विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 21 December 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 13

 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

_📜🗡भाग - 13📜🚩🗡

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

_🚩📜🚩___

ज्योतिषी निघून गेला. तो महाराजांचा संदेश घेऊन आलेला नजरबाजच होता याविषयी आता नेताजींच्या मनात कोणताही संशय उरलेला नव्हता. त्याची वायफळ वाटणारी बडबडसुद्धा महाराजांच्या भावी योजना सूचित करीत होती, हे त्यांना स्पष्ट जाणवले. सारे महाराजांनी आखलेल्या योजनेप्रमाणे सुरू होते.

नेताजींनी गोदाजीला बोलावून घेतले–

गोदाजी उदईक जेजुरीला जायचं. आमच्या वतीनं खंडेरायास भंडारा चढवायचा.

जी सरकार.

सटरफटर कामांच्या निमित्ताने डेऱ्यात घुटमळणारे सेवक निघून जाईपर्यंत दोघे असेच काहीबाही बोलत राहिले. धूर्त गोदाजीला त्यातून निघणारा नेमका अर्थ बरोबर समजत होता.

सेवक निघून जाताच गोदाजी जवळ सरकला. नेताजींनी हातात सरकवलेली चिठ्ठी त्याने झटक्यात कमरबंदात लपविली.

गोदाजी उद्याच्या उद्या सासवडच्या मोगली छावणीत निघायचं. छावणीत वीरसिंग हांडाला गाठायचं.

माझा माणूस आहेस ही ओळख पटवण्यासाठी चिठ्ठीच्या घडीत पाचदलांचे बेलपान आहे ते त्याला दाखवायचे. तो तुला थेट मिर्झाराजांसमोर उभा करील. त्यांना हे पत्र द्यायचे आणि एकांत चर्चेची इच्छा सांगायची. मग त्यांना कळवायचे की, आम्ही त्यांचे पदरी येण्यास तयार आहोत. मात्र आम्हास सुपे परगण्याच्या जहागिरीचे वतन, पाचहजारी मनसबदारी आणि खासगी खर्चासाठी रोख पन्नास हजार रुपये मिळावे. त्यांस सांगावे, आम्ही शिवाजीराजांचे सरनोबत होतो तरी आम्हास स्वतंत्र मनसब नव्हती. पगारी नोकरी होती; त्यामुळे आमची स्वत:ची फौज नाही. तरी शाही खर्चाने फौज उभारून आमचे स्वाधीन करावी आणि फौजेच्या रोजमुऱ्यासाठी स्वतंत्र तनखा मंजूर करावा. जहागिरीच्या जागी स्वतंत्र व्यवस्था होईतो आमचा कुटुंबकबिला आम्हासंगत छावणीतच ठेवण्याची इजाजत असावी. या बाबी मान्य झाल्या तर होळी पौर्णिमेनंतर आम्ही राजाजींच्या पदरी दाखल होऊ.

दुसऱ्या दिवशीचे तांबडे फुटण्यापूर्वीच गोदाजी राजरोसपणे रुस्तमेजमाच्या छावणीतून निघाला.

रोजच्या रिवाजाप्रमाणे रुस्तमेजमाच्या डेऱ्यात मानकरी जमले होते. मोगलांच्या स्वारीला तोंड देण्याच्या योजनांची आखणी सुरू होती. कुठलाच संदर्भ नसताना अचानक रुस्तमने पुसले–

नेताजी हुजूर, तुमचा नोकर म्हणे आज सकाळी अचानक छावणी सोडून गेला.

जी हाँ. फाल्गुनाच्या महिन्यात खंडेरायास भंडारा चढवण्याचा आमचा कुळाचार आहे. त्याच कामासाठी त्याला जेजुरीस धाडले आहे. अशा कामांसाठी कोणाची परवानगी घेण्याची आजवर कधी गरज पडली नाही; त्यामुळे ती बाब आपल्या कानी घालण्याचे लक्षात आले नाही. अशी गफलत आयंदा होणार नाही. खात्री बाळगावी.

ठीक आहे. याद रहे.

चर्चा पुन्हा पुढे सुरू झाली. ओघाओघाने सुरू असलेल्या चर्चेने शिवाजीने चालविलेल्या, दक्षिणी सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन मोगलांच्या विरुद्ध एकजूट करण्याच्या राजकारणाकडे वळण घेतले.

फाजलखान तावातावाने म्हणाला–

जिल्हेसुभानी हजरत आदिलशहा हुजुरांनी दगाबाज शिवाजीचा नापाक अर्ज धुडकावून लावून त्याला चांगला धडा शिकवला हे फार उत्तम झाले. त्या नीच दरवडेखोरास आलाहजरतांनी त्याची जागा बरोब्बर दाखवून दिली.

काही सरदारांनी फाजलच्या सुरात सूर मिसळून अशीच बेताल शेरेबाजी केली. त्यावर नापसंती दर्शवीत रुस्तमेजमा म्हणाला–

फाजल, तुझ्या जहनमध्ये सलतनतीच्या हितापेक्षा जाती दुश्मनी जोर करून आहे. म्हणूनच तू असे बोलतो आहेस. काय चूक होती शिवाजीच्या पैगामात सांग? कोणी मान्य करो अथवा न करो आज शिवाजी दख्खनमधील मोठी ताकद बनून राहिला आहे. त्याच्या ताकदीचा आणि हुनरचा अनुभव तू स्वत: तर घेतला आहेसच आणि आपल्या फौजासुद्धा हरहमेश घेत असतात. असा सूरमा आपसातील दुश्मनी विसरून परक्यांशी मुकाबला करण्याची दावत देत असेल तर त्यावर गौर फरमावली जायलाच हवी होती. जर कुतुब आणि आदिलशाही यांच्या जोडीला शिवाजी मोगलांशी झुंजायला उभा ठाकला तर मिर्झाराजा आणि दिलेरला नर्मदापार हाकून देणे कठीण नाही.

जनाब, आपण असे म्हणणे स्वाभाविक आहे. आपले मरहूम वालिद हुजूर आणि शिवाजीच्या बापामधील पुराना दोस्ताना आजसुद्धा दिलात बाळगून आहात. पण मी जावळी, मिरज आणि पन्हाळा विसरू शकत नाही. त्या दगाबाज काफिराच्या सावलीचासुद्धा मी भरवसा करू शकत नाही. कुठून पैदा केली शिवाजीने ही ताकद? आदिलशाही सलतनत लुटूनच ना? त्याने आपल्या स्वत:च्या जहागिरीलासुद्धा तोशीस दिली आहे हे विसरू नका. परवरदिगार अल्लाची मोठी मेहेरबानी की, अशा नमकहराम काफिराची मदत घेण्याइतकी आदिलशाही दुबळी झालेली नाही. विजापुरात दिलेरखानाला परास्त शिवाजीने नाही तर आदिलशाहीतील तुमच्या-माझ्यासारख्या नेक वफादार नमकहलाल सूरमा सरदारांनीच दिला. आपणच आज मोगलांच्या नाकी दम आणला आहे.

मार्ग सोडून चर्चा व्यक्तिगत पातळीवर जाऊन भांडणाच्या वळणाने जाण्याचा संभव पाहून चाणाक्ष रुस्तमेजमाने तिचा रोख बदलण्याचा यत्न केला. ही संधी साधून नेताजीने आपले घोडे पुढे दामटले.

जनाब, मोगलांचा मुकाबला करण्यासाठी आपण मोहीमनशीन आहोत पण गेले कित्येक दिवस आपली फौज नुसतीच पुख्खा झोडीत स्वस्थ बसून आहे. माझी दरखास्त आहे, माझ्या हाताखाली फौज दिली तर मी मोगलांनी कब्जा केलेल्या प्रदेशात घुसून प्रदेश ताराज करीन आणि त्यांच्या छावणीवर छापे मारून त्यांना त्रस्त करून सोडीन.

नेताजी, आपल्या काबिलियतवर कोणताच शक नाही. आपण जे बोललात ते अनेकदा करून दाखवले आहे. पण आपले भोसले खानदानीचे रिश्तेदारीचे संबंध लक्षात घेऊन आपल्याला कर्नाटकात एकोजीराजांच्या कुमकेस पाठवावे आणि त्याच भागात जहागिरी देऊन वसवावे, असे जिल्हेसुभानी आलाहजरतांच्या मनात आहे.

त्यासाठी आपल्याला द्यावयाच्या जहागिरीचा शोध सुरू आहे. तूर्तास आपणास आराम देऊन आदिलशाहीच्या दरबारी रस्मोरिवाजांची तालीम द्यावी असा हुकूम आहे. याबाबत फैसला होईपर्यंत आपण आमच्या सोबत राहून आम्हाला मशवरे देऊन मदत करावी, अशी आलाहजरतांची दिली ख्वाहिश आहे.

आमच्या कुटुंबकबिल्याबाबत काय फैसला आहे? किती दिवस आम्ही असेच सडेफटिंग राहावे. आमचा सूड आमच्या बायका-पोरांवर घेतला जाईल असा आम्हाला अंदेशा आहे. त्यांची हिफाजत झाली पाहिजे.

अलबत. अलबत. आपला कबिला आपल्या साथ जाईल; फिकीर करण्याचे कारण नाही.

असे असेल तर प्रश्नच नाही. पण शिवाजीराजांच्या अखत्यारीत आमचा कबिला फार काळ ठेवणे आम्हाला परवडणार नाही. त्यांना कधीही तोशीस लागू शकते. आम्ही माणूस पाठवून होळीच्या सणासाठी आमचा कबिला जेजुरीला बोलावून घेतो. खंडोबाच्या दर्शनाला जाण्यास त्यांना मनाई केली जाणार नाही. आम्हाला इजाजत मिळावी, आम्ही जातीनिशी जाऊन कबिला छावणीत घेऊन येऊ किंवा विजापुरी ठेवून येऊ.

बिलकुल दुरुस्त. आपली ही दरखास्त आम्ही आजच्या डाकेतूनच आलाहजरतांकडे रवाना करू. रहमदिल जिल्हेसुभानी आपल्या माणसांचे दिल राखणे जाणतात. आपल्याला निश्चितच परवानगी देतील.

महाराजांनी पाठविलेल्या ज्योतिष्याने भविष्य सांगण्याच्या मिषाने दिलेला इशारा अशा प्रकारे रुस्तमेजमाच्या बोलण्याने खात्रीत उतरला. नेताजी सावध झाले. आता वेळ गमावणे नाही. कर्नाटकात जावे लागले तर साऱ्याच राजकारणाचा विचका होणार.

-

नेताजी गोदाजीची चातकासारखी वाट पाहत होते. एके दिवशी अगदी दिवेलागणीच्या सुमारास गोदाजी छावणीत परतला. त्याच्या मिश्यांवर, कल्ल्यांवर आणि कपड्यांवर भंडाऱ्याच्या खुणा रेंगाळत होत्या. नेताजीच्याच डेऱ्यासमोर पायउतार होऊन तो थेट आत गेला. कडकडीत मुजरा घालीत मोठ्या खुशीत तो म्हणाला–

सरकार खंडोबानं गाऱ्हानं आइकलं. उजवा कौल दिला.

दिवे उजळणारा हुजऱ्या बाहेर जाईपर्यंत दोघे वरकड बोलत राहिले. तो निघून जाताच गोदाजीने मिर्झाराजांच्या भेटीचा वृत्तान्त थोडक्यात सांगितला. बाहेर गेलेला हुजऱ्या कनातीला कान लावून ऐकत होता. ही खबर बहिर्जीकडे पोहोचविणे निकडीचे होते. तो लगेच बहिर्जीच्या माणसाला गाठण्यासाठी निघाला.

कुटुंबकबिला आणण्यासाठी जेजुरीला जाण्याची परवानगी मिळाली.

मात्र वजिराने स्वतंत्र खलिता लिहून रुस्तमेजमास सख्त ताकीद दिली की, नेताजीस एकटा सोडू नये. त्याला जरासुद्धा नजरेआड होऊ देता कामा नये. शिवाजीचा हा चेला आपल्या उस्तादाइतकाच चलाख आणि धोकेबाज आहे. विश्वासू मुसलमान सरदार हत्यारबंद अरब हशमांची फौज देऊन सोबत पाठवावा.

आग्र्याला जाण्यासाठी महाराजांनी राजगडावरून प्रस्थान ठेवले. कऱ्हेपठारावर मोगली छावणीत त्यांनी मिर्झाराजांची भेट घेतली. गाझी बेग, तेजसिंह कछवा आणि शाही

इतमामासह त्यांनी औरंगाबादच्या दिशेने कूच केले. नेमके त्याच दिवशी जेजुरीला जाण्यासाठी नेताजींनी आदिलशाही छावणी सोडली. त्यांच्या संरक्षणासाठी आणि इतमाम पुरविण्यासाठी खानजमा अडीचशे कडवे अरब स्वार घेऊन सोबत निघाला.

-

जेजुरीला यथासांग देवदर्शन झाले. कुटुंबातील लोकांशी भेटीगाठी झाल्या. रडणे, समजावणे, धीर देणे सगळे व्यवस्थित पार पडले. एकदा गर्दीत वाघ्याचे सोंग काढलेला बहिर्जी अचानक सामोरा आला, पण नेताजींनी त्याची नजर शिताफीने चुकविली. दुपारनंतर पुरणावरणाचे तट्ट जेवण झाले. पोट आणि मन दोन्ही भरून गेले. संध्याकाळी राहुटीच्या बाहेर बाजेवर बसून गप्पा मारता मारता नेताजी खानजमाला म्हणाले–

खानसाहेब, बायकापोरे भेटली. दिल खूश झाला. आता फार रेंगाळण्यात मतलब नाही. परवा गडावर उत्सव आहे. तो आटोपला की, आपण निघू. आम्हाला जनाना सोबत घेऊन प्रवास करण्याची आदत नाही. आपण मेणे सकाळीच रवाना करू. आम्ही देवदर्शन आणि दानदक्षिणा वगैरे उरकून सांजेपावेतो निघू. आपली होडी पहिल्याच मजलेवर काफिला गाठेल. त्यास कितीसा वेळ जाणार?

बात तो दुरुस्त है। पण कबिल्यासोबत बंदोबस्त?

येथवर तर स्वत:च आले ना? आमचे खासगीचे हशम सोबत आहेतच. नेताजी पालकरच्या कबिल्याला धका लावायला कुणाची माय व्यायली आहे?

बात तो ठीक है, मगर आता तुम्ही आदिलशाही मनसबदार आहात.

पूर्वीचे गवार मराठा सरदार नाही. काही दरबारी रिवाज आणि मरातब सांभाळलेच पाहिजेत. त्याशिवाय हा मुलूख मोगली फौजेच्या ताब्यात. मराठ्यांची हद्दसुद्धा हाकेच्या अंतरावर. या गोष्टीचे भान ठेवणे गरजेचे आहे. शिवाजी आणि मोगली सरदार सारेच तुमच्यावर डोळा ठेवून. आपल्याला त्यांची भीती वाटते असे नाही पण ऐसे खुशी के मौकेपर खून खराबा हो। काही अप्रिय घडावे असे मला वाटत नाही. माझी अडचण अशी की, माझी फौज तोकडी आहे; त्यामुळे ती अशी विभागून चालणार नाही.

शाही रिवाजाप्रमाणे मी तुम्हाला एकटा विसंबू शकत नाही. तेव्हा एक दिवस ‘देर से सही’ पण सगळे एकत्रच निघू.

नाही. आम्ही ठरवलेले तुम्ही बदलू शकत नाही. तुम्हाला तुमचा रिवाजच पाळायचा असेल तर तुमचे वीस-पंचवीस स्वार पाठवा कबिल्याबरोबर. जाऊ देत त्यांना पुढे. गाठू आपण त्यांना पहिल्याच मजलेवर.

फार जास्त ताणून धरणे खानाला शक्य नव्हते. नेताजींचे म्हणणे मान्य करण्याशिवाय त्याला गत्यंतरच नव्हते. भेटीगाठी आणि जत्रेच्या धामधुमीत तो विषय एवढ्यावरच राहिला.

--

ठरल्या दिवशी कबिल्याचे मेणे आणि सामानाचे गाडे आदिलशाही छावणीच्या दिशेने रवाना झाले. थोडा विचार केल्यानंतर खानजमाच्या लक्षात आले की, नेताजीच्या कबिल्याची कोणतीच जबाबदारी त्याच्यावर नव्हती. त्याला लक्ष ठेवायचे होते नेताजींवर आणि जेथे खुद्द नेताजीलाच आपल्या माणसांची काळजी नसेल तर आपण का फुकाची चिंता करा, असा पोक्त विचार करून त्याने फक्त पंचवीस हत्यारबंद अरब कबिल्याबरोबर रवाना केले. शिवाय नेताजींचे खासगीतले पन्नास जवान सोबत होतेच. खासे, नोकरपेशा, दासी बटकी वगैरे मिळून मोठा काफिला तयार झाला होता. कबिल्यासोबत घरचा जबाबदार माणूस म्हणून खुद्द नेताजींचा काका, कोंडाजी पालकर चालत होता.

सूर्य मावळतीकडे असताना बरीशी जागा आणि पाण्याची सोय पाहून कोंडाजीने काफिला थांबविला. बायकामाणसांसाठी झटपट काही राहुट्या ठोकल्या गेल्या. बाकी बापये मंडळी उघड्यावरच राहणार होती. उघड्यावर राहण्यास अरब कां-कूं करू लागले पण त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. अंधार दाटून येण्यापूर्वीच जेवणे आटोपून झोपण्याची तयारी सुरू झाली. अरबांच्या जुमलेदाराने पहारे बसवायला सुरुवात केली. कोंडाजीने गोड शब्दांत त्याला समजावले–

अरे! खानसाहेब, तुम्ही तर आमचे मेहमान. तुम्ही आराम करा. उद्या पुन्हा दिवसभर उन्हातून सफर आहेच. पहाऱ्याला आमची मंडळी जागतील. अजी आमच्या घरची बायामाणसे सोबत न्यायचीत, आम्ही काय गाफील राहू? तुम्ही झोपा बिनघोर. छे! छे!! अहो, नेताजी काय म्हणणार? माझा पुतण्या ना तो, मी सांगेन त्याला जे सांगायचे ते. तुम्ही निवांत असा.

पडत्या फळाची आज्ञा घेऊन अरबांनी पथाऱ्या पसरल्या. उन्हाच्या रखरखाटात दिवसभर रखडपट्टी करून अरब नाहीतरी दमून गेले होते. माळावरची गार हवा लागताच सारे गाढ झोपी गेले. कोंडाजीने व्यवस्थित चौक्या पहारे लावले.

मध्यान्ह रात्र झाली. बायकामाणसे उठवली गेली. आवाज न करता आवरसावर झाली. राहुट्या उतरताना थोडा आवाज झालाच. काही अरबांची थोडी चुळबुळ झाली पण कोणी उठला नाही. मांजराच्या पावलाने कोंडाजीचे हशम एकेका अरबाच्या उशाशी उभे राहिले. त्यांच्या हातातल्या नंग्या तलवारी क्षीण चांदण्यातसुद्धा चमकत होत्या. इशारतीची खूण होताच पंचवीस तलवारी एकाच वेळी खाली उतरल्या आणि अरबांची मुंडकी धडावेगळी झाली. आपण कधी मेलो त्यांना कळलेच नाही. खबर द्यायलासुद्धा कोणी मागे राहिला नाही. झपाट्याने सामान गाड्यांवर चढले. जड सामान आणि बुणगे वेगळ्या वाटेने रवाना झाले.

चांदणी उगवण्यापूर्वीच काफिला जिकडेतिकडे रवाना झाला. अरबांची पंचवीस घोडी आयतीच मिळाली; त्यामुळे बायकासुद्धा घोड्यावर स्वार झाल्या. पहाटेचा अंधार कापीत सासवडच्या दिशेने घोडी चौखूर उधळली.

अरबांची प्रेते रक्ताच्या थारोळ्यांत धुळीत लोळत पडली होती. माळावरच्या कोल्ह्या-तरसांना रक्ताचा वास लागताच त्यांनी मेजवानी झोडायला सुरुवात केली. तांबडे फुटण्यापूर्वीच कोठूनशी घारी-गिधाडे सावजावर उतरली. निसर्गाने साफसफाईचे काम तातडीने सुरू केले.

क्रमश:

*____📜🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...