विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 12 December 2023

महाराणी ताराबाईसाहेब भोसले (१६७५ - १७६१)

 

महाराणी ताराबाईसाहेब भोसले (१६७५ - १७६१)
लेखन :सोनल पाटील


ताराबाई किंवा ताराराणी ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची कन्या व राजाराम महाराज यांच्या पत्नी होय. औरंगजेब नावाचे वादळ हे १६८१ साली स्वराज्यावर चालून आले, तेव्हा मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला त्या औरंग्यास संभाजीराजे यांनी योग्यप्रकारे उत्तर दिले पण कपटाने संभाजीराजास पकडून त्यांची हत्या औरंगजेबाने केली. त्यानंतर ह्या लढ्याची जबाबदारी पडली राजाराम महाराजांवर! त्यांनी हरप्रकारे मुघलांना तोंड दिले आणि सळो की पळो करून सोडले. पण दुर्दैव! राजाराम महाराजांचे २ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले आणि ह्या हिमालयासारख्या संकटाचे नेतृत्व ताराबाई यांनी केले.
राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्य चालाविण्याची जबाबदारी ताराबाईंवर येउन पडली. आपल्या पतीच्या हयातीतच ह्या स्त्रीने राज्यकारभारात व लष्करी मोहिमात भाग घेण्यास सुरुवात केली होती. मोगली इतिहासकार खाफीखान म्हणतो,”ताराबाई ही राजारामाची बायको होय. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा फार मोठा लौकिक होता.”ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजी (दुसरा) यास गादीवर बसवून राज्याची सर्व सूत्रे हाती घेतली. मराठे औरंगजेबाशी युद्ध खेळत होते, पण औरंगजेबाचे प्रचंड सामर्थ्य येथे अपुरे पडत होते. राजाराम महाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची बाजू कमजोर झाली असे बादशहास वाटले पण ताराबाईंनी धैर्याने व हुशारीने बाजू सावरली.
त्या विधवा तरुण राणीने औरंगजेबासारख्या मुरब्बी सम्राटाशी युद्ध खेळून अपराजित राहणे म्हणजे हे तिचे कर्तुत्व बोलते. औरंगजेबाचे लष्करी व राजकीय सामर्थ्य प्रचंड होते. मल्हाररामराव म्हणतो,”औरंगजेब बादशहासारखा शत्रू. लाखो फौज. खजिना बेमुबलक छकड्यास-छकडा द्रव्याचे भरोन कोटीशाबरोबर चालत आहेत.” अशा मोठ्या साम्राज्याशी महाराष्ट्र टक्कर घेत होता. लष्करी युद्धव्यवस्था,द्रव्य इत्यादी बाबतीत मराठे मोगलांशी बरोबरी करु शकत नव्हते, तरीदेखील त्यांनी मुघलांचे जगणे नकोसे करून टाकले. मुघल- मराठा संघर्षात मोगली नेतृत्वात कोणताही बदल झाला नाही. उलट मराठ्यांच्या नेतृत्वात तीन वेळा बदल झाला. संभाजीराजे, राजाराम महाराज व ताराबाई ह्या नेतृत्वाच्या तीन पिढ्या महाराष्ट्राने बघितल्या.
ताराबाई ह्या मराठ्यांच्या नाममात्र राज्यकर्त्या नव्हता. मराठ्यांच्या राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती होती. याशिवाय लष्करी मोहिमांची आखणीही त्या करीत होत्या. त्यांच्या राज्यकारभार कौशल्याविषयी व लष्करी नेतृत्वाविषयी खाफीखान म्हणतो,”रामराजाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडविली. तीत तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांचे व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली.” सरदारांच्या नेमणुका, त्यांच्या बदल्या,राज्याचा कारभार,बादशाही मुलुखांवरील हल्ले या सर्व गोष्टी तिच्या तंत्राने चालू लागल्या. ताराबाईंनी आपल्या सैन्याची योजना अशी केली की सिरोंज,मंदसोर,माळवा या प्रांताच्या सरहद्दीपर्यंत धामधूम उडविली.
बादशहाने आपली अर्धी हयात मोहिमा करणे व किल्ले घेणे यात घालविली. ताराबाईशी तो शेवटपर्यंत लढला पण मराठ्यांचे बळ व बंड ही देवसेंदिवस वाढत गेले. तत्कालीन मराठी कवी गोविंद याने ताराबाईंच्या पराक्रमाचे सार्थ वर्णन केले आहे:-
“दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुरणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलयाची वेळ झाली | मुगलहो सांभाळा ||”
महाराष्ट्रातील जनतेला युद्धाबद्दल आत्मीयता नसती आणि त्यात भाग घेतला नसता तर हे मराठ्यांचे राज्य यावनी झाले असते. मराठ्यांनी खूप मोठा लढा देउन स्वतःचे राज्य राखले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...