विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 12 December 2023

#इतिहासातील_पराक्रमी_स्रिया

 #इतिहासातील_पराक्रमी_स्रिया

 

राजमाता जिजाऊसाहेब भोसले (इ.स.१५९८-१६७४)
स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई हिच्या पोटी झाला. शिक्षण-तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीनप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले.तिला दांडपट्टा, अश्वारोहण वैगरे युद्ध कलांचे शिक्षण देण्यात आले.राज्यकारभाराचेही प्रशिक्षण मिळू लागले.जिजाउं चा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांचेशी दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटाने संपन्न झाला जिजाउंना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकि चार मृत्यू पावली. संभाजी व शिवाजी हे दोन होत. शहाजीं नी जिजाऊ ना शिवनेरीवर किल्ल्यात सुरक्षित ठेवले. येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाउने शिवाजीस जन्म दिला.बाल शिवबाच्या लहानपणापासूनच जिजाऊ त्यांच्या गुरु बनल्या.जिजाऊ स्वतः राजकारण,युद्धकलेत पारंगत असल्याने त्यांनी बाल शिवबाला ते सर्व शिक्षण दिले.शहाजी राजांच्या गैरहजरीत बाल शिवबाच्या संगोपनापासून ते स्वराज्याचा कारभार जिजाऊनी मोठ्या कौशल्याने पार पडली.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली होती. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट,आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊ भोसले !!!
जिजाऊंनी स्वराज्याचे दोन छत्रपती घडविले, त्याचबरोबर महाराणी येसूबाई या देखील जिजाऊंच्या छत्रछायेत वाढल्या होत्या.
महाराणी येसूबाई -स्त्री सखी राज्ञी जयती
सुविद्य, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, राजकारण-कुशल अशा महाराणी येसूबाई साहेबांनी १६८०-१७३० या कसोटीच्या काळात अतिशय महत्वाचे योगदान केले आहे.
महाराणी येसूबाई ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी.
पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या कुलीन मराठा घरण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब महाराज ...
अंदाजे इ.स.१६६१ ते १६६५ च्या दरम्यान त्यांच्या विवाह शिवपुत्र संभाजी राजांशी संपन्न झाला. विवाहाच्या वेळी त्यांच वय जेमतेम ६-७ वर्ष होत. त्यामुळे त्यांची जडन-घडन संभाजी राजांसामवेत माँसाहेबांच्या देखरेखी खाली झाली. त्याचा एकंदरीतच परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येतो. स्वराज्य प्रवर्तिका जिजाबाईसाहेब व युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या मुशीतून तावून सुकावून बाहेर पडलेले अस्सल बावनकशी सोने महाराणी येसूबाईसाहेब महाराज.
महाराणी येसूबाई रणांगणी नसल्या तरी त्या धर्यशील, कर्त्यव्यदक्ष, कणखर वृतिच्या होत्या.
ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा काराभार माँसाहेब सांभाळत तसा संभाजी राजांच्या अनुपस्थितीत येसूबाई सांभाळत असत. त्याकरता त्यांच्या नावाचा शिक्काही "स्त्री सखी राज्ञी जयती" असा छत्रपती संभाजी महाराजांनी करवून दिला होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या सारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेचे पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या... पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्रभर गरुड भरारी मारणाऱ्या संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या.. गडावर येणारे वाद आणि तंटे त्या स्वत: सदरेवर बसून कुशल रीतीने हाताळत.
पुढे इ.स.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपले वैयतिक दुःख बाजुला सारून मोठ्या निर्धाराने सामोरे गेल्या. राजाराम महाराज व संभाजी पुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रुच्या हाती सापडू नयेत म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहुला आपल्या जवळ ठेवून राजारामंना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले. बाहेरून रायगडला मदत करा, प्रसंगी जिंजीकडे जा,असे त्यांनी सुचवले. स्वतः येसूबाई रायगड लढायला लागल्या. पण शेवटी रायगड लढने शक्य नाही हे पाहिल्यावर त्यांनी मोगलांच्या छावनीत स्वतःच्या ७-८ वर्षांच्या मुलासह प्रवेश केला.
स्वराज्याची शकले होऊ नये म्हणून पोटच्या मुलाचा म्हणजे लहानग्या शाहुराजेंचा अधिकार असताना सुद्धा स्वराजाच्या त्यांना गादीवर न बसवता छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करून त्यांनी आपल्या नि:स्वार्थपणाची साक्ष दिली.आयुष्यातील उमेदिची २७ वर्षे त्यांनी मोगल कैदेत घालवली. त्यात अनेक अडचणी आल्यात. त्या त्यांनी मोठ्या धैर्याने सोडविल्या. त्यांच्या ह्या आत्मबलिदानाला तोड़ नाही. सतत २७ वर्षे मोघलांच्या कैदेत राहून औरंझेबाचे नीच इरादे उधळून लावत आपला मान,सन्मान,अभिमान आणि स्वाभिमान कायम जपला... इ.स.१७१९ च्या सुमार्यास त्या दिल्लीहून दक्षिनेत परत आल्या. दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा, कोल्हापुर अशी शकले पाहिली. आपसांतिल दुहिमुळे परकीय शत्रुंची कसे फावते याचा धडा शिवरायांच्या कारकिर्दीपासून पाहत आल्यामुळे त्यांनी कोल्हापुरचे संभाजीराजे व शाहू यांच्यात १७३०च्या सुमाराला वारणा येथे मैत्रीचा तह घडवून आणला. हा तह वारणेचा तह म्हणून इतिहासात अमर झाला.
यानंतर थोडेच दिवसांत त्यांचे देहवासन झाले. त्याचा उल्लेख कोल्हापुरच्या संभाजी यांच्या पत्रावारून कळतो. सातार्याजवळील माहुली या क्षेत्री त्यांचे दहन करण्यात आले. आजही माहुलीच्या नदीकाठी एका चौथार्यावर त्यांची समाधी दाखवतात.
परंतु त्यावर 'नाही चिरा नाही पणती'!.
आपल्या सगळ्यांचे दुर्दैव असे कि आपल्या सर्वस्वाचा त्याग करत स्वराज्यापायी आणि रयतेसाठी अनंत अन्यास सहन करणाऱ्या ह्या महान महाराणीचा इतिहास आपण जागता ठेवू शकलो नाही...
ह्या महान महाराणीची जन्मतारीख इतिहास विसरून गेला तो गेलाच परंतु त्यांच्या निधनाची तारीख सुद्धा याद ठेवण्याची तोशीश इतिहासाने घेतली नाही..
इतिहासात अजुन त्यांच्या जन्माची नोंद नाही, मृत्यूची दाद नाही. त्यांच्या कर्तुत्वाची, ऐतिहासिक योगदानाची माहिती नाही.
अशा ह्या अद्वितीय स्त्रीश्क्तीला मानाचा त्रिवार मुजरा...!
महाराणी ताराबाईसाहेब भोसले (१६७५ - १७६१)
ताराबाई किंवा ताराराणी ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची कन्या व राजाराम महाराज यांच्या पत्नी होय. औरंगजेब नावाचे वादळ हे १६८१ साली स्वराज्यावर चालून आले, तेव्हा मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला त्या औरंग्यास संभाजीराजे यांनी योग्यप्रकारे उत्तर दिले पण कपटाने संभाजीराजास पकडून त्यांची हत्या औरंगजेबाने केली. त्यानंतर ह्या लढ्याची जबाबदारी पडली राजाराम महाराजांवर! त्यांनी हरप्रकारे मुघलांना तोंड दिले आणि सळो की पळो करून सोडले. पण दुर्दैव! राजाराम महाराजांचे २ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले आणि ह्या हिमालयासारख्या संकटाचे नेतृत्व ताराबाई यांनी केले.
राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्य चालाविण्याची जबाबदारी ताराबाईंवर येउन पडली. आपल्या पतीच्या हयातीतच ह्या स्त्रीने राज्यकारभारात व लष्करी मोहिमात भाग घेण्यास सुरुवात केली होती. मोगली इतिहासकार खाफीखान म्हणतो,”ताराबाई ही राजारामाची बायको होय. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा फार मोठा लौकिक होता.”ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजी (दुसरा) यास गादीवर बसवून राज्याची सर्व सूत्रे हाती घेतली. मराठे औरंगजेबाशी युद्ध खेळत होते, पण औरंगजेबाचे प्रचंड सामर्थ्य येथे अपुरे पडत होते. राजाराम महाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची बाजू कमजोर झाली असे बादशहास वाटले पण ताराबाईंनी धैर्याने व हुशारीने बाजू सावरली.
त्या विधवा तरुण राणीने औरंगजेबासारख्या मुरब्बी सम्राटाशी युद्ध खेळून अपराजित राहणे म्हणजे हे तिचे कर्तुत्व बोलते. औरंगजेबाचे लष्करी व राजकीय सामर्थ्य प्रचंड होते. मल्हाररामराव म्हणतो,”औरंगजेब बादशहासारखा शत्रू. लाखो फौज. खजिना बेमुबलक छकड्यास-छकडा द्रव्याचे भरोन कोटीशाबरोबर चालत आहेत.” अशा मोठ्या साम्राज्याशी महाराष्ट्र टक्कर घेत होता. लष्करी युद्धव्यवस्था,द्रव्य इत्यादी बाबतीत मराठे मोगलांशी बरोबरी करु शकत नव्हते, तरीदेखील त्यांनी मुघलांचे जगणे नकोसे करून टाकले. मुघल- मराठा संघर्षात मोगली नेतृत्वात कोणताही बदल झाला नाही. उलट मराठ्यांच्या नेतृत्वात तीन वेळा बदल झाला. संभाजीराजे, राजाराम महाराज व ताराबाई ह्या नेतृत्वाच्या तीन पिढ्या महाराष्ट्राने बघितल्या.
ताराबाई ह्या मराठ्यांच्या नाममात्र राज्यकर्त्या नव्हता. मराठ्यांच्या राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती होती. याशिवाय लष्करी मोहिमांची आखणीही त्या करीत होत्या. त्यांच्या राज्यकारभार कौशल्याविषयी व लष्करी नेतृत्वाविषयी खाफीखान म्हणतो,”रामराजाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडविली. तीत तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांचे व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली.” सरदारांच्या नेमणुका, त्यांच्या बदल्या,राज्याचा कारभार,बादशाही मुलुखांवरील हल्ले या सर्व गोष्टी तिच्या तंत्राने चालू लागल्या. ताराबाईंनी आपल्या सैन्याची योजना अशी केली की सिरोंज,मंदसोर,माळवा या प्रांताच्या सरहद्दीपर्यंत धामधूम उडविली.
बादशहाने आपली अर्धी हयात मोहिमा करणे व किल्ले घेणे यात घालविली. ताराबाईशी तो शेवटपर्यंत लढला पण मराठ्यांचे बळ व बंड ही देवसेंदिवस वाढत गेले. तत्कालीन मराठी कवी गोविंद याने ताराबाईंच्या पराक्रमाचे सार्थ वर्णन केले आहे:-
“दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुरणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलयाची वेळ झाली | मुगलहो सांभाळा ||”
महाराष्ट्रातील जनतेला युद्धाबद्दल आत्मीयता नसती आणि त्यात भाग घेतला नसता तर हे मराठ्यांचे राज्य यावनी झाले असते. मराठ्यांनी खूप मोठा लढा देउन स्वतःचे राज्य राखले.
अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५) -
अख्ख्या पेशवाईत अलौकिक, अतुलनीय कर्तबगारी गाजवणारी स्त्री अहिल्याबाई होळकर.
अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे१७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला.त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकविले.
बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेमुळे ८ वर्ष्याच्या अहिल्यादेवींना,मल्हाररावांनी एका देवळात बघितले.मुलगी अवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.
मल्हारराव होळकरांची सून. मल्हाररावासारख्या मातब्बर सरदारांच्या घराण्यात अहिल्याबाई आल्या खऱ्या, पण आयुष्यभर दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकून राहिल्या. कुंभेरीच्या वेढ्यात तोफोचा गोळा लागून त्यांचे पती खंडेराव ठार झाले. ऐन तारुण्यात वैधव्याचे संकट कोसळले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या तेव्हा मल्हाररावांनी "तुच माझा खंडू....या म्हाताय्राची तुला कीव येवू दे" अशी विनवणी करून त्यांना सती जाण्यापासून रोखले. मल्हारावांनी अहिल्याबाईंना आपला पुत्र मानूनच राज्यकारभारासाठी तयार केले. महसूल, न्याय,अर्थ, लष्कर, राजनीती अशा राज्याच्या अनेक बाबींत त्यांना पारंगत केले होते. सन १७६६ मध्ये मल्हाररावांचे निधन झाल्यावर माळव्यातील ७४ लाखाच्या इंदूरच्या जहागिरीची सर्व जबाबदारी अहिल्याबाईंवर पडली. पुढे लगेच त्यांचा एकुलता एक तरुण मुलगा मालेराव मृत्यूमुखी पडला. अहिल्याबाई एकट्या पडल्या. पुढे आपल्या मुलीच्या मुलास जवळ केले. पण मृत्यूने त्याच्यावरही घाला घातला. अहिल्याबाईंचे वैयक्तिक जीवन पूर्ण उद्ध्वस्त झाले.
अहिल्याबाई अशा संकटांनी खचून जाणाऱ्या स्त्री नव्हत्या. सर्व काही ईश्वरी इच्छेने होते अशा श्रध्दा ठेवून त्यांनी आपले जीवन प्रजेच्या उध्दारासाठी वाहिले. कार्यक्षम राज्यव्यवस्था, चोख न्याय, निर्भीड राजनीती,अपार दानधर्म, अन्नछत्रे, पाणपोया, सर्वत्र असंख्य मंदिरांचा जीर्णोध्दार व नव्या मंदिरांची बांधणी, तीर्थक्षेत्री नदीतीरांवर घाटांची उभारणी अशा गोष्टी केल्या. १८ व्या शतकात आहिल्याबाईंची किर्ती जगभर गाजली. अहिल्याबाईंचे दातृत्व कप्णासारखे अलौकिक होते. या दानधर्मासाठी त्यांनी राज्याचा खजिना वापरलेला नव्हता, त्यासाठी स्वत:ची सर्व संपत्ती कारणी लावली. अहिल्याबाई धर्मनिष्ठ व सात्त्विक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्यात व्यावहारिक चातुर्य, राजकारणातील नैपुण्य व संकटांवर मात करण्याची जिद्द हे गुण होते. मालेरावांच्या निधनानंतर राघोबा दादाने इंदूरवर स्वारी करण्याचा बेत रचल्याचे समजताच अहिल्याबाई फौजेची सिध्दता करून त्याच्याशी लढाई देण्यास तयार झाल्या. त्यांनी राघोबास निरोप धाडला :- "क्षिप्रा उतरला असता तुमची आमची तलवार चालेल, याचा विचार करुनमगच पाऊल टाकणे." या बाणेदार निरोपाने राघोबा मनात चरकला आणि मग त्याने सारवासारवीची भाषा सुरु करून स्वत:ची फजिती करून घेतलीझालेल्या या प्रकाराने अहिल्याबाईंच्या बाणेदारपणाचा लौकिक सर्व हिंदुस्थानात झाला.
आपल्या असामान्य धर्मनिष्ठे मुळे व अलौकिक दातृत्त्वामुळे त्याकाळी अहिल्याबाई सर्व हिंदुस्थानातील लोकांच्या आदराचे स्थान बनून राहिल्या. पुण्यश्लोक,देवी, साध्वी अशा बिरुदावल्या त्यांना बहाल केल्या गेल्या. आजह सर्व देशात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...