नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
_⚔🚩⚔📜🚩___
रसूल बेग येऊन
गेल्यापासून एक मोठा बदल घडून आला. छळ आणि मारहाण पूर्ण बंद झाली. रोज
अंघोळ करण्याची मुभा मिळाली. जाडेभरडे, आडमाप का असेनात, पण अंगावर कपडे
चढले. कदान्न असले तरी रोज, दिवसातून दोन्ही वेळा जेवण मिळू लागले. सिद्दी
फुलादखान आदबखान्याकडे फिरकलाच नाही. सिद्दी याकूत आला तरी नेताजींच्या
कोठडीकडे फिरकेना. दिवसाआड कोठडीची झाडझूड होऊ लागली. हे सारे कशासाठी याचा
आधीच उलगडा झाल्यामुळे नेताजींना त्याचे सोयरसुतक वाटत नव्हते.
महिन्याभरात हे नाटक संपून ‘येरे माझ्या मागल्या…’ होणार याची त्यांना
खात्री होती.
दिवसा उन्हे
तापण्यास सुरुवात झाली होती. मात्र रात्री गजांमधून गार वारा आला की शरीर
सुखावत असे. अंगचा ठणका कमी झाल्याने रात्री बरी झोप लागू लागली.
एके दिवशी
मध्यरात्रीनंतर त्यांची झोप चाळवली गेली. बहुधा तिसरा प्रहर उलटला असावा.
कोणाच्या तरी आपसात बोलण्याच्या आवाजाने झोप चाळवली होती. खाटेवर दरोगा
निवांत घोरत असल्याने पहाऱ्यावरचे शिपाई आपसात जरा मोकळेपणाने गप्पा मारीत
होते.
काय रे? नाव काय तुझे? नवीन आलेला दिसतोस, कोठून आलास?
छे! नवीन कुठला,
चांगला महिना झाला मला या पहाऱ्यावर रुजू होऊन. आपणा दोघांची एकत्र पाळी
आज लागली एवढेच. तसा मी मूळचा दिल्लीचा म्हणजे आमच्या तीन पिढ्या तरी
दिल्लीतच गेल्या. पण मोहिमेपायी अनेक वर्षे दख्खनमध्ये काढावी लागली. सरदार
कारतलबखानांच्या निसबतीत नवाब शाहिस्तेखान हुजुरांच्या फौजेत दख्खनमध्ये
गेलो. गेलो तो तिकडेच अडकून पडलो. कारतलबखानसाहेब परत आले पण आमचा दस्ता
त्यांनी मागेच राजा जसवंतसिंहाच्या फौजेत ठेवला. सरदार बदलत गेले, आम्ही
मात्र तसेच दख्खनमध्ये अडकून पडलो. शेवटी मोठी खटपट करून या कैद्याबरोबर
आलेल्या फौजेत शिरकत करून घेतली आणि आपल्या वतनास परत आलो.
झूठ. नामुमकिन.
मला फसवू नकोस. त्या तुकडीत सरदारापासून बारगिरापर्यंत फक्त पठाण आणि पठाणच
होते. दुसऱ्या कोणत्याही जमातीच्या शिपायाला सामील करून घेण्यावर सख्त
बंदी असल्याचे मी ऐकले होते.
तू ऐकलेस ते सौ
फीसदी खरे आहे. पण गड्या स्वत:च्या वतनाला परत येण्याची ओढ मोठी जबरदस्त
असते. इथे. माझ्या तीन बायका आणि कच्ची-बच्ची माझ्या वाटेकडे डोळे लावून
बसली होती. मग शागिर्दपेशात सामील झालो. भिस्त्याचे काम करीत आग्र्याला
येऊन पोहोचलो.
मग पुढे? इथे येऊन कसा टपकलास?
आग्र्यात
पोहोचलो. कैदी आपल्या मालकांच्या ताब्यात दिला गेला. फौजेला सुटी मिळाली.
आम्हा बाजारबुणग्यांना वाऱ्यावर सोडून दिले. दिल्लीला घरी गेलो. थोडे दिवस
घरी राहिलो. पण कामधंदा केल्याशिवाय कसे भागणार? आपण हातावर पोट असणारी
माणसे. कबिला घेऊन आग्र्याला परत आलो. जुन्या ओळखी काढल्या, बिरादरीतल्या
लोकांचे वशिले लावले तेव्हा हजरत फुलादखानसाहेबांच्या सेवेत दाखल झालो.
मोठा देवमाणूस आहे आपला मालक. माझी मोठी कडी इम्तहान घेतली हुजुरांनी. मग
त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. बरीच वर्षे दख्खनमध्ये काढल्यामुळे मला या
काफिर मरगट्ट्यांची जुबान समजते. म्हणून मग या जालीम कैद्यावर नजर
ठेवण्यासाठी आणि तो त्याच्या भाषेत जे काही बरळतो ते ऐकून हुजुरांना खबर
देण्याच्या खास कामगिरीवर मला येथे नेमले आहे. समजले?
बोलत असताना
शिपायाची एक नजर कैद्यावर होतीच. कैद्याची झोप चाळवल्याचे आणि आपले शेवटचे
वाक्य ऐकून तो सजग झाल्याचे त्याला जाणवले. सहज बोलत असल्यासारखे त्याने
बोलणे पुढे चालूच ठेवले.
खरे सांगू
मित्रा, पोटामागे एवढा हिंडलो, पण दिल्ली-आग्र्यासारखा मुलूख नाही. आपल्या
वतनात जो सुकून आहे तो दुसरीकडे कुठेच मिळत नाही. काय ते भयानक दख्खन. ते
भयानक पहाड, खोल दऱ्या, भयंकर जंगले, उंबर खिंडीसारख्या अक्राळविक्राळ
खिंडी आणि या सर्वांवर वरताण म्हणजे ती मराठी; मराठी माकडांची भुतावळ.
नुसत्या आठवणीनेच अंगावर काटा उभा राहतो. अल्लाची खैर म्हणून मी हातीपायी
धड जिवंत परत आलो.
कैद्याची चाहूल घेत त्याने बोलणे पुढे सुरू ठेवले–
पण दोस्ता, एक
बात आहे. त्या भयानक कोहस्तानी मुलखात रत्नागिरी नावाचा प्रांत आहे. मुलूख
तसाच भयंकर पण यार तिथले आंबे. तिथले कलमी आंबे असे नामी की, काही विचारू
नकोस. त्याला तोड नाही. त्या आंब्यांची आठवण आली की, आजसुद्धा तोंडाला पाणी
सुटते.
शिपायाची पुढची
बडबड नेताजींच्या कानात जणू शिरलीच नाही. रत्नागिरी आणि तिथले आंबे हा
उल्लेख ऐकून ते चपापले. शिपायाच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. त्याचे
काम झाले होते. ओळख पटली होती. तेवढ्यात दरोग्याने कूस बदलली. बडबड
थांबवायला तेवढे निमित्त पुरेसे होते.
महाराजांविषयीच्या
अभिमानाने आणि प्रेमाने नेताजींचा ऊर भरून आला. स्वराज्यापासून शेकडो कोस
दूर ऐन शत्रूच्या राजधानीत आपला माणूस पाठविण्यात महाराजांना यश आले होते.
एवढेच नव्हे तर तो माणूस थेट त्यांच्या कोठडीपर्यंत पोहोचला होता.
धन्य आहे महाराज
तुमची धन्य आहे. एका क्षुल्लक चाकरासाठी केवढा हा आटापिटा. मी भरून पावलो.
सारे भरून पावलो. माझ्या आजवरच्या सेवेचे चीज झाले. आता दुनिया काय म्हणेल
याची फिकीर करण्याची गरज नाही. आता हे शरीर साहेबकामीच खस्त होणार. सत्त्व
आणि धर्म रक्षिण्यासाठी स्वराज्याचा सरनोबत मरणाला कसा सामोरा जातो हे
जगाला आता दाखवून देईन. आता झुकणे नाही, भले प्राण गेला तरी बेहत्तर.
या विचारांनी त्यांच्या अंगी पुन्हा जणू हत्तीचे बळ संचारले. मोठ्या समाधानाने ते झोपेच्या स्वाधीन झाले.
-५५-
पटांगणातल्या
आंब्याच्या झाडाला नवी पालवी फुटली होती. पानांच्या झुबक्याआडून हिरव्याकंच
कैऱ्या डोकावू लागल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून चैत्र लागून गेल्याचे
नेताजींच्या लक्षात आले होते. शिपायाचे बोलणे ऐकल्यापासून त्यांचे मन स्थिर
झाले हात. आपण एकटे असलो तरी एकाकी नाही याची खात्री पटून त्यांचा
आत्मविश्वास वाढला होता; त्यामुळे शरीराला आणि मनाला नवी उभारी आली होती.
सध्या मिळत असलेल्या सवलती आणि आराम म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीची
शांतता आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. पण आता त्यांना फिकीर नव्हती.
जे कोसळेल ते झेलण्याची त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झाली होती.
एक दिवस
कोठडीसमोरच्या पटांगणात झाडाखाली तशीच बैठक मांडली गेली. असरचा नमाज
झाल्यानंतर रसूल बेग त्या बैठकीवर येऊन बसला. या खेपेला तो एकटा नव्हता.
त्याच्या सोबत राजा जसवंतसिंह आणि अन्य दोन अनोळखी राजपूत सरदार होते. तसेच
दोन-तीन मुस्लीम दरबारी होते. हातीपायी बेड्या जखडून नेताजींना बैठकीवर
आणले गेले. रसूल बेग उठून दोन पावले सामोरा आला. हाताला धरून त्याने
नेताजींना बैठकीशी आणले.
खुशामदीन नेताजी भाईजान. आईये. यहाँ तश्रीफ रखिये. हमें खुशी है पिछली मुलाकात से आपकी तबियत बेहतर नजर आ रही है.
नेताजी जागीच थांबले. त्यांनी आपले हात सोडवून घेतले.
शुक्रिया जनाब
रसूल बेग! मी आपला येथेच बरा आहे. ज्याने त्याने आपल्या पायरीप्रमाणे
राहावे हेच उत्तम! मनसबदाराने मसनदीवर बसावे आणि धोकादायक कैद्यांनी
दहा-पाच पावले दूरच उभे राहावे.
अजी भाईजान,
तुम्ही तर आमच्यावर नाराज दिसता. आम्ही काही तुम्हाला कैदी म्हणून जाब
विचारायला आलो नाही. आम्ही एका सूरमा वीराला दोस्तीच्या रिश्त्याने भेटायला
आलो आहोत. तसे म्हणाल तर तुम्हालासुद्धा शाही मनसब आणि जहागिरी बहाल
झालेली आहे.
हुं! मनसब!!
त्याच मोहाला बळी पडलो आणि हा नतीजा पावलो. आता दोस्तीचे म्हणाल तर आमच्या
हातीपायी बेड्या तशाच आहेत. बेड्यांमध्ये जखडले असताना आम्ही दोस्तीचा
रिश्ता कसा निभावणार आहोत? इतके हाल आणि उपासमार सोसूनसुद्धा हा नेताजी
बेड्यांमधून मोकळा झाला तर सात-आठजणांना भारी आहे हा शक आपल्या दिलात कायम
आहे. असू द्या तो तसाच. आम्ही तो आमचा बहुमान समजतो. पण अवघडलेल्या
दोस्ताची अशी परक्यांसमोर नुमाइश मांडली जात नाही. आपण शाही कामगिरीवर आला
आहात. आमच्या मनी तुम्हाबाबत कोणताही किंतू नाही. जो हेतू मनात धरून आला
आहात, तो नि:संकोच बोला. आम्ही ऐकून घेऊ. आपण आणलेल्या प्रस्तावाला आम्ही
आधीच उत्तर दिले आहे. त्यात बदल करण्याची आम्हाला गरज वाटत नाही.
इतका वेळ गप्प राहून ऐकणारा राजा जसवंतसिंह कसनुसे हसत म्हणाला–
अजी नेताजी भाईसा,
एकदम असे टोकाला येऊ नका. जरा ऐकून तर घ्या बेगसाहेब काय पैगाम घेऊन आले
आहेत ते. तुम्हा मराठ्यांची एक घाव दोन तुकडे ही मनोवृत्तीच तुमच्या
प्रगतीमधली रुकावट आहे. आज आम्ही इतक्या पिढ्या शाही सेवेत घालवल्या त्या
दिमाग शांत ठेवून, हातरुमालात बांधून आणि जिभेवर साखर ठेवून; म्हणूनच आज
आम्ही सारी सुखे उपभोगीत आहोत. जीव, दौलत वाचवून सुखरूप आहोत.
राजा
जसवंतसिंहजी, या अशा प्रसंगी आणि ही असली बोलणी करण्यासाठी आपल्यासारख्या
मातब्बर हिंदू राजाने यावे या परते हिंदू धर्माचे दुर्दैव ते काय? राजपूत
म्हणजे अस्सल क्षत्रिय. रामाचे, कृष्णाचे, पांडवांचे थेट वंशज. या
परमपवित्र पुण्यभूमीच्या सीमांचे रक्षक. तुमच्या समर्थ खांद्यावर डोके
ठेवून उरलेला समस्त हिंदुस्थान निवांत होता. पण तुमच्यात पृथ्वीराज
चौहानापेक्षा जयचंद राठोडच वरचढ ठरला. स्वत:च्या दौलती वाचवण्यासाठी आणि
स्वत:च्या ऐशआरामाला धक्का लागू नये म्हणून आपल्या घरच्या लेकीबाळी आपल्याच
हाताने तुर्कांच्या जनानखान्यात ढकलण्यात तुम्हाला मोठी धन्यता वाटते.
आम्ही मराठ्यांनी आपल्या आया-बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी, मायभूमीचे
परचक्रापासून रक्षण करण्यासाठी स्वत:च्या हातांनी दौलतीवर, घरसंसारावर
निखारे ठेवले. मराठा ही काय चीज आहे हे तुमच्या पन्नास पिढ्या अशाच गेल्या
तरी तुम्हाला समजायचे नाही. तेव्हा आपण याविषयी न बोलाल तर बरे. रसूल बेग
जे करीत आहेत तो त्यांचा धर्म आहे. निदान त्यांच्याकडे पाहून तरी
स्वधर्मनिष्ठा शिकलात तरी पुरेसे आहे.
एका जखडलेल्या
कैद्याच्या तोंडून इतक्या तेजस्वी शब्दांत झालेला पाणउतारा ‘मानी’ रजपुतास
कसा सहन होणार? त्यांचा डावा हात मिशीवर आणि उजवा हात तलवारीच्या मुठीवर
गेला. प्रसंगाने अचानक गंभीर वळण घेतले आणि वातावरण तंग झाले. वेळेची नजाकत
ओळखून रसूल बेग लगेच मध्ये पडला. जागेवरून उठून हाताने नेताजींना थोपवीत
आणि नजरेच्या इशाऱ्याने जसवंतसिंहाला शांत करीत तो गडबडीने म्हणाला–
अजी छोडिये
भाईजान. असे संतापू नका त्यांच्यावर. आम्ही दरबारातून सोबतच निघालो. मीच
त्यांना सहज सोबत चलण्याचा आग्रह केला. त्यांना बिचाऱ्यांना यातले काहीच
माहीत नाही. शांत व्हा. शांत व्हा.
रसूल बेग, याच
राजा जसवंतसिंहाच्या पाठीवरचे कोंढाण्यावर उठलेले वळ आलमपन्हांच्या दरबारात
पुन्हा नजरेला पडल्याने शिवाजीराजांनी भरदरबारात घडवलेले रामायण हे
विसरलेले दिसतात. जखडलेला प्रतिशिवाजी कसा दिसतो हे पाहण्यासाठी आणि मौका
सापडला तर त्याला खिजवण्यासाठी ते आपल्या सोबत आले आहेत. सिंह बंदिस्त असला
तरी कोल्ह्या-तरसांनी त्याला खिजवायचे नसते, या धड्याची त्यांना फक्त आठवण
दिली. सध्या आम्ही शांत राहण्याशिवाय काय करू शकतो?
नेताजी भाईजान,
तुमचे माझ्याविषयी काय मत असेल ते असो, मी मात्र तुमच्या मर्दानगीचा दिवाना
आहे. माझ्या मनात तुमच्यासाठी गाढ प्रेम, स्नेह आणि आदरच आहे. म्हणून आणि
म्हणूनच मला असे प्रामाणिकपणे वाटते की, आपल्यासारखा नामी मोहरा असा
फुकाफुकी वाया जाऊ नये. यामध्ये माझा कोणताच वैयक्तिक स्वार्थ नाही.
रसूल बेग,
तुमच्या मनातल्या सद्हेतूचा मला पूर्ण आदर आहे. म्हणूनच आम्ही तुमच्याशी
तुमचा इतमाम राखून बोलत आहोत. आम्ही आमचा निर्णय आपणास सांगितला आहे. का
उगा स्वत:ला असे शिणवता?
भाईजान, तुमच्या
बयानावर, त्यातल्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. पण आलाहजरतांचा
नाही. आज दरबारात तुमचा एकही मित्र नाही. शिवाजीराजांनी जे केले आणि
त्यामुळे कुंवर रामसिंह जो नतीजा पावले आणि मिर्झाराजांसारख्या थोर
दरबाऱ्याची जी अवस्था झाली ती पाहून तुमचा कोणी जातभाई तुमची रदबदली
करण्यास धजावत नाही. धजावणारसुद्धा नाही. तुमच्याबद्दल आलमपन्हांचा निर्णय
जवळपास झालाच आहे असे समजा. आधी बोललो त्याप्रमाणे मी तुमच्या मर्दानगीचा
दिवाना आहे. तुमचे शौर्य आणि बुद्धी सलतनतीसाठी कामी यावी हा माझा विचार
अलीजांना पटवून देण्यात अल्लाच्या कृपेने मी यशस्वी झालो. म्हणूनच आपणास
सामंजस्याने समजावण्याची संधी देण्यास आलाहजरत राजी झाले. त्यांच्या
मेहेरबानीनेच मी आज आपल्याला कळकळीची विनंती करतोय. जान है तो जहान है. जीव
राखावा. माझे ऐकावे. राजी व्हावे.
नामुमकिन.
सोबतच्या एका
मुसलमान मानकऱ्याने काही बोलण्यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, पण रसूल
बेगने हात उंचावून त्याला गप्प राहण्याची इशारत केली आणि राजा
जसवंतसिंहाकडे नेत्रपल्लवी केली. नेताजींनी त्याची जी शोभा करून ठेवली होती
ती पाहून दुसऱ्या कुणाचा तोंड उघडण्याचा धीर होणे शक्यच नव्हते. हताश
झाल्याप्रमाणे रसूल बेग काही वेळ शांत बसून राहिला. मग उसंत घेऊन पुन्हा
बोलू लागला–
भाईजान, ज्या
प्रकारे शिवाजीराजे पळून जाण्यात कामयाब झाले तसे आपण होऊ अशी जर तुमची
समजूत असेल तर ती तुमची गलतफहमी आहे. ते केवळ नजरबंदीत होते आणि त्यांच्या
सोबत माणसे होती, ज्यांना शहरात कुठेही फिरण्याची मुभा होती. तुम्ही एकटे
आहात आणि तुम्हाला आदबखान्यात जखडून बांधून ठेवले आहे; त्यामुळे एखादी
तरकीब लढवून तुरुंग फोडून पळून जाण्याचा खयाली पुलाव पकवीत असाल तर ते
व्यर्थ आहे. आणि समजा, जरी तुमच्या नशिबाने साथ दिली आणि या चार
दिवारींमधून सुटका झालीच, तरी तुम्ही परत घरी जाऊ शकत नाही हे आम्ही पुरते
जाणतो. तुमचे मागचे सर्व बंध आता तुटून गेले आहेत. शिवाजीराजे पक्ष सोडून
गेलेल्यास परत जवळ करीत नाहीत हे आम्हालासुद्धा ठावके आहे. आजच्या
परिस्थितीचा विचार केला तर हे तुम्हीसुद्धा ओळखून चुकला असाल की, आलमपन्हा
तुम्हाला आता जिवंत सोडणार नाहीत. आपला जीव असा वाया घालवण्यात काय मतलब
आहे? मी तुम्हाला भीती दाखवीत नाही, तुम्हाला माहीत असलेलीच वस्तुस्थिती
बयान करतो.
जिवाची पर्वा
असती तर हाती हत्यार धरलेच नसते. फार फार तर काय करेल बादशहा? जीव घेईल. छळ
करून मारेल. मंजूर आहे. पण धर्म सोडणार नाही.
जरा थोडा
वेगळ्या पद्धतीने विचार करा. मी तुम्हाला लालूच दाखवीत नाही, पण जी शक्यता
समोर दिसतेय तीच तेवढी उघड करून सांगतो. तुमच्या संबंधाने आलाहजरतांनी
सुरुवातीपासूनच काही वेगळा विचार केलेला असला पाहिजे. केवळ शिवाजीचा सूड
घेण्यासाठी तुम्हाला जेरबंद केले असते तर तुम्हाला आग्र्यात आणवून आणि
अद्यापपावेतो जिवंत ठेवलेच नसते. दिलेरखानाच्या छावणीतच तुमचे मुंडके छाटून
ते शिवाजीकडे नजराणा म्हणून पाठवून दिले असते. ज्या अर्थी आलमपन्हांनी
तुम्हाला अद्याप जिवंत ठेवले आहे, हातीपायी धड ठेवले आहे त्या अर्थी
त्यांच्या मनात कुठेतरी तुमच्यासाठी नरमाई आहे. तुमच्या शौर्याची,
बुद्धिचातुर्याची, योजकतेची, धडाडीची त्यांना जाणीव आहे. तुमच्यासारखा
सूरमा ते कधीच असा वाया जाऊ देणार नाहीत. त्यांना सलतनतीच्या कामासाठी
तुम्ही हवे आहात हे नक्की. पण त्यांच्या पद्धतीने; त्यांच्या मर्जीप्रमाणे.
वाट्टेल ते झाले तरी तुम्ही परत जाणार नाही या खात्रीसह तुम्ही त्यांना
हवे आहात. तुम्ही फक्त हो म्हणा, बघा तुम्हाला ते कोणत्या बुलंदीवर नेऊन
ठेवतात ते. असे छप्पन्न शिवाजी तुम्ही तुमच्या पदरी बाळगू शकाल. त्याशिवाय
खुद्द सर्वसाक्षी एकमेवाद्वितीय सर्वशक्तिमान अल्लाने त्याला मानणाऱ्या आणि
त्याच्या अखेरच्या रसूलवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक बंद्याला, प्रत्येक
मोमिन मुसलमानाला या मत्र्य जगात आणि मरणोत्तर स्वर्गात जास्तीतजास्त सुखे
प्राप्त करून देण्याचे कुराणेपाकमध्ये वचन दिले आहे. भाईजान, ही तुम्हाला
मिळालेली शेवटची संधी आहे. हो म्हणा, मेहेरबानी करून हो म्हणा, त्यात
तुमच्यासह सर्वांचाच फायदा आहे. कदाचित उद्या वेळ निघून गेलेली असेल.
जनाब बेगसाहेब,
तुमच्या मगरीबच्या नमाजाची अजान होत आहे. माझ्यासारख्या दगडावर डोके
आपटण्यापेक्षा तुमच्या अल्लापुढे सजदा दिलात तर शतपट पुण्य पदरात पडेल.
हे बोलत असतानाच
पाठ फिरवून ताडताड पावले टाकीत नेताजी आपल्या कोठडीकडे निघून गेले.
बेड्यांचा आणि साखळ्यांचा खळखळाट वातावरणात बराच काळ घुमत राहिला.
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना रसूल बेगच्या तोंडून उद्गार
बाहेर पडले–
अफसोस सख्त
अफसोस. एक नामी मोहरा आपल्या खोट्या हट्टापायी विनाकारण मातीमोल होणार. या
अल्ला, परवरदिगार या माणसाला तुझ्या सन्मार्गावर येण्याची सद्बुद्धी देणे
आता फक्त तुझ्याच हाती आहे.
आमीन. सुम्मा आमीन.
सोबतच्या मुसलमान सरदार आणि शिपायांच्या मुखातून एकदमच दुवा बाहेर पडला. दाटून येणाऱ्या अंधारात आदबखाना फारच भेसूर वाटू लागला.
-५६-
भल्या सकाळीच
सिद्दी फुलादखान कोठडीसमोर दाखल झाला. त्याच्या दोन्ही हातांत चामडी
वाद्यांचे भले मोठे आसूड होते. वाद्यांच्या सुट्या टोकांना अणकुचीदार आकडे
लावलेले होते. कोठडीसमोर उभा राहून तो पिसाटासारखा विकट हसत होता. हातातले
आसूड फरसबंदीवर आपटून भयंकर आवाज काढीत होता. निर्विकार मुद्रेने नेताजी
त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या नजरेत यत्किंचितही भय वा चलबिचल न
आढळल्याने फुलादखान अधिकाधिक त्वेषाने आसूड आपटत राहिला. हसत राहिला. पण
हसूनहसून हसणार किती? अखेर त्याच्या घशाला कोरड पडली आणि त्याचे हसणे आपसूक
थांबले. नोकराने पुढे केलेले पाणी तो घटाघटा आवाज करीत प्यायला आणि
गडव्यामध्ये उरलेले पाणी नेताजींच्या तोंडावर फेकून मोकळा झाला. सात-आठ
भालाईत कोठडी उघडून आत घुसले आणि भाले रोखून भोवताली उभे राहिले.
हरामजादा काफिर,
आज तू माझ्या कब्जात आहेस. तो बेवकूफ रसूल बेग मध्ये न पडता आणि वजीरेआझम
जाफरखानसाहेबांनी त्याची तळी उचलून धरली नसती, तर या नालायक कुत्र्याची
आतापर्यंत कधीच कुत्र्या-कोल्ह्यांना मेजवानी झाली असती. सुअर की औलाद, आता
तुला दाखवतो सिद्दी फुलादखान काय चीज आहे.
नेताजींचे सारे
कपडे उतरवले गेले. पुन्हा एकदा ते नुसत्या लंगोटीवर आले. खेचून त्यांना
कोठडीबाहेर आणले गेले. काल ज्या झाडाखाली बैठक सजविली होती त्याच झाडाला
त्यांना उलटे टांगण्यात आले. फुलादखान ओरडला–
पचीस.
आणि त्याने हातातील आसूड दोन तगड्या हबशांकडे भिरकावले. आकडे इजा करणार नाहीत याची काळजी घेत त्यांनी ते शिताफीने झेलले.
कारवाई पूरी की जाय. आम्ही आलाहजरतांच्या कदमबोसीसाठी जाऊन येतो.
त्याची पाठ
वळताच दम खाऊन आणि उसंत घेऊन आसुडाचे फटके नेताजींच्या उघड्या अंगावर कोसळू
लागले. प्रत्येक फटक्यासरशी अणकुचीदार आकडे रक्तामांसाचे गोळे ओरबाडू
लागले. दातओठ घट्ट आवळून आणि श्वास कोंडून ते वेदना सहन करीत राहिले.
त्यांच्या तोंडून साधा सीत्कारसुद्धा निघत नाही असे पाहून फटक्यांचा जोर
चढत्या क्रमाने वाढत गेला. फटके मारून संपले. आसूड भिरकावून धापा टाकीत
हबशी झाडाच्या बुंध्याला टेकून बसले. सारे अंग जखमांनी भरून गेले होते. तीळ
ठेवायलासुद्धा जागा उरली नव्हती. ठिबकणारे रक्त जागीच गोठून गेले. पण
नेताजी तसेच उलटे लटकत राहिले.
दुपार उलटून गेल्यावर सिद्दी फुलादखान परत आला.
कमीनो, कोरडे मारलेत की नाही? मला एकसुद्धा किंकाळी ऐकू आली नाही.
हुजुरे आली,
डोक्यापासून पायापर्यंत सारा जिस्म ओरबाडून काढला. आमचा सगळा हुनर आणि पुरी
ताकद पणाला लावली, पण जालीम काफिराने तोंडातून शब्द काही काढला नाही. साधे
हुश्शसुद्धा केले नाही.
साला शैतान है शैतान! उतरवा त्याला खाली आणि घाला अंघोळ गरम पाण्याने. नंतर बंद करा पुन्हा त्याच कोठडीत, तळघरात.
नेताजींना
उतरवून उभे करण्यात आले. काही कळण्याच्या आत मीठ मिसळलेले तीन-चार बादल्या
कढत पाणी त्यांच्या डोक्यावर ओतण्यात आले. इतक्या झटपट की, दम
घ्यायलासुद्धा उसंत मिळाली नाही. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत वेदनांचा
लोळ नव्याने उसळला. उमटू पाहणारी किंचाळी महत्प्रयासाने रोखली तरी अस्फुट
चीत्कार उमटलाच. भाला टोचून, चालण्याची इशारत करण्यात आली पण दुसऱ्याच
पावलाला ते खाली कोसळले. त्यांचे दोन पाय दोन शिपायांनी उचलून धरले आणि
फराफरा फरफटत तळघरातील कोठडीत नेण्यात आले. पायऱ्यांवरून फरफटताना सारे अंग
ठेचाळून निघाले. मस्तक शेकून निघाले. सिद्दी फुलादखान मागोमाग पोहोचलाच.
त्यांच्या पाठीमागून मातीचे तसराळे घेऊन एक गुलाम चालत आला.
कोठडीत येताच
त्यांना पालथे पाडून त्यांचे हातपाय फाकवून जखडण्यात आले. अंगावरची
उरलीसुरली लंगोटी फेडून दूर भिरकावली गेली. हातापायांवर दोन-दोन सिद्दी उभे
राहिले. इशारत झाल्याबरोबर गुलाम पुढे झाला आणि तसराळ्यातला लालभडक
मिरचीचा ठेचा त्याने झटक्यासरशी उघड्या गुदद्वारात भरला. वेदनेने कळस
गाठला. प्राणांतिक किंकाळीने अवघे तळघर दुमदुमले. फुलादखानाच्या चेहऱ्यावर
विजयाचे पाशवी हास्य पसरले. तडफडणारे शरीर चपळाईने साखळ्यांनी जखडून त्याला
धनुष्याचा आकार दिला गेला आणि वेदनांचे झटके सोसणाऱ्या शरीराचे मुटकुळे
छतावरच्या आकड्याला टांगण्यात आले. आकडी खाणाऱ्या असहाय देहाच्या
हालचालींची मजा ते यमदूत बराच वेळ घेत राहिले. सर्वप्रथम फुलादखानच भानावर
आला. त्याने कर्कश आवाजात पुढला हुकूम सोडला. त्यासरशी धावाधाव उडाली.
कोठडीत गोवऱ्या आणून पेटविल्या गेल्या. रसरशीत निखारे पेटल्यानंतर
त्यामध्ये बचकभर सुक्या मिरच्या टाकून पागोट्याच्या शेवाने नाक-तोंड झाकत
सारे घाईघाईने तळघरातून बाहेर पडले. कोठडीभर मिरच्यांचा खाट भरून राहिला.
छताला टांगून ठेवलेले नेताजी अगतिकपणे ठसक्यांचे उमाळ्यामागून उमाळे देत
राहिले. हळूहळू खाट विरला. ठसका उणावला. पराकोटीच्या वेदनांनी बेशुद्धीची
चादर पांघरून घालून त्यांचे शरीर शांत केले.
छताला टांगलेले
शरीर खाली उतरविण्याच्या खटाटोपात त्यांना शुद्ध आली. दिवस उजाडला नसला तरी
झुंजूमुंजू झाले असावे. सिद्दी फुलादखान काळभैरवासारखा समोर उभा होता.
क्यों नेता? कशी
वाटली शाही खातिरदारी? काल तिखट मेजवानी झाली. आज गोडाची मेजवानी. लक्षात
ठेव, ती तर सुरुवात होती. आज खरी गंमत कळेल.
एका आडदांड
न्हाव्याने जुनाट वस्तऱ्याने त्यांच्या मस्तकाचा जमेल तसा चमन गोटा केला.
क्षणही न गमावता त्यांच्या कानात कापसाचे मोठमोठे बोळे कोंबण्यात आले. तसेच
बोळे त्यांच्या डोळ्यांवर बसवून पूर्ण चेहरा फडक्याने घट्ट आवळून
बांधण्यात आला. जेमतेम श्वास घेता येईल एवढीच सोय ठेवली होती. ढकलत ओढत
त्यांना बाहेर काढून पुन्हा वर पटांगणात आणण्यात आले. आगीने भणाणणाऱ्या
शरीराला पहाटेचा गार वारा किंचित सुखावून गेला. एका ठिकाणी उभे करून
त्यांच्या कंबरेला चऱ्हाट बांधण्यात आले आणि कसलासा चिकट द्रव अंगावर
ओतण्यात आला. कंबरेला हिसडा बसला. शरीर हवेत उचलले गेले. थोड्या अंतरावर
फिरवून पुन्हा खाली आणले. एका घडवंचीवर बसवून हातपाय मेखा मारून साखळ्यांनी
जमिनीला जखडून बांधण्यात आले.
कानातले जाड बोळे भेदत फुलादखानाचा भयंकर कर्कश आवाज त्यांच्या कानात शिरला–
रहमदिल हजरत
आलाहजरतांचा हुकूम आहे म्हणून तुझे कान, डोळे आणि तोंड झाकून ठेवले आहे.
नाहीतर लाल मुंगळ्यांच्या सोबतीने काकवीची खरी मजा काय असते ते तुला समजले
असते. ए शिपाई, उचल ते मडके. त्यात उरलेली काकवी पाहुण्यापासून
वारुळापर्यंत थेंब थेंब ओतत जा. भाल्याने वारूळ विसकटून मुंगळ्यांना जागे
कर.
गच्च बांधलेल्या
डोळ्यांसमोर अंधारी होतीच. कानांमध्येसुद्धा शांतता पसरली. थोड्या वेळातच
अंगावर काहीतरी वळवळू लागले. बहुधा आंब्याच्या झाडांवर बांडगुळांमध्ये
असतात तसे मोठाले जालीम लाल मुंगळे असावेत ते. काकवीचा पापुद्रा उचलताना
प्रत्येक मुंगळा कडकडून डसत होता. उघड्या जखमांमध्ये शिरून मांस कुरतडत
होता. शरीराचा जव अन् जव मुंगळ्यांनी भरून गेला. लवकरच सूर्य उगवला.
चैत्राचे ऊन तापू लागले; त्यामुळे हालात आणखी भर पडली. घामाचे ओघळ
जखमांमध्ये चरचरू लागले. शरीराला मध्येच कंप येई. घामाच्या ओघळाने तसेच
कंपनाने मुंगळे अधिकच बिचकत आणि सैरभैर धावत जोमाने चावे घेण्यास सुरुवात
करीत. ऊन चढत गेले तसा ताप वाढत गेला. घामाने काकवी ओलसर बनून पाघळू लागली;
त्यामुळे मुंगळ्यांना जास्तच चेव चढला.
कमी होत
जाणाऱ्या उष्णतेनेच दिवस मावळत असल्याचे कळले. शरीरामधील संवेदनाशक्ती
कधीचीच नष्ट होऊन गेली होती. अचानक कंबरेला जोरदार हिसडा बसला. शरीर हवेत
उचलून तरंगत थोडे दूर गेल्याचे जाणवले आणि धाडकन पाण्याच्या हौदात कोसळले.
चार-पाच वेळा चांगले बुचकाळून काढल्यावर अंगावरचे मुंगळे सुटले असावे.
नाका-तोंडात पाणी गेले. जीव कासावीस झाला. बधिर झालेल्या शरीराला कुठल्याच
संवेदना समजत नव्हत्या. डोक्यावर बादल्याच्या बादल्या गार पाणी ओतले जात
होते. शेवटी गळाभर पाण्यात बसवून ठेवले गेले. तशा अवस्थेतच शुद्ध हरपली.
त्याच अवस्थेत रात्र गेली.
पुन्हा दोराला
हिसडा बसला आणि शरीर हौदातून बाहेर आले. पाण्यात रात्र काढूनसुद्धा काही
चुकार मुंगळे तोंडाला बांधलेल्या फडक्यामध्ये वळवळत होतेच. फडके
सोडविणाऱ्या शिपायांना त्याचा प्रसाद मिळाला. शिव्या देऊन,
लाथा-बुक्क्यांनी तुडवून त्या शिपायांनी आपल्या रागाला वाट करून दिली. डोळे
उघडताच कंबरेवर हात ठेवून सैतानासारखा हसत उभा असलेला फुलादखान दिसला.
क्यों शैतान,
कैसी मिजाज है? तरी तुझे तोंड घट्ट झाकून ठेवल्याने तुला खरी मजा समजलीच
नाही. डोळ्याचे, कानाचे नाजूक पडदे मुंगळ्यांना फार आवडतात. तिकडून त्यांना
मेंदूत शिरणेसुद्धा सोपे पडते. मग खरी मजा येते. खैर छोडो। अबे ओ बेइमानो,
रात्रभर पाण्यात बसवून ठेवलेत आमच्या शाही मेहमानांना. थंड पाण्याने
बिचारे कसे काकडून निघाले आहेत बघा. आता त्यांना जरा शेकून काढा.
लगोलग नेताजींना
एका खांबाशी जखडण्यात आले. खांबाच्या सभोवती दोन कदमांच्या अंतरावर एक चर
खणलेला होता. लाकूड आणि गोवऱ्यांनी चर भरलेला होता. चर पेटविण्यात आला.
संध्याकाळपर्यंत जाळ विझता कामा नये. जर विझला तर तुमची खैर नाही, लक्षात ठेवा.
पहारेकऱ्यांना
असा दम देऊन फुलादखान निघून गेला. फटक्यांच्या आणि अणकुचीदार आकड्यांच्या
जखमा, मुंगळ्यांच्या चाव्यांमुळे त्यातच उठलेल्या मोठमोठ्या गांधींमुळे
शरीराची आधीच चाळण झालेली.
वेदना आणि
आगीच्या भगभगीने शरीर आधीच विकल झालेले, त्यात हा जाळाचा ताप. थोड्याच
वेळात आकाशातून सूर्य आग ओकू लागला. शरीर आतून-बाहेरून पेटून निघाले.
कणाकणांत घण घातल्याप्रमाणे वेदना उठल्या. जोरजोरात विव्हळावे, किंचाळावे
असे वाटू लागले, पण त्या भावनेवर ताबा ठेवण्यात कसेबसे यश आले. आतापर्यंत
बेहोशीबरोबर चांगली मैत्री जमून गेली होती. शेवटी तीच मदतीला धावून आली.
सायंकाळी फुलादखान आला तेव्हा त्यांना कसेतरी शुद्धीवर आणले गेले.
काय शाही
मेहमान, समजले का दर्द म्हणजे काय? तो अडाणी बेग आपला मूर्खासारखा नुसता
विनवण्या करीत होता. आता काय निर्णय करायचा तूच ठरव. तू ठरवीपर्यंत हा
सिलसिला असाच सुरू राहणार आहे. आता गाझी बेगचे ऐकायचे की माझा हा पाहुणचार
घ्यायचा हे ठरवायला तुला तीन दिवसांचा वेळ आहे. जुम्म्याच्या नमाजानंतर
हजरत अलीजांसमोर तुझी पेशी आहे. तोपर्यंत शाही बिछान्यावर आराम कर.
उघड्यानागड्या
नेताजींना पुन्हा तळघरातील कोठडीत नेले गेले. मिरच्यांच्या धुनीची राख
कोठडीभर विखरून पसरली होती. कोठडीत एक तक्ता पडला होता. त्याला अणकुचीदार
खिळे ठोकले होते. त्यावर आडवे झोपवून नेताजींना जमिनीवर जखडून टाकले गेले.
क्रमश:
*____⚔📜🚩
No comments:
Post a Comment