लेखन ::डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे .
राजर्षी शाहूमहाराजांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या पत्नी श्रीमंत इंदुमती राणी साहेबांचा जन्म ६ डिसेंबर १९०६ रोजी झाला . सासवडचे शंकरराव पांडुरंगराव जगताप यांच्या त्या कन्या .त्यांचे माहेरचे नाव जमना. विवाह ६ जून १९१७ रोजी राजपुत्र शिवाजी यांच्याशी झाला. पण दुर्दैवाने त्यांना वैवाहिक जीवन केवळ एक वर्ष लाभले. प्रिन्स शिवाजी १२ जुन १९१८ रोजी शिकार करीत असता अपघाताने मृत्युमुखी पडले. प्रिन्स शिवाजी महाराजांचे १९१८ मध्ये निधन झाल्यावर शाहू महाराजांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.
त्यातून सावरून महाराजांनी आपल्या तरुण विधवा सूनेस आपल्या मुलीप्रमाणे वाढवले, शिक्षण दिले, संस्कार घडवले ,एक सुसंस्कारित आदर्श स्त्री व स्वावलंबी , कणखर व्यक्ती म्हणून इंदुमती देवींच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून महाराजांनी जातीने प्रयत्न केले. आपण कोल्हापूरच्या बाहेर गेल्यावर मागे आपल्या सुनेने राज परिवाराशी कसे वागावे याविषयी बारीकसारीक सूचना महाराज त्यांना देत होते. इंदुमती राणीसाहेब कोल्हापुरात राहत असताना महाराजांनी पुण्यावरून त्यांना एक पत्र लिहिले होते..त्यांच्या सोबत सोनतळी कँपवर राहणार्या मुलींच्या सोबत कसे वागावे याचे अत्यंत योग्य रितीने आपल्या सुनेस मार्दर्शन केले होते. जेवतेवेळी सर्व मुलींना बरोबर घेऊन जेवत जावा. सर्व मुलींनी चहा घेतल्यानंतर तुम्ही चहा घ्यावा. पंगतीला बसल्यानंतर सर्व मुलींचा समाचार घ्यावा. सर्व मुलींनी नोकर लोकांनी तुमच्यावर प्रेम करावे अशा रीतीने त्यांना वागवीत जावा.
"वाडवडिला सेवित जावेll
सवतीशी प्रेम धरावे |l
पतीकोपी नम्र असावे.ll
सेवकावरी सदय पहावे ll
निज धर्मा दक्ष राहावेll
भाग्य येता मत्त न व्हावे ll
ऐशीलाची गृहिणी म्हणती ll
इतरा कुलव्याधिच होती ll"
कण्व ॠषींनी आपल्या मुलीस असा उपदेश केला आहे. तो ध्यानात ठेवून वागत जावे.
शाहूमहाराजांनी इंदुमती राणी साहेबांना शिक्षण दिले आणि त्यांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावेत असेच प्रयत्न केले.
महाराजांच्या निधनानंतरही इंदुमती राणीसाहेबांनी आपले शिक्षण चालू ठेवले १९२५ मध्ये त्या मॅट्रिक पास झाल्या त्या काळातील मॅट्रीक उत्तीर्ण होणार्या त्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या..दिल्लीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही त्यांना त्या शिक्षणाचा लाभ घेता आला नाही.
इंदुमती राणीसाहेबांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केले. नाशिक येथे भरलेल्या मराठा महिला शिक्षण परिषदेच्या सहाव्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या. कोल्हापुरात त्यांनी 'ललित विहार' (१९५४ )संस्था स्थापून स्त्री शिक्षण प्रसाराच्या कामाला आरंभ केला.स्रीमुक्तीची चळवळ गतीमान करण्यासाठी व कार्यकर्त्यांची बौध्दीक घडण करण्यासाठीच त्यांनी ललिता विहारची स्थापना केली.मुलींना केवळ पुस्तकी शिक्षण न देता समर्थ गृहिणी बनविण्याचा हा महाराष्ट्रातील पहिला शैक्षणिक प्रयोग होता.मुलींना ऊद्यमशिल बनविण्यासाठी औद्योगिक कला भवन सुरू केले.महिला वसतिगृह सुरु करून शहरात शिक्षण व नोकरीसाठी आलेल्या स्रियांच्या निवासाचा प्रश्न राणीसाहेबांनी सोडवला.१९६१ साली माॅडेल हायस्कूल फाॅर गर्ल सुरू केले.
स्रियांनी घराचा ऊंबरा ओलांडून बाहेर यावे व स्वतःहा बरोबर समाजाचेही प्रश्न सोडवावे हाच ललिता विहारचा उद्देश होता 'महाराणी शांतादेवी गायकवाड प्रशिक्षण संस्था (१९५४ )' 'महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय( १९५५ )कमी शिकलेल्या मुलांसाठी औद्योगिक कला भवन , मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स( १९६१ ) या संस्था काढल्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाची सोय केली. इंदुमतीदेवी कोल्हापूरच्या शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे त्या एक अभिन्न घटक होत्या. त्यांनी समाजकार्य करणाऱ्या संस्था ,व्यक्ती ,गरजू विद्यार्थी वगैरेंना सढळ हाताने मदत केली
इंदुमती राणीसाहेब या धार्मिक वृत्तीच्या व परोपकारी स्वभावाच्या होत्या. त्यांना संगीत, नाट्य आणि तत्सम ललित कलांची उत्तम अभिरुची होती. त्यांचे ग्रंथप्रेम आणि ज्ञानजिज्ञासा प्रसिद्ध आहे .त्यांचे स्वतःचे ग्रंथालय मराठी, संस्कृत ,इंग्रजी आदी भाषांतील विविध विषयांतील ग्रंथांनी समृद्ध होते.
शिक्षण, संस्कार, रसिकता आणि सौंदर्य अशा विविध गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त, आकर्षक व प्रभावी होते. त्यांचे निधन ३० नोव्हेंबर १९७१ रोजी कोल्हापूर येथे झाले.
आपल्या कार्यकर्तुत्वाने इंदुमती राणीसाहेब खर्या अर्थाने राजर्षि शाहू महाराज यांच्या स्नुषा शोभल्या त्यांचे स्मरण आपल्याला कायम प्रेरणादायी ठरेल.
आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तविनम्र अभिवादन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे .
No comments:
Post a Comment