१३ डिसेंबर इ.स.१६९२
इ. स. १६९२ चा पावसाळा संपताच संताजी आणि धनाजी ह्या दोन मराठा वीर सेनानींनी ३० हजार फौज घेऊन ते मद्रासकडे येण्यास निघाले. त्या सैन्याचा मुक्काम प्रथम कांजिवरम जिल्ह्यात झाला. मराठी सैन्याच्या आकस्मिक उग्र चालीमुळे मद्रासमधील लोकांत घबराट पसरली आणि ते मद्रास किल्ल्याच्या आश्रयास ११ ते १३ डिसेंबरमध्ये गेले. संताजींची फौज कावेरी पाकजवळ आल्याचे कळताच, कांचीचा मोगल फौजदार अली मर्दानखान त्यांजवर चालून गेला. संताजींच्या जाळ्यांत तो व त्याचे सैन्य पकडले गेले. आपला काही इलाज नाही हे खानाच्या लक्षात येताच त्याने कांजीवरमला परतण्याचा प्रयत्न केला तेव्हा मराठी सैन्याने त्याला त्याच्या १५०० घोडेस्वारांसह पकडले तसेच ६ हत्ती पकडले. खानाच्या सैन्याचे तंबू लुटले, सामानही लुटले १३ डिसेंबर १६९२ खानाला पकडून त्यास मराठ्यांनी कैद केले व त्यास जिंजीस घेऊन गेले. त्याजकडून एक लाख होनाचा जबर दंड घेऊन मराठ्यांनी सोडून दिले. ही दंडाची रक्कम त्याचा मेहुणा अलिकादीर याने उभी केली होती. हा महत्त्वपूर्ण विजय मिळवून संताजींनी अतिउत्साहाने जिंजीच्या पायथ्याशी आले. तेथे मोगल आणि मराठे यांच्या युद्धास तोंड लागले. धुमश्चक्रीची युद्धे सुरू झाली. मराठ्यांचे सैन्य ३० हजाराहून अधिक होते. मोगल फौज थोडी होती. त्यापैकी बरीच फौज छावणीचे रक्षण आणि शहाजाद्यांवर पहारा करण्यात गुंतली होती. काही फौज असदखानाच्या तैनातीत होती. मोगली सैन्यास संताजींच्या फौजेच्या कारवाईमुळे रसद मिळणे कठीण झाले. संताजीं वेढा घालून बसलेले मोगल सैन्यास घेरून त्यांचा रसद आपल्या कबजांत घेऊन त्यांना जिंजीचा वेढा उठविणे भाग करून कसे टाकले हे मार्टीनच्या डायरीवरून समजून घ्यावयास मिळते.
No comments:
Post a Comment