विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 15 December 2023

संताजींनी अलिमर्दानखानाचा पराभव केला

 संताजींनी अलिमर्दानखानाचा पराभव केला ती तारीख होती - १३ डिसेंबर १६९२


संताजींचा तळ कांचीपासून दहा कोसावर कावेरीपाकच्या किल्ल्याजवळ होता. मराठ्यांची तुकडी जवळ आहे याची खबर अलिमर्दखानास लागताच आपल्याबरोबर मोठी फौज व बहेलिया बरकंदाज घेऊन तो मराठ्यांबरोबर लढा देण्यासाठी निघाला. मराठा फौजेत संताजी घोरपडे आहेत याची जराही कल्पना खानाला नव्हती.
संताजीराव खान धावून इतुया आन् तेच्या दळात बहलिया बरकंदाज बी हायती. कंचा इचार हाय तुमचा ? विठोजी चव्हाण अंदाज काढत बोलले.
इठोजी कवढा काय इचार करायलाय तुमी आपलं घोडदळ बरकंदाज काय कमी हायती काय ? संताजी विठोजींना बोलले.
तसं न्हायजी पर म्या म्हणतोय खानाला असा अंगावर घेण्या परीस पाठ शिवनीचा खेळ खेळू की वैसा. विठोजी.
इठोजी तुमासनी काय वाटलं खानाला काय पिसाळलेलं कुतरं चावलय व्हय? त्यानं बी काय तर इचार करूनच कुच केली आसल की. पर माजा डाव खानावर भारी पडणार बगाच तुमी संताजी खात्रीने बोलले.
कावेरीपाकच्या मैदानात अलिमर्दिनखान आणि संताजींचे सैन्य समोर समोर भिडले. हत्यारांची खणाखणी सुरू झाली. संताजींना सामोरे पाहताच खान लाले लाल होऊन ओरडला, घेरलो इस शैतान को. यही खतम कर दो इसे. आज ये भागणे ना पाय. बंदुके चलाव.
अल्ला हो अकबर, काटो मारो म्हणत मोगल सैनिक वार करू लागले. दोन्ही बाजूने जोरदार वार होऊ लागले. खानाच्या सैन्यातील बहेलिया बर्कंदाज मनापासून लढत नव्हते. त्यांच्या बंदुकीचा निशाणा चुकत होता. संताजींनी लढाईचा अंदाज घेत माघार घेतली. त्यांनी सैन्याला माघारी पषण्याचा इशारा केला. संताजींच्या माघार घेण्याचा अंदाज खानाला लवकर कळाला नाही. आपल्या बहेलिया बरकंदाजांना सोबत घेऊन तो संताजींच्या पाठलागावर निघाला. थोडं अंतर पार करताच संताजींची राखीव तुकडी संताजींना सामील झाली. खानाने संताजींना गाठलं. त्याने आपल्या बरकंदाजांना हुकूम केला, बंदुके चलाओ छलणी करदो इन काफरोंको.
बहेलिया बरकंदाजांचं पथक जागेवरून जरासेही हललं नाही. खान बुचकळ्यात पडला. काय होते ते अलिमर्दानखानाला समजेना. तेवढ्यात संताजींनी इशारत केली. संताजींच्या इशारातीसरशी खानच बहेलिया बरकंदाजांचं पथक संताजींच्या पथकात सामील झालं. बहेलिया बरकंदाजांचं पथक आता मोगलांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करू लागलं. गोळ्या लावगून मोगल शिपाई मरू लागले. कित्येक जखमी झाले. संताजींनी आपले राखीव पथक मोगलांच्यावर चाल करून नेले. पुन्हा कापीकापीला उत आला. लढाईच्या ऐन वेळी बहेलिया बरकंदाजांचं पथक मराठ्यांना सामील झाल्याने अलिमर्दानखानाने कच खाल्ली. मोगल सैन्य मैदानात टीकेना. मराठ्यांनी आता खानासह त्याच्या सैन्याला चारी बाजूंनी घेरलं. काही वेळ जोराची लढाई झाली. शेवटी अलिमर्दानखानाचा मोठा जबरदस्त पराभव झाला. अलिमर्दानखान त्याचे साथीदार व्यापारी मराठ्यांच्या कैदेत सापडले. जिंजीकडे जाणारी मोठी साधन सामग्री संताजींच्या हाती पडली. खानाच्या ताब्यात असलेले पाच हत्ती 300 घोडे व धान्याच्या गोण्या वाहणारे असंख्य बैल संताजींना मिळाले. संताजींनी सर्व युद्ध कैदी व युद्धात सापडलेली सामग्री घेऊन मोठ्या उत्साहात जिंजीच्या किल्ल्यात प्रवेश केला.
संताजींनी अलिमर्दानखानाचा पराभव केला ती तारीख होती - १३ डिसेंबर १६९२

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...