यशवंतराव १९६२ला देशाचे संरक्षण मंत्री झाले त्यानंतरची ही गोष्ट..
एकदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना ते संत एकनाथांच्या पैठण जवळून निघाले होते. रस्त्याच्या एका बाजूला आठ-दहा माणसे उभी होती. काही तरुण तर काही वयोवृद्ध लोक जाणाऱ्या ताफ्याकडे आतुरतेने पहात उभे होते.
ते पाहून यशवंतरावांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. गाडी गर्दीजवळ जाऊन थांबली. 'मंडळी का थांबला आहात?' यशवंतरावांनी विचारले.
गर्दीतून दोन म्हातारी माणसे पुढे आली. त्यांनी विचारले, 'चव्हाण साहेबांची गाडी हीच काय?'
यशवंतरावांना वाटले लोकांना तक्रार किंवा निवेदन द्यायचे असेल. ते गाडीतून खाली उतरले.
त्यांना म्हणाले, 'हो, मीच यशवंतराव चव्हाण. बोला काय अडचण आहे ?'
'अडचण काही नाही' असे म्हणून एका वृद्धाने हातातल्या पिशवीतून एक रुपयांच्या नोटांचा हार बाहेर काढला आणि त्यांच्या गळ्यात घातला.भोवती उभे असलेल्या लोकांनी नकळतच टाळ्या वाजवल्या.
या अनपेक्षित व अकृत्रिम स्वागताने यशवंतराव साहजिकच भारावून गेले.
ते हात जोडून म्हणाले, 'बाबा, या पैश्यांचं मी काय करू ?'
'तुला खाऊ घे. तुझ्यासारखा पुत्र व्हावा अशी खूप इच्छा होती. म्हणून तुला खाऊला हे पैसे आणले आहेत. सुखी रहा' असे म्हणून त्या वृद्धाने यशवंतरावांच्या पाठीवर हात ठेवला.
यशवंतरावांनी वाकून नमस्कार केला. प्रेमाने त्यांना आलिंगन दिले व गाडीत जाऊन बसले. सर्वांनी हात वर करून त्यांना निरोप दिला. गाडी निघाली.
यशवंतरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. पण आज त्यांना वडिलांची भेट झाल्यासारखे वाटले !
तसं पाहिलं तर आपल्या पिढीला यशवंतरावांची आपल्या राज्याचे पाहिले मुख्यमंत्री ही ओळख सोडली तर फार काही माहीत नाही..पण..त्यांनी घेतलेले अनेक निर्णयांनी महाराष्ट्रावर व देशावर सोडलेली छाप आजही कायम आहे.
त्यातील मला माहीत असलेले काही निर्णय म्हणजे
१) महाराष्ट्रात सर्वात आधी लागू झालेला आणि नंतर त्याचे यश पाहून पूर्ण देशाने लागू झालेला ३ स्तरीय पंचायत राज कायदा..!
म्हणजेच आज देशातल्या प्रत्येक गावात दिसणारी ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्यात यशवंरावांचे योगदान आहेच..!
२) १९६२ ची लढाई चीनकडून हरल्यानंतर.. उत्तमोत्तम शिक्षित अधिकारी सैन्यात यावे म्हणून सुरू झालेले आणि आजतागायत चालू असलेले ' Short Service Commission ' त्यांच्याच कार्यकाळात चालू झाले होते.
३) खानदेशातील तापी नदीचे पाणी जास्त ६५% खानदेशाला आणि ३५% गुजरातला हा निर्णयही त्यांचाच..नाही तर ६५% पाणी गुजरात पळविनार होते..! ह्या निर्णयात मधुकरराव चौधरी यांचेही मोठे सहाय्य होते.
४) महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक यांचे निवासस्थान असलेली वांद्रातील सरकारी योजने अंतर्गत उभी राहिलेली ' साहित्य सहवास ' सोसायटी ही देखील त्यांच्या पुढाकारांने स्थापन झाली होती.
५) यशवंतराव द्विभाषिक महाराष्ट्राचे मुखमंत्री असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या पक्षाला तेव्हा विरोध असूनही.. पक्षातील व मंत्रिमंडळातील विरोध न जुमानता..१९५६ ला धर्म बदललेला असूनही चालू ठेवलेले आणि अजूनही चालू असलेले अनुसूचित जातींचे आरक्षण ह्या निर्णयातही त्यांचा मोठा हात होता.
६) देशात धरण किंवा प्रकल्प ग्रस्त यांच्या पुनर्वसनाचा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य त्यांच्याच मुळे बनले होते.
७) बाकी मराठवाडा विद्यापीठ, वारणा दूध संघ , राजाराम कारखाना इ अनेकानेक गोष्टींसाठी त्यांचा direct / indirect हातभार लागला आहेच.
व महाराष्ट्राला योग्य ती दिशा देण्यात त्यांचे महत्वाचे योगदान लाभले आहे..
टीप - वरील आठवण ही पत्रकारांनी नाही..तर यशवंतरावांच्या सचिवांनी ते गेल्यानंतर प्रसिद्ध केली होती..?!
आणखी एक गोष्ट
यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते, त्यांच्या मोटारींचा ताफा पंजाबातून दिल्लीकडे येत होता. रस्त्यात एका मोठ्या गावात "पानिपत' नावाचा नामफलक त्यांना दिसला. आपला प्रवास खंडित करून जेथे पानिपताचा समरप्रसंग घडला, त्या "काला आम' नावाच्या ठिकाणी ते गेले. तेथे मराठी वीरांच्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधीच्या समोरच त्यांनी शेतात अचानक बसकण मारली. त्या रानची पांढुरकी माती त्यांनी आपल्या दोन्ही मुठींमध्ये धरली व कविहृदयाचे यशवंतराव हमसून हमसून रडू लागले. त्यांची ही अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची तारांबळ उडाली. भावनेचा पहिला पूर ओसरल्यावर आपल्या ओघळत्या अश्रूंना कसाबसा बांध घालत यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले, दोस्तहो, हीच ती पवित्र माती. राष्ट्रसंकट उद्भवल्यावर त्याविरोधात लढावे कसे, शत्रूला भिडावे कसे, याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे..
Ref and Credit -
कथारुप यशवंतराव
By Adv. Raosaheb Shinde
No comments:
Post a Comment