विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 December 2023

‘हिंदूराव घोरपडे’ घराण्याचा दक्षिणेकडील इतिहास...🙏🚩

 

घोरपडे घराण्याचा विस्तारपूर्वक व ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहिलेला हा पहिलाच इतिहास म्हणजे


‘हिंदूराव घोरपडे’ घराण्याचा दक्षिणेकडील इतिहास...🙏🚩

मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थांनी गौरवास्पद ठरावी अशीच होती. हे घराणे उत्तरेकडून राजपुतांच्या इतिहासाशी निगडित, तर महाराष्ट्रात मराठ्यांच्या इतिहासाशी ते निकटचे संबंधित. दक्षिण भारतात या घराण्याने स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतंत्रपणे आपला इतिहास घडवला. एवढ्या विविध क्षेत्रात शौर्य गाजवणाऱ्या घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व अनेक थोर इतिहासकारांनी गौरवाने उल्लेखले आहे. विशेषतः शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात ज्या शर्थीने या घराण्याच्या थोर पुरुषांनी तलवार गाजवली तिची प्रशंसापर वर्णने फार्सी इतिहासकारांनाही करावी लागली. त्यांना संताजी, बहिर्जी आणि मालोजी या घोरपडे बंधूंचे पराक्रम आपल्या इतिहासात नमूद करणे अपरिहार्य वाटावेत एवढे मोठे होते..

औरंगजेबाशी सत्तावीस वर्षे या घराण्यातील कोणत्या ना कोणत्या तरी पुरुषाने निकराने झुंज दिली. मोगलांच्या फौजेला शह देण्यासाठी त्यांनी युद्धाचे डावपेच लढवले. त्या अफाट सेनासागराला मागे हटवण्याएवढा चमत्कार घडवला आणि प्रसंगी अशी लढाई देता देताच युध्दक्षेत्रावर आपले देह ठेवले.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीबाईसाहेब या चार छत्रपतींच्या राजवटीत स्वराज्याला सर्वांत मोठा आधार घोरपडे घराण्याच्या शस्त्राचा वाटत होता..

हिंदुराव घोरपड्यांचे पराक्रम तर एवढ्यावरच मर्यादित नाहीत. त्यांनी दक्षिण भारतात मर्दुमकी करून आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले. स्वतःचे गुत्ती राज्य उभे केले. आपल्या घराण्याची प्रतिष्ठा वाढवली. दक्षिण भारताच्या राजकारणावर प्रभाव पाडला. विशेषतः अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात गुत्तीच्या मुरारराव हिंदुराव घोरपडे यांनी इंग्रज, फ्रेंच, हैदर आणि निजाम या सर्वांना पुरुन उरावे अशी मुत्सद्देगिरी आणि लढाऊ बाणा दाखवला, त्याला मराठ्यांच्या इतिहासात क्वचितच तोड सापडेल. राजे मुराररावांचे युद्धकौशल्य आणि राजकीय मुत्सद्देगिरी यांची प्रशंसा खुद्द इंग्रज आणि फ्रेंच इतिहासकारांना व राज्यकर्त्यांनाही करावी लागली. सतत ३५ वर्षे राजे मुराररावांनी दक्षिण भारतात आपले समर्थ व्यक्तिमत्व प्रतिपक्षांच्या पुढे कायम ठेवले आणि आपला व आपल्या हिंदुराव घोरपडे घराण्याचा गौरवशाली इतिहास निर्माण केला. पण एवढ्या गौरवशाली कर्तृत्वाचा सलग, सविस्तर आणि साधार इतिहास मात्र आजवर लिहिला गेला नाही..

 सर यदुनाथ सरकार आणि रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्यासारख्या मान्यवर इतिहासकारांनी तर असे म्हटले आहे की, “जोपर्यंत घोरपडे घराण्याच्या दक्षिण भारतातील कामगिरीचा आणि महत्वपूर्ण संबंधित घटनांचा इतिहास लिहिला जाणार नाही, तोपर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहून पूर्ण होणार नाही...” यापुढे जाऊन असे म्हणता येईल अठराव्या शतकातील दक्षिण भारताच्या इतिहासाचा अभ्यास पूर्ण होऊ की घोरपडे घराण्याचा, विशेषतः राजे मुराररावांचा इतिहास अभ्यासल्याशिवाय शकणार नाही..
.
मराठ्यांची स्वराज्यातील कामगिरी शिवकालीन इतिहासात वाचावयास मिळते. पेशवेकालीन कामगिरी उत्तरेकडील मोहिमांच्या इतिहासात व्यक्त होते. नागपूरकर भोसल्यांच्या कामगिरीचे उल्लेख ओरिसा आणि बंगालच्या लढ्यांवरून लक्षात येतात. शिंदे, होळकर, गायकवाड, पवार यांनी पेशवेकालात गाजवलेल्या इतिहासाचा संबंध उत्तरेकडे पसरलेल्या मराठी साम्राज्याच्या इतिहासाशी निगडित आहे. सुदैवाने या सर्व घराण्यांचे इतिहास लिहिले गेले आहेत. मराठ्यांच्या मुख्य इतिहासप्रवाहाशी त्या सर्व घराण्यांचे इतिहास जोडलेले असल्यामुळे मराठी रियासतीतही त्यांचे विस्तृत वर्णन केले आहे. पण खेदाची गोष्ट अशी की दक्षिण भारतात तशाच तोलामोलाची स्वतंत्रपणे कामगिरी करून आपले वैशिष्ट्य निर्माण करणाऱ्या हिंदुराव घोरपडे घराण्याच्या शाखेचा इतिहास मात्र काहीसा उपेक्षितच राहिला. त्याला कारणे काहीही असोत, वस्तुस्थिती मात्र अशी आहे खरी. ऐतिहासिक साधने सुरक्षित राहिली नाहीत. सतत युद्ध प्रसंगांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे स्थैर्य मिळाले नाही. अशा अनेक कारणांमुळे हिंदुराव घोरपडे घराण्याचा, विशेषतः गुत्ती राज्याचा इतिहास आजवर उपलब्ध होऊ शकला नाही. राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांनी सन १६९७ साली गुत्तीचा किल्ला जिंकला व स्वतःचे राज्य निर्माण केले. त्यात सन १७१४ मध्ये राजे सिधोजीराव हिदुराव घोरपडे यांनी सोंडूरचा प्रदेश पाळेगाराकडून जिंकून गुत्तीच्या राज्यास जोडला..

 या सर्व घटनांमागील इतिहास महत्वाचा आहे. त्याचा तपशील यथाक्रम पुढील प्रकरणात येणार आहे. अशा पार्श्वभूमीवर विद्यमान महाराज यशवंतराव हिंदुराव घोरपडे यांनी आपल्या पूर्वजांच्या इतिहासाविषयी दाखवलेली आस्था विशेष प्रशंसनीय वाटावी अशीच आहे. त्यांच्या प्रोत्साहनानेच प्रस्तुत इतिहासलेखनाला चालना मिळाली आहे. हा इतिहास लिहिला जावा, त्याचे महत्त्व प्रकाशात यावे, दक्षिण भारतात हे राजघराणे किती प्रभावी होते हे स्पष्ट व्हावे आणि एकूण मराठ्यांच्या इतिहासात त्याचे केवढे मोठे स्थान आहे हेही लक्षात यावे, अशा विविध विचारांनी प्रेरित होऊन श्रीमंत महाराज यशवंतराव हिंदुराव घोरपडे यांनी प्रस्तुत इतिहासाला चालना दिली. या इतिहासाची फार थोडी साधने उपलब्ध आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी साधने जमवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आणि अशा प्रकारे या इतिहास लेखनाची पूर्वतयारी केली..
.
हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू या चार राज्यांत घडला. यावरून त्याचे क्षेत्र आणि व्याप किती मोठा होता याची कल्पना येऊ शकेल. संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना मोगलांनी पकडले त्यावेळी म्हाळोजीरावांनी त्यांना वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. बहिर्जी हिंदुराव यांनी राजाराम महाराजांना जिंजीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी आपले प्राण धोक्यात घातले आणि छत्रपतीना सुरक्षितपणे इष्ट स्थळी पोहोचवले. व नंतर गुत्तीचे राज्य स्थापन केले. सिधोजीराव हिंदुराव यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींसाठी आपली कामगिरी पार पाडली. त्यानंतर सोंडूरचा प्रदेश जिंकला व गुत्तीच्या राज्यात सामील केला. राजे मुरारराव हिंदुराव घोरपडे यांनी हैदराशी प्राणपणाने झुंज देऊन या घराण्याच्या ऐतिहासिक कर्तृत्वावर कळस चढवला. त्यानंतरचा काळ मात्र या घराण्याला प्रतिकूल परिस्थितीत घालवावा लागला. पण त्यावेळी ती स्थिती सर्वच ऐतिहासिक घराण्यांना प्राप्त झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नव्या परिस्थितीत आणि बदलत्या क्षेत्रात श्रीमंत महाराज यशवंतराव हिंदुराव घोरपडे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची समयज्ञता आहेत..
.
――――――――――――
◆ लेखक : स.मा.गर्गे ✍️
◆ पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्रकार : @rambdeshmukh 🔥
◆ पुस्तक प्रकाशक : #मराठीदेशा_फाउंडेशन ♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...