छत्रपती रामराजा :- एक रहस्यमयी न उलगडलेलं कोड ?
सदर लेख छत्रपती रामराजा यांच्याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी आहे त्यामुळे संदर्भ देवून आपली मते मांडावी हि विनंती
इ.स.
सप्टेम्बर १७१४ च्या दरम्यान पन्हाळ्यावर नाट्यमय राजकारण घडून महाराणी
ताराबाई व त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी कैद झाले. राजराम महाराजांच्या
द्वितीय पत्नी राजसबाई यांचे पुत्र संभाजी कोल्हापूरच्या गादीवर विराजमान
झाले. सातारा छत्रपती शाहू महाराज व कोल्हापूर छत्रपती संभाजी
यांच्यातदेखील गृह्कलह चालू होता. १३ एप्रिल १७३१ रोजी सातारा व कोल्हापूर
यांच्यात वारणेचा तह घडून आला.
शाहू
महाराज यांना पुत्रसंतानाचे सुख मिळाले नाही. सातारा गादीच्या वारसाचा
प्रश्न त्यामुळे निर्माण झाला व दत्तक पुत्र घेण्याचा विचार पुढे आला.
दत्तक पुत्राचा शोध सुरु असताना सातारा येथे शाहू महाराजांच्या कैदेत
असलेल्या महाराणी ताराबाई यांनी शाहू महाराजांना निरोप पाठवून आपला नातू
म्हणजे ताराबाईंचा पुत्र शिवाजी यांचा पुत्र रामराजा यास दत्तक घेण्याचे
सुचवले. शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार रामराजा सातारा
गादीवर विराजमान झाले.
महाराणी
ताराबाई व नानासाहेब पेशवे यांच्यात एक संघर्ष घडून आला. छत्रपती रामराजा
यांना कैद करून महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याचा कारभार पाहण्यास
सुरवात केली. कालांतराने ताराबाई यांनी रामराजा हा आपला नातू नसून हा खरा
रामराजा न्हवे असे जाहीर केले. त्यामुळे छत्रपती रामराजा यांच्या
सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह इतिहासात निर्माण झाले त्यासंबंधित नोंदीचा
अभ्यास करण्याचा एक प्रयत्न .
- रामराजा यांच्या जन्माची नोंद
महाराणी
ताराबाई यांनी समस्त कारकून ,प्रधान व सरदार यांना केलेल्या
आज्ञापत्रातून रामराजा यांच्या जन्माची हकीगत कळते. तराबाई व त्यांचे
पुत्र शिवाजीराजे पन्हाळ्यावर कैदेत होते त्यासोबत त्यांच्या पत्नी
पार्वतीबाई व भवानीबाई यासुद्धा कैदेत होता. ताराबाई यांचे पुत्र
शिवाजीराजे यांची पत्नी पार्वतीबाई यांना दोन पुत्र झाले. परंतु पहिला
पुत्राचे निधन झाले. दुसरा पुत्र जन्मल्यावर त्याला ताराबाईनी सुखरूप
बाहेर पाठविले व अज्ञातवासात ठेवीले.
शिवाजीराजे
यांची दुसरी पत्नी भवानीबाई गरोदर असताना शिवाजीराजे यांचा देवीच्या
आजाराने मृत्यू झाला. पत्नी पार्वतीबाई यांनी शिवाजीराजे यांच्या सोबत सती
गेल्या. काही काळाने भवानीबाई प्रसूत झाल्या व त्यांना पुत्राची प्राप्ती
झाली. परंतु राजराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई व पुत्र संभाजी
यांनी कपटबुद्धीने त्या नवजात बालकास मारून टाकले. ( राजवाडे खंड ८
न.१६९ ,)
रामराजा
यांनी साताऱ्याचे छत्रपती झाल्यानंतर दोन महिन्यांनी भगवंतराव आमात्यांस
एक सनद करून दिली त्यात ते आपल्या जन्माची हकीकत नमूद करतात “ पन्हाळ्यास
शिवाजी राजे कैदेत असताना जन्म झाला. गुप्तरीतीने त्यांना बावड्यास
ठेवण्यात आले. दहा बारा वर्ष तेथे सुखरूपपणे वास्तव्यास होते. परंतु
कोल्हापूर छत्रपती संभाजी यांना याबाबत सुगावा लागला असता जीजाबाई
बावड्यावर चाल करून आल्या. रामराजा यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची पाठवणी
तळकोकणात करण्यात आली. काही काळ तुळजापुरात व्यतीत केला. ( राजवाडे खंड ८
न.१८४ )
इ.स.
१७४५ शाहू महाराज दत्तक पुत्राचा शोध घेत असताना महाराणी ताराबाई यांनी
आपला नातू रामराजा अज्ञातवासात असल्याचे जाहीर केले. यावेळी रामराजे
बावड्यात वास्तव्यास होते. शाहू महाराजांनी रामराजास गादीवर दत्तक घेण्याचा
निश्चय केला. शाहू महाराजांनी भगवंतराव अमात्य यांना बोलवून घेतले.
भगवंतराव अमात्य यांनी माहुली येथे कृष्णेचे उदक हाती घेवून शपथपूर्वक
रामराजा यांचा जन्म वृतांत खरा असल्याचे सांगितले.
सदर
दत्तक विधानाविषयीचा सुगावा शाहू महाराजांच्या पत्नी सकवारबाई यांना
लागला. १७ फेब्रुवारी १७४५ रोजी महाराणी ताराबाई यांनी भगवंतराव व
सीवरामआमात्य यांना पत्र लिहिले त्यात लिहितात “ छत्रपती शाहू महाराजांनी
सूचना केली. चिरंजीव रामराजे तुमच्याजवळ असल्याची खबर सकवारबाई यांना
लागली आहे. सकवारबाई यांच्यापासून रामराजे यांना धोका असण्याची शक्यता
लक्षात घेऊन पानगावी दर्याबाई निंबाळकर यांच्याकडे पाठवण्यात आले. (
राजवाडे खंड ८ न.१७० )
पंत
अमात्य यांच्या बखरीतील नोंदीच्या आधारे रामराजा हे साधारण सात वर्षाचे
असताना आपल्या बहिणीकडे पानगावी आले परंतु समकालीन पत्रातील नोंदीनुसार
रामराजा २१ वर्षापर्यंत बावड्यात होते. छत्रपती शाहू महाराजांच्या
आज्ञानंतर त्यांना त्यांच्या बहिणीकडे दर्याबाई निंबाळकर यांच्याकडे
पाठवण्यात आले.
- रामराजा यास राज्याभिषेक
१५
डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती शाहू महाराज निधन पावले. छत्रपती शाहू
महाराजांनी आपल्यानंतर राज्यकारभार कसा चालावा याविषयीच्या सूचना देणारे
दोन फर्मान ( याद्या ) लिहून ठेवल्या . कोल्हापूर गादीचे वंशज ( संभाजी )
गादीवर बसवू नये अशी स्पष्ट आज्ञा त्यात नमूद करण्यात आली . शाहू
महाराजांच्या निधनानंतर बापुजी चिटणीस व इतर लोकांना पानगावी पाठवण्यात आले
.२६ डिसेंबर १७४९ रोजी रामराजा साताऱ्याजवळील वडूक या गावी आले. ताराबाई
यांनी रामराजा यांना अज्ञातवासात ठेवल्यानंतर त्यांची व रामराजा यांची हि
पहिलीच भेट होती. याआधी ताराबाई यांनी रामराजा यांना प्रत्यक्ष पहिले
न्हवते.
धर्मशास्त्रातील
नीतीनुसार एखाद्या राज्याचा निपुत्रिक राजा मृत्यू पावल्यास त्याच्या
गादीवर दत्तक राजा घेताना मध्यग्र दत्तक विधीने नवीन राजा दत्तक घेता येतो.
परंतु धर्मशास्त्रातील हा विधी रामराजा यांच्याबाबतीत झाला नाही. ४
जानेवारी १७५० रोजी संध्याकाळी कोणताही दत्तकविधीचा संस्कार न होता रामराजा
स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपती झाले.
छत्रपती
रामराजा यांचे बालपण व तारुण्य अज्ञातवासात व्यतीत झाल्याने त्यांना
राजकारणाचा व राज्यकारभाराचा पत्यक्ष अनुभव न्हवता. महाराणी ताराबाई व
पेशवे नानासाहेब या दोन महत्वाकांशी अनुभवी व्यक्तींच्या मध्ये छत्रपती
रामराजा अडकले. २० मार्च १७५० रोजी ताराबाई सातारा सोडून सिंहगडावर
राहावयास गेल्या. १८ एप्रिल १७५० रोजी नानासाहेब पेशवे साताऱ्याहून पुण्यास
निघून घेले.
- छत्रपती रामराजा यांची पेशवे व ताराबाई यांच्यासंबंधीची भूमिका
छत्रपती
रामराजा एप्रिल १७५० रोजीच्या एका पत्रात आपली इच्छा व्यक्त करतात त्यात
त्यांना पेशव्यांचे सहकार्य ताराबाई यांच्यापेक्षा जास्त वाटते तसेच
त्यांना पेशव्यांवर अधिक विश्वास दिसून येतो “ आता राजश्री बोलतात कि
आऊसाहेबास आणावयासी तजवीज केली पाहिजे आणि मजला नेवून आईचे चरणावर घालून
त्यासी येथे घेऊन यावे आणि पेशव्यांनी मजवर का राग करितात ? माझे मायबाप
गणगोत जे आहेत ते तेच आहेत . त्याजखेरीज आणिक कोणी नाहीत. आता बहुतसे
लीनतेत आले आहेत ( पेशवे दफ्तर ६ले. १७ )
परंतु काही महिन्यातच ते पेशव्यांवर आरोप करतात
१९
जून १७५० मधील पत्रातील नोंदीनुसार छत्रपती रामराजे यांची पेशव्यानबद्दल
तक्रार होती कि “ पेशवे यांनी व चिटणीसानी माझी आजी फोडली आणि मला
धरावयासी जपतात. मारू म्हणतात. दुसरा राजा उभा करू म्हणतात आणि जे काही
थोरले आबासाहेब होते त्यांनी दिले नाही ते आम्हापाशी मागतात. ते काही मी
देणार नाही. जे आबासाहेबी दिले आहे ते तुम्ही घ्यावे . त्यासी काही मी उजूर
करीन तर मग वारी म्हणावे कि हा बेईमान आहे . अधिक म्हणतात तर काही मी
देणार नाही . मग त्यामुळे माझा प्राणही गेला तरी जावो. ( पेशवे दफ्तर ६
ले.५९ )
छत्रपती
रामराजे यांना ताराबाई यांच्याविषयी विश्वास दिसून येत नाही ताराबाई
यांना कैदेत टाकण्याची इच्छा होती असे दिसून येते. २० मार्च १७५० रोजी
ताराबाईसातारा सोडून सिंहगडावर राहावयास गेल्या असता त्यांची समजूत कडून
परत साताऱ्यास वास्तव्यास आणावे असे रामराजा यांना सुचविण्यात आले असता
त्यांनी “ आईसाहेब आणावयास मी कधी जाणार नाही वरीसभर कुजविन. तिचे येथे
कामच काय? खेळी तर तीच आहे. मी आणणार नाही, आली तर चांगली कैदेत ठेवीन .
- छत्रपती रामराजा महाराणी ताराबाई यांच्या कैदेत
२४
नोहेंबर १७५० चंपाषष्ठी निमित्ताने असलेल्या पूजेला व भोजनाला महाराणी
ताराबाई यांच्या निमंत्रणावरून छत्रपती रामराजा गडावर आले असता ताराबाई
यांनी त्यांना किल्यावारच बंदिस्थ केले व राज्यकारभार आपल्या हातात घेतला.
२३ जुन १७६१ रोजी महाराणी ताराबाई यांचे निधन झाले तोपर्यंत छत्रपती रामराजा महाराणी ताराबाई यांच्या कैदेत ११ वर्ष होते.
- छत्रपती रामराजा यांच्या सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह ?
३
फेब्रुवारी १७५१ रोजी नानासाहेब पेशवे यांचा साताऱ्यातील वकील त्रिबंक
सदाशिव याने लिहिल्या पत्रातील नोंदीनुसार “ शाहू महाराजांची पत्नी
सकवारबाई सती गेल्या त्यावेळी शाहू महाराज मरतेवेळी काय बोलले होते ?
सकवारबाई बोलिली कि “ या राज्याचा खाविंद संभाजीराजा , हे नवे ( रामराजे )
उभे केले आहे हे खूळ आहे. संभाजीराजाचा चाकर म्हणविल तो इनामी. त्याचे बरे
होईल. या खुळाला हाती धरून बसवील. हि गादी ह्या धन्याची त्यास देईल ,
त्यास बरे होणार नाही. हे साफ सती निघतेवेळी बोलली.
सदर
पत्रात वकील नानासाहेब पेशव्यांना सुचवितो कि “ तुम्ही कोल्हापूर
संभाजीना सातारा गादीवर बसवावे . ताराबाई यांना हे श्रेय न देता आपण
घ्यावे. ( पेशवे दफ्तर खंड ६ पत्र १४७ )
१७
सप्टेम्बर १७५२ रोजीच्या पत्रातील नोंदीनुसार महाराणी ताराबाई यांनी
शपथपूर्वक सांगितले कि हा राजा खरा नाही. कोल्हापूर संभाजी महाराज यांना
आणून गादीवर बसवावे. राजाचे नसल ( बीज ) खरे नाही असे शपथपूर्वक सांगितले. (
राजवाडे खंड ६ ले. २५७ )
१५
मे १७५८ रोजी महाराणी ताराबाई यांनी नानासाहेब पेशवे यांना लिहिलेल्या
पत्रातील नोंदीनुसार “ पेशवे नानासाहेब यांनी अर्जव केली होती कि रामराजा
ताराबाई यांनीच आम्हास खावंद ( छत्रपती ) करून दिला. त्याचीच सेवा आम्ही
करून लागलो त्यात आमची कोणतीही चूक न्हवे त्यास प्रतुत्यर म्हणून ताराबाई
लिहितात श्री कोटेश्वर मंदिरात रामराजाशी झालेल्या पहिल्याच भेटीत सदर
रामराजा हा खोटा असल्याचे ताराबाईनी पेशव्यांनी पाठविलेल्या पुराणिक ,
गोपाळराव यादव , गोविंद खंडेराव व बापुजी खंडेराव व चीटनिवीस यांना
सांगितले. “ हि वस्तू ( रामराजा ) खरी नाही वंशास डाग लागतो , तेव्हा दूर
करणे .त्याप्रसंगी सदर चारही इसमांनी अर्ज केला ( सल्ला दिला ) कि आता वेळ
नाही म्हणण्याची नाही घात होतो. याप्रमाणे ताराबाईंचा बुद्धीभ्रंश
करण्यात आला
प्रयाश्चितविधी
, मौजीबंधन ,विवाहसंबंध अश्याप्रसंगी महाराणी ताराबाई यांनी आज्ञा केली
होती कि कोणतीही घाई न करता रामराजाचा पूर्ण शोध घ्यावा. ( ताराबाईकालीन
कागदपत्रे खंड ३ पत्र १२३ )
२३
मे १७६१ रोजीच्या पत्रातील नोंदीनुसार नानासाहेब पेशवे यांनी त्यांच्या
मृत्युपूर्वी आजारी असताना आपला पुत्र माधवराव यांस आज्ञा केली कि
“साताऱ्याला जावून नवीन राजा बसवून येणे. त्यास येथे राहो न देत बहुतच
आग्रह “ (पेशवे दफ्तर खंड ६ ले. २२४ )
- छत्रपती रामराजा यांचा तोतया
महाराणी
ताराबाई यांनी आपला नातू छत्रपती रामराजा हा खोटा असल्याचे जाहीर केले
आणि त्याचा फायदा घेत छत्रपती रामराजा यांचा तोतया निर्माण झाला. परंतु
त्याचा बेबनाव पकडला गेला. सदर तोतयाचे नाव संताजी संभाजी अहिरराव .
यशवंतराव प्रभू व इतर लोकांच्या सांगण्यावरून त्याने हे सदर तोतयाचे रूप
धारण केले. त्याला शिक्षा म्हणून डाग देण्यात आला तसेच त्याच्या डाव्या
हाताची करंगळी छाटण्यात आली. त्याच्यासोबत त्याचा सहाय्यक एक गोसावी देखील
होता त्याचे कान कापण्यात आले.
- इतिहासकारांची मते
जयसिंगराव पवार लिहितात
“ ताराबाईचा नातू म्हणून भलत्याच इसमाला गादीवर आणण्याचा कुटील
चक्रव्यूव्ह पेशवा नानासाहेब यांचा होता. आजपर्यंत कोणताही इतिहास संशोधक
छत्रपती रामाराजाचे गूढ उकलु शकला नाही.
आसाराम सैंदाणे लिहितात
“ स्वार्थ आणि आत्मश्लाघेमुळे ताराबाईंनी रामराजाही खोटा ठरविला , रामराजा
खरा कि खोटा याबद्दल अजूनही खात्रीशीर पुरावा दिला गेलेला नाही.
रियासतकार लिहितात “
रामराजाचे अस्तित्व फारच थोड्यास माहीत असल्यामुळे , राज्यरोहणाचे पूर्वी
त्यास स्वतःचे ताटात भोजनास घेऊन प्रमुख मराठा मंडळाची खात्री ताराबाईस
पटवावी लागली. ताराबाई मोठी कारस्थानी बायको, वाटेल ते उलट सुलट करण्यात
मागे पुढे पाहणारी न्हवे , अशी त्यावेळी सुद्धा शाहूची व मराठा मंडळाची
तिच्याबद्दल समजूत होती. म्हणूनच कृष्णेचे उदक घेऊन सत्य करणे किंवा एका
ताटात जेवून घास देणे, इत्यादी प्रकारांनी तिला लोकांची खात्री पटवावी
लागली. इतके करूनही पुढे नऊ वर्षांनी आपल्या या कारस्थानापासून आपणास काहीस
लाभ्यांस न होता पेशव्यानीच सर्व कारभाराचा आटोप केला असे पाहून ,
रामराजा खोटा , हि वस्तू खरी नाही ,असे बेधडक ताराबाईनी लिहुन दिले.
वरील
सर्व बाबींचा विचार करता नानासाहेब पेशवे व महाराणी ताराबाई यांच्यातील
राजकीय वर्चस्व व सत्ता आपल्या हाती राखण्यासाठी राजकारणातील डावपेच
यांच्यामध्ये छत्रपती रामराजा अडकले. याचा परिणाम छत्रपती रामराजा यांच्या
सत्यतेविषयी मात्र कायमचे प्रश्नचिन्ह लागले ?
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :-
मराठा रियासत , करवीर रियासत , पंत अमात्य बावडा दफ्तर , मराठ्यांच्या
इतिहासाची साधने, ताराबाईकालीन कागदपत्रे खंड ३ , पेशवे दफ्तर खंड ६
No comments:
Post a Comment