नाशिकमधील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 'सरकार वाडा'
लेखन :सोनल पाटील
नाशिकमधील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 'सरकार वाडा' बाबत नाशिककर व इतिहास विषय रसिक ह्यांच्या सेवेत हा लेख.
-----
निजाम राजवटीत झालेल्या विध्वंसानंतर नाशिकला त्याचे वैभव परत मिळवून देण्यासाठी पेशव्यांनी बरेच प्रयत्न केले पण नाशिकचा खरा विकास झाला तो आनंदीबाई पेशवे, गोपिकाबाई पेशवे आणि अहिल्याबाई होळकर या तीन महिलांमुळे...
नाशिकला उपराजधानी चा दर्जा देऊन नाशिकच्या विकासाला सुरुवात झाली. नदीवर पूल बांधून तिच्या पश्चिम भागात वसाहती तयार झाल्या. राघोबा दादांनी वयक्तिक लक्ष पुरवून साधारण ६६.५० बाय २३.८० मीटर लांबी-रुंदीचा १५८२.७० चौ मी मोकळ्या जागेत चौक आणि आजूबाजूला दिवाखाने वजा भव्य खोल्या, लाकडी-नक्षीदार सुबक लांब, चुना,विटा,मातीच्या विशिष्ट पद्धतीने बांधकाम केलेला उत्कृष्ट पॉलिश फरसबंदीचा वाडा बांधला. राघोबा दादांशी बेबनाव झाल्यानंतर गोपिकाबाई सुरुवातीला याच वाड्यात राहिल्या. त्यांना 'सरकार' म्हणत असत या कारणाने आणि पेशवाईच्या सरकारी कामकाजामुळे हा वाडा 'सरकारवाडा' या नावाने ओळखला जाऊ लागला असावा. या वाड्याची बरीच वैशिष्ट्ये आपल्याला सापडतील. अठराव्या शतकात पेशवाई सरकार तर एकोणाविसाव्या शतकात इंग्रज राजवटीत जिल्ह्याधिकाऱ्यांचे कार्यालय सुरुवातीच्या काळात इथेच होते. सरकार वाड्यापासून काही अंतरावर गोडाप्रवाह होता. वाड्यातून आनंदवल्ली किंवा समर्थांच्या टाकळी पर्यंत भुयारी मार्ग असल्याच्या आख्यायिका आहेत.
या वाड्याचे बांधकाम हे इतके तंत्रशुद्ध आणि अचूक आहे की बांधकामात गुणा (काटकोन) बोहरपट्टीतुन खरेदी केला की जुनी अनेक जाणकार गवंडी मंडळी टेपवर अचूकता मोजण्याऐवजी सरकार वाड्याच्या दर्शनी कोपऱ्यावर लावीत असत. त्या कोपऱ्याला तो व्यवस्थित बसला की योग्यतेची खातरजमा होत असे. इतके तंत्रशुद्ध बांधकाम वाड्याचे आहे.
इथे भद्रकाली आणि सरकारवाडा ( ए आणि बी डिव्हिजन ) असे पोलीस ठाणे होते ह्याची माहिती नाशिककरांना आहेच. इमारतीच्या वरच्या मजल्यावर प्रारंभी 'नेटिव्ह लायब्ररी' असे इंग्रजी नाव असलेले आणि 'नाशिक पुस्तकालय' असे मराठीत नाव असलेले १९२४ मध्ये स्थापन झालेले सार्वजनिक वाचनालय आहे. 'वीर बापू गायधनी' यांच्या शौर्याची निशाणी म्हणून त्यांच्या स्मारकासाठी महानगरपालिकेने १९३६ मध्ये सारकरवाड्याच्या पायऱ्यांलागत जागा उपलब्ध करून दिली.
एवढ्या वर्षाच्या वापरानंतर वाड्याचा पहिला मजला आणि तळमजल्याचा दर्शनी भाग कोसळलेला आहे. १९९५ मध्ये पुरातत्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून वाड्याचा ताबा मिळवला पण हवी ती सुधारणा करू शकले नाहीत. सन २००० मध्ये सरकार वाड्याला मोडकळीस आलेली वास्तू असे नाशिक महानगरपालिकेने घोषित केले.
२०१६ मध्ये आजूबाजूच्या अतिक्रमणामुळे पुरातत्व विभागाला बाहेर रेलिंग बसवण्याचे काम अर्धवट राहिले. सरकारवाड्याच्या संपूर्ण भिंतीला लागून छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाकडून अतिक्रमण झाले होतं.
२०१७ च्या मध्यांनापर्यंत रिस्टोरेशन संपायला हवं होतं पण अतिक्रमणामुळे त्यांना रात्रीच काम करावं लागायचं त्यामुळेच ते सर्व काम २०१९ पर्यंत लांबल गेलं. अतिक्रमणाचा निकाल २०१८ मध्ये पालिकेने लावला. २०१९ मधेच त्याचे म्युझियम करण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागाने ठेवला.त्याच वर्षी Indian National Trust for Art and Cultural Heritage (INTACH), Nashik, and Sarafa Bazar Association of the city. ह्यांच्या मदतीने १९ ते २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय हेरिटेज सप्ताह साजरा केला.
त्या सप्ताहात 'होन' - शिवकालीन सोन्याची नाणी व
'शिवराई -' शिवकालीन चलन मुख्य आकर्षण होते. अनंत ठाकूर यांनी मराठा कालीन हत्यारं वगैरे प्रदर्शनात ठेवलेले जे आजही आपल्याला वाड्यात पाहायला मिळतील. १९३९ च्या पुरात वाड्याच्या ११ पायऱ्या बुडालेल्या म्हणून पालिकेने वाड्याच्या भिंतीवर निळ्या रंगाची रेष(flood line) आखली आहे.
सरकारवाडा चौक कालांतराने आज सराफ बाजार चौक या नावाने ओळखला जातो. या चौकात सोन्या मारुतीचे जुने मंदिर आहे. मुंबई मध्ये जसे भुलेश्वर,जव्हेरी बाजार, काळबादेवी हा भाग गजबजलेला असतो अगदी तसाच सरकारवाडा आणि अजुबाजूचा परिसर म्हणजे सराफ बाजार,भांडीबाजार,कापड बाजार या पेठा गजबजलेल्या असतात .म्हणून त्याला नाशिकचे हृदय म्हटले जाते.
पोस्ट क्रेडिट्स : #टीम_नाशिकचे_नाना
फोटो क्रेडीट्स : #Karan_Raskar
No comments:
Post a Comment