हत्तीवर असाव्यात. दोन पालख्यासुद्धा खाशांसाठी सोबत ठेवाव्यात.
ठीक ठीक.
नेहमीच्या गंभीर स्वरात मोरोपंत म्हणाले–

खर्चासाठी बादशहाने लाखभर रुपये मंजूर केलेत खरे, पण लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. राजधानीतसुद्धा राजकारण चालवायचे म्हणजे मोठाच खर्च करावा लागणार. बादशाही मनसबदार हिऱ्या-मोत्यांचा चारा घातल्याशिवाय बोलत नाहीत; त्यामुळे आपला स्वतंत्र खजिना ठेवणे अगत्याचे आहे. आणि महाराज, जुन्नर, पैठण आदी पेठांमधून आग्र्याच्या सावकारांसाठी हुंड्यासुद्धा मिळवून ठेवाव्यात.


अगदी रास्त आणि चोख व्यवहार्य. मोरोपंत, ही तजवीज आम्ही तुम्हावरच सोपवितो. याचा तपशील आपण नंतर यथास्थित ठरवू. एवढा सगळा लबेदा वागवायचा म्हणजे वंजारी आणि शागिर्दपेशा सोबत बाळगणे आले. अनाजी, शंभर-सव्वाशे लमाण वंजारी नीट पारखून घ्या. त्यांना वाटा-आडवाटांची, नदीच्या घाटांची आणि उतारांची चोख माहिती हवी. शागिर्दपेशा आणि चाकर वीस-पंचवीसपेक्षा अधिक नको. प्रसंगी त्यांना हत्यारसुद्धा धरता आले पाहिजे, अशीच माणसे निवडा.
म्हाराज, शिपायांची टोळी फार मोठी नग. उगा खायला आन् सांभाळायला भार. अशी मानसं येचतो की, येक येक गडी धा धा गनिमांना पुरून उरलं. आनि म्हाराज, नग म्हनू नगा. आईसाब म्हाराजांचे अंगरक्षक म्हनून आम्ही सोता जातीनं जानार. उगा तुमच्या जिवाला घोर नग.


असं म्हणून कसं चालेल प्रतापराव? अहो, सरनोबत तुम्ही. आमच्यापेक्षा स्वराज्य मोठे. ते कुणी सांभाळायचे? तुम्ही स्वराज्यातच राहून गड-कोट आणि फौज सांभाळायची. तुम्हास सल्ला देण्यास मोरोपंत आणि निळो सोनदेव मुजुमदार आहेतच. सर्जेराव जेधे आणि हिरोजीच्या मदतीने तुम्ही हुजरातीचे मावळे निवडा; तुम्ही म्हणालात तसेच. मोठा गोतावळा नको, फक्त साडेतीनशे मावळे हवेत.
महाराजांच्या सोबत कोणकोण असावे याची चर्चा सुरू झाली. या जोखमीच्या नाजूक घडीला प्रत्येकाला वाटत होते आपण महाराजांच्या सोबत असावे. पण ते तर शक्य नव्हते. चर्चेचा गदारोळ शांत करीत मंद हसत महाराजांनी अखेर कौल दिला–
आमचे सोबत हेजिबी करण्यास निराजी रावजी, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे राहतील. पंत चार-सहा विश्वासू ब्राह्मण कारकून वरकड कामासाठी तुम्ही निवडून सोबत घ्या. लेखणीसोबत तलवारीची पण सवय असणारी माणसे निवडा. माणकोजी हरी सबनीस त्यांचे प्रमुख असतील. आमच्या सोबतची शिबंदी बाजी सर्जेराव जेधे, राघोजी मित्रा, दावलजी गाडगे आणि

रामजींच्या हुकमतीखाली राहील. आमचे अंगरक्षक म्हणून हिरोजी फर्जंद भोसले आमच्या सोबत असतील आणि आमच्या तैनातीसाठी आम्ही मदारी मेहतरला सोबत घेणार आहोत. शंभूराजांनासुद्धा त्याची बरी सोबत होईल. कवींद्र परमानंद, तुम्हीसुद्धा आमच्या संगतीने चलावे अशी आमची इच्छा आहे.
आज्ञा प्रमाण, महाराज.
साऱ्यांनाच आमची चिंता वाटते. आम्ही नजरेसमोर असावेसे वाटते.

आम्ही ते जाणतो. पण मंडळी आमच्या गैरहाजिरीत स्वराज्याची घडी बिघडता कामा नये. सर्वांनी एकजुटीने, सावधपणे आपापल्या जागा धरून असणे. शंभूराजे आमचे सोबत असतील; त्यामुळे स्वराज्याची शिक्के कट्यार आम्ही आईसाहेबांस सोपवतो. कारभारी मंडळ, मोरोपंत पिंगळे आणि निळो सोनदेव मुजुमदार यांच्या आदेशाप्रमाणे आईसाहेबांच्या नावे कारभार चालवतील. सर्वांनी एकविचारे करून कारभार चालवावा. कोठे उणे पडू देऊ नये. नव्या किल्ल्यांची बांधकामे सुरू आहेत; त्यात खंड न पडावा. त्यांच्या गरजेचे सामान आणि माणसे यथास्थित पुरवावीत. मोरोपंत याकडे बारीक लक्ष पुरवतील. प्रतापराव सरनोबत आधी सांगितल्याप्रमाणे फौज, छावण्या, सरहद्दी, गडकोटांचा लष्करी बंदोबस्त याकडे जातीने लक्ष देतील. याबाबत त्यांस आमच्या जागीच जाणावे.

खुशीची कोणतीही बातमी आली तरी अजिबात गाफील राहू नये. जगदंब न करो, पण खबर विपरीत, आमच्या संबंधानेसुद्धा असली, तरी हातपाय न गाळता धैर्याने कारभार आणि बंदोबस्त आहे तसाच चालवावा. दोन्ही परिस्थितीत गनीम दावा साधू शकतो याचे भान हरहमेश राखावे. फंदफितुरी अथवा पुंडाव्याचा यत्न जरी झाला तरी जरब बसेल अशी कडक कारवाई कारभारी मंडळींनी आईसाहेबांच्या हुकमाने करावी. आमच्यासाठी फैसला खोळंबून ठेवू नये. कोकणात सिद्दी आणि टोपीकर शिरजोर होणार नाहीत याची पुरती काळजी घ्यावी. दर्यासारंग दौलतखान आणि मायनाक भंडारी, आरमारी सुभा आम्ही तुम्हावर सोपवीत आहोत. आरमार सतत फिरते ठेवावे. दर्या कसाही असो, गस्त थांबता कामा नये. जौळाचा फायदा घेऊन गनीम दावा साधू पाहील तर तसे न व्हावे. जर आम्हास दर्याच्या मार्गे निसटून येण्याचा प्रसंग आलाच तर कुमकेची गलबते सारे सामान भरून ठरलेल्या बंदरांमध्ये पावसाळ्यापूर्वीच पोहोचली पाहिजेत. ऐन वेळी गोंधळ होता कामा नये. गलबतांवरील तांडेल आणि नाखवे अनुभवी आणि वादळाशी, खवळलेल्या दर्याशी सामना करण्यात वाक्बगार असले पाहिजेत. प्रस्थान ठेवण्यापूर्वी आम्ही जातीनिशी घडी घालून देऊच.
महाराजांची प्रत्येक सूचना आणि आज्ञा अत्यंत स्पष्ट होती. त्यात गोंधळ वा गैरसमजास केसाइतकासुद्धा वाव नव्हता. बारीकातील बारीक बाबसुद्धा महाराजांच्या नजरेतून सुटली नाही.
-

दुपारचे भोजन आटोपून महाराज आपल्या महालात विश्रांती घेत होते. डोळे मिटले असले, तरी चित्त सजग होते. चोरमार्गाच्या दरवाजावर खुणेची टकटक झाली. महाराजांनी झटकन उठून लोटलेल्या दरवाजास पक्का अडसर घातला आणि त्यांनी दिंडी उघडली. रामदासी गोसाव्याच्या वेषातला बहिर्जी आत आला. लोडाला रेलून महाराज मंचावर बसले. मुजरा घालून बहिर्जी समोर उभा राहिला.
म्हाराज, नेताजी सरकार तसे सुकरूप हाईत पर, मिर्जाराजाची मान्सं लईच पिच्छा पुरवाया लागलीत त्येंचा. राजपूत त्यांस्नी आपल्याकडं वडू बघतोया ही गोठ आता छपून ऱ्हायली न्हाय. त्यापाई आदिलशाहीत बी अस्वस्थता हाईच. नेताजी सरकारांना बी ते जानवतंया. त्यापाई त्ये पार सैरभैर झाल्येत बगा. अर्ध्या राती मधीच उठून सोताशीच बडबडत ऱ्हातात. कधी जनू खलिता सांगावा तसे बरळतात. त्येतला शब्दन्शब्द हुकमापरमानं पायाशी रुजू हाय. आता आदिलशाहीत फार दिवस त्येंचा निभाव लागल असं दिसत न्हाई. संशयी नजरा त्येंच्याभोवती भिरभिरू लागल्याती. मिर्जाराजांपासून तेन्ला तोडन्यासाठी त्येंना जिंजी-तंजावरकडं कर्नाटकात धाडण्याचं घाटत हाय.
आपली माणसे सावध करा.
नेताजीकाकांना धोका होता कामा नये. त्यांच्याकडे एक विद्वान ज्योतिषी रवाना करा. त्यांना भविष्य सांगा, फाल्गुनाच्या वद्य पक्षात त्यांनी नोकरी बदलली तर त्यांचा परम उत्कर्ष आहे. आमच्या आग्राभेटीचा ठरलेला तपशील त्यांच्या कानी जाऊ दे.

त्यानंतर महाराजांनी समुद्रातून परत येण्याचा प्रसंग आल्यास सौराष्ट्रातील वेरावळ बंदरात कोणत्या रस्त्याने पोहोचावे, पडाव कुठे टाकावे, संपर्काचे दुवे कोणते, स्थानिक भाषा जाणणाऱ्या नजरबाजांशी आणि हस्तकांशी संपर्क कसा करावा आदी बाबींची तपशीलवार चर्चा करून बहिर्जीस आवश्यक ते हुकूम दिले. पक्की योजना आखून बहिर्जीस नीट समजावली. खर्चाच्या तजविजीसाठी सुरत आणि वेरावळच्या सावकारांच्या नावे लिहिलेल्या हुंड्या महाराजांनी त्याच्या स्वाधीन केल्या. निकड भासली तर याच कामगिरीवर असणाऱ्या गलबतांच्या तांडेलांकडून रकमा उचलण्याचे लेखी हुकूमसुद्धा सोपविले. आणि बहिर्जीस निरोप दिला. बहिर्जी आल्या वाटेने निघून गेला.
-

सतत खुल्या अस्मानात भराऱ्या मारणारा गरुड ठाणबंद होऊन पडावा तशी नेताजींची अवस्था होऊन बसली होती. आदिलशाही दरबारात मानमरातब झाला. पंचहजारी सरदारी, मनसब आणि जहागीर मंजूर झाली पण प्रत्यक्षात पदरात काहीच पडले नव्हते. ना जहागिरीची सनद ना लष्करी नेमणुकीचा कागद ना फौजेची मनसब. यावर कडी म्हणजे मिर्झाराजांची माणसे चौकशीसाठी घिरट्या घालत असल्याची छावणीत आणि दरबारातसुद्धा बोलवा असल्याने कोणत्याच कामगिरीवर नेमणूक होत नव्हती. निगराणी मात्र कडक झाली. मानमरातब भले मिळत होता, पण एक प्रकारची नजरकैदच सुरू होती. अशा परिस्थितीत महाराजांनी सोपविलेली कामगिरी कशा प्रकारे पार पाडता येईल याची चिंता लागून राहिली. त्याच विवंचनेत दुपारच्या वामकुक्षीनंतर ते डेऱ्यात शतपावली करीत असतानाच हुजऱ्या आत आला.

हुजूर, येक बामन आपली भेट मागू लागलाय. जोतिषी हाय म्हनून सांगतुया. हात पाहून भविष्य सांगतू.
काही नको. आधीच आम्ही परेशान आहोत. त्यातच काही भलतेसलते सांगायचा आणि जिवाला नसता घोर लागून राहायचा.

हुजूर परतवायची लय कोशिश केली, पर लोचटावानी चिटकूनच बसलाय. लईच गयावया कराया लागला. दूर कोकनातून रत्नागिरीस्नं आलोय म्हंतुया. मी घालवून द्याया निगालो त कळवळून बोलला, अवकाळी पावसानं अवंदाचं कलमी आंब्याचं पीक साप बुडाल्यानं हालत येकदम खस्ता हाय, पोराबाळांच्या पोटापान्याची कायतरी सोय हुईल म्हनून इतक्या दूर आलोया म्हनला. मग दया आली. म्हनून म्हनलं हुजुरांना पुसावं. मर्जी आसंल तर धाडतो; नाय म्हनाल तर देतो माघारी लावून.
रत्नागिरी आणि कलमी आंबे हे शब्द ऐकून नेताजी चमकले. पण वरकरणी अनिच्छा दाखवीत मानभावीपणे म्हणाले–

ठीक, ठीक. तुला त्या बिचाऱ्याची एवढी कणव आली असेल तर दे धाडून. मात्र त्याच्याकडून काही लुबाडून घेण्याचा प्रयत्न केल्याचे माझ्या कानी आले, तर तुझी खैर नाही हे पक्के ध्यानात ठेव.
तोबा, तोबा हुजूर, मुसुलमानाची चाकरी करीत असलो तरी म्या छ्यान्नव कुळी जातिवंत मऱ्हाटाच. आवो. गरीब भटा-बामनाला लुबाडून खाल्लो तर ल्येकराबाळांसकट नरकात न्हाय जायचा?

नेताजींच्या नजरेकडे लक्ष जाताच हुजऱ्याचे पुढचे शब्द घशातच जिरले. हुजऱ्या बाहेर गेला आणि काही क्षणांतच एका ब्राह्मणाने डेऱ्यात प्रवेश केला. चित्पावन ब्राह्मणी, गोरापान तांबूस वर्ण, प्रसन्न तेज:पुंज मुद्रा, डोक्याला धुवट पांढरा रुमाल, कपाळी दुबोटी आडवे गंध, गळ्यात, दंडावर आणि मनगटात रुद्राक्ष माळा. नजरेत शांत भाव, पण एक वेगळीच तीक्ष्ण चमक, पायी खडावा, खांद्यावर बरीशी पडशी, एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हाती कानापर्यंत उंचीचा, तेल पाजलेला मजबूत वेळू. अशा ब्राह्मणाला पाहताच नेताजी उठून उभे झाले. स्मरणशक्तीला ताण देऊन त्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला पण ओळख पटेना. मग त्यांनी तो नाद सोडून दिला आणि जमिनीला हस्तस्पर्श करून ब्राह्मणास नमस्कार केला.

नमस्कार करतो महाराज. यावे वर इथे गिर्दीला टेकून आरामात बसावे.
आयुष्यमान भव. विजयी भव. सर्व संकल्प निर्विघ्नपणे सिद्धीस जावोत. कल्याणमस्तु। यजमान, ही गाद्या-गिरद्यांची उपाधी आपली आपणासच लखलाभ; त्याने मोहादी विकार उत्पन्न होतात. ब्राह्मणाचे आसन म्हणजे दर्भासन; सर्व विकारांपासून मुक्त.

ब्राह्मणाचा स्वर अगदी स्वच्छ. उच्चार अनुनासिक. समोरच्या व्यक्तीवर लगेच प्रभाव पाडणारे बोलणे ऐकून नेताजींस बरे वाटले. पडशीतून एक दर्भासन काढून ब्राह्मणाने जाजमावर अंथरले आणि त्यावर बैठक मारली. नाइलाजाने नेताजी पण ब्राह्मणासमोर जाजमावरच बसले.

महाराज, आपण कोकणातून आल्याचे माणूस सांगत होता. इतक्या दूर, परमुलखात आणि थेट गनिमाच्या छावणीत आपल्याला का यावे लागले?
ओळख पटविण्याची नेताजींची खटपट ब्राह्मणापासून लपून राहिली नाही. पण तसे न दर्शविता विषण्ण हसू हसत गंभीरपणे म्हणाले–

पोट दिले ना देवाने. त्यात काटे का भरायचे? मग हिंडावे लागते त्या मागे अष्ट दिशांना. यवनांनी जिणे नकोसे करून सोडले होते. कसाबसा जीव आणि धर्म वाचवून राहत होतो. वाटले, चला आता शिवाजीराजाचे राज्य आले तर धर्मास ऊर्जितावस्था येईल. देवा-धर्माचे राज्य पुनरपि येईल. पण कसचे काय, दिल्लीश्वराचा एकच तडाखा काय बसला, आमचा शिवाजीराजा भुईसपाट! आता जेथे आपल्यासारखे मातब्बर पक्षी झाडाचा आसरा सोडून नवी घरटी आणि ठाव धुंडाळू लागले तेथे चिमण्या-कावळ्यांना कोण पुसते? मग आम्हा पोटार्थी भटा-भिक्षुकांची काय कथा. आता तर म्हणे शिवाजीराजा मनसबदारी अन् दख्खनची सुभेदारी मिळवण्यासाठी आलमगीर बादशहाच्या दरबारी आग्र्यास जायचा आहे. पोटच्या लेकरास सवे घेऊन. प्रस्थानाचा मुहूर्तसुद्धा अगदी नामी काढलाय, फाल्गुनी नवमी. मागे येथे दौलतीचा शिमगा न व्हावा म्हणजे मिळवली. असो. आपणास काय, थोरामोठ्यांच्या मोठ्या गोष्टी. आपण आपल्या पायतळीची सावली जपावी.
महाराज, आपण कामाशी काम ठेवावे हे बरे. आम्ही येथे आलो म्हणून आम्हास हवा तो बोल लावावा, पण शिवाजीराजांबद्दल ब्र काढल्यास नतीजा ठीक होणार नाही, याचे नीट भान ठेवावे.

क्षमा स्वामी. लायकी नसता भलतेच बोलून गेलो. जुने ऋणानुबंध स्वामी जपतात, पाहून धन्य वाटले. ते असो. जरा आपला उजवा तळहात बघू.
नेताजींनी आपला उजवा हात ज्योतिष्याच्या हाती दिला. बराच वेळ ब्राह्मण हाताचे निरीक्षण करीत राहिला. मध्येच तो हलक्या हाताने ठिकठिकाणी दाब देई, तर कधी पालथा करून न्याहाळी. कधी कपाळाकडे पाहत राही, तर काही क्षण वर छताकडे पाहत काहीतरी पुटपुटे. काही वेळाने त्याने हलकेच हात सोडला आणि डोळे मिटून स्वस्थ बसला. त्याच्या चेहऱ्यावरील बदलते भाव निरखीत नेताजी स्वस्थ बसून राहिले. थोड्या वेळाने त्याने आपले विशाल डोळे उघडून नेताजींकडे पाहिले. प्रसन्न स्मित करीत भविष्य सांगण्यास सुरुवात केली.

एका अतुल पराक्रमी महापुरुषाचा हात पाहण्याचा दुर्मीळ योग आज आला. वा! काय सुंदर हात आहे!! उच्चीचा गुरू, उच्चीचा रवी. शत्रुस्थानी

शनी-मंगळ युती. सुंदर योग. चंद्र-शुक्र स्वगृही. वैभवास कधीच उणे नाही. पराक्रमात आणि यशात न्यून नाही. परंतु सांप्रत ग्रहस्थिती ठीक नाही. राहू अनुकूल नाही. महादशा सुरू झाली आहे. तो आपला प्रभाव दाखवणारच त्या कारणे प्रियजनांपासून दूर व्हावे लागले आहे. परंतु चिंता नसावी. अंती सारे मनासारखे घडून येणार आहे. गुरू आणि रवीच्या प्रभावाने सारे गोमटे होईल. आपल्या मनी ज्यांचे विषयी निष्ठा वसते आहे, त्यांच्या मनातील आपल्या स्थानास धक्का लागायचा नाही. सांप्रतची नोकरी मनाविरुद्ध पत्करली आहे. येथे उत्कर्ष नाही. दक्षिणेस जावे लागल्यास अनर्थ संभवतो. विरोधक दक्षिणेस दवडू पाहताहेत पण उच्चीचा गुरू सावधान करील. शुभस्थानी असलेला चंद्र योग्य निर्णयास बळ पुरवील. पराक्रमासाठी उत्तर दिशा अनुकूल आहे. उत्तरेच्या धन्याची चाकरी पत्करल्यास धन्याच्या दक्षिणेस राहून पराक्रम गाजवता येईल. काही काळ धन्याचा सहवास लाभून विश्वास संपादन होईल. पुन्हा धन्याच्या दक्षिणेस येण्याचा योग प्राप्त होईल. धैर्य आणि कष्टाने दैवावर मात करून इच्छित साध्य होईल. गुरू बुद्धी, रवी शक्ती, बुध युक्ती, शनी धीर, मंगळ पराक्रम, चंद्र बळ देऊन मार्ग दाखवील. काय योगायोग आहे पाहा. हुताशनी पौर्णिमेनंतर होणारे ग्रहबदल आपल्या नोकरीत बदल घडवतील. या योगाचा योग्य फायदा घेतल्यास आणि लगेचच चाकरीत फेरबदल केल्यास, हातून कीर्ती, अस्मानात नेणारा पराक्रम घडेल. हृदयमंदिरात विराजमान श्रद्धास्थानाचे प्रिय करणे संभव होईल. शुभं भवतु। आम्हास जे दिसले, ते येथवर सांगितले. आता स्वामींस काही पुसणे असल्यास पुसावे. यथामति समाधान करू. कैलास नाथ पार्वती परमेश्वर कृपे करून व वाडवडिलांचे आशीर्वादे करून आजमितीपर्यंत पामराचा शब्द लटका ठरिला नाही. माता सरस्वती कृपेने वाणीस यश मिळत गेले. स्वामींनी पुसावे.

बस्स. अजून काही नको. ज्योतिष्याने दिशा दाखवावी. बाकी जे मिळवायचे, ते मिळवण्याचे सामर्थ्य मर्द आपल्या मनगटात आणि मुत्सद्दी मस्तकात बाळगतात.
तथास्तु.
महाराज, आपले बुद्धिचातुर्य पाहून आम्ही प्रसन्न आहोत. आपणास आश्रय द्यावा अशी ऊर्मी उठत आहे. मान्य केल्यास वैभवी पोहोचवू.
सांप्रत तो योग संभवत नाही स्वामी. आमच्या पायीचे चक्र आणि स्वामींचे ग्रहयोग विरुद्ध दिशांचे भ्रमण दाखवीत आहेत. प्राक्तनात सेवेचा योग असेल तर दैवयोगे स्वामींची पुन्हा गाठ पडेलच.

भरपूर बिदागी देऊन नेताजींनी ब्राह्मणाची सन्मानपूर्वक बोळवण केली.


क्रमश:

*____📜

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...