१२ जानेवारी १७०८ साली गादीवर आलेल्या शाहू महाराजांच्या काही मागण्या अमान्य करून व्हिसेरेइने छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध शाहू काळात संपुष्टात आणले,त्यातून मराठे आणि पोर्तुगीज लढ्याला सुरुवात झाली.शाहू महाराजांच्या विरोधात गेलेल्या कान्होजी आंग्रेंनाही इ स १७२१ साली आंग्रे विरुद्ध पोर्तुगीज-इंग्रज लढ्यात शाहू महाराजांचे स्वामित्व स्वीकारायला शाहू महाराजांनी भाग पाडले.शाहू महाराजांच्या सैन्याला तोंड देणे म्हणजे संपूर्ण हिंदुस्तानाला आव्हान करण्यासारखे आहे हे जाणून असलेल्या व्हिसेरेइने आंग्रेंच्या बाजूने समोर उभ्या असलेल्या शाहू महाराजांच्या सैन्यासमोर माघार घेतली आणि समोर आलेल्या तहाला मान्यता दिली.
गादीवर आलेल्या शाहू महाराजांच्या दरबारात नजराणा घेऊन वकील पाठवायच्या मुळात जुन्याच असलेल्या या मागणीला व्हिसेरेइने नकार दिला.
इ. स.१६८४ ला छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी रायगडावर पोर्तुगीजांनी नजराणा पाठविला नव्हता आणि त्यामुळे त्याला माघारी परत पाठविले होते.शाहू महाराजांनीही तीच मागणी केली होती
जी व्हिसेरेइने अमान्य केली. महाराजांना हे कळल्यावर ते पोर्तुगीजांवर खूप चिडले.त्याच वेळेस ठाण्यातील प्रदेशात पोर्तुगीज मिशनरी हिंदूंचे सक्तीने धर्मांतर करून घेत असल्याची बातमी शाहू महाराजांना समजली.पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी शाहू महाराजांनी इ. स.१७२३ साली सरदार पिलाजी जाधव व सरदार दावलजी सोमवंशी यांना वसईवर हल्ला करण्याचा हुकूम दिला.ही लढाई बरेच दिवस चालू होती. त्या वेळी मराठे आणि मोगल युद्ध चालू होते.एकाच वेळी दोन-तीन आघाड्यावर युद्ध करणे शक्य नसल्याने आपल्या फायद्यात नसलेला तह देखील जानेवारी १७३२ ला मराठ्यांना मान्य करावा लागला.
इ स १७३३ साली सुरू झालेल्या मराठे-सिद्धी युद्धात सिद्धीला बाहेरून मिळत असलेल्या पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या मदतीमुळे १७३६ ला मराठ्यांना माघार घ्यावी लागली होती. या सर्व कारणांमुळे पोर्तुगीजांना ठेचून काढण्यासाठी शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यासाहित तडका- फडकी वसईवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
वसईच्या किल्ल्याची जबाबदारी शाहू महाराजांनी चिमाजी आप्पा यांच्यावर सोपवली.त्या कामगिरीत त्यांच्या सोबत मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे,शंकराजी नारायण, मानाजी आंग्रे व खंडोजी मानकर यासारखे मुख्य सरदार होते. या लढाईत विठ्ठल शिवदेव हे चिमाजी आप्पांसोबत होते.६ एप्रिल १७३७ ला
सुरू झालेली लढाई पुढे दोन वर्षे चालु होती.पोर्तुगीजांच्या किल्लेदाराने तहाची भूमिका घेतली पण मराठ्यांनी ती मान्य केली नाही.कारण वसई सारखा मजबूत किल्ला शत्रूच्या ताब्यात सोडून देणे योग्य नव्हते.करार झाला आणि आपण इथून निघून गेलो तर हे लोक दिलेला भाग हळूहळू परत आपल्या ताब्यात घेतली, त्यामुळे किल्ला लढत ठेवणे तसेच चालू राहिले.किल्ला काहीही करून पावसाळ्याच्या आत ताब्यात घ्यायचा असा मराठ्यांनाचा विचार होता आणि त्यापद्धतीने त्यांच्या हालचाली सुरू होत्या.मैदानात ठिकठिकाणी मोर्चे बांधले गेले होते.पोर्तुगीजांच्या तोफांचा मारा चुकवत एका मोर्च्यातून दुसऱ्या मोर्च्यात जाण्यासाठी सलाबतकुचा (जमीन आतुन खोदून तयार केलेला नागमोडी आकाराचा रस्ता) तयार केला गेला.किल्ल्यावर तोफा जास्त होत्या.किल्ल्यावरून तोफा आणि गरनाळा यांचा जोरदार हल्ला चालू होता.पण हटतील ते मराठे कुठले.शत्रू पक्षापेक्षा मोठ्या तोफा आणि गरनाळे लावून शत्रूच्या तोफा बंद करत किल्ल्याच्या तटाला तोफांनी हल्ला पोहोचेल यासाठी रस्ता केला पण पोर्तुगीजांनी सर्व तोफांचा भडिमार त्या एकाच ठिकाणी केल्यामुळे मराठ्यांना आत शिरता आले नाही.त्यामुळे नंतर मराठ्यांनी १७ फेब्रुवारी १७३९ ला जमिनीच्या बाजूने शंकराजी नारायण यांनी तर पाण्याच्या बाजूने आंग्रे यांनी किल्ल्याला चहू बाजूने वेढा दिला.पण तरीही तीन महिने मराठ्यांना किल्ला घेता आला नाही.ही लढाई दोन वर्षे चालू होती.दोन्ही बाजूने वार जशास तशे चालू होते.मराठ्यांचे सैनिक जीवाची बाजी लावून लढत होते पण सर्व व्यर्थ ठरत होते.शेवटी त्यांनी किल्ल्याला पाच ठिकाणी सुरुंग लावले. पहिल्या तीन सुरुंगाना आग लावली त्यापैकी दोन सुरुंग हे उडाले.ज्यामुळे तटाला मोठी खिंड (बोगदे) पडली.त्या बोगद्यातून मराठे आत शिरण्याचा प्रयन्त करू लागले. पण दुर्दैवाने त्या वेळी तटाचा तिसरा सुरुंग उडाला आणि त्यात बरेच मराठे कामी आले.त्या संधीचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला आणि मराठ्यांवर तोफांचा आणि बंदुकीचा भडिमार सुरू केला, त्यामुळे मराठ्यांना मागे हटावेच लागले.मराठे मागे हटलेले समजताच पोर्तुगीजांनी खिंडीत दगड रचून तो बोगदा बंद केला.पहिलेच एक सुरुंग उडाला होता पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.तटाचा शेवटचा सुरुंग उडायचा अजून बाकी होता.तो उडवण्याच काम मल्हारराव होळकरांनी हाती घेतले होते.त्यांनी सुरुंगाला पेटवले,त्यात मोठ्या प्रमाणात किल्ल्याचा बुरुज कोसळला आणि मराठ्यांनी परत किल्ल्यावर हल्ला केला.पोर्तुगीजांनी मातीच्या टोपल्या भिंतीवर रचून त्यावर तोफा लावून मराठ्यांना विरोध केला पण पोर्तुगीजांकडे लढण्यासाठी दारुगोळा खूप कमी राहिला होता आणि खाण्याच्या वस्तू तर संपतच आल्या होत्या.स्वतःचा जीव वाचण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ४ मे १७३९ ला पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली आणि १५ मे १७३९ ला त्यांनी काही शर्तीने किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला व आपल्या परिवारानिशी निघून गेले.
या लढाईत किल्ल्याच्या आतून लढत असल्यामुळे पोर्तुगीजांचे एकूण सैनिक आठशे पेक्षा कमी तर मराठ्यांचे पाच हजाराच्या आसपास सैनिक या लढाईत कामी आले.
तर काही संदर्भानुसार मराठ्यांचा १२-१४ हजार असा आहे.तर या युद्धात मराठ्यांचे २०-२२ हजार सैनिक मारले गेले तर पोर्तुगीजांचे एक हजाराच्या जवळ सैनिक मारले गेले असा पोर्तुगीजांचा अंदाज होता.
त्यामुळे या सैनिकांचा फिक्स आकडा सांगू शकत नाही.
या लढाईनंतर विठ्ठल शिवदेव यांनी मोठी फौज घेऊन कोकण प्रांतातील समुद्र किनाऱ्यावरील साष्टी,कल्याण व आसपासच्या ठिकाणांवर हल्ला करून ती ठिकाण आपल्या ताब्यात घेतली.
या युद्धात गोवा सरकर पूर्णपणे कंगाल झाले होते.त्यात त्यांची चाळीस लक्ष रुपयांचे नुकसान झाले होते. लांब पल्ल्याच्या, लहान-मोठ्या, ब्राँझच्या सर्व मिळून ५९३ तोफा त्यांनी गमावल्या होत्या.वसई सारखा महत्वाच्या किल्ल्यासोबत लहान मोठी वीस किल्ले, आठ शहरे,दोन तटबंदीच्या टेकड्या,ठाणे शहारासोबत साष्टी बेट, कारंजा बेट त्यांना गमवावी लागली.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कारणावरून मराठे आणि पोर्तुगीज संबंध खराब झाले,स्वतःच्या हट्टामुळे त्यांनी शाहू महाराजांना मोगलांचे मांडलिक म्हणून दरबारात नजराणा देऊन वकील पाठवण्यास नकार दिला होता यो हट्ट सोडून नाक रगडीत सातारला शाहू महाराजांच्या दरबारात वकीलासोबत नजराणा पाठवावा लागला.
संदर्भ-*मराठ्यांच्या इतिहासाची साधने
*विंचूरकर घराण्याचा इतिहास
*पोर्तुगीज मराठा संबंध
-सोनल पाटील,नाशिक
No comments:
Post a Comment