विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 December 2023

छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारीसाठी राजगडावरून प्रस्थान...!

 


छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारीसाठी राजगडावरून प्रस्थान...!
मुघल साम्राज्याला हादरा देणारे शिवशाहीतील एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची पहिली लूट. शाईस्तेखानाने स्वराज्यात राहून केलेली स्वराज्याची नासधूस, या सर्व काळामध्ये महाराजांचे पन्हाळगडावरून पलायन, चाकणचा वेढा, उंबरखिंडीचे युद्ध, या सर्व घटनांवर मात करीत महाराजांनी रामनवमीच्या दिवशी केलेला शाईस्तेखानाचा पराभव, या सर्व घटनांमुळे स्वराज्याचा खजिना रिकामा होत होता. याची भरपाई म्हणून महाराजांनी एक धाडसी मोहीम आखली. ही मोहीम स्वराज्यात राहून नव्ह, तर स्वराज्याचा बाहेर जाऊन राबवायची होती, मुघली गोटात शिरून, चोख तयारीनिशी महाराजांनी मनसुबा आखला. या नव्या शिलांगणाची मोहीम महाराजांनी आपल्या सगळ्यात विश्वासू हेरावर सोपवली आणि ते म्हणजे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. (स.ब)
गुजरात प्रांतातील सुरत शहर म्हणजे अतिशय समृद्ध आणि श्रीमंत. दिल्लीच्या खालोखाल सुरतेचा मान होता. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या सुरत शहरामधून चाले. या सुरत शहरामधून मिळणार्या जकातीपोटीच औरंगजेबास वार्षिक १२ लक्ष रुपये मिळत असत. डच, इंग्रज, अरबी, फ्रेंच हे सगळे लोक सुरतमधून आपला व्यापार करत असत. सोने, हिरे, मोती, जड-जवाहीर याने सुरतेतील व्यापाऱ्यांचे कोश गडगंज भरलेले असत. अनेक अनमोल वस्तू, चंदन, अत्तरे, केशर, रेशमी कापडाचे ठाण अशा अनेक वस्तूंचा व्यापार सुरतेमधून चालत असे. या सर्व गोष्टी वगळता सुरतेला अनन्यसाधारण महत्त्व होते, कारण यवनी धर्मानुसार मक्का यात्रा अत्यंत पवित्र मानलेली आहे आणि मक्केला जाणारे यात्रेकरू हे सुरतेमधून जात असत. त्यामुळे सुरतेला मक्केचा दरवाजा असे संबोधले जात असे. सुरतेचे मूळ नाव 'सूर्यपूर' असे होते. तापी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले, समुद्र किनार्यापासून २७ मैल आत असणाऱ्या सुरतेची वस्ती तशी दाट होती. पण त्याभोवती यावेळी तटबंदीदेखील नव्हती. (अ.हो.मो)
सुरत राजगडापासून १५० कोस दूर आणि हा सगळा प्रवास मुघली प्रदेशातूनच होणारा. अशा या सोन्याच्या लंकेची खडा-न-खडा माहिती बहिर्जी नाईक यांनी गोळा केली.
सुरतेमधील सर्व धनिक मंडळी, त्यांची संपत्ती, सुरतेमधील मुघली बंदोबस्त ही सर्व माहिती घेऊन बहिर्जी महाराजांसमोर हजर झाले आणि सुरत शहराचा नकाशाच त्यांनी महाराजांपुढे मांडला आणि बहिर्जी महाराजांना म्हणाले, "सुरत मारल्याने अगणित द्रव्य मिळेल." बहिर्जीकडून ही सगळी माहिती ऐकल्यावर "लष्कर चाकरी नाफारी काम मनाजोगे होणार नाही याजकरिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे" या विचारे महाराजांनी स्वतः जाण्याचे निश्चित केले. (स.ब) सर्व सैन्याच्या जमावानिशी महाराजांनी मार्गशीष वद्य द्वितीया, शके १५८५ म्हणजेच ६ डिसेंबर १६६३ रोजी सुरतेसाठी राजगडाहून प्रस्थान केले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...