विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 December 2023

संताजी घोरपडे ....!! सेनापती...एक शिकार खेळी

 


संताजी घोरपडे ....!!
सेनापती...एक शिकार खेळी
जिंजी किल्ल्याच्या काही अंतरावर उत्तरेस जिंजी नदी वाहते.नदीचा किनारा धरून सेनापती संताजी घोरपड्याची छावणी चांगली ऐसपैस पसरली होती.तीस-चाळीस हजारांचा माणूस मेळ असावा.मार्गशीर्ष महिन्याची थंडी अंगाला चांगलीच झोंबत होती.छावणीच्या थोडं दूरवर महादेवाच एक टोलेजंग मंदिर होतं बहुदा एखाद्या जुन्याजाणत्या राजा ते उभारलं असावं.मात्र त्याची घडणावळ फारच चकोट होती.त्यालाच लागून मोठा दगडी घाट नदी पर्यंत उतरत होता.नदीच्या पल्याड दूरपर्यंत घनदाट जंगल पसरलेलं होतं.
दिवस उगवतील चार-पाचशे तरणा मावळा मंदिराचा घाट धरून लंगोट किस्ताक लावून जोर मारण्याच्या नादात घुमत होता घुमण्याचा नाद कानी पडताच सेनापतीही त्या सामील झाले.
मेहनतीने तापलेल अंग गार पडताच सेनापतींनी थेट नदीत उडी टाकली.ओल्या अंगानं महादेवाला पाणी घालून ते आपल्या बिचव्यात शिरले.महत्वाची कामं उरकताच ते जरा निवांत झाले
फडावरची मंडळी बाहेर पडताच दहा-पंधरा सरदारांच टोळकं
सेनापतींच्या बिचव्यात शिरलं.
सेनापतींना मुजरा करून सर्वजण असनस्त झाले.जरा जुजबी
बोलणं झाल्यावर सेनापतींच्या डाव्या बाजूला बसलेल्या बाजी जाधवानं सेनापतींचा निवांत पणा हेरला.तसा संताजीरावांचा स्वभाव जरा गरमागर्मीचा पण आज सेनापती खुश दिसत होते
बाजीन हळूच मुद्याला हात घातला.मामासाहेब आज आपण
छावणी उठवणार नसाल तर आज आम्ही शिकारीला उतरावं म्हणतोय..!! शिकार म्हटलं की सेनापती मन ही मन खुश झाले
जरूर..जरूर उतरू असा जाब आला..!! बहुत दिवस झाले शिकारीला उतरलेलो..!! संताजीराव म्हणाले..बाजीराव आज तुमच्या मूळ शिकारीचा योग दिसतोय जरूर जाऊ.पर कवाशी निघायचं..? बाजी म्हणाला जी...उन कलतीला लागलं की निघू
तवर पाच-पन्नास हाके पुढ धाडतो.बाजी मुजरा करून निघून गेला.
शिकार म्हटलं की बाजी नुसता हरकून गेला.ताबडतोब त्यानी सगळी जुळवा जुळव केली.पाच-पन्नास हाके डोंगराच्या दिशेनं पाठवले.त्यांना वन्यप्राण्यांपासून सवरक्षणा साठी पन्नास-साठ घोडी त्यांच्या दिमतीला दिली.स्वतः जातीनं जाऊन त्यांनी शिकारीच रान बघितलं.नदीच्या पलीकडं जरा जंगलात शिरलं की थोडं मोकळं गवताचं कुरण लागतं.डोंगरावरून निघालेले हाके बरोबर या मोकळ्या कुराणकडं येणार होते.हाक्याच्या आवाजानं आतील जगली प्राणी नेमके या कुरणाच्या मयदानात येतील ही गोष्ट बाजीन ताडली.इथंच डाव मांडू या इराद्यानं बाजी पुन्हा छावणी कडं परतला.
दुपार टळली तशी शिकारीसाठी दोन-एकशे घोडा छावणीतुन बाहेर पडला.हाक्याना निरोप जाताच ते जोरजोरात ढोल,ताशे
बडवत.मोठ्या हाळ्या मारत शिट्या मारत निघाले.हाके जशे आत शिरले तशी आतली जनावर बिचकू लागली.एक एक कळप त्या कालव्यानं बाहेर पडू लागली.इखड गवताच्या मयदानात शिकार खेळी तयारीत होते.पण पहिल्यांदा जंगली
गव्यांचा कळपच बाहेर पडला तशी सगळ्यांनी त्यांना बगल दिली.मात्र थोड्या वेळानं जगली जनावरं ( डुकरं) आपल्या चिरक्या आवाजात ओरडत बाहेर पडू लागली.
ती बाहेर पाळताच हर एक घोडा त्यांच्या माघ लागला.तशी रानजनावराची भाल्यानं शिकार करणं जिकिरीच..मोठं अवघड काम.कारण पळणाऱ्या जनावरांच्या बरोबरीन आपला घोडा पळवावा लागतो.एखाद्या वेळी चिडलेल जनावर घोड्याच्या पायात गुसून इजा करून घोडा पाडू शकतं.त्यामुळं घोड्यात आणि जनावरा मध्ये योग्य अंतर राखणं जरुरीचं असतं पण सेनापती आणि बाजी या खेळात माहीर होते.बघता बघता सगळ्यांनी मिळून सत्तर-एक जनावर पाडली.पाडलेली जनावर इतर मावळे काटीला उलटी टांगून तळाकडे पळवत होते.आता दिवस मावळतीकडे झुकला होता पण बाजीची हाऊस अजून फिटली नव्हती.शेवटी सेनापतींचा आदेश येताच सगळी घोडी छावणीच्या दिशेनं निघाली. नदी ओलांडून
जाता जाता आधारुण आलं होतं.
आज छावणीत जंगी बेत होणार होता.कारण सगळ्या तळावरच्या चुली पेटलेल्या दिसत होत्या....!!
लेखन सेवा :- इंद्रजित खोरे
टीप :- वरील हकीकत ही काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी
# सेनापती
# संताजी घोरपडे
# मराठा घोडदळ
# मराठा पायदळ
# जिंजी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...