मराठाशाहीतील ताकदवर मराठे
२ ) बंगाल मध्ये "भास्कर पंडत" म्हणून प्रसिध्द असलेले नागपूर संस्थानचे कारभारी भास्करराम कोल्हटकर
यांचा इतिहास
लेखन माहिती ::©®सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com
इ.स.१७४० मध्ये थोरल्या शाहूमहाराजांनी फत्तेसिंह भोसले ह्यास कर्नाटक मोहिमेवर पाठविले होते. तंजावरच्या प्रतापसिंह भोसल्यांस अर्काटचा नवाब दोस्तअली व त्याचा जावई चंदासाहेब हे पांडेचेरीचा फ्रेंच गव्हर्नर डुमास याच्या मदतीने त्रास देत होते. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेसिंह भोसले, मुरारराव घोरपडे व रघुजी भोसले यांच्या फौजांनी यश संपादले व दोस्तअलीचा जावई चंदासाहेब यास कैद करून साताऱ्यास आणले.
बंगाल व ओरिसा येथे मूर्शिदकुलीखान याचा पराभव करून अलिवर्दीखानाने सत्ता स्थापन करून तो नवाबपदी विराजमान झाला. यावेळी मूर्शिदकुलीखानचा प्रामाणिक सरदार मीर हबीब हा अलिवर्दीखानावर सूड उगविण्यासाठी मराठ्यांची मदतीसाठी नागपूरला पोहोचला. मीर हबीबसोबत भास्करपंत कोल्हटकर सैन्य घेऊन इ.स.१७४२ ला बिहार मधून अलिवर्दीवर गेले. अलिवर्दीखान व भास्करपंत यापैकी कोणासही निर्णायक यश मिळाले नाही तेव्हा भास्करपंत पावसाळ्यात नागपूरास आले. इ.स.१७४३ मध्ये पुन्हा रघुजी भोसले व भास्करपंत ह्यांनी बंगालवर स्वारी केली परंतु शत्रूला फक्त हैराण करण्यात यशस्वी झाले. पुढील वर्षी म्हणजे १७४४ मध्ये पुन्हा भास्करपंतांनी बंगालवर स्वारी केली तेव्हा अलिवर्दीखान मराठा सैन्याशी लढून कंटाळला होता. भास्कररामने यावेळी आपल्या सैनाला सरसहा कत्तल करण्याचा हुकूम केला. अनेक प्रकारच्या छळाने बंगालची रयत हैराण झाली. तेथे "भास्कर पंडत" म्हणताच लोकांना कापरे भरायचे, इतकी दहशत भास्करराम निर्माण झाली होती. मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपला सेनापती मुस्तफाखान याच्या सल्ल्याने कपटनीतीचा वापर करण्याचे निश्चित केले. मुस्तफाखान व त्याचा कारभारी जानकीराम यांनी भास्करपंतांशी तहासाठी वाटाघाटी सुरू केल्या. भास्करपंत व अलिवर्दीखान यांच्या छावण्या कटवाजवळच होत्या. मुस्तफाखानाने नबाब अलिवर्दीखानाच्या वतीने भास्करपंतास मेजवानीस निमंत्रण देऊन दिवस निश्चित केला. ठरलेल्या दिवशी भास्करपंत आपल्या निवडक वीस सरदारांसहित नबाबाकच्या डेऱ्यात दाखल होताच, दरवाजात जानकीराम व मुस्तफाखानाने त्यांचे स्वागत केले. नबाबाने देखील सर्वांचे स्वागत करून काहीतरी निमित्ताने तो बाहेर पडला. पूर्वसंकेताप्रमाणे नबाबाच्या लोकांनी तंबूचे तणावे कापून आतील भास्करपंतासहित वीस सरदारांना कापून काढले. भास्करपंत व वीस सरदारांचे हत्याकांड हे ३१ मार्च १७४४ रोजी कटवा नजीक असलेल्या मानकुरा येथे घडले. भास्करपंताचा एकमेव सरदार राघोजी गायकवाड हा तळावर राहिल्याने जिवंत राहिला होता. या हत्याकांडाची बातमी पोहोचताच त्याने सैन्यासह नागपूरकडे पळ काढला तर भास्करपंतांची गरोदर असलेली पत्नी ताईबाई काशी येथे गेली. काशी येथे तिला पुत्र झाला म्हणून त्याचे नाव "काशीराव" ठेवण्यात आले.
No comments:
Post a Comment