विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 12 December 2023

विठ्ठल शिवदेव विंचूरकर..भाग-१




 

भाग-१
लेखन ::सोनल पाटील
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात १२-१३ हजार लोकसंख्येच विंचूर हे गाव...गावात विणकाम मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे गावाला विंचूर हे नाव पडले.याच विंचूर गावामुळे पुढे विठ्ठल शिवदेव यांना विंचूरची जहागिरदारी मिळाल्यामुळे त्यांना विंचूरकर हे नाव पडले...
विठ्ठल शिवदेव विंचूरकर...
शाहू काळात गाजलेलं व्यक्तिमत्व...
पानिपतच्या युद्धात महत्वाची भूमिका बजावणारे नाव म्हणजे विंचूरकर...
आजही विंचूर मध्ये विंचूरकरांचा वाडा सुस्थितीत आहे.
विठ्ठल शिवदेव यांचा जन्म इ. स. १६९५ साली सासवड (पुणे) या गावी दाणी कुटुंबात झाला.ते मुळचे ऋग्वेदी ब्राम्हण...त्यांचे पूर्वज सासवड येथील वतनात दाणीच काम करत असत त्यामुळे त्यांचे आडनाव दाणी पडले असावे.वडिलांचे नाव शिवजीपंत.. त्यांना ३ मूल होती. सर्वात मोठे आबूराव शिवदेव,मधले त्रिंबक शिवदेव आणि लहान विठ्ठल शिवदेव... घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातील मोठी दोन मुलं घर चालवायला हातभार लावत होती. विठ्ठलराव मात्र घरात कुठलाच हातभार लावत नव्हती.कामधंदा करत नव्हती.त्यांना तालीम आणि घोड्यावर बसणे या दोन गोष्टींचा खूप शौक होता.रात्रंदिवस ते कसरत आणि घोड्यावर बसण्याचा अभ्यास करत असे,त्यामुळे त्यांनी शरीरयष्टी खूप कमावली होती.त्यांची शरीर संपत्ती अशी होती की आसपासच्या गावात त्यांच्या सारखा दुसरा पुरुष नव्हता.
पण त्यांच्या मोठ्या बंधूंना हे आवडत नव्हते.ते त्यांना वाईट साईट बोलून त्रास देत." तू उगीच जोर काढून व मल्लखांबावर उड्या मारून आयुष्य व्यर्थ घालवितोस! त्यापेक्षा कोणाची तरी चाकरी केलीस तर पोटभर खाशील व कदाचित तुझे लग्नही होईल".पण ते त्यांच्या भावांच एवढं मनावर घेत नसत.एक दिवस त्यांचे वडील रागात त्यांना म्हणाले की,"तू घरात निरोद्योगी बसून दुसऱ्याचे कमाईवर उपजीविका करतोस, त्यापेक्षा मरलास तर बरे होते! तुझे बंधू मिळवितात आणि तू आयते खाऊन उनाडासारखा फिरतो याची तुला लाज म्हणून वाटत नाही काय? आणि असेच वर्तन पुढेही ठेवणे असेल तर तू घरात राहू नकोस. निघून जा".
आपल्या वडिलांचे हे बोलने विठ्ठलरावांना खूप बोचले.त्यांच्यातील वीराला हे सहन झाले नाही आणि त्यांनी घरातील मोठ्यांना नमस्कार करून घर सोडले.
*विठ्ठलरावांना मिळालेला पहिला राजाश्रय-१७१५*
सासवड सोडून विठ्ठलराव साताऱ्याजवळील "मर्ढे" या गावी आले.त्या गावातील "अमृतस्वामी" या रामउपासक सिद्ध पुरुषाच्या मठात त्यांची मनोभावे सेवा करू लागले. काही दिवसांनी अमृतस्वामी तिर्थ यात्रेला गेले त्यानंतर त्यांच्या गादीवर त्यांचे शिष्य "पावनबावा" हे बसले. विठ्ठलराव त्यांची सेवा करू लागले. त्यांच्या सानिध्यामुळे विठ्ठलरावांच्या अंगी कीर्ती मिळवण्याजोगे सामर्थ्य आले आणि बुद्धीही चाणाक्ष झाली. मर्ढे गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती पावनबावांच्या मठात नेहमी येत असे. जो साताऱ्यात शाहू महाराजांकडे बक्षीगिरीचे काम करत होता. विठ्ठलरावांच्या प्रामाणिक सेवेच फळ म्हणून पावनबावांनी त्या गृहस्थांकडे विठोबा सासवडकरांची साताऱ्यात कुठेतरी सोय करून द्यावी म्हणून सांगितले.बक्षीनी स्वामींची आज्ञा मान्य करून सासवडकरांना आपल्या सोबत सातारला आणून आपल्या घरी ठेवले.तिथे विठ्ठलराव बक्षी यांच्या घोड्यांची देखरेख करत आणि छोटी मोठी कामे करू लागले.
शाहू महाराजांना शिकारीची खूप आवड होती.एक दिवस शाहू महाराज आपल्या सैनिकांसोबत शिकारीला निघाले असता विठ्ठलरावांनी बक्षीच्या पागेतील घोडा घेऊन महाराजांच्या सैनिकांसोबत गेले.रानात कृष्णातीरी गेल्यावर महाराजांच्या सैनिकांनी एका रानडुकराला घेरा घालून त्याच्या भोवती कडे केले.त्या रानडुकराला पळून जायला कुठलाच मार्ग भेटत नसल्याने ते चवताळून कडा फोडून मुसंडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागते.रानडुक्कर पळून जाताना पाहून विठ्ठलरावांनी घोड्यावरून उडी टाकत धावत जाऊन डुकराला आपल्या दोन्ही पायात घट्ट दाबून ठेवले आणि त्याचे दोन्ही कान पकडून त्याला पळून जाण्यापासून अडवले. तेव्हा शाहू महाराज आपला घोडा घेऊन धावून आले आणि भाल्याने त्या डुकराला ठार मारले.
शरीराने धष्टपुष्ट असलेल्या विठ्ठलरावांची शक्ती आणि धैर्य पाहून महाराजांना त्यांचे विलक्षण कौतुक वाटले.महाराजांनी त्यांचे हे कर्तृत्व पाहून त्यांच्या बद्दल चौकशी केली आणि इथे येण्याचे करण विचारले. विठ्ठलरावांनी त्यांची आतापर्यंतची सर्व हकीकत शाहू महाराजांना सांगितली आणि सध्या बक्षी यांच्या घरी राहत असल्याचे सांगितले.विठ्ठल रावांची सर्व हकीकत ऐकून आणि त्यांचे हे कर्तृत्व बघून महाराजांनी त्यांना सरकारी पागेतील एक घोडा देऊन बारगिराच्या पटांत त्यांचे नाव दाखल करून त्यांना आपल्या सेवेत राहण्याची आज्ञा केली.हा काळ सन १७१५ चा होता.घर सोडल्यानंतर विठ्ठलरावांना मिळालेला हा पहिला राजाश्रय होता. या घटनेने हे स्पष्ट होते की विंचूरकर हे इतर सरदारांसारखे पेशव्यांचे चाकर नसून शाहू महाराजांच्या पदरचे सरदार होते.
पुढे महाराजांसोबत कितीतरी वेळा शिकारीच्या वेळी तसेच राजकीय कामात विठ्ठलरावांचे धैर्य आणि चातुर्य बघून महाराजांनी सासवडकरांना दहा घोडयांची शिलेदारी देऊन कायम आपल्या जवळ राहण्याची आज्ञा केली.त्यावेळी विठ्ठलराव हे २१ वर्षाचे होते.त्यानंतर विठ्ठलरावांनी वाई जवळील केंजळगावच्या कुलकर्णी यांच्या मुलीशी लग्न केले.तिचे नाव त्यांनी रखमाबाई ठेवले.
(क्रमशः)
संदर्भ-विंचूरकर घराण्याचा इतिहास
फोटो-१.विंचूर येथील विंचूरकरांचा वाडा
२.विंचूर येथील विंचूरकरांची समाधी
३.वंशावळ (नेटवरून)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...