नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
_⚔🚩⚔📜🚩___
राजगडावरच्या
आपल्या महालात महाराज अस्वस्थपणे शतपावली करीत होते. कोणालाही आत न
सोडण्याची सख्त ताकीद पहाऱ्यावरच्या हुजऱ्याला देण्यात आली होती. महालाच्या
एका भिंतीवर खुणेची खरखर ऐकू येताच महाराजांनी कवाडाला अडसर घातला आणि
चोरदरवाजाची दिंडी उघडली. बहिर्जी आत आला. त्याच्या मुजऱ्याकडे दुर्लक्ष
करीत महाराज अधीरतेने बोलले–
नाईक, नेताजीकाकांची काय खबर? आमचा जीव थाऱ्यावर नाही. कुठून दुर्बुद्धी सुचली… हा गडी मोगलांकडे गेला. काहीच सुचेनासे झाले आहे.
म्हाराज, खबर लई
वंगाळ हाय. बाच्छावानं सरकारांचा लई छळ मांडलाया. तेंच्या मांगं मुसलमान
व्हन्याचा धोसाच लावलाया. पर समद्या छळवनुकीस खंबीरपनं त्वांड द्येत सरकार
अजून टिकून हायती. बाच्छावाला काई दाद देत न्हायती. पर बाच्छा लई दिस
त्यास्नी खेळवत बसेल असे रंग दिसत न्हाईत. सरकारांच्या जिवास कोन्त्याबी
क्षनी धोका व्हवू शकतो.
महाराजांची सचिंत
नजर पायतळी काहीतरी शोधत राहिली, तर बहिर्जी महाराजांच्या मुखावरचे भाव
बघत राहिला. महाराजांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्या
पुसण्याचेसुद्धा भान उरले नव्हते. बऱ्याच उशिराने महाराजांची नजर
बहिर्जीच्या नजरेला भिडली आणि त्यांच्या मुखावाटे एक जड सुस्कारा निघाला.
झटकन पुढे होऊन उशागती असलेला चवाळीचा पंचा बहिर्जीने त्यांच्या हाती दिला
आणि तिवईवरील तांब्यातील पाणी ओतून पेला समोर धरला. पंचाने तोंड स्वच्छ
पुसून महाराज घटाघटा तीन-चार घोट पाणी प्याले. चेहऱ्यावरचे क्लांत भाव जाऊन
आता नेहमीचे शांत करारी भाव पुन्हा आले. दोन्ही हात पाठीशी बांधून त्यांनी
काही येरझारा घातल्या. नंतर खिडकीशी उभे राहून दूरवर अंधारात न्याहाळत
राहिले. जणू अंधारात त्यांना काहीतरी दिसत होते. ऐकू येत होते. अचानक वळून
हलक्या आवाजात त्यांनी हाक मारताच त्यांच्याकडे एकटक न्याहाळणारा बहिर्जी
दचकला पण नजरेचा इशारा ओळखून झटकन जवळ सरकला.
नाईक, झाली चूक
सुधारण्यात अर्थ नाही. उद्भवलेल्या पेचातून मार्ग काढण्याची कोशिश केली
पाहिजे. नेताजीकाकांसारखा मोहरा अशा प्रकारे गनिमाच्या कैदेत राहून
कुत्र्याच्या मौतीने गारद होऊन चालणार नाही. त्यांना परत आणलेच पाहिजे;
पडेल ती किंमत देऊन. त्यासाठी कोणतेही दिव्य करावे लागले तरी बेहत्तर.
बजाजी नाईकांप्रमाणेच काकांना पुन्हा शुद्ध करून घेता येईल. आपला माणूस
त्यांच्या जवळ पोहोचला आहे ना? त्याच्याकरवी सांगावा पोहोचवा. म्हणावे,
आमची आज्ञा आहे. ताठा सोडावा. पडेल ती किंमत द्यावी पण जीव वाचवावा. शरीर
राखावे. इस्लाम कबूल केल्याचे ढोंग करावे. मग बादशहा मोकळीक देईल. संधी
मिळताच पळून जा. स्वराज्यात परत या. बाकी पुढचे आम्ही पाहून घेऊ. बहिर्जी,
आता अधिक उशीर झाल्यास फार महाग पडेल. आलमगीर काही बरे-वाईट करण्याच्या आत
शब्दाच्या वेगाने सांगावा पोहोचता झाला पाहिजे. रातोरात गड सोडा. या आता.
चोरदरवाजाच्या दिंडीतून बहिर्जी निघून जाताच महाराज मंचकावर कोसळले.
-
नेताजींच्या
छळाचा सिलसिला दर आठवड्याला सुरू राहिला. बुधवार-गुरुवार-शुक्रवार जेवण आणि
विश्रांती, तीसुद्धा मिरच्यांची राख मिसळलेल्या राखेत. कारण दर
जुम्म्याच्या नमाजानंतर बादशहासमोर आपल्या पायांनी चालत कैदी पेश झाला
पाहिजे. दर पेशीला थोडी गोडीगुलाबी, बराचसा धाकदपटशा आणि धर्मांतराचा आग्रह
होत राहिला. खोड्यात जखडलेले, साखळदंड आणि दोरखंडांनी जेरबंद केलेले;
विकलांग असले तरी केवळ प्रखर इच्छाशक्तीने ताठ उभे असलेले नेताजी मुखावाटे
शब्दही न काढता एकटक बादशहाच्या नजरेला नजर भिडवून असत. त्या नजरेच्या
धगीने बादशहाच अस्वस्थ होऊन उठे. दोन महिने असेच निघून गेले.
अशाच एका
पेशीनंतरच्या रात्री वजीर जाफरखान, अस्लमखान, राजा जसवंतसिंह, रसूल बेग,
मीर जुमला आणि अन्य वजनदार असामी बादशहाच्या खासगी दिवाणखान्यात जमले होते.
विषय होता दिलेरखान आणि बहादूरखानाच्या मदतीसाठी दख्खनमध्ये कोणाला धाडावे
हा. पण नकळत गाडी नेताजींच्या विषयाकडे वळली. संधी साधून जाफरखान म्हणाला–
गुस्ताखी माफ हो
आलमपन्हा, पण नेताजीसारख्या क्षुल्लक पण जालीम काफिराला, हुजुरे आलींनी
दयावंत होऊन, अद्याप जिवंत ठेवले आहे. इतकेच नव्हे तर पूर्ण शाबूत ठेवले
आहे याचे मोठे ताज्जुब वाटते. तो काफिर ज्या उद्दाम नजरेने हुजुरे आलांकडे
बघत असतो ती पाहून माझ्या
तळपायाची आग मस्तकात जाते. असे वाटते, स्वत:च्या हातांनी त्याचे डोळे फोडून ती उर्मट नजर गारद करावी.
ताज्जुब
माबदौलतना वाटले पाहिजे. इतकी वर्षे आमची वजिरी सांभाळता आहात पण आमच्या
मनाचा तुम्हाला अंदाज घेता येत नाही. आमच्या प्याऱ्या खालाजानचे खासम
म्हणूनच तुम्ही अजून वजिरी टिकवून आहात. समशेरीचा आणि अकलेचा असा बुलंद
सर्फराज आम्हाला हवा आहे. ऐतखाऊ अय्याश, निकम्म्या खुशमस्कऱ्यांनी भरलेल्या
दरबारात माबदौलतांना एकतरी खराखुरा शेर हवा आहे. याचसाठी आम्ही सब्र करून
आहोत.
पण आलमपन्हा या
काफिराची मिजास अजून किती दिवस सहन करायची? फुलादखान त्याला समजावण्याची
एवढी कोशिश करतो आहे, पण हरामजादा काफिर अजून झुकायला तयार नाही.
मुंग्यांच्या वारुळावर एकदा जरी बसवले तरी बडे बडे नामचिन दरवडेखोरसुद्धा
हवे तसे झुकवता येतात. दोन महिने झाले हा मात्र ढिम्म. इन्सान आहे की
हैवान? अल्ला जाने.
त्याची ही
जिद्द, हे धैर्यच आमच्या दिलात त्याच्याविषयी ओढ निर्माण करते. त्या
कमीन्याची ही अदाच आमचा दिल जिंकून गेली आहे. पण अलबत आमच्या सब्रला पण
काही मर्यादा आहेत. कदाचित एक-दोन किंवा फार तर तीन हप्ते. त्यानंतर खचितच
माबदौलतांची सब्र तुटेल.
अनाठायी
भरकटलेला विषय जरब देऊन बादशहाने मूळ पदावर आणला खरा, पण त्याचा नूर बिघडला
तो बिघडलाच. कुठलाच निर्णय न करता त्याने दरबाऱ्यांना निरोप दिला.
-
यातनांचे अजून
एक चक्र संपले. मिरच्यांच्या तिखट राखेत बेशुद्धीच्या ऐलथडी पैलथडी
पडलेल्या नेताजींच्या कानात खोल विहिरीतून यावे तसे शब्द गुंजत होते–
सरनोबत, सरनोबत; सरकार जागे व्हा. जागे व्हा सरकार.
आग्र्याच्या या
भयाण आदबखान्याच्या तळघरात इतके दिवस उलटून गेल्यानंतर आता कोण मला सरनोबत
म्हणून हाक मारणार? हा नक्कीच भास असणार. बहुधा आपल्या मनाचा समतोल बिघडत
असल्याचीच ही निशाणी असली पाहिजे. असे
नेताजींना वाटत
असतानाच पुन:पुन्हा त्या हाका ऐकू येत राहिल्या. हाकांमधील आर्त अधीरता
वाढत गेली. काही वेळाने भाल्याच्या काठीच्या ढोसण्यासुद्धा बसू लागल्या.
ग्लानीत असलेल्या नेताजींनी मोठ्या कष्टाने कसेबसे अर्धवट डोळे उघडले. तोच
तो, रत्नागिरीच्या आंब्याची गोष्ट सांगणारा सिद्दी शिपाई. कोठडीच्या
गजांपाशी बसून दबक्या आवाजात हाका मारीत होता. त्यांना उठविण्याचा प्रयत्न
करीत होता. डोळ्यांची थोडी उघडझाप झालेली पाहून सोबतच्या छाजलमधील पाणी
त्याने त्यांच्या तोंडावर मारले. गजांमधून हात घालून मोठ्या कष्टाने त्याने
त्यांना अलीकडे ओढले. हातांचा जोर लावून आणि भाल्याच्या काठीचा आधार देऊन
कसेबसे बसते केले. जखमा झालेल्या हातांनी कसेबसे गज पकडून ते अर्धवट बसते
झाले. त्या शिपायाने पाण्याची हलकी धार त्यांच्या तोंडावर धरली. अधाशीपणे
घटाघटा त्यांनी मिळाले तेवढे पाणी पिऊन घेतले. तो शिपाई हलक्या, दबक्या पण
स्पष्ट शब्दांत पुन्हा सांगू लागला–
सावध व्हा
सरनोबत, सावध व्हा. मी सांगतो ते नीट ऐका. वेळ थोडा आहे. सावध होऊन ऐका. मी
सिद्दी हिलालच्या तुकडीतला महाराजांचा माणूस आहे. महाराजांच्या
आज्ञेप्रमाणे दिलेरखानाच्या छावणीपासून हर प्रयत्न करून आपल्या आसपास आहे.
मी बहिर्जी नाईकांच्या पथकातला नजरबाज आहे. त्यांचा खबरी म्हणूनच मी तुमचा
पहारा मिळवला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मनगटावरचे हे गोंदण बघून
खात्री करून घ्या.
उठून तो भिंतीवर
अडकविलेली दिवटी घेऊन आला. अस्तनी मागे सारून त्याने मनगट उघडे केले आणि
दिवटीजवळ धरले. दिवटीच्या हलत्या प्रकाशात बहिर्जीच्या खास दलाची खूण
असलेले गोंदण चमकत होते. यातनांनी पिळवटलेल्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य
पसरले. दिवटी पुन्हा जागेवर अडकवून शिपाई पुन्हा गजांजवळ उकिडवा बसला.
मोठ्या कष्टाने नेताजींनी आपली मान गजांवर टेकवली आणि कान शिपायाकडे केला.
सरनोबत, तुमची
प्रत्येक खबर महाराजांच्या पायाशी रुजू आहे. घटकाभराचा जरी अवधी मिळता, तर
इतक्या आसानीने पकडले न जाता! गनिमाने फारच चपळाई केली. तुमचे हे कष्ट ऐकून
लेकरासाठी माय रडावी तसे महाराज धायधाय रडले. त्यांनी माझ्या हाती अति
तातडीचा आणि निर्वाणीचा सांगावा धाडला आहे.
नेताजींनी कसाबसा हुंकार भरला.
सरनोबत, ‘पडेल
ती किंमत द्यावी पण जीव वाचवा, शरीर राखावे. फारच जिवावर बेतून आले, तर
मुसलमान झाल्याचे नाटक करावे, पण स्वत:ला सोडवून घ्यावे. एकदा मुसलमान
झालात की, बादशहा मोकळीक देईल.
संधी मिळताच घराकडे निघून येणे. आम्ही आहोत. बजाजी नाईकांप्रमाणे शुद्ध करून घेऊ. हा आमचा शब्द आहे.’ सरनोबत उद्या जुम्मा.
नमाजानंतर
पुन्हा तुमची पेशी आहे. ती तुमची कदाचित शेवटची संधी असेल. आतावेरी फक्त छळ
झाला, त्याची वाढती कमान सुरू होईल. अजूनपर्यंत इजा झाली नाही पण यापुढे
सांगवत नाही. हातपाय तोडणे, डोळे फोडणे, कातडी सोलणे अशा पायऱ्या आता सुरू
होतील. मग काहीही करणे शक्य होणार नाही. मुसलमान होतो म्हणालात तरी बादशहा
मानणार नाही. जीवे मारल्याशिवाय राहणार नाही. ही शेवटची संधी साधून घ्या.
कुणाची तरी
चाहूल लागल्यासारखे वाटले आणि शिपाई झटकन जाग्यावर जाऊन उभा राहिला.
गजावरील पकड सुटताच ते मागच्या मागे कोसळले. कोठडीत सांडलेल्या पाण्याने
पाठीखालची राख भिजली होती. तो गारवा शरीराला किंचित सुखावून गेला. मिटल्या
डोळ्यांसमोर महाराजांची चिरपरिचित हसरी प्रतिमा उभी राहिली. नजरेत मायेचा
ओलावा आणि ओठांवर धीर देणारे आश्वासक प्रसन्न स्मितहास्य.
महाराज, महाराज,
मी धन्य झालो. माझ्यासारख्या क्षुद्र सेवकासाठी तुम्ही डोळ्यांतून पाणी
काढलेत. माझे सारे जीवन कृतार्थ झाले. तुमची आज्ञा प्रमाण. आता सारे
तुमच्या, आईसाहेबांच्या आणि जगदंबेच्या स्वाधीन. कीर्ती, अपकीर्ती, यश
तुमच्या पायी वाहिले. त्या सुखाच्या गुंगीत कित्येक महिन्यांनंतर नेताजींना
गाढ झोप लागली.
-
सकाळी सिद्दी
याकूत कोठडीत आला. राखेने लडबडलेल्या नेताजींच्या शरीरावरील पाण्याचे ओघळ
लपून राहण्यातले नव्हते. पहाऱ्यावरच्या शिपायावर डोळे काढीत तो किंचाळला–
बेवकूफ, कुत्ते की औलाद, कोणाच्या हुकमाने या कैद्याला पाणी पाजलेस?
हुजूर मोहरम सुरू आहे. प्यास्याला पाणी पाजणे सुन्नत आहे. या महिन्यात तर त्याचा विशेष स्वाब सांगितला आहे, हुजूर.
खाडकन शिपायाच्या थोबाडीत बसली. चढा कर्कश स्वर लावत याकूत पुन्हा केकाटला–
हरामजादा, मला
सुन्नत शिकवतोस? काफिराला पाणी पाजणे सुन्नत नाही तर नाफर्मानी आहे. दफेदार
इसे तुरंत दस कोडे लगाये जाय. काफिरांवर रहम करण्याची आयंदा कोणाची जुर्रत
होता कामा नये.
गुस्ताखी माफ हो
हुजूर, गुलामावर रहम करा. कैद्याने इस्लाम कबूल करण्याचे मान्य केले
म्हणूनच दिल पसीजला आणि हातून हे धाडस घडले. रहम हुजूर, रहम करा.
अस्स?
तुझ्यासमोर बोलला तो असं? तू काय मोठा आलाहजरत लागून गेलास की काय? फैसला
करायचा हक तुला कोणी दिला? तू म्हणतोस ते खरे मानले तरी त्याला पाणी
पाजण्याआधी तू माझी इजाजत घेणे जरूर होते. शिस्त मोडल्याची सजा झालीच
पाहिजे. घेऊन जा हरामीला. दस नहीं मगर तीन कोडे मारा. पुन्हा अशी गफलत
केलीस तर कातडी सोलून गिधाडांपुढे जिवंत फेकून देईन.
पहारेकऱ्याला
धरून बाहेर चालविले. त्याला शिक्षेचे दु:ख वाटत नव्हते. महाराजांची कामगिरी
पूर्ण केल्याचे समाधान त्याच्या मनात भरून राहिले होते. पुढे जे घडणार
होते त्याचा मुस्तकीम तपशील लवकरात लवकर कसा मिळविता येईल या विचारात
असल्याने फटक्यांची वेदना त्याला जाणवलीच नाही.
जुम्म्याच्या
नमाजानंतर जखडलेल्या जेरबंद नेताजींना बादशहासमोर पेश केले गेले. जोखडाचे
ओझे पेलत असतानासुद्धा ताठ उभे राहण्याचा प्रयत्न करीत आणि पायबेड्या
फरफटवीत नेताजी हजर झाले. मात्र दर खेपेसारखी नजर बादशहाच्या डोळ्यांत
रोखलेली नव्हती तर पायदळी झुकलेली होती.
क्यों नेता? आज
नजरे झुकाये? नेहमी माबदौलतांवर अंगार बरसवणारी नजर आज बुझी बुझीसी आणि
झुकलेली ताज्जूब. माबदौलतांनी ऐकले ते खरे आहे का? आम्हाला ते तुझ्या
स्वत:च्या तोंडून ऐकायचे आहे. काय, तू इस्लाम कबूल करण्यास रजामंदी दाखवली
आहेस? अल्लाचे सर्वांत प्यारे नबी हजरत महम्मद सलल्लाह वसल्लम यांनी जो
सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, एकमेवाद्वितीय रहमाने रहीम अल्लाचा खरा धर्म
सांगितला, तो तुला कबूल आहे?
अस्फुट स्वरात, जड आवाजात नेताजींच्या मुखातून जड सुस्काऱ्यात मिसळलेले शब्द आले–
जी…
अल्ला एक आहे आणि हजरत महम्मद सलल्लाह वसल्लम त्याचे आखरी पैगंबर आहेत हे तुला कबूल आहे?
जी…
कुफ्र सोडून सर्वशक्तिमान अल्लाच्या पनाहमध्ये येण्यास तू स्वखुशीने कबूल आहेस?
जी…
हे सर्व तू या साक्षीदारांच्या साक्षीने कबूल करतोस?
जी…
मुबारक हो! अल्लाच्या सच्च्या मार्गावर काफिले मदिनामध्ये तुझे स्वागत आहे.
‘जिंदा पीर आलाहजरत आलमगीर’
अशा घोषणांनी मोती मशिदीचा सारा परिसर दुमदुमून गेला.
शहजाद्याच्या
जन्मानंतरसुद्धा आनंदाने फुलला नसेल इतका आलमगिराचा चेहरा आनंदाने फुलला.
इस्लामी सत्तेला टक्कर देण्याची हिंमत दाखविणाऱ्या, स्वत:ची स्वतंत्र दौलत
उभी करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या आणि ती खरी करून दाखविणाऱ्या एका
कोहस्तानी काफिर बंडखोराचा, तितकाच त्रासदायक आणि घातकी सिपाहसालार;
सरनोबत, त्याचा उजवा हात समजला जाणारा काफिर आज त्याच्यापुढे झुकला होता.
त्याची सारी मस्ती, रग, बंडखोरी पार जिरली होती. नेता एकदा मुसलमान झाला
की, त्याला आलमगिराशिवाय अन्य त्राता उरणार नव्हता. त्याचा परतीचा मार्ग
पुरता बंद होणार होता. या दुसऱ्या शिवाचा उपयोग करूनच तो आता शिवाला शह
देणार होता. अर्थातच त्यासाठी त्याला काही वर्षे इंतजार करावा लागणार होता.
त्याला त्याची तयारी होती.
आलमगीर आनंदित
झाला होता, पण आनंदाने हुरळून गेला नव्हता. त्याचे डोके पूर्ण ठिकाणावर आणि
पाय पक्के जमिनीवर होते. क्षणभरसुद्धा बेसावध राहून शत्रूला कोणतीही संधी
देण्यास तो आता तयार नव्हता. पुढे काय, कसे आणि केव्हा केव्हा करायचे याचा
आराखडा त्याच्या मनात पूर्ण तयार होता. तो शत्रूला तुच्छ लेखत असला, तरी
त्याच्या काबिलीयतची पूर्ण जानकारी ठेवणारा होता आणि त्याला कुठेही कमी
समजत नव्हता. हात उंचावून त्याने घोषणा थांबविल्या.
सिद्दी
फुलादखान, इसे बाइज्जत रिहा करो। उत्तमातील उत्तम पेहराव त्याला द्या. लजीज
खाना द्या. शाही हकिमाच्या देखरेखीखाली कोऱ्या वस्तऱ्याने याची ताबडतोब
खतना करवून घे. तकलीफ झाल्याची शिकायत आली तर लिहाज केला जाणार नाही.
ईशाच्या नमाजापूर्वी माबदौलत स्वत: नव्या बंद्याला कलमा पढवतील. आणि
त्याच्या सोबतच ईशाचा नमाज पढतील. मात्र याद रहे, पहारे ढिले होता कामा
नये. मागच्या खेपेस झाली तशी गफलत जर झाली, काही दगा झाला, दगा होण्याची
कोशिश जरी झाली, तर गर्दन मारली जाईल. याद राख.
बोलता बोलता
बादशहा उभा राहिला. हुजऱ्याने पुढे ठेवलेले चढाव पायात सरकवून कोणाकडेही न
पाहता तो झपाट्याने आपल्या खासगी महालाकडे निघाला. त्याला आता एकांत हवा
होता, शुक्रानीचा नमाज अदा करण्यासाठी. त्याच्या अल्लाने त्याला मोठीच फते
मिळवून दिली होती.
बादशहा उठून
जाताच नेताजींच्या मानेवरचे जोखड ताबडतोब तेथेच उतरविले गेले. बेड्या
तोडल्या गेल्या. इतका वेळ केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर दोन पायांवर उभे
असलेले नेताजी धाडकन खाली कोसळले. त्याच क्षणी फुलादखानाचा खर्जातला दमदार
आवाज घुमला–
घुसलखाना. उठाकर ले चलो। खबरदार, कोई तकलीफ न हो। आलमपन्हा की हुक्म की तामील हो।
दोन धिप्पाड हबशांनी नेताजींचे मुटकुळे उचलून घुसलखान्याकडे चालविले.
-
असरचा नमाज
बादशहाने आपल्या खासगी महालातच पढला. नमाज पढण्यासाठी त्याने वजीर जाफरखान,
खान जहान लोधी, दिलावरखान उझबेग, दाऊदखान कुरेशी, नवाब फिदाई हुसेन खान,
महाबतखान, आग्र्याचा किल्लेदार रादअंदाझखान, कोतवाल, सिद्दी फुलादखान, गाझी
बेग, शाही हकीम मुल्ला सय्यद अहमद नूरानी, दिल्लीचा शाही इमाम मौलाना
मुफ्ती अफजल सईद महम्मद झरदारी, मोती मशिदीचा पेश इमाम मौलाना मसूद अहमद
कुरेशी आणि अन्य काही विश्वासू दरबारी, सरदार, धार्मिक विद्वान काझी
वगैरेंना बोलावून घेतले होते. शाही इमामाच्या मागे नमाज पढून झाला. बादशहा
लोडाला टेकून मसनदीवर बसला. नजर छतावर खिळलेली. हातातील जपमाळेचे मणी झरझर
सरकत होते. तेवढीच काय ती हालचाल. इतर मंडळी योग्य अंतर राखून, हात बांधून
नजर पायाशी ठेवून शांत उभी होती. बऱ्याच वेळाने हिरवी नजर खाली उतरली आणि
सिद्दी फुलादखानावर स्थिर झाली.
सिद्दी फुलादखान
अखेर तुझ्या प्रयत्नांना यश आले. परमदयाळू परवरदिगार अल्लाने काफिर नेताला
इस्लामच्या खऱ्या आणि सच्च्या मार्गावर येण्याची सद्बुद्धी दिली. तुझी
सेवा अल्लाच्या दरबारात निश्चितच रुजू होईल.
आपल्या कृपेचेच हे सारे फळ आहे आलमपन्हा. वर्ना माझ्यासारख्या नाचीज गुलामाला ते कुठले शक्य व्हायला!
पण मला माजरा
काही साफ दिसत नाही. कालपर्यंत जिवाची पर्वा न करणारा इसम आज नेमका
आमच्यासमोर पेश होण्याच्या दिवशी आणि नेमकी आमच्या सब्रची डोर ज्या दिवशी
कदाचित तुटणार होती त्याच दिवशी अचानक धर्म बदलण्याची कबुली देतो हे जरा
कुठेतरी खटकते. यामध्ये त्या हरामजाद्याचा आणि त्याचा जुना मालिक, तितक्याच
हरामखोर शिवाचा काही डाव असावा असा माबदौलतांना शक आहे. अनेक वर्षे
दख्खनमध्ये सुभेदारी केल्यामुळे माबदौलत त्या मराठी भुतावळीला चांगलेच
ओळखतात. ते इतक्या सहजासहजी नमणारे नाहीत. याच्यावरचे पहारेकरी नीट पारखून
घेतलेले खात्रीचे आणि विश्वासातले होते ना? काही दगा किंवा फंदफितुरी नाही
ना याची नीट चौकशी आणि खात्री करून घे. इतक्यात याला कोणी भेटून गेला काय?
नाही आलमपन्हा.
हुजुरे आलींच्या हुकमाप्रमाणे हजरत गाझी बेगसाहेब भेटून गेले तेवढेच. बाकी
पाखरूसुद्धा त्याच्या आसपास फिरकू शकणार नाही असा चोख बंदोबस्त आहे.
प्रत्येक शिपाई मी स्वत: पारखून घेतलेला, खात्रीचा आहे. सगळे माझे बिरादर
आणि जातभाईच आहेत.
ठीक. तरी
माबदौलतांना शक आहेच. जसा सिद्दी जौहरला सुलह करण्याचे आमिष दाखवून गाफील
केला गेला, तसेच तुला इस्लाम कुबूल करतो असे खोटेच सांगून गाफील केले नसेल
कशावरून? दीड लाख फौजेचा गराडा फोडून जो शिवा लाल महालात शिरतो आणि आमच्या
मामूजानची बोटे
तोडतो आणि वर
राजरोसपणे सुखरूप निसटून जातो, जो तुझ्या तोफा आणि पाच हजार जांबाज
हशमांच्या वेढ्यातून गायब होतो, तो शिवा किंवा त्याची माणसे या किल्ल्यात
घुसणे अशक्य नाही. अचानक छापा मारून ते त्यांचा माणूस सोडवून नेतात.
माबदौलतांना त्यांना आता कोणतीही संधी द्यायची नाही. किल्लेदार
रादअंदाझखान, आजच रात्री त्या काफिराला कलमा पढवला जाईल. आत्ता, या
क्षणापासून किल्ल्याचे चौक्या-पहारे दुप्पट वाढवून कडक कर. तटावर फिरती
गस्त ठेव. दर दहा-पाच पावलांवर एक तिरंदाज आणि एक बरकंदाज उभा ठेव.
प्रत्येक कमानीवर तीर लावलेला आणि प्रत्येक बंदूक, प्रत्येक तोफ ठासून सज्ज
ठेव. फुलादखान, पूर्ण शहरात नाकेबंदी जारी कर. तुझी आणि रादअंदाझची पथके
शहरापासून पाच कोस दूरपर्यंत फिरती ठेव. बेड्या तोडल्या असल्या तरी
कैद्यावर सख्त पहारा तसाच जारी ठेव. मशिदीच्या सभोवती किल्लेदाराचे पहारे
असतील पण आतसुद्धा तू तुझे सावध पहारे जारी ठेव. नमाजासाठी आमच्या मागे
असणारे मानकरी हत्यारबंद राहतील. तेथे कोण उभे राहतील त्यांची निवड
वजीरेआझम स्वत: करतील. काफिराने इस्लाम कबूल केला तरी पुढचा हुकूम
होईपर्यंत सख्त पहारे तसेच जारी राहतील. मौलाना मुफ्ती अफजल, आज
रात्रीपासून कैदी तुमच्या ताब्यात, तुमच्या हवेलीत राहील. त्याला चांगला
खुराक देऊन तंदुरुस्त करा. दीनी तालीम द्या. तुमच्या हवेलीच्या हिफाजतीची
जिम्मेदारी फुलादखान सांभाळेल. खर्चाची फिकीर करू नका. लागेल तेवढा पैसा
सरकारातून मिळेल. हकीम मुल्ला सय्यद अहमद नूरानी, कैद्यावर ताबडतोब इलाज
सुरू झाले पाहिजेत. हयगय झाल्याचे समजले तर मुलाहिजा केला जाणार नाही. दोन
महिन्यांनंतर भरणाऱ्या चाँदरातीच्या दरबारात तो तंदुरुस्त हाजिर राहू शकला
पाहिजे. वजीरेआझम, तो तुमचासुद्धा जिम्मा राहील. कैद्याला खबर लागू न देता
त्याचा कुटुंबकबिला बोलावून घ्या. त्यांना मुसलमान करा.
बादशहा बोलत
असताना मध्ये बोलण्याची सोय नव्हती. सगळे मुकाटपणे ऐकत होते. माना डोलवीत
होते. आपल्या नावाचा उल्लेख झाला की, कुर्निसात करून प्रतिसाद देत होते.
बादशहाचे हुकूम इतके स्पष्ट होते की, त्यावर चर्चा करण्याची सोय नव्हती.
बाहेर पडण्यासाठी कुर्निसात करायला सारे वाकले. नेमके तेव्हाच शाही इमामाने
तोंड उघडले–
जान की अमान पाऊं तो आलमपन्हांच्या खिदमतमध्ये चार शब्द सुचवण्याची गुलाम इजाजत अर्ज करतो.
जपमाळेचे मणी थांबले. कपाळावरचा काळा डाग आक्रसला. नजर अधिकच तीव्र झाली. हाताच्या इशाऱ्यानेच बादशहाने इजाजत दिली.
आलमपन्हा का हुक्म सरआखोंपर. पण हुजूर परवाच इन्शाल्ला चाँदरात आहे. त्या मुबारक मुहूर्तावर कैद्याला कलमा पढवला तर सवाब अधिक मिळेल.
बादशहाची तिखट
हिरवी नजर शाही इमामावर खिळली. सरसर भाव बदलत गेले. नजरेची धग तिसऱ्या
माणसाला जाणवण्याइतकी तेज झाली. शाही इमाम घामाने डवरून निघाला. चूक होऊन
गेली होती. आपल्या धार्मिक स्थानाच्या तोऱ्यात आणि अतिआत्मविश्वासाने
केलेला शहाणपणा आता त्यांच्या अंगावर उतणार हे सर्वांना कळून चुकले. काही
क्षणांच्या अस्वस्थ शांततेनंतर बादशहाचा तीव्र चिरका संतप्त स्वर महालात
घुमला–
बेवकूफ गुस्ताख
नामुराद बेइमान, किती पैसे मिळाले तुला त्या हरामी शिवाकडून? हा असला
बेइमानी मशवरा? देखा? आमचा अंदेशा गलत नसतो. अरे बेहया, नशीब समज तुझी दीनी
हैसियत पाहून माबदौलत तुझी जान बख्शीत आहेत. ध्यानात ठेव. असला मशवरा
यांच्यापैकी कोणी दिला असता तर त्याच्या नापाक रक्ताने आमचा बेशकिमती कालीन
खराब होण्याची फिकीर न करता इथल्या इथे त्याची गर्दन उतरली असती. त्या
मूर्ख सिद्दी जौहरने शिवाला फक्त एक रात्र बहाल केली आणि स्वत:ची कयामत
ओढवून घेतली. तू त्याला तीन रात्रींची मोहलत बहाल करतोस? नेता
स्वत:च्या
पायांनी पळून जाऊ शकणार नाही असा बंदोबस्त फुलादखानाने करून ठेवला असला,
तरी त्या शिवाची भुतावळ काहीही करू शकते, हे आलम हिंदुस्थान जाणतो. पण
लक्षात ठेव, नेता काफिर असेपर्यंतच त्यांची ही धडपड चालू शकते. ज्या क्षणी
तो मुसलमान होईल त्याच क्षणी त्यांचे ताबूत आपोआप ठंडे होतील. कारण
काफिरांच्या नापाक धर्मात फक्त बाहेर जाण्याचे मार्ग उघडे आहेत; आत
येण्याचे नाहीत. अगदी फटसुद्धा नाही. याउलट आपल्या पाक इस्लाममध्ये आत
येण्याचे हजारो दरवाजे सतत उघडे असतात. पण बाहेर जाण्याचा काहीच मार्ग
नाही. कोणी तसा प्रयत्न केलाच तर अशा बेइमानाला नाफर्मानीचा दोष ठेवून थेट
नरकात हाकलून देण्याचा अधिकार प्रत्येक सच्चा मुसलमानाला कुराणेपाकने बहाल
केला आहे. वजीर जाफरखान, या क्षणापासून मुफ्ती अफजल झरदारीची सनद रद्द कर.
त्याला शाही दरबारातून मिळणारे सगळे मरातब आणि शाही खजिन्यातून मिळणारे
सर्व तनखे रद्द. त्याच्या कुटुंबाचा जेमतेम उदरनिर्वाह चालेल एवढीच संपत्ती
त्याच्या सर्वांत मोठ्या बायकोच्या हवाली करून, बाकी प्रत्येक पै अन् पै
जप्त करून आमच्या धर्मादाय खात्यात जमा कर.
जो हुक्म अलीजा.
फुलादखान,
ताबडतोब या बेइमानाच्या घरावर चौक्या पहारे जारी करून त्याला नजरबंद कर.
माबदौलतांच्या खास इजाजतीशिवाय कोणी आत-बाहेर जाता-येता कामा नये. हा
शिवाला फितूर झाला आहे किंवा नाही आणि मरगट्ट्यांची माणसे शहरात आली आहेत
का याचा रातोरात शोध घे. उद्या सकाळी दिवाणे खासमध्ये अहवाल सादर झाला
पाहिजे.
जो हुक्म आलमपन्हा. मला चौकशीची पूर्ण सूट मिळावी असा अर्ज आहे.
मंजूर. कैद्याला
मुफ्तीच्या हवाली सोपवण्याचा हुकूम आता रद्द. जाफरखान, त्याला तुझ्या
स्वत:च्या निगराणीत ठेव. जरा चूक झाली, कैद्याने दगा दिला तर तुझ्या
वजिरीचा लिहाज ठेवला जाणार नाही.
जी अलीजा.
तखलिया.
पटापट मुजरे घालीत सारे बाहेर पडले. महालाबाहेर पाऊल टाकताच शाही इमामाच्या मुसक्या आवळल्या गेल्या.
बादशहाच्या
हुकमाची तामील लगोलग सुरू झाली. जागोजाग चौक्या बसल्या. येणाऱ्या-जाणाऱ्या
प्रत्येकाची चौकशी सुरू झाली. फुलादखानाच्या माणसांनी मोठ्या प्रमाणात
धरपकड केली. शहरात जणू अघोषित संचारबंदीच लागू झाली. घराघरांतून
नेताजींच्या छळाच्या खऱ्या-खोट्या चर्चा आणि धर्मांतराची कुजबुज सुरू झाली.
शहरातच नव्हे तर शहराभोवती स्वारांची दौड सुरू झाली. लाल किल्ल्याच्या
तटा-बुरुजांवर गस्त सुरू झाली. रादअंदाझखानाच्या शिपायांनी मोती मशीद घेरली
होती. नमाजासाठी येणाऱ्या मोठमोठ्या अमीर-उमरावांचीसुद्धा कडक तपासणीतून
सुटका नव्हती. मशिदीच्या आत सिद्दी फुलादखानाचे कडवे हबशी खांद्यावर नंग्या
तेगा घेऊन भिंतीला चिकटून उभे होते. मशिदीचा प्रत्येक कोपरा त्यांच्या
नजरेच्या टप्प्यात होता. गांजा पिऊन लालभडक झालेले डोळे अधिकच तांबारून
सिद्दी याकूत सख्त देखरेख करीत होता.
रात्र पडू
लागली. ईशाच्या नमाजाला घटकाभराचाच अवधी उरला. मोती मशिदीत ईदचा माहोल
होता. मगरीबच्या नमाजासाठी आलेला बादशहा आपल्या जागेवरच बसून होता. अत्यंत
विश्वासू दरबारी बादशहाच्या मागच्या रांगेत पायाशी नंग्या तलवारी ठेवून उभे
होते. बादशहाच्या डावीकडे मध्ये चार हातांचे अंतर ठेवून जरीच्या कलाबतूचे
काम केलेला एक मखमली मुसल्ला अंथरलेला होता.
नव्या कोऱ्या
मुघली पोशाखातील नेताजींना मोती मशिदीत आणले गेले. सिद्दी फुलादखान
त्यांच्या जोडीने चालत होता. विजयाचा आनंद त्याच्या डोळ्यांत मावत नव्हता.
छाती पुढे काढून चालताना इकडेतिकडे कटाक्ष टाकीत लोकांच्या नजरेतून
उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा तो अंदाज घेत होता. नेताजींच्या हातीपायी बेड्या
नसल्या तरी तळपते भाले आणि नंग्या तलवारी घेतलेल्या हशमांचा गराडा कायम
होता. मारहाण, अतोनात छळ आणि उपासमार, त्यातच प्रचंड मानसिक तणाव यामुळे
नेताजींच्या अंगात उभे राहण्याचेसुद्धा त्राण नव्हते. भरीस भर म्हणजे
नुकताच खतना झालेला असल्यामुळे टाकलेले प्रत्येक पाऊल मस्तकात झिणझिण्या
उठवीत होते.
पेश इमाम मौलाना मसूद अहमद कुरेशी लगबगीने पुढे झाला. नेताजींचे दोन्ही हात हातात घेऊन त्याने नेताजींचे स्वागत केले.
खुशामदीन जनाब. अल्लाच्या घरात मी तुमचे मनापासून स्वागत करतो. जिल्हेसुभानी आलमपन्हा तुमचीच वाट पाहत आहेत. चलावे.
पेश इमामाने
त्यांना बादशहासमोर उभे केले. त्यांच्याकडे पाहून आलमगीर बादशहा चक्क मंद
स्मित करीत होता. गेल्या कित्येक वर्षांत त्याच्या चर्येवर कोणी स्मितरेषा
पाहिली नव्हती. आजचा योगच मुळी अपूर्व आणि दुर्मीळ होता. शरीरातून उठणाऱ्या
वेदना दाबून धरून आणि चेहऱ्यावर हास्य आणून नेताजींनी कंबरेतून वाकून
बादशहाला तीन वेळा कुर्निसात केला. बादशहाची हिरवी गहरी नजर एकटक रोखून बघत
होती. मग एक अत्यंत दुर्मीळ घटना घडली. नेताजींच्या कुर्निसातचा बादशहाने
मान झुकवून स्वीकार केला आणि शेजारच्या मखमली मुसल्ल्यावर बसण्याचा हाताने
इशारा केला. पेश इमामाने पुढे होऊन त्यांना बसण्याचा इस्लामी तरीका समजावून
सांगितला. इतकेच नव्हे तर पश्चिमेकडे मोहरा करून त्यांना नीट बसवून घेतले.
खतन्यामुळे उठणाऱ्या असह्य वेदना कशाबशा सहन करीत, मुद्रेवर त्या उमटणार
नाहीत याची दक्षता घेत मोठ्या शिकस्तीने ते विशिष्ट पद्धतीचे आसन घालून
बसले.
दरबारी
अमीर-उमरावांनी मशीद गच्च भरली होती. सारे हात बांधून स्तब्ध उभे होते.
नेताजींना सर्वांत पहिल्या रांगेत बसविल्याने मागे कोणकोण आहेत हे समजत
नव्हते. प्रत्यक्ष बादशहा शेजारी बसलेला असल्याने मागे वळून पाहणे शक्य
नव्हते. त्यांना समोर फक्त मेहराबचा महिरपी कोनाडा, त्याच्या शेजारचे खुतबा
पढण्याचे मौलवी आणि शेजारी उभा असलेला पेश इमाम एवढेच दिसत होते. आज पेश
इमामाच्या दोन्ही बाजूंस हत्यारबंद हशम उभे होते. मागच्या रांगेतल्या
उमरावांच्या नजरा नेताजींवर रोखलेल्या होत्या. त्यांची प्रत्येक हालचाल आणि
चेहऱ्यावरचे बदलते भाव ते अतिशय बारीक नजरेने टिपत होते. नमाज
पढतानासुद्धा नजर ढळू न देण्याची त्यांना ताकीद होती. दग्याफटक्याचा संशय
जरी आला तरी विजेच्या वेगाने तलवार उचलून चित्त्याच्या चपळाईने ती
चालविण्यास ते अगदी सिद्ध होते.
नेताजींनी डोळे
मिटून घेतले. मिटल्या डोळ्यांसमोरून रोहिडेश्वराच्या शपथेपासून
विशाळगडावरच्या प्रसंगापर्यंतची दृश्ये क्षणात तरळून गेली. आईसाहेबांचा
करारी तरी वत्सल, आश्वासक सोज्ज्वळ चेहरा आणि महाराजांची भव्य मूर्ती
दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर खिन्न स्मित होते. एका डोळ्यात चिंता, तर
दुसऱ्या डोळ्यात आश्वासन तरळत होते. महाराजांच्या मागून खंडेराया आणि भवानी
आई वरदहस्त उंचावून मंद हसत होते. नेताजींच्या शरीराचा कणन् कण आणि मनाचा
कोपरान् कोपरा टाहो फोडून महाराजांना सांगत होता–
‘महाराज, तुमची आज्ञा म्हणून स्वराज्यासाठी हे दिव्यसुद्धा
करण्यासाठी मी आनं?
No comments:
Post a Comment