मराठे आणि इंग्रज यांच्यात झालेली आरमारी लढाई
खांदेरीची मोहीम
जगभरातील बलाढ्य नौदलाचा विचार करता आज भारतीय नौदल जगात सहाव्या क्रमांकावर आहे. अनेक वेगवेगळ्या युद्धनौकांनी सुसज्ज असलेल्या या नौदलाची कीर्ती आज जगभर पसरली आहे. पण हे प्रचंड नौदल केव्हा आणि कसं सुरू झालं हे आपल्याला माहीत आहे का? चला, नौदलाच्या या गौरवशाली सुरुवातीबद्दल जाणून घेऊया.
साधारण १६५६ सालची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या कोकण प्रांतात वसलेलं कल्याण हे शहर विजापूरच्या आदिलशहाने मुल्ला अहमद नवातीय नावाच्या सुभेदाराच्या स्वाधीन केलं होतं. १६५६ मध्ये आदिलशहाने मुल्ला अहमदला प्रकृती अस्वास्थ्यामुळे विजापूरला बोलावलं, आणि नेमकं इथे याचाच फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी कल्याणवर हल्ला केला. दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर दादाजी बापूजी रांझेकर नावाच्या एका मराठा सरदाराने कल्याण आणि भिवंडी या दोन्ही ठाण्यांवर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवला. या घटनेनंतर काही दिवसांतच शिवाजी महाराज स्वतः कल्याणला आले. या ठिकाणची भौगोलिक रचना आणि महत्त्व समजून महाराजांनी त्याच क्षणी इथे किल्ला बांधण्याची आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिली. या ठिकाणी पूर्वीपासूनच असलेल्या देवीच्या नावावरून या किल्ल्याला "दुर्गाडी" असं नाव देण्यात आलं.
कल्याण शहर हे सिंधसागराच्या एका विशाल खाडीवर वसलेलं होतं, आणि आजही आहे. नकाशावर नजर टाकली तर असं दिसून येईल की पूर्वी कल्याणहून जलमार्गाने सिंधसागराला जाऊन मिळण्यासाठी आधी ठाणे आणि वसईच्या परिसरातून जावं लागत असे. ठाणे आणि वसई या दोन्ही ठिकाणी पोर्तुगीज होते, या वेळेस मुंबईतही अजून पोर्तुगीजच होते बरं, मुंबई बेट अजूनही इंग्रजांना देण्यात आलं नव्हतं. या मोठ्या युरोपीय शक्तीला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कल्याण हे अत्यंत महत्वाचं होतं, त्यातच अनेक प्राचीन मार्ग कल्याणमधून गेले असल्याने याचं महत्व आणखीनच वाढलं. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराजांनी आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. ज्याप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीज जहाजे सिंध समुद्रात, विशेषत: मराठा राज्याच्या शिखरावर असलेल्या कोकणात मुक्तपणे फिरत होती, अन या आरमाराच्या बळावर त्यांनी स्थानिक लोकांवर आपला अधिकार प्रस्थापित केला होता, त्याचप्रमाणे आपल्यासाठीही, कोकण किनारपट्टीवर आपला अधिकार चालावा या शक्तींवर बारीक लक्ष ठेवता यावं यासाठी आपलं आरमार असणं महाराजांना आवश्यक वाटू लागलं होतं. एका स्वतंत्र नौदलाचा विचार हाच मुळी क्रांतिकारी होता. महाराजांनी ताबडतोब आपल्या अधिकाऱ्यांना युद्धनौका बांधण्यासाठी पोर्तुगीज तज्ञांची मदत घ्यायला सांगितलं. कल्याण परिसरातील दोन पोर्तुगीज तज्ञ ही मदत करण्यास सुरुवातीला तयार झाले. एकीकडे खाडीच्या किनाऱ्यावर किल्ला बांधला जात असतानाच हळूहळू मराठा नौदलाची जहाजे खाडीच्या काठावर तरंगताना दिसू लागली. आजूबाजूच्या घनदाट जंगलात असलेल्या 'सागवान' नावाच्या झाडाचं लाकूड जहाजांना योग्य आहे हे समजल्यावर काम अधिकच जलदगतीने सुरू झालं. अवघ्या काही कालावधीतच अशा २० युद्धनौका तयार झाल्या. आता मात्र ही बातमी ठाणे व आसपासच्या पोर्तुगीजांना मिळताच त्यांनी त्या दोन पोर्तुगीज तज्ञांना दमात घेतलं आणि मराठ्यांना मदत न करण्यास भाग पाडलं. अर्थात, तोपर्यंत मराठ्यांनी युद्धनौका तयार करण्याची ही पद्धत आणि तंत्र आत्मसात केलं होतं. जहाजबांधणीचे हे काम त्या दोन तज्ञांच्या जाण्यानंतरही सुरूच राहिलं. या घटनेच्या बरोबर एक वर्षानंतर गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने आपल्या राजाला पत्र लिहून सांगितलं आहे की, "शिवाजी नावाच्या एका माणसाने आमचे वसई, चौल असे प्रांत काबीज केले आहेत. त्यामुळे त्याची शक्ती आणखी वाढली आहे. त्याने कल्याण-भिवंडी ताब्यात घेतली आहे आणि अनेक युद्धनौका ताब्यात घेतल्या आहेत, आणि पनवेलच्या परिसरात आणखी बांधणीही सुरु आहे, त्यामुळे आता काळजी घ्यावी लागणार आहे. या युद्धनौका समुद्रात जाऊ नयेत, यासाठी आम्ही आमच्या कॅप्टनला आदेश दिले आहेत, की या युद्धनौका कल्याणच्या खाडीतून कधीही समुद्रात उतरणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी."
पण पोर्तुगीजांची ही कल्पना स्वप्नवतच राहिली. अवघ्या आठ वर्षांत महाराजांच्या युद्धनौकांचा एक मोठा ताफा कल्याणहून निघाला आणि सिंधसागरात उतरला. कुठून? पोर्तुगीज जिथे स्थायिक झाले होते त्याच मार्गाने! हे मराठा नौदल पारसिक, वसई सारख्या पोर्तुगीजांच्या मोठ्या सागरी ठाण्यांसमोरून समुद्रात उतरलं, पण पोर्तुगीज मात्र काही करू शकले नाहीत. मराठा आरमाराचा हा ताफा किती मोठा होता? सुमारे ८५ लहान आणि ३ मोठ्या युद्धनौकांनी सुसज्ज असं हे मराठ्यांचं आरमार पहिल्यांदा खुल्या सागरात उतरत होतं. इंग्रजांच्या मुंबई, राजापूर आणि वसई, चौल इत्यादी पोर्तुगीजांच्या तळांसमोरून जात महाराजांहे आरमार अखेरीस गोव्याजवळ पोहोचलं. दि. ८ फेब्रुवारी १६६५ रोजी शिवाजी महाराजांनी प्रथमच त्यांच्या प्रचंड नौदलाच्या युद्धनौकेवर औपचारिकपणे पाऊल ठेवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच दिवशी मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण म्हणून देऊन टाकलं, ज्या इंग्रजांना पुढे महाराजांच्या या आरमाराशी झुंजावं लागणार होतं. महाराजांनी युरोपीय शक्तींचा पराभव करण्यासाठी आणि सिंधसागरमध्ये आपल्या नौदलाचे लहान-मोठे तळ असावेत यासाठी अनेक सागरी किल्लेही बांधले होते. एक वर्षापूर्वीच महाराजांनी कोकणातील मालवण इथे एक प्रचंड किल्ला बांधण्याचा आदेश दिला होता. एकंदरीतच विस्ताराने मजबुती पाहता पुढे या किल्ल्याचं नाव ठेवण्यात आलं 'सिंधुदुर्ग'! यावेळी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग इत्यादी किल्लेही या काळात तयार झाले होतेच.
दि. ८ फेब्रुवारी रोजी, महाराजांनी एका युद्धनौकेवर पाऊल ठेवल्यानंतर केवळ सहा दिवसांनी हा सारा ताफा गोव्याच्या दक्षिणेकडील बसरूर इथे जाऊन पोहोचला. मराठ्यांनी दिवसभर हे आदिलशाही शहर अक्षरशः लुटलं. या साऱ्यात दोन कोटी रुपयांचा खजिना मराठ्यांच्या हाती सापडला, अन सात श्रीमंत उद्योगपतींना मराठ्यांनी कैद केलं. यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यासह आसपासच्या इतर आदिलशाही ठाण्यांवर हल्ला चढवला. इथे एकाच वेळी खुष्कीच्या म्हणजे जमिनीच्या मार्गाने आणि दुसरीकडे समुद्रातून कारवारवर स्वारी करण्याचा महाराजांचा बेत होता, परंतु शेरखान या आदिलशाही सेनापतीने शिवाजी महाराजांना कारवारला न येण्याची विनंती केली आणि कारवारवरील मराठ्यांचा हल्ला थांबवला. हे सगळं होताना राजापूरचे इंग्रज या सगळ्या गोष्टींवर नजर ठेऊन होते. तरीही, इंग्रजांनी अद्याप मराठा युद्धनौकांना या वेळी तरी आपल्या तोलामोलाचं न मानता चेष्टाच केली. पण पुढे मात्र हे चित्रं नेमकं उलटं होणार होतं. कसं? याचं उत्तर आपल्याला पुढे मिळेलच.
या साऱ्या घटनांनंतर आपण शिवाजी महाराजांच्या या नौदलाच्या सर्वात मोठ्या मोहिमेकडे येऊ. ही घटना आहे मुंबईच्या अंगणात झालेल्या एका भल्या मोठ्या सागरी युद्धाची. मुंबईच्या दक्षिण-पूर्व भागात, कोकणच्या किनारपट्टीला लागून मांडवा-थळ च्या समुद्रात दोन मोठी बेटं. ब्रिटीश या बेटांना हेन्री-केन्री म्हणत, आणि प्रत्यक्षात त्यांची नावे होती खांदेरी आणि उंदेरी. शिवाजी महाराजांची दृष्टी आधीपासूनच या दोन बेटांवर होती, विशेषत: मुघलांशी तह मोडल्यानंतर महाराजांनी गमावलेले सर्व किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला तेव्हापासूनच. दि. २२ एप्रिल १६७२ रोजी सुरतहून मुंबईला लिहिलेल्या पत्रात मुंबईच्या ब्रिटिशांना इशारा देण्यात आला होता की शिवाजी महाराज हेन्री-केन्री येथे किल्ला बांधणार आहेत. पण, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय आणि इतर काही कारणास्तव महाराजांची ही इच्छा पुढील काही वर्षे पूर्ण होऊ शकली नाही.
महाराजांचे हे स्वप्न १६७९ साली पुन्हा सत्यात उतरण्याची चिन्ह दिसू लागली. या वेळी मुंबईहून सुरतला लिहिलेल्या पत्रात इंग्रजांनी म्हटलं आहे की, "काही पोर्तुगीज आणि हिंदू लोकांच्या सल्ल्यानुसार, शिवाजी मुंबई बेटाच्या जवळ हेन्री-केन्री येथे किल्ला बांधत आहे. जर आपण ही दोन्ही बेटं त्याच्या हाती सहजगत्या जाऊ दिली तर या महत्त्वाकांक्षी राजाला निमित्तच मिळेल, आणि असं झालं तर आपल्यासाठी मोठ्या संकटाची नांदी ठरेल. आपल्या नौदलाच्या बळावर तो मुंबईचा आसपासच्या परिसराशी असलेला आपला संपर्क तोडू शकतो. शिवाजीने चौलमधील कारागिरी आणि इतर साहित्य चोख केले आहे. जर त्याने येथे किल्ला बांधला तर नंतर ती जागा ताब्यात घेणे आपल्यासाठी फार कठीण जाईल. त्यामुळे आतापासून आपण त्या दोन ठिकाणांवर आपला अधिकार दर्शवला पाहिजे."
ऑगस्ट १६७९ मध्ये महाराजांनी या दोन बेटांच्या काठावर वसलेल्या 'थळ' नावाच्या ठिकाणाहून किल्ले बांधण्यासाठी काही लहान जहाजे आणि चार तोफांसह १५० लोकांना खांदेरी बेटावर पाठवलं. ही सागरी मोहीम एका पराक्रमी आरमारी मराठा अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली होती. या अधिकाऱ्याचं नाव होतं मायनाक भंडारी. मायनाकने यापूर्वीही अनेक सागरी मोहिमांमध्ये भाग घेतला होता. मायनाक भंडारी आणि बाकीचे मराठा सैन्य खांदेरीवर उतरल्यावर काही दिवसांतच इंग्रजांनी त्यांना हे बेट सोडण्याचा आणि निघून जाण्याचा 'आदेश' दिला. यावर मायनकने अतिशय शांतपणे उत्तर दिले, "महाराजांची आज्ञा होईपर्यंत आम्ही हे काम थांबवणार नाही." इंग्रज चरफडले. पाऊस थोडा कमी झाल्यावर सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात इंग्रजांनी 'हंटर' नावाची एक मोठी युद्धनौका खांदेरीच्या आसपास पाठवली आणि मायनाकला सांगितलं की, "हे बेट इंग्लंडच्या राजाचं आहे, जर तुम्ही येथे किल्ला बांधला तर ते इंग्लंडविरुद्ध शत्रुत्वाचं कृत्य मानलं जाईल." मायनकने या बडबडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मराठ्यांच्या खांदेरीवरील या कारवाया आणि काम थांबवण्यासाठी इंग्रजांनी शेवटी तीन लहान नौका पाठवल्या, पण त्यांनाही काही करता आलं नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, मायनाक आणि त्याच्या माणसांनी खांदेरी बेटाच्या भोवती एक यार्ड (सुमारे १ मीटर) उंच भिंत बांधून कोणतीही बोट बेटाजवळ येऊ नये आणि इंग्रजांची माणसं सहजगत्या बेटावर उतरू नये म्हणून व्यवस्था केली होती. अशातच इंग्रजांची एक छोटी नौका मराठ्यांनी ताब्यात घेतली, ज्यामध्ये जॉर्ज कोल नावाचा एक मोठा अधिकारी आणि अनेक इंग्रजांना कैद केलं गेलं. इंग्रजांची मोठी जहाजं समुद्रातील खडक आणि उथळपणामुळे खांदेरी बेटाच्या जवळ जाऊ शकली नाहीत. याच्या नेमकं उलट मराठ्यांच्या छोट्या नौका मात्र इंग्रजांच्या युद्धनौकांना सहज चकवून किनाऱ्यावरून खांदेरी बेटाकडे जाऊ शकत होत्या.
काही दिवसांतच 'हंटर' सोबत तिला मदत म्हणून इंग्रजांनी 'रिव्हेंज' नावाची दुसरी मोठी युद्धनौका खांदेरीच्या आसपास पाठवली. त्यांना बातमी मिळाली होती की, दौलत खान नावाचा दुसरा एक मोठा अधिकारी मायनाक भंडारीच्या मदतीसाठी २० मोठ्या आणि ८-१० छोट्या युद्धनौका घेऊन येत आहे. या बातमीने मुंबईकर इंग्रजांना धक्काच बसला. त्यांनी आपल्या नौदल अधिकाऱ्यांना सांगितलं की, "दौलतखान खांदेरी येथे उतरला तर त्याच्याशी बोलणी वगैरे करायचं सोडून थेट हल्ला करावा, आणि युद्ध घोषित करावं." आता या दोन्ही मोठ्या इंग्रजी युद्धनौकांवर एक नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आला. त्याचं नाव होते रिचर्ड केग्विन. केग्विनने मुंबई बेटावरून २०० सैनिक आणून खांदेरीच्या आघाडीवर तैनात केले. ही लढाई आता इतकी महत्त्वाची बनली होती की मुंबई किल्ल्याच्या रक्षणासाठी मागे फक्त ५० सैनिक तैनात करण्यात आले होते.
इंग्रजांनी अजूनही मराठ्यांच्या आरमाराला आपल्या तोलामोलाचं कसं मानलं नाही हे आपण मागे पाहिलं. इंग्रजांच्या दोन्ही मोठ्या युद्धनौकांना चकवून दौलतखान खांदेरीला पोहोचला तेव्हा मुंबईहून केग्विनला निरोप पाठवण्यात आला की, "शत्रूच्या नौका खूप आहेत पण तरीही छोट्या आहेत, त्या तुमच्यासमोर काही करू शकणार नाहीत. त्यांच्या नौकांची अवस्था आणि दर्जा आमच्या जहाजांपेक्षा अत्यंत निकृष्ट आहे. तुम्ही त्यांच्या लहान नौकांपैकी एक जरी काबीज केलं, तर बाकीच्यांना लक्षात येईल की शत्रूची ताकद किती कमी आहे." परंतु, हे होण्याआधी एके दिवशी, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता, मराठ्यांच्या नौकांचा एक ताफा जवळच्याच नागावच्या किनाऱ्यावरून समुद्रात आला, ज्यामध्ये सुमारे ५० लहान-मोठ्या युद्धनौकांचा समावेश होता. बाहेर येताच, इंग्रजांना तयारीसाठी वेळ न देता त्यांनी रिव्हेंज युद्धनौकेवर अचानक हल्ला करण्यास सुरुवात केली. इंग्रज या साऱ्यातून सावरून युद्धासाठी तयार होतात न होताच तोच मराठा आरमाराची ही तुकडी पुन्हा आपल्या जागेवर गेली. या साऱ्यामुळे इंग्रजांना आता भीती वाटू लागली होती, की कदाचित हीच परिस्थिती कायम राहिल्यास शिवाजी महाराज इतर युद्धनौका घेऊन मुंबईपर्यंत आरामात पोहोचू शकतील. केगविनने थेट मुंबईच्या अधिकाऱ्यांना लिहिले की, "आपण कितीही सावध असलो तरी शत्रूची जहाजे आपल्या हातात येत नाहीत. त्यांच्या छोट्या नौका आपल्या हातातून सहज निसटून मूळ जागी पोहोचतात. आमच्याकडेही अशा छोट्या नौका असाव्यात अशी आता गरज भासू लागली आहे." थोडक्यात, मराठा नौदल दिसायला लहान असलं तरीही चपळाईने ते सहज कोणालाही गुंगारा देऊ शकत होतं आणि त्याच्यासमोर नावाजलेल्या रॉयल आरमारालाही हात टेकावे लागले हे इंग्रजांनाही मान्य करावं लागलं.
या संपूर्ण घटनेत इंग्रज अधिकाऱ्यांचा श्वास अक्षरशः घशात अडकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुरतेच्या प्रमुख इंग्रज अधिकाऱ्यांनी खेरीस मुंबईकरांना ओरडून सांगितलं की, "आमच्यात आता आणखी काही काळ शिवाजीशी थेट लढण्याची ताकद उरलेली नाही. आता हे युद्ध चौलच्या पोर्तुगीजांच्या किंवा जंजिऱ्याच्या सिद्दीकडे सोपवलं पाहिजे, नाहीतर आपलं असंच नुकसान होत राहील पुढेही." अखेरीस, जानेवारी १६८० मध्ये इंग्रजांनी खांदेरी आणि उंदेरी या दोन्ही बेटांवर मराठ्यांच्या हक्काला मान्यता दिली. पण, याच्या काही दिवस आधी इंग्रजांच्या मदतीला आलेल्या जंजिऱ्याच्या सिद्दीने उंदेरी बेट ताब्यात घेतलं होतं. उंदेरी गमावली, पण खांदेरी मात्र पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात आलं आणि तेथे एक बुलंद किल्ला बांधण्यात आला.
खांदेरीची ही सागरी लढाई इतिहासात प्रसिद्ध झाली आहे, कारण या युद्धात मराठा आरमाराने त्या काळातील प्रसिद्ध ब्रिटिश नौदलाचा पराभव केला. मराठा आरमार हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा कांगावा युरोपीय महासत्ता करत असतानाच, मराठा आरमाराने मात्र आपल्या ताकदीच्या जोरावर हे नव्या युगाचं नौदल असल्याचं दाखवून दिलं. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही काळाने मराठा आरमाराची कमान 'कान्होजी आंग्रे' या धाडसी अधिकाऱ्याच्या हाती आली. आज यांच्याच नावावरून खांदेरी बेटाला अधिकृतपणे 'कान्होजी आंग्रे बेट' असं नाव देण्यात आलं आहे. इ.स. १७५६ सालच्या तुळाजी आंग्ऱ्यांवरच्या मोहिमेत विजयदुर्गचं तुळाजींचं आरमार दुर्दैवाने नष्ट झालं असलं तरीही इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे सबंध आरमार इथे बुडालं नाही. आजवर पसरलेला हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तुळाजींच्या नंतरही कुलाबकर आंग्रे हे होतेच, सोबतच विजयदुर्गच्या मराठा आरमाराची धुरा सरदार धुळपांनी सांभाळली. या आरमाराने पुढे लगेच पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात या खांदेरीच्या मोहिमेची आठवण करून देत इंग्रजांची तशीच अवस्था केली आणि त्यांना सळो की पळो करून सोडलं.
मराठा नौदलाच्या आधी, प्राचीन भारतीय राजसत्तांची स्वतःची नाविक दलं जरी असली तरी ती स्वतंत्र राज्यांग म्हणून गणली गेली नव्हती. दक्षिणेतील चोळ राजवंश असो वा गोमंतकाचे कदंब, या साऱ्यांची नौदलं ही केवळ व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी होती. महाराजांच्या काळात मात्र नौदल हे लष्करासारखं एक वेगळं अंग मानलं गेलं. रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात स्पष्टच म्हटलं आहे, "आरमार म्हणजे येक स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजवल आरमार त्याचा समुद्र. या करितां आरमार अवस्यमेव करावे." अमात्यांनी आज्ञापत्रात आरमारावर एक स्वतंत्र प्रकरण दिलं आहे, ज्यात आरमाराची बांधणी आणि व्यवस्था कशी असावी, व्यापारी जहाजांसंबंधी त्यांचं धोरण काय असावं, आरमारी युद्धात नेमकी कशी काळजी घ्यावी, आरमारी छावणी कशी करावी आदी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे. मराठा नौदलापासून प्रेरणा घेऊन आपल्या स्वतंत्र नौदलाने पुढच्या तीन शतकांत तोच मार्ग अवलंबला. आज आपल्या बलाढ्य नौदलात विमानवाहू जहाजे आणि पाणबुड्या सोडल्या तर इतर सर्व युद्धनौकांची रचना जवळपास मराठा युद्धनौकांसारखीच दिसते. यामध्ये मोठ्या विनाशिका (पाल), मध्यम श्रेणीच्या फ्रिगेट्स (गुराबा), लहान पण घातक मारा करणाऱ्या कॉर्व्हेट्स आणि किलर्स प्रकारातील नौका (गलबत, मचवे इ.) आणि इतर अनेक युद्धनौका यांचा समावेश होतो. हे नुसते सांगण्यासारखे नाही, तर भारतीय नौदल आजही छत्रपती शिवाजी महाराजांना 'भारतीय नौदलाचे जनक' म्हणून अभिमानाने संबोधतं, त्याचं मूळ इथे आहे.
स्रोत:
• जेधे करीना
• मुन्तखल-उल-लुबाब ए महम्मदशाही: खाफीखान
• शिवचरित्र, शेजवलकर आणि पगडी
• शिवकालीन पत्र संग्रह, खांदेरीशी संबंधित सुमारे ३० पत्रे
• शिवचरित्रप्रदीप
• इंग्लिश रेकॉर्डस् ऑन शिवाजी
• सभासद बखर
- © कौस्तुभ कस्तुरे
No comments:
Post a Comment