ऊन रणरणत होतं. पौर्णिमा दोन दिवसांवर आली होती. पण शनिवारवाड्यात सेवकांची अन खासे मंडळींची लगबग उठली होती. श्रीमंत काही दिवसांपूर्वीच पुण्यात परतले होते. दक्षिणेतील निजामाच्या मोहिमे पाठोपाठ नागपूरकर भोसले यांची मोहीम सुद्धा जबरदस्त यशस्वी ठरली होती. जानोजी भोसले श्रीमंतांना पूर्णपणे शरण आले होते. यापुढे पेशव्यांच्या बरोबरीने, पेशव्यांच्या नेतृत्वात, मराठी मनगटाची ताकद टोपीकरांना आणि निजामाला दाखवून देण्याचा त्यांनी निर्धार केला होता. रामनवमीच्या आसपास झालेला हा कनपुऱ्याचा तह, पेशवे आणि नागपूरकर भोसलें यांच्या मधील स्नेहबंध अधिक मजबूत करणारा ठरला होता.
गुरुवार १८ मे १७६९. शनिवारवाड्यात भरणारा आजचा दरबार अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार होता. श्रीमंत माधवराव पेशवे यांची प्रकृती किंचित कमी - जास्त असली तरी त्यांची मानसिकता प्रसन्न होती. दक्षिणेतलं राजकारण बरंचसं आटोक्यात आलेलं होतं. नागपूरकर भोसल्यांच्या आघाडीवर संबंध सुधारले होते. राघोबा दादांना, तात्पुरते तरी, शांत बसविण्यात यश आलं होतं. आता नजर होती ती उत्तरेत. दिल्लीवर. *आठ / नऊ वर्षांपूर्वी पानिपत वर झालेला पराभव, ही आतली ठसठसती जखम होती. एक लाख बांगडी जिथे फुटली, सदाशिवराव भाऊ सारखा मोहरा जिथे गळाला, विश्वासराव, जनकोजींसारखं उमलतं तारुण्य जिथे अकालीच कोमेजलं, ते पानिपत. रणमर्द आणि रणझुंजार अशा निधड्या छातीच्या मराठ्यांना असलेलं आव्हान म्हणजे पानिपत. त्या पानिपताचा बदला घ्यायचा होता. त्या हरामखोर नजीबाचा गळा आवळायचा होता. त्या अफगाणी रोहिल्यांच्या रक्तानेच पानिपतची भूमी परत पवित्र करून घ्यायची होती.* आणि म्हणूनच श्रीमंतांनी एक भलं मोठं राजकारण धरलं होतं. उत्तरेत मराठ्यांचा दबदबा परत निर्माण करण्याचं राजकारण. उत्तरेत भगवा जरीपटका डौलाने फडकवत ठेवण्याचं राजकारण. आज त्या राजकारणाचा सूत्रपात होणार होता. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमेचा आज श्री गणेश होता.
गेल्या काही वर्षात उत्तरेत मराठ्यांचा वचक उरला नव्हता. राजस्थानातले राजपूत आणि जाट शिरजोर झाले होते. चौथ (खंडणी) येणं केव्हाच थांबलं होतं. पानिपतच्या युद्धाचा अब्दालीवर इतका विपरीत परिणाम झाला होता की त्याने पाच वर्षांपूर्वी (सन १७६४ ला) पुण्याला पेशव्यांच्या दरबारात आपला वकील पाठवला होता आणि सलोख्याचा प्रस्ताव पुढे केला होता. मात्र दक्षिणेतील राजकारण आणि इकडे घरात राघोबा दादांचं ताळतंत्र सोडून वागणं यामुळे पेशवे माधवरावांना दिल्लीकडे लक्ष देण्यास उसंत मिळत नव्हती. ती आता मिळाली होती. आणि म्हणूनच आजचा हा खास दरबार.
दिल्ली मोहिमेवर प्रत्यक्ष स्वतः जाणं हे माधवरावांना शक्य नव्हतं. राघोबा, निजाम आणि टोपीकर हे कधी उचल खातील याची शाश्वती नव्हती. म्हणून श्रीमंतांनी या दिल्ली मोहिमेसाठी दोन नावं ठरवली होती. रामचंद्र गणेश आणि विसाजी कृष्ण. दोघेही जबरदस्त लढवय्ये होते. कुशल सेनापती होते. शिवाय त्यांच्या सोबतीला असणार होते ते शिंदे आणि होळकर. उत्तरेत मराठ्यांच्या दोन तळपत्या तलवारी. मराठ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम होती.
आणि म्हणूनच, रामचंद्र गणेश आणि विसाजी कृष्ण असल्याने, श्रीमंत तसे निर्धास्त होते. *रामचंद्र गणेश म्हणजे रामचंद्र गणेश कानडे, सदाशिवराव भाऊंच्या तालमीत तयार झालेले.* नुसतेच उत्तम लढवय्ये नाहीत तर सैन्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले. मुत्सद्दी. नुकत्याच झालेल्या नागपूरकर भोसल्यांच्या मोहिमेत रामचंद्र पंतांनी चांगली कामगिरी करून दाखवली होती. *यांच्या जोडीला होते विसाजी कृष्ण अर्थात विसाजी पंत बिनीवाले.* तसे हे चिंचलकर. मात्र दक्षिणेत कडाप्पा येथे १७५० मध्ये, निजामाबरोबर झालेल्या युद्धात विसाजीपंतांनी जो भीम पराक्रम गाजवला, तो बघून श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी विसाजी पंतांना 'बिनीवाले' ही उपाधी दिली. अर्थात शौर्यानं आणि धैर्यानं आघाडीवर लढणारे वीर! या नावाला सार्थ करत विसाजी पंतांनी पानिपतच्या दीड वर्ष आधी, १० ऑक्टोबर १७५९ ला निजामाला पराभूत करून नगरचा महत्त्वाचा किल्ला जिंकून घेतला होता. असे हे जय- विजय, मराठी सैन्य घेऊन उत्तरेच्या मोहिमेवर निघणार होते.
वैशाखातल्या त्या दिवसाच्या चौथ्या प्रहरी वारा छान सुटला होता. उष्मा कमी झाल्यासारखा वाटत होता. शनिवार वाड्यातील गणेश महालात पेशव्यांचा खास दरबार सजला होता. पेशव्यांनी रामचंद्र पंत कानडे आणि विसाजी पंत बिनीवाले यांना निरोपाचे विडे दिले आणि आपल्या सरदारांना उद्देशून ते म्हणाले, _"रामचंद्र पंत आणि विसाजी पंत, फार अपेक्षेने आम्ही तुमची रवानगी दिल्लीच्या या मोहिमेसाठी करतो आहोत. आठ वर्षांपूर्वी पानिपतवर जे झालं ते आपल्या सर्वांच्या काळजात सलणारी खोल जखम आहे. आपण आपल्या आप्तेष्टांना फक्त गमावलंच नाही, तर अखिल हिंदुस्थानाच्या राजकारणात आपली पत कमी झालेली आहे. तिकडे अफगाणिस्तानात बसलेल्या गिलच्यांनी जरी सलूक केलेला असला, तरी आपल्या देशात बसलेले त्यांचेच भाईबंद रोहिले पुन्हा शिरजोर झालेले आहेत. हिंदू प्रजेची विटंबना करताहेत. तिकडे जाट आणि राजपूत सुध्दा आपली हुकूमत मानेनासे झाले आहेत. या सर्वांना वठणीवर आणणं गरजेचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, *पानिपताचा सूड आपल्याला घ्यायचा आहे.* हिंदुस्थानच्या राजकारणातलं आपलं स्थान पुन्हा आपल्याला मिळवायचं आहे.”_
_“तुमच्याबरोबर हुजूरातीची धरून २० हजारांची खडी फौज आहे. माळव्यात तुम्हाला पाटील बाबा आणि तुकोजीराव भेटतील. त्यांच्याजवळ प्रत्येकी १५००० ची फौज असेल. अशी एकूण ५० हजारांची, ही कडव्या मराठ्यांची फौज घेऊन तुम्ही दिल्लीवर एल्गार करावा. आपल्या राजकारणाची घडी नीट बसवावी."_
रामचंद्र पंत आणि विसाजीपंतांनी ताठ मानेने श्रीमंतांना मुजरा केला. या दोघांच्या वतीनं रामचंद्र पंत उत्तरले, _"श्रीमंत, आपल्या आज्ञेचं शब्दशः पालन होईल. आम्ही पानिपताचा सूड घेणार आणि उत्तर हिंदुस्थानाची घडी नीट बसवणार”._
*पेशवे दरबारातील सारे मानकरी, सरदार, दरकदार त्या सर्व वातावरणात भारावून गेलेले आहेत. आठ वर्षानंतर ताठ मानेने जगायची एक संधी समोर आलेली आहे. पानिपतची भळभळती जखम आता बांधली जाईल. ती बरी होईल, असा विश्वास निर्माण होतोय.*
शनिवारवाड्या बाहेर २० हजारांच्या खड्या फौजेचे बाहू स्फुरण पावताहेत. घोड्यांच्या टापा खूर उधळताहेत. रणवाद्यांची आकाशभेदी गर्जना होतेय. पेशव्यांची सेना उत्तर दिग्विजयाला प्रस्थान करते आहे.
--- ०० --- ०० ---
वीस हजार उसळत्या मराठी फौजांचं हे वादळ, माळव्यात पोहोचलं तेव्हा थंडीला सुरुवात झाली होती. पुण्याहून निघालेल्या या मराठी सैन्याचे बाहू पानिपतच्या प्रतिशोधाच्या विचाराने फुरफुरत होते. या सैनिकांपैकी अनेकांच्या घरचं कुणी ना कुणी पानिपतात मारल्या गेलं होतं. यापैकी काही थोडे पानिपतावरुन जीव वाचवून पळून आलेले होते. तिथे त्यांनी, त्या गिलच्यांनी केलेली मराठ्यांची लंगडेतोड कत्तल बघितली होती. आया बहिणींच्या अब्रूंचे धिंडवडे बघितले होते. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या डोळ्यात सूडाचे अंगार होते.
आणि माळव्यात त्यांना भेटल्या अश्याच, प्रतिशोधाच्या वणव्यात होरपळत असलेल्या शिंदे आणि होळकरांच्या फौजा. खुद्द महादजी शिंदे हे शिंद्यांच्या फौजेचं नेतृत्व करत होते. ‘पाटील बाबा’ या नावाने अवघ्या उत्तर भारतात परिचित असलेले महादजी. यांनी स्वतः पानिपतच्या रणात भाग घेतला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून पायाला इजा होण्यावर निभावलं. पण महादजी, पायांची युद्धात झालेली इजा सोडली, तर त्या युद्धातून सुखरूप परत आले होते. मात्र पानिपतच्या युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी बुरुडी घाटातील युद्धात त्या हरामखोर नजीबाने, ज्या कपटाने आणि क्रौर्याने दत्ताजी शिंदे यांना ठार मारले होते ते महादजी विसरू शकत नव्हते. ऐन पानिपतच्या युद्धात जनकोजी शिंदे सारखा कोवळा लढवय्या वीर मारल्या गेला होता, हे शल्य देखील महादजी विसरले नव्हते. पानिपताच्या सूडाग्नीने त्यांची अनेक रात्रींची झोप हिरावून नेली होती. त्या गिलच्यांच्या, इस्लामी आक्रांतांच्या, त्या नजीबाच्या, नुसत्या आठवणीनेच पाटील बाबांचा भडका उडत होता. *अशी ही सूडानं पेटलेली पन्नास हजारांची फौज दिल्लीच्या दिशेने निघाली होती.*
--- ०० --- ०० ---
मराठ्यांना मुळी दुहीचा शापच होता. वरती जर जबरदस्त असं नेतृत्व उभं राहिलं, तरच मराठे एका दिलानं लढत. थोरल्या आबासाहेबांच्या वेळेला असं घडलं होतं. तेव्हाही अर्थात घोरपडे, निंबाळकरांसारखे काही मराठा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होतेच. पण बहुसंख्यांक मराठे एकजूट होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, पुढील सतरा - अठरा वर्ष निर्नायकी अवस्थेत असतानाही, महाराष्ट्राने ही एकजूट बघितली होती. नंतर बाजीराव पेशव्यांच्या काळात अवघं मराठे मंडळ एकजुटीने अवघा देश मुक्त करण्यासाठी धडका मारत होतं. पण बस, तेवढंच. नंतर परत आपापसात फूट, हेवे - दावे, कुरबूरी सुरू झाल्या होत्या. भांडणं फक्त राघोबा दादा - माधवराव या काका पुतण्यातच नव्हती, तर शिंदे होळकरांमध्येही होती.
१७६५ मध्ये मल्हार बाबा होळकरांचा मृत्यू झाल्यानंतर होळकरांची रया काहीशी गेल्यासारखी वाटत होती. अहिल्याबाई सारख्या साध्वी ने होळकरांचं राज्य त्याच ताकदीने चालवायचा प्रयत्न चालवला होता. पण कुठेतरी शिंदे आणि होळकरांमधलं वितुष्ट संपलेलं नव्हतं.
*पण ही मोहीम वेगळी होती. अगदी वेगळी. सर्व मराठी मंडळाचा शत्रू एकच होता - दिल्ली आणि दिल्ली वर नियंत्रण ठेवणारा नजीब. या सर्वांची मनगटं पानिपताचा कलंक धुवून काढण्यासाठी फुरफुरत होती.*
*आणि म्हणूनच, पन्नास हजारांची ही चवताळलेली मराठी फौज जेव्हा दिल्लीकडे कूच करून निघाली, तेव्हा नजीबासकट सर्वांच्या छातीत धडकी भरली होती.*
--- ०० --- ०० ---
माळव्यात एकत्र आल्यानंतर या मराठी फौजेचे ठरवून तीन भाग झाले. रामचंद्र पंत कानडे हे बुंदेलखंडाकडे वळले. सन १७६० मध्ये गोविंद पंत बुंदेले यांच्या मृत्यूनंतर अंतर्वेदात मराठ्यांची उपस्थिती जाणवत नव्हती. तिथला चौथ सुद्धा मिळत नव्हता. रामचंद्र पंतांनी तिथे चांगलीच जरब बसवली. तुकोजीराव होळकर, बुंदी आणि कोटा या भागाकडे वळले. तर महादजी शिंदे आणि विसाजीपंत बिनीवाले यांनी सरळ उदयपूर कडे कूच केले. मात्र परत कोणाकडून किती खंडणी स्वीकारायची यावर मतभेद सुरू झाले. पण तरीही या तिघांनीही बरीच खंडणी गोळा केली आणि १७६९ च्या शेवटी, ऐन थंडीत, या सर्व फौजा परत एकदा चंबळ भागात एकत्र झाल्या. आतापर्यंत संपूर्ण उत्तर भारतात मराठ्यांच्या या धडक मोहिमेची बातमी पसरली होती. पानिपतच्या युद्धापूर्वी मराठी राज्याचे मांडलिक असणारे अनेक राजे, चौथ (खंडणी) घेऊन पुढे येत होते. पण जाटाने मराठ्यांचं वर्चस्व स्वीकारायला नकार दिला. म्हणून मराठ्यांच्या ह्या एकत्रित फौजा चंबळ येथून निघाल्या आणि सरळ जाटांच्या मुलखात सुसाट शिरल्या.
मथुरे जवळच्या गोवर्धन मध्ये या मराठी फौजेचा सामना जाटांच्या सैन्याशी झाला. जाटांनी वीस हजारांच्या वर फौज उभी केली होती. गुरुवार, ५ एप्रिल १७७० ला, जाटांशी निर्णायक युद्ध झालं. पानिपतच्या प्रतिशोधाने भडकलेल्या मराठ्यांना कोणीच अडवू शकत नव्हतं. त्यामुळे अपेक्षित असंच झालं. मराठ्यांनी जाटांच्या फौजेला अक्षरशः कुटलं. जबरदस्त चोपलं. त्यांची पूर्ण फौज लुटल्या गेली. जाटांचा राजा नवल सिंह मराठ्यांना सपशेल शरण आला. ६५ लाखांची खंडणी त्याने कबूल केली. आग्रा आणि मथुरा ही महत्त्वाची ठिकाणं मराठ्यांच्या हाती आली. उत्तरेत मराठ्यांचा धाक जमायला परत एकदा सुरुवात झाली.
-- ०० --- ०० ---
*मराठे एकजुटीने चालून आले तर काय होऊ शकतं, हे सारा उत्तर भारत अनुभवत होता.* आता मराठ्यांचं पुढचं लक्ष्य होतं दिल्ली! दिल्ली ताब्यात आली म्हणजे जणू अवघा हिंदुस्थानच ताब्यात आला. दिल्लीवर राज्य होतं मुघल बादशहा शाह आलम (द्वितीय) याचं.
पण शाह आलम त्यावेळी कुठे होता?
शाह आलम होता प्रयाग मध्ये. इंग्रजांच्या छत्रछायेत. त्यांच्या संरक्षणात. १७५७ ला प्लासीचे युद्ध जिंकल्यानंतर इंग्रजी फौजांचा अंमल काही प्रमाणात बंगाल मध्ये सुरू झालेला होता. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी दिल्लीचा बादशहा शाह आलमने अवधचा नवाब शुजाउद्दौला आणि बंगालचा पराभूत, मीर कासिम सह बक्सर मध्ये, इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात इंग्रजांचा निर्णायक विजय झाला होता आणि त्यांनी दिल्लीच्या बादशहाला 'निवृत्ती वेतन' सदृश्य रक्कम देऊन पटना येथे ठेवले होते. पुढे त्याला प्रयागला ठेवण्यात आले. या बादशहाची खूप इच्छा होती की आपण दिल्लीला जावे आणि राज्यकारभार करावा. त्यासाठी तो इंग्रजांना बरीच पत्र लिहीत असे.
या बादशहाच्या नावावर नजीब, वजीर या नात्याने, दिल्लीचा कारभार चालवत होता. त्यामुळे १७७० मधले चित्र होते - प्रयाग मध्ये इंग्रजांच्या आश्रयावर राहत असलेला शाह आलम, जो इंग्रजांना सतत दिल्लीला नेण्याची विनवणी करतोय, दिल्लीमध्ये, ‘शाह आलम च्या वजीराच्या रूपात’ राज्यकारभार करणारा नजीब आणि जाटांचे पारिपत्य करून, पानिपताचा सूड घेण्याच्या मोहिमेवर दिल्लीला कूच केलेले मराठे!
मराठ्यांची ही घोडदौड बघून नजीबाच्या पोटात गोळा उठला होता. त्याला पक्के माहीत होते की मराठ्यांचा हा झंझावात येतोय तो आपल्याला संपवण्यासाठीच. आणि म्हणूनच त्याने आठ - नऊ वर्षांपूर्वी जसं मल्हार बाबा होळकरांशी संधान बांधलं होतं, तसं तुकोजीराव होळकरांशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृतीने मराठ्यांच्या संयुक्त फौजेतच काहीशी फूट पडल्यासारखी झाली. दत्ताजी शिंदे यांना बेईमानीने, कपटाने आणि क्रौर्याने मारणाऱ्या नजीबाचे मुंडकेच महादजी शिंदेंना हवे होते. तर सध्या उत्तरेतलं राजकारण जमवून घेण्यासाठी नजीबाशी इतक्यातच वैर घेऊ नये असं म्हणणारे होळकर होते. तिकडे रामचंद्र पंत कानडे आणि विसाजीपंत बिनीवाले यांच्यातही या मुद्द्यावरून मतभेद झाले. शेवटी सर्वांनी ठरविले, वेळ लागला तरी हरकत नाही, पण पुण्याला श्रीमंतांनाच (माधवराव पेशव्यांना) विचारावे. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ठरवावे.
ही मसलत कळताच, माधवराव पेशव्यांनी लगोलग पत्र रवाना केले. त्यात स्पष्ट म्हटलं होतं, ‘नजीबाचे पारिपत्य हा ठरलेला विषय आहे. ते करावेच, परंतु तत्पूर्वी नावापुरता त्याच्याशी सलोखा करून इतर कार्यभाग साधत असेल तर तसे करावे.'
श्रीमंतांचा हा सल्ला मराठी नेतृत्वाने मानला. मात्र या पत्रा पत्रीच्या दरम्यान दोन घटना घडल्या. विसाजीपंत आणि रामचंद्रपंत यांच्यातील विसंवाद लक्षात घेता, पेशव्यांनी रामचंद्र पंत यांना पुण्यात बोलवून घेतले आणि ‘उर्वरित मोहीम ही महादजी शिंदे आणि विसाजी पंत बिनीवाले यांच्या नेतृत्वात चालवावी’, असे सांगितले. दुसरी घटना म्हणजे पानिपतचा एक खलनायक, नजीब याला ऑक्टोबर १७७० मध्ये अचानक मृत्यू आला.
--- ०० --- ०० ---
नजीबाच्या मृत्यूने बऱ्याच गोष्टी बदलल्या. आता नजीबाच्या जागेवर त्याचा मुलगा झाबतखान हा वजीर या नात्याने दिल्लीचा कारभार बघत होता.
मराठ्यांना शाह आलमला दिल्लीच्या गादीवर एखाद्या कळसूत्री बाहुली सारखं बसवायचं होतं. पण बादशहा शाह आलम तर इंग्रजांच्या छत्रछायेत प्रयागला होता. मग बादशहाचं ते सोंग दिल्लीला आणण्यासाठी मराठे गेले प्रयागला. याच दरम्यान ७ ऑगस्ट १७७० ला, महादजी शिंदे यांनी काशीचे विश्वनाथ मंदिर तोडल्याची क्षतीपूर्ती म्हणून, बादशहा कडून मोठी रक्कम वसूल केली. बक्सर च्या युद्धात इंग्रज जरी जिंकले असले तरी तो पर्यंत प्रयाग मध्ये इंग्रजांची फारशी ताकद नव्हती. त्यामुळे दोन महिन्यांच्या फक्त वाटाघाटींवर, मराठे बादशहा ला इंग्रजांपासून सोडवून आपल्याबरोबर घेऊन आले. या दोन महिन्यांच्या प्रयाग मधील वास्तव्य काळात मराठ्यांनी तिथे दोन मंदिरं सुद्धा बांधली. त्यातील एक आहे, प्रसिद्ध आलोपी देवीचे मंदिर.
-- ०० -- ०० ---
१७७० ची दिल्ली फार वेगळी होती. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. न्याय व्यवस्था ही तर मुघलांच्या शासन काळात फारशी कधी नव्हतीच. पण आता तर जनतेचा कोणी वालीच उरला नव्हता. बादशहाने इंग्रजांबरोबर १७६५ चा करार केलेला. त्यामुळे तो इंग्रजांकडेच पडीक होता. आधी पटना आणि नंतर प्रयाग मध्ये. बादशहा नसल्याने दिल्लीत कोणाला कोणाचा फारसा धाकही नव्हता. बादशहाचा ‘मीर बक्षी’, अर्थात वजीर म्हणून नजीब खानाचा बेटा झाबतखान दिल्लीचा कारभार हाकत होता. त्याचं पूर्ण लक्ष हे स्वतःचा खजिना भरण्यात होतं.
३१ ऑक्टोबर १७७० ला नजीबाचा मृत्यू झाल्यानंतर झाबतखानच जणू दिल्लीचा सर्वेसर्वा झाला होता. कणाहीन आणि कर्तृत्व शून्य असलेल्या बादशहा शाह आलमला मात्र या दिल्लीवर आपला अधिकार हवा होता. याच, अराजकतेचा समानार्थी शब्द असलेल्या, दिल्लीवर.
कारण ती ‘दिल्ली’ होती. काहीही झालं आणि कशीही परिस्थिती असली तरी दिल्ली ही दिल्लीच होती. त्या काळच्या विशाल पसरलेल्या भारताची राजधानी. आणि म्हणूनच बादशहा दिल्लीला जायला उतावळा झालेला होता.
या बादशहाच्या बुजगावण्याची गरज मराठ्यांनाही होतीच. म्हणून महादजी शिंदे, या बुजगावण्याला बरोबर घेऊन दिल्लीला निघाले होते. दिल्लीच्या वाटेवर असतानाच २७ डिसेंबर १७७० ला बादशहाच्या वतीने अहमद खान याने मराठ्यांबरोबर औपचारिक करार केला. या कराराच्या अंतर्गत, शाह आलमला मराठे पूर्ण संरक्षण देणार होते. आणि बदल्यात बादशाहीतल्या खंडणीचे हक्क मराठ्यांना मिळणार होते.
बंगालवर अधिकार जमवण्याच्या प्रयत्नात असलेल्या ईस्ट इंडिया कंपनी चा वकील आणि त्यांचा एक तळ दिल्लीला होताच. मराठ्यांचा हा दिल्लीकडे येत असलेला झंजावात ते बघत होते. मात्र ते त्यांच्या समस्येतच गुरफटलेले होते. बंगालचा दुष्काळ हा उग्ररूप धारण करत होता. या दुष्काळाची पर्वा न करता इंग्रज हे जास्तीत जास्त वसुलीच्या मागे लागले होते. त्यामुळे त्यांना विरोध होत होता. अर्थातच दिल्लीवर चालून येणाऱ्या या मराठी वादळाला थोपवण्याचे धैर्य आणि सामर्थ्य इंग्रजांजवळ मुळीच नव्हते.
*आणि ते वादळ दिल्लीवर कोसळले..!*
*तो झंजावात होता पानिपताच्या सूडानं पेटलेल्या मराठ्यांचा. देशाच्या रक्षणासाठी दक्षिणेतून उत्तरेत येत, आक्रांताना थोपवणाऱ्या देशभक्तांचा. आसेतु हिमालय, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं व्रत घेतलेल्या थोरल्या आबासाहेबांच्या, शिवाजी महाराजांच्या, शूर मावळ्यांचा.*
तो दिवस होता शनिवार ९ फेब्रुवारी १७७१. कुंभ संक्रांतीचा दिवस. सूर्याचा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करण्याचा दिवस.
अखिल हिंदुस्थानावर हुकूमत गाजवणाऱ्या मुघलांची राजधानी दिल्ली, मराठ्यांचा आवेश पाहून आधीच गर्भगळीत झालेली. लाल किल्ल्याला मराठ्यांचा वेढा पडलेला होता. आणि एकच दिवस... फक्त एकाच दिवसात लाल किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. *दिल्ली मराठ्यांनी जिंकली. लाल किल्ल्यावर भगवा फडकला.*
रविवार १० फेब्रुवारी १७७१ चा हा दिवस. फाल्गुन कृष्ण एकादशी, अर्थात विजया एकादशीचा दिवस. दिल्ली विजयाचा दिवस.
*पानिपतच्या त्या दुर्दैवी पराभवानंतर फक्त दहा वर्षातच मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा केला होता. जाटांना आणि राजपूतांना शरण आणलं होतं. मराठी मनाचा मानबिंदू भगवा जरीपटका दिल्लीच्या तमाम किल्ल्यांवर अभिमानाने फडकत होता. महादजी शिंदे, तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले यांच्या संयुक्त शौर्याचं हे प्रतीक होतं. मराठे एकवटले तर काय करू शकतात हे दिल्ली सकट अवघा हिंदुस्तान बघत होता!*
मात्र सूड अद्याप पुरा झालेला नव्हता. ज्या नजीबाच्या आमंत्रणामुळे अब्दाली दिल्लीवर चालून आलेला होता, त्याचा मृत्यू झाला असला तरी त्याचा मुलगा झाबतखान पळून गेला होता. नजीब खानाचे सगे सोयरे, त्याचं सैन्य अजूनही रोहिलखंडात होतं. त्यांना नेस्तनाबूद करणे आवश्यक होतं.
हे रोहिले म्हणजे पश्तून लोकांच्यातून निघालेला मिश्र संकर. यातील अधिकतर रोहिले हे गेल्या शंभर - दीडशे वर्षात अफगाणिस्तानच्या कंदहार आणि स्वात खोऱ्यातून आलेले. अत्यंत कपटी आणि बदमाश असलेले हे रोहिले म्हणजे कट्टर मुसलमान.
मराठ्यांचं पुढील लक्ष्य होतं, अर्थातच रोहिलखंड..!
महादजी शिंदे, तुकोजी होळकर, आणि विसाजीपंत बिनीवालेंच्या नेतृत्वात, विजयाची झिंग चढलेली आणि तरीही सुडाग्नीने पेटलेली ही मराठ्यांची फौज निघाली रोहिलखंडाकडे. दिल्ली जिंकल्यानंतर हे वादळ कुंजपुरा, पानिपत, श्यामली जिंकत पुढेच निघालं होतं. पवित्र तीर्थस्थळ हरिद्वार ही त्यांनी जिंकलं. गोजगड हाती आला. १७७१ चं हे वर्ष म्हणजे मराठ्यांची उत्तर भारतातील विजयाची घोडदौड होती. या आक्रमणाच्या मध्यावर रोहिल्यांचा पुढारी हाफीज रहमत हा लढाईतून पळून गेला होता. झाबत खान सुद्धा मराठ्यांच्या या झंजावातापासून बचावण्यासाठी इथे तिथे पळत होता.
शेवटी मराठ्यांनी त्याला गाठलंच. नजीबाबाद मधल्या पत्थरगड या किल्ल्यात झाबतखान लपून बसला होता. १७७२ चा प्रारंभ. मराठे, रोहिल्यांचा सूड घेण्यास सज्ज झालेले होते. नजीबाबाद हे नजीबाने बसवलेले शहर. रोहिल्यांची राजधानीच जणू. बरेलीच्या जवळ. आजच्या उत्तर प्रदेशाचे उत्तर टोक.
*आणि मराठ्यांचे हे चक्रीवादळ पत्थरगडावर येऊन धडकले. झाबतखानाला कैदेत टाकण्यात आलं. बायका - मुलांना सोडून देण्यात आलं. आणि त्यानंतर मराठ्यांनी जे काम केलं ते बघून, सात फूट जमिनीच्या आत गाडलं गेलेलं नजीबाचं प्रेत सुद्धा चळाचळा कापत राहिलं असेल.*
*महादजी शिंदे यांच्या आज्ञेप्रमाणे पत्थरगड किल्ल्यातील आणि नजीबाबाद शहरातील बायका -मुलं सोडली तर एकूण एक व्यक्ती कापून काढल्या गेली. किल्ला लुटला. किल्ल्यात आणि शहरात, जमिनीवरील दोन विटांच्या वर असलेले प्रत्येक बांधकाम तोफ लावून उडवून टाकण्यात आलं. मराठ्यांच्या रूपानं पानिपताच्या सूडाग्नीने पेटलेला कळीकाळच तेथे थैमान घालत होता.*
*तश्यातच मराठ्यांना कळलं की नजीबाचं थडगं किल्ल्यातच आहे. मराठ्यांनी ते थडगं फोडलं. विसाजीपंत बिनीवाले स्वतः कबरीत उतरले. आणि नजीबाची हाडं उधळत थयाथया नाचू लागले...!*
*मराठे पानिपताचा सूड घेत होते!*
पानिपताच्या युद्धात मराठ्यांजवळ असलेलं सोनं - नाणं, खजिना हा नजीबाच्या लोकांनी लुटून या पत्थरगडात आणून ठेवला होता. मराठ्यांच्या आक्रमणाच्या बातम्या येऊ लागल्यावर रोहिल्यांनी तो पूर्ण खजिना, ती सर्व मालमत्ता, किल्ल्याच्या भोवतालची असलेल्या खंदकात टाकून दिली होती. मराठ्यांनी तो खंदकच फोडला. पाटा द्वारे त्यातील पाणी काढलं. त्यात मराठ्यांना १२,८५५ तोळे सोनं, १७ रुप्याचे पलंग, कितीतरी मोती, हिरे, माणिक अशा असंख्य मौल्यवान गोष्टी मिळाल्या.
पानिपतच्या सुडाची ही पेशव्यांनी आखलेली मोहीम पूर्णतः यशस्वी झाली होती.
मराठ्यांनी पानिपताचा सूड उगवला होता..!
- प्रशांत पोळ
_(पूर्व प्रसिद्धी - 'सर्वोत्तम' दिवाळी अंक. २०२३)_
No comments:
Post a Comment