विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 12 December 2023

विठ्ठल शिवदेव विंचूरकर..भाग-२

 

भाग-२
लेखन ::सोनाल पाटील






*सन १७२०-
"सिद्दी साद" नावाचा नवाब जंजिरा बेटावर अमल करतील होता. त्याने दक्षिण कोकणात धुमाकूळ माजवला होता.त्याचा बिमोड करण्यासाठी शाहू महाराजांनी चिमाजी आप्पा यांना पाठवले.त्यांच्या सोबत विठ्ठल शिवदेव हे मोठे बहादूर शिलेदार त्यांच्या बरोबर होते.चिमाजी आप्पा आपल्या सैनिकांसहीत छावणी जवळ पोहोचले आणि लढाई सुरू झाली.या लढाईत विठ्ठल शिवदेव पुढे येऊन सिद्दी वर हल्ला केला आणि त्याला ठार मारले.त्याच्या फौजेचा बिमोड करून त्यांचे पुष्कळ घोडे आपल्या गोटात आनले.चिमाजी अप्पानी हा सर्व प्रसंग शाहू महाराजाना पत्राने लिहून कळवला. ते वाचून महाराज खूप खुश झाले.
त्यांनी कोकणात चिमाजी आप्पांना असा हुकूम पाठवला की ,"पेशव्यांचे निशाण पूर्वीपासूनच भगवे आहे त्यास आता जरीपटका लावावा, तसेच विठ्ठल शिवदेव यांनी आपल्या बहादुरीने सिद्दीच्या जे घोडे हिसकावुन घेतले आहेत त्यांजवर स्वारीची नेमणूक करून त्या स्वारीची सरदारी विठ्ठल शिवदेव यांनाच द्यावी".
साताऱ्याला आल्यावर लढाईची सर्व हकीगत महाराजांना सांगितली. विठ्ठल शिवदेव यांच्यावर खुश होऊन महाराजांनी त्यांना पेशव्यांच्या मुलूकगिरीत कायमच राहण्याचा हुकूम केला.त्या दिवसापासून विठ्ठल शिवदेव पेशव्यांच्या तैनातीत राहू लागले.त्याच वर्षात एक महत्वाची घटना घडली ती अशी की साताऱ्याचे मुख्य प्रधान "बाळाजी विश्वनाथ" हे 2 एप्रिल ला मरण पावले.ते कोकणस्थ ब्राम्हण असल्यामुळे त्यांच्या मागे त्यांचा मोठा मुलगा बाजीराव याला पंतप्रधानाची जागा देऊ नये असे प्रतिनिधी आणि अष्टप्रधान मंडळाची इच्छा होती पण प्रधानाच्या अंगी चातुर्य आणि शूरत्व हे गुण असावे असे महाराजांचे मत होते.त्यामुळे महाराजांनी अष्टप्रधानाची हरकत असतांनाही बाजीरावांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे त्यांना १७ एप्रिल १७२० साली पेशवाईचे वस्त्र दिली.
==================================
*थोरले बाजीराव यांच्या कारकिर्दीत विठ्ठल शिवदेव यांनी केलेले पराक्रम-*
शाहू महाराजांच्या आज्ञेनंतर विठ्ठल शिवदेव बाजीराव आणि चिमाजी आप्पा या बंधूंच्या सोबत राहू लागले.
*सन १७२३ साली माळव्याचा सुभेदार अजिमुल्लखान याने आपला सरदार दाऊद खान याला बाजीराव पेशवे यांच्यावर चालून जायला सांगितले. खान्देशात बऱ्हाणपूर जवळ दोघांची लढाई झाली.या लढाई वेळी विठ्ठल शिवदेव हे बाजीराव पेशव्यांच्या सोबत होते.त्यांनी दाऊद खानावर हल्ला करून त्याला मारून टाकले आणि त्याच्या फौजेवर विजय मिळवला.
*सन १७२४ साली बाजीराव पेशवे दिल्लीला गेले असता विठ्ठल शिवदेव त्यांच्या सोबत होते.त्यांनी प्रत्येक लढाईत चांगली कामगिरी केली म्हणून त्यांना फौज वाढवून देण्याचा हुकूम केला.
*सन १७३० साली चिमाजी आप्पा यांची फौज माळव्यात गेली.विठ्ठल शिवदेव हे चिमाजी आप्पा यांच्या सोबत होते.दिल्लीच्या बादशाहा कडून माळव्याच्या सुभ्यावर नुकतीच दयाबहादूर या सरदाराची नेमणूक झाली होती.त्या सुभेदाराने पेशव्यांना माळव्याची चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्यास अडकाव केला. तिथे पेशवे आणि सरदाराची लढाई झाली.
ज्यात विठ्ठल शिवदेव यांनी त्या सरदाराच्या सैन्याचा पराभव केला आणि त्याला मारून ही लढाई जिंकली.
*सन १७३१ साली पेशव्यांनी सयाजी गुजर यांना गढेमंडळावर पाठविले होते त्यावेळी विठ्ठल शिवदेव यांना गुजर यांच्या सोबत जाण्यास सांगितले होते.तिथेही विठ्ठल शिवदेव यांनी आपला पराक्रम गाजवून किल्ला जिंकला.ही सर्व हकीकत गुजर यांनी पेशव्यांना सांगितली तेव्हा खुश होऊन त्यांनी विठ्ठल शिवदेव यांना एक पृथक टोळीचे सरदार केले.आत्ता पर्यंत साताऱ्याहुन मिळणारी तैनात पुढे १७३३ पासून पेशव्यांकडून मिळू लागली.
*सन १७३३-
दयाबहादूर या सरदारानंतर बादशाहाने माळव्याच्या सुभ्यावर फरखाबादचा नवाब फत्तेखान बंगष याची नेमणूक केली होती.त्याने बुलेंद खंडावर स्वारी करून छत्रपुरचा राजा छत्रसाल याला अडचणीत टाकले होते.त्या वेळी छत्रसालाने माळव्यात असलेल्या बाजीराव पेशव्यांना "माझ्या राज्याचे रक्षण करावे" असे मदतीचे पत्र लिहिले होते.त्यावेळी बाजीराव पेशवे विठ्ठल शिवदेव यांच्या सोबत बंगष याच्याविरोधात लढाईला उतरले आणि त्याचा पराभव करून त्याला इथून हकलून लावले.
==================================
*श्रीनृसिंह मंदिराचा जीर्णोद्धार-*
दहा बारा वर्षांनी अमृतस्वामी जेव्हा आपल्या यात्रेहून परत आले तेव्हा पावनबाबानी सासवडकरांचे कर्तृत्व स्वामींना सांगितले, ते ऐकून स्वामींना आनंदच झाला. स्वामी यात्रेहून परत आले हे समजताच विठ्ठलराव त्यांना भेटायला आले.त्यांचा आशीर्वाद घेतला.त्यांच्या कृपेने आपले चांगले दिवस आले म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करू लागले आणि आपल्याला त्यांनी सेवा करण्याची संधी मिळावी अशी भावना व्यक्त केली. स्वामी यात्रेत जात असतांना नृसिंहपूर येथे प्रवासात थांबले होते.तिथे नीरा आणि भीमा नदीच्या काठी श्री नृसिंहाचे मंदिर आहे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे पाया हा खचत चालला होता, हे स्वामींनी बघितले होते.त्याचा लवकर जीर्णोद्धार झाला नाही तर पुढे ते मंदिर नष्ट होण्याची परिस्थिती येईल हे विठ्ठलरावांना सांगितले.तसेच तो देव हा तुझा कुलस्वामी आहे म्हणून तू त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे स्वामींनी विठ्ठलरावांना सांगितले. स्वामींची ही आज्ञा विठ्ठलरावांनी मान्य केली पण त्या वेळी त्यांची परिस्थती तेवढी नव्हती की ते याचा खर्च करू शकतील ही खंत त्यांनी स्वामींना बोलून दाखवली.त्यावर स्वामी त्यांना म्हणाले की तू पेशव्यांची सेवा प्रामाणिकपणाने कर तुझा नक्की उद्धार होईल.आणि हे काम तुझ्याच हातून होईल. पुढे त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना बढती मिळत गेली आणि त्यांनी मंदिराला भरपूर पैसे खर्च करून त्याचा पाया मजबूत करून मंदिराची उंची वाढवून घेतली आणि पक्क्या दगडांनी मंदिर अजून मजबूत करून घेतले.ते एवढ्यावरच थांबले नाही.पुढे त्यांनी मंदिराच्या नित्यानेमाच्या कामासाठी आपल्याला मिळालेल्या जहागिरीपैकी गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील उरपाड येथील चार गावांचा महसूल श्री च्या खर्चासाठी नेमून दिला होता.हे उत्पन्न सालाला ६००० रुपये एवढे होते.त्यातून मंदिरात रोजचा नैवेद्य,नंदादीप, सनई-चौघडा वादन, पूजा,ब्राम्हण, दरसाल होणारी श्रीनृसिंहांची जयंती यांच्या नियमित खर्चाची व्यवस्था त्यातून करून दिली होती.मंदिरात श्रीच्या चरणी अलंकार अर्पण केले होते. पेशवे पद्धतीची एक किलो वजनाची सोन्याची पगडी त्यांनी अर्पण केली होती.हे अलंकार पूजेच्या वेळी अजूनही श्रीनृसिंहाना घातले जातात असे वाचनात आहे.
विठ्ठल शिवदेव यांची श्रीनृसिंहांवर नितांत भक्ती होती.युद्धाच्या वेळी त्यांचे सैन्य आघाडीवर असायचे, त्यांची युद्धाची गर्जनाही "जय नरहरी" हीच होती. पेशव्यांसोबत त्यांचे बरेच आयुष्य हे उत्तर भारतात गेलेले त्यामुळे त्यांनी तिकडेही बऱ्याच भागात श्रीनृसिंहांची मंदिरे बांधलेली आहे.त्यांना विंचूरची जहागिरी मिळाल्यानंतर त्यांचे स्वतःचे नाणेही होते.ते नाणे "नृसिंह शिक्का" या नावाने ओळखले जात.त्यांची एक लंबवर्तुळाकार व बदामी आकाराची मुद्रा पण होती.
*संदर्भ-मराठ्यांच्या इतिहासातील साधने खंड 2
*विंचूरकर घराण्याचा इतिहास
*पुरंदरचे धुरंधर:- शिवाजीराव एक्के
(प्रकरण १५)
फोटो-इंटरनेटवरून व पुस्तकातून
सोनल पाटील,नाशिक

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...