मराठाशाहीतील ताकदवर मराठे
२ ) बंगाल मध्ये "भास्कर पंडत" म्हणून प्रसिध्द असलेले नागपूर संस्थानचे कारभारी भास्करराम कोल्हटकर
यांचा इतिहास
लेखन माहिती ::©®सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com
ऐतिहासिक पांडेवाडी - ता. वाई, जि.सातारा
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात पांडेवाडी नावाचे एक खेडेगाव आहे.
वाई नगरीच्या पश्चिमेस सुमारे पाच कि.मी.अंतरावर पंतकवी वामन पंडित यांची प्रतीकात्मक समाधी असलेले भोगांव आहे. याच भोगांवच्या ईशान्येस सुमारे एक ते दीड कि.मी.अंतरावर पांडेवाडी गाव आहे. थोरल्या शाहूमहारांच्या कालखंडात नागपूरचे सत्ताधारी झालेल्या पहिले रघूजी भोसले यांचे बालपण येथे गेलेले आहे तर बंगाल मध्ये "भास्कर पंडत" म्हणून प्रसिध्द असलेले नागपूर संस्थानचे कारभारी भास्करराम कोल्हटकर यांचे हे गाव आहे.
रघूजी भोसले नागपूरकर यांचे मूळ घराणे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा नदीकाठी असलेल्या हिंगणी बेर्डी येथील होय. रघूजीचा मूळ पुरूष मुधोजी भोसले. मुधोजी भोसले पुत्र तीन बापूजी, परसोजी व साबाजी हे होय. यापैकी परसोजी भोसले हे थोरल्या शाहूमहाराजांची इ.स.१७०७ मध्ये मुघलांच्या कैदेतून सशर्त सुटकेनंतर सुरूवातीला त्यांना प्रथम पाठींबा देणारे होते. परसोजी भोसले यांचे निधन इ.स. १७०९ मध्ये झाल्यावर त्यांचे पुत्र कान्होजी भोसले हे सेनासाहेबसुबा झाले. परंतु त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांचे चुलत बंधू बिंबाजी व काशीबाई भोसले यांचा पुत्र रघुजीला आपल्या हाताशी धरून त्यांनी भाम ( जि.यवतमाळ)या आपल्या मूळ गावी आपले बस्तान बसविले. परंतु पुढे कान्होजीस रायाजी नामक पुत्र झाल्यावर रघुजी बाबत अनास्था निर्माण झाली. रघुजीचे बालपण हे आपली आई काशीबाई व आजी बयाबाई यांच्यासोबत वाई तालुक्यातील पांडववाडी (आजची पांडेवाडी)येथे गेले. पांडेवाडी गावातील रामभक्त असलेल्या संत रामजीपंत कोल्हटकर यांच्या आशीर्वादामुळे निंबाजी भोसले पुत्र झाला अस मानलं गेल्यामुळे त्याचे नाव रघु ठेवण्यात आले होते. रामभक्त रामजीपंत कोल्हटकरांना कोण्हेराम व भास्करराम असे दोन पुत्र होते. पुढे रघुजी नागपूरकर घराण्याचा प्रमुख झाल्यावर हे कोल्हटकरांच्या दोन्हीही मुलांनी रघुजीच्या कारभारात आपले योगदान दिले. कान्होजींच्या वर्तनानात झालेला बदल पाहून रघुजी भोसले हे देवगडचे राजे चांद सुलतान यांच्याकडे गेले. राजे चांद सुलतान हे मूळचे हिंदू. त्यांचे वडील बखतशहा हे देवगडचे राजे असताना, त्यांच्या भावांनी त्यांच्याविरूद्ध बंड करून त्यांना देवगड सोडण्यास भाग पाडले. देवगडचे राज्य परत मिळविण्यासाठी औरंगजेब बादशाहाची मदत मागितले तेव्हा औरंगजेबाने धर्म बदलण्याची अट ठेवली. राज्यप्राप्तीसाठी धर्म बदलणाऱ्या बखतशहाचा, बखतबुलंद झालेल्या राजाने राजापूर बारसा नावाच्या बारा वाड्या होत्या, त्या एकत्र करून नागपूर शहराची स्थापना व नामकरण केले होते. सेनासाहेबांचे पुतणे आपल्याकडे आले म्हणून चांदसाहेब यांनी त्यांची बडदास्त ठेवली. काही दिवसांनी रघुजी भोसले हे सातारा येथे छत्रपती थोरले शाहूमहाराजांकडे आले. दरम्यानच्या काळात कान्होजी सेनासाहेब सुभा यांच्यावर महाराजांची अवकृपा झाली तर रघुजी महाराजांच्या मर्जीत आले. महाराजांनी रघुजीचे लग्न सुलाबाईशी लावले. सुलाबाई ही महाराजांच्या धाकटया सगुणाबाई राणी, ज्या कन्हेरखेडच्या शिंदे घराण्यातील होत्या त्यांची चुलत बहीण लागत होती.
गोंडवण देवगडचा राजे चांद सुलतान हा इ.स.१७३५ मध्ये मृत्यू पावल्याने वारसाहक्काचा झगडा अनौरस पुत्र वलिखान व औरस दोन पुत्रात यांच्यात सुरू झाला, तेव्हा चांद सुलतानची विधवा राणी रतनकुंवर हीने सेनासुभा रघुजी भोसले यांची मदत मागितली. रघुजी भोसले सैन्याने देवगडवर स्वारी करून सोनबरडी व गिरोली या गावांच्या दरम्यान झालेल्या युद्धात वलिखानचा पराभव केला व त्यास कैद केले. अशाप्रकारे विधवा राणीला त्यांनी सहकार्य केले. रतनकुंवर राणीला दोन मुलगे होते. राज्यप्राप्ती झाल्यावर तिने दोन्ही मुलांना व रघुजी भोसलेंना मिळून राज्याच्या तीन वाटण्या केल्या. गोंडवण प्रांतातील किल्ले पवनी, मारूड व मूळतापी वरघाट हा भाग रघुजींस मिळाला. याच प्रदेशातील नागपूर येथे रघुजीनी आपल्या राज्याच्या राजधानीची स्थापना केली. यानंतर ख-या अर्थाने रघुजी या प्रदेशाचा शास्ता झाला.
No comments:
Post a Comment