नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
📜⚔🗡भाग - 1⃣1⃣📜⚔🚩🗡___
_⚔🚩⚔📜🚩___
जी म्हाराज, समदं नीट ध्यानात आलं. आपुन सांगाल तसंच व्हुईल. चिंता नगं.
उत्तम! या विषयीची खबर घेऊन येणारा नजरबाज थेट आमच्यापर्यंत पोहोचू देत. आम्ही कितीही कामात वा व्यग्र असलो तरी. आम्हाशिवाय एक शब्दसुद्धा इतरांच्या कानी पोहोचता उपयोगाचा नाही. अगदी पंतप्रधान वा सरनोबतांच्यासुद्धा नाही. आम्ही कोठेही असलो तरी सासवडचे अंजीर घेऊन येणाऱ्या खबऱ्यासाठी आमचे दरवाजे अष्टौप्रहर उघडे आहेत. आमची निद्रा भंग करावी लागली तरी फिकीर करू नये.
जी म्हाराज, तसंच व्हुईल.
आता कोणाचीही भेट न घेता थेट विजापूर गाठा. अगदी आईसाहेबांचेसुद्धा दर्शन घेण्यास आम्ही मना केले आहे असे समजा. खर्चाची चिंता नको. विजापुरात लिंगण्णा सावकाराच्या पेढीवरून आणि कोल्हापुरात तुकाशेट गंगणेच्या पेढीवरून लागेल तशी उचल करा. कशी ते सांगणे नकोच.
जी म्हाराज, असाच टाकोटाक गड सोडतो.
हो, बरे आठवले, थांबा. मागे आम्ही उत्तरेतील कामगिरी सोपवली होती. त्याचे काय?
म्हाराज, कर्माजीला त्याच कामगिरीवर सोडलंया. दिवसा-दोन दिवसांत तो आपली गाठ घेईल. समदं अगदी बैजवार जमून आलंया. म्या त्येला सांगावा धाडतो.
मिर्झाराजे दिल्लीला जाण्यासाठी फारच नेट लावून आहेत. टाळणे अशक्य दिसते. फार वेळ गमावूनसुद्धा चालणार नाही.
इचार करन्यास हरकत न्हाई म्हाराज. परत्येक ठिकानचा कौल उजवाच हाय. हुकूम व्हायची खोटी, कर्माजी समदं बैजवार जुळवून आनील. आता रजा घिऊ का म्हाराज? आत्ता निघालो तर भाकरी खान्यास पेठेत पोहोचीन.
होय निघा, थेट विजापूर. कोणाचीही भेट न घेता. कोणी हटकले, विचारले वा बोलावले तर बिनदिक्कत आमचे नाव सांगा.
जी म्हाराज.
मुजरा करून बहिर्जी निघून गेला. काही वेळ महाराज स्वस्थ बसून राहिले. मग त्यांनी आईसाहेबांच्या
महालात वर्दी पाठविली.
-
मिर्झाराजांच्या दिवाणखान्याच्या शामियान्यात वेचक मोगल सरदारांची मसलत भरली होती. दिलेरखान पठाण खालमानेने चडफडत उभा होता. वातावरण अस्वस्थ होते. मिर्झाराजे चिडलेले दिसत होते.
दिलेरखान, आज नेताजीसारखा रुस्तमेजंग आदिलशाहीला जाऊन मिळाला, यास अप्रत्यक्षपणे तुम्हीच जिम्मेदार आहात. शिवाजी आणि नेताजी यांना आपल्या छावणीत एवढ्यासाठी ठेवून घेतले होते की, ही अत्यंत शूर आणि महत्त्वाकांक्षी माणसे सदैव आपल्या नजरेसमोर असावीत. आणि मुघल सलतनत वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेता यावा. पण केवळ द्वेष, द्वेष आणि द्वेष यापलीकडे तुम्हा लोकांना काही सुचत नाही. शिवाजीच्या हत्येच्या गोष्टी जर तुम्ही केल्या नसत्या तर शिवाजीला छावणी सोडून जाण्याचे निमित्त मिळाले नसते. पन्हाळ्याच्या किल्लेदाराला हल्ल्याची खबर कळवून त्याच्याकडून शिवाजीचा काटा परस्पर काढण्याची बेहुदा हरकत जर तुम्ही केली नसतीत तर शिवाजी अपयशी होणे शक्य नव्हते आणि आज जी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ती झाली नसती. कारस्थान करण्याची इतकी हौस होती तर मग नेताजीला आपल्याकडे वळवून घेण्याची खटपट करायची होती. आता झाले ते होऊन गेले. त्याची चर्चा व्यर्थ आहे. आता शिवाजीपासून वेगळ्या झालेल्या नेताजीला, दुसऱ्या शिवाजीला; हर प्रयत्न करून मुघल छावणीत ओढून आणले पाहिजे.
राजासाहब, आप जो ठीक समझे कीजिये. मी साधा रांगडा शिपाई गडी. जिल्हेसुभानी हजरत बादशहा सलामतांच्या विरुद्ध उठणारा प्रत्येक हात कलम करायचा. उठणारा प्रत्येक डोळा फोडायचा. बोलणारी प्रत्येक जबान छाटायची आणि जिवाची बाजी लावून शाही तख्ताची इमानाने सेवा करायची एवढेच मला समजते. आपली सियासत आपण खुल्या दिलाने करावी. त्यात माझी दखलअंदाजी नसेल. आपल्या हर हुकमाची तामील होईल. यह हमारा वादा रहा.
त्याच दिवशी मिर्झाराजांनी दिल्लीला तातडीचे टपाल रवाना केले आणि नेताजीसंबंधीचा सारा तपशील बादशहाला कळविला. आदिलशाहीस नेताजीच्या रूपाने कसे बळ मिळाले आहे आणि त्यावर प्रतिडाव म्हणून नेताजीला मोगली गोटात खेचून घेणे कसे लाभदायक ठरणारे आहे याचा त्यांनी तपशीलवार ऊहापोह केला. त्यासाठी त्याला जी आश्वासने द्यावी लागणार होती त्याचा सारा तपशील यथास्थित कळविला. त्यास बादशहाची मंजुरी मागितली. तसेच बादशहाच्या वतीने त्यास जहागिरी देण्याचा अधिकारसुद्धा मागून घेतला.
-
औरंगजेबाने आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवलेला त्याचा बाप शहाजहान बादशहा मरण पावला. औरंगजेबाचा मार्ग आता पूर्णत: निष्कंटक झाला. तो दिल्लीवरून आग्र्यास आला. आग्रा पुन्हा दार-उल-सलतनत म्हणजे राजधानी म्हणून घोषित झाले. मोठा दरबार भरवून पुन्हा एकदा शहनशाह-ए-हिंदोस्ताँ, बादशहा अशी सर्वांची मान्यता वदवून घ्यावी, त्यांच्याकडून निष्ठेची शपथ घेववावी आणि आपल्या दबदब्याचा खुंटा हलवून बळकट करून घ्यावा, असा त्याने घाट घातला होता.
या दरबारासाठी सर्व दरबारी, मनसबदार, जहागीरदार, मानकरी एवढेच नव्हे तर इराण, तुर्कस्तानपासून परदेशी पाहुण्यांना निमंत्रणे गेली. या भपकेबाज दरबारातच शिवाजीला बोलावून मोगली वैभवाच्या प्रदर्शनाने त्याला पार दीपवून टाकावे. त्याच्या मनात मोगली सत्ता आणि सामर्थ्याचा धाक निर्माण करावा. त्याला जरबेत घ्यावे असा बेत बादशहाने मुक्रर केला.
बेत ठरताच बादशहाने मिर्झाराजांचे सर्व अर्ज मंजूर केल्याची फर्माने दख्खनेत रवाना झाली. वाटखर्चासाठी शिवाजीला दख्खन खजिन्यातून रुपये एक लाख मंजूर झाले. त्याला शहजाद्याच्या इतमामात आग्र्यास आणण्याचा हुकूम दिला गेला. आयुष्यातले सर्वांत मोठे राजकारण सफल होण्याची आशा मिर्झाराजांच्या दिलात जागी झाली, मात्र मिर्झाराजांची मोहीम सुरूच राहिली. याबरोबरच नेताजीसंबंधीचेसुद्धा सर्व अर्ज बादशहाने मंजूर करून टाकले. नेताजीला मोगली पक्षात वळवून घेण्यासाठी सर्व अधिकार आता मिर्झाराजांच्या मुठीत आले. त्यांची पावले त्या दिशेने पडू लागली.
-
राजगडावर महाराजांची खास सदर बसली होती. खुद्द आईसाहेब जातीनिशी सदरेवर उपस्थित होत्या. वयोमानानुसार आजकाल त्यांचे सदरेवर येणे बरेच कमी झाले होते. त्यांचा बहुतेक वेळ आईवेगळ्या शंभूराजांच्या देखभालीतच जाई. पण आजची बाब विशेष होती. खास महाराजांच्या नावे बादशहाचे भेटीच्या मंजुरीचे फर्मान आले होते; ते स्वीकारण्यास मिर्झाराजांच्या छावणीत जायचे होते. बादशहा त्याच्या वाढदिवसाला आग्र्यात मोठा दरबार भरविणार होता. त्या दरबारात हजर राहण्याचे महाराजांना विशेष कृपेचे निमंत्रण आले होते. महाराजांचे आग्र्यास जाणे अजून मुत्सद्द्यांच्या मनात येत नव्हते. त्र्यंबक सोनदेव म्हणाले–
महाराज, औरंगजेब म्हणजे शहाजहान नव्हे हे ध्यानी घ्यावे. मोगल सारेच धर्मांध. पण याबाबतीत आलमगिराचा हात धरणारा कुणी नाही. इस्लामपुढे त्याला दुसरे राजकारण समजत नाही. निजामशाहीच्या निमित्ताने थोरल्या महाराजांनी मोगल आणि आदिल अशा दोन्ही शाह्यांशी टक्कर घेतली. निजाम मुर्तुजाला वाचवण्यासाठी आपल्या पायाने चालत जाऊन ते दोन्ही बादशहांचे बंदी झाले. ते वख्ती प्राणांशीच गाठ होती. पण शहाजहान बादशहा धोरणी; थोरल्या महाराजांचे शौर्य, बुद्धी, तडफ आणि थोरवीची त्यास जाण होती. एवढा तालेवार मोहरा हकनाक मारून वाया घालवण्यापरीस त्याने मुसलमानी शाही वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचे ठरवले, म्हणूनच हद्दपारी देऊन त्यांना दूर कर्नाटकात पाठवले तरी जीव वाचवला. हाती अधिकार कायम ठेवले. आलमगिरास ही दूरदृष्टी नाही. म्हणून त्याचा भरवसा धरता येत नाही.
प्रतापरावांनी पंतांना दुजोरा देत म्हटले–
पंताचं बोलनं अक्षी चोख बरुबर हाये. तुळतुळीत हजामत केलेल्या आलमगिराच्या डोक्यात राजकारणापेक्षा दगाबाजीचे आनि कपट कारस्थानाचे कारखाने चालू ऱ्हातात.
शिवबा, मिर्झाराजांना तुम्ही थोरल्या महाराजसाहेबांच्या स्थानी मानता. तेसुद्धा तुमचेवर पुत्रवत प्रेम करतात. त्यांना म्हणावे, आपण वडीलकीच्या नात्याने बोटास धरून बादशहासमोर रुजू करावे. त्यांना डावलून काही करणे अथवा त्यांच्यादेखता दगा करणे आलमगिरास झेपणारे नाही. मग तुमच्या सलामतीची आणि सुखरूप परत येण्याची चिंता जशी मिटेल तसेच पत्रोपत्री चालणारे राजकारण थेट समोरासमोर प्रत्यक्ष बोलून तडीस नेता येईल.
आपला मुद्दा आणि उपाय अगदी बिनतोड आहे, आईसाहेब. सुरुवातीपासूनच आम्ही राजासाहेबांना तसा आग्रह करीत आलो आहोत. पण मोहीम टाकून दरबारात येण्यास त्यांस इजाजत नाही. कावेरीपावेतो मोगली निशाण नेण्याचा बादशाही हुक्म आहे. तशी राजदूताची आणसुद्धा आहे. या राजकारणाइतकीच किंबहुना त्यापरीस कांकणभर अधिकच ही मोहीम त्यांना मोलाची वाटते. त्यांच्या या काजात आम्ही शरीक झाल्यास ते अधिक सुकर होईल, अधिक वेगाने साध्य होईल या आणि केवळ याच एकमेव अटकळीने त्यांनी हे राजकारण चालवले आहे. आपणास मदत करणे वा हिंदवी स्वराज्यास साहाय्य करणे हे त्यांच्यासाठी दुय्यम ठरते.
ऐसे घृतकुल्या मधुकुल्याचे राजकारण असेल तर बादशहासमोर एवढ्या दूर जाणे टाळावे हेच श्रेयस्कर असे आमचे स्वच्छ मत आहे.
शहाजीराजांच्या राणीसाहेब जिजाऊ भोसले हे बोलत नाहीत, तर वृद्धत्वाकडे झुकलेली आणि कर्त्यासवरत्या एकुलत्या एक लेकराच्या काळजीने ग्रस्त झालेली एक वत्सल माता हे बोलत आहे. आईसाहेब, दोन तपे रक्ताचे पाणी करावे, पाण्यासारखे सवंगड्यांचे रक्त सांडावे, काल्यात लाह्या उधळाव्यात तसे मावळ्यांनी आपले प्राण उधळून राज्य उभे करावे, गोरगरीब, भोळ्याभाबड्या रयतेने, आया-बहिणींनी हर जुलमास तोंड देत, प्रसंगी रानावनात परागंदा होऊन, अनेक दिव्यांत आम्हास मुखातून ब्र न काढता साथ देऊन ते तगविण्याचा निकराचा यत्न करावा आणि एखाद्या शाहिस्ताखानाने अथवा मिर्झाराजाने सारे सारे लुटून, ओरबाडून न्यावे. आम्ही नव्या उमेदीने ‘पुनश्च हरि ओम’ म्हणून नेटाने कार्य सुरू करावे. हे असे किती काळ चालवावे.
महाराजांनी धीराने घ्यावे. भावनेत वाहत जाऊन घायकुतीने कुठलाही निर्णय घेणे रास्त नाही. अशा प्रसंगी थोरल्या महाराजसाहेबांना अनुसरावे.
त्र्यंबकपंत, आपल्या तीर्थरूपांच्या सोबतीने आबासाहेब स्वराज्याचा खेळ खेळले. अवघी उमेद या काजातच वेचली. अखेर हाती काय आले? एका तहाच्या फलस्वरूप त्यांना महाराष्ट्रापासून, सह्याद्रीपासून दूर कर्नाटकात हद्दपारी पत्करावी लागली. त्यांचे स्वराज्याचे स्वप्न सावरीच्या कापसासारखे दाही दिशांना उडून गेले. कारण त्या वख्ती आबासाहेब अगतिक होते. दोन-दोन बलाढ्य शहांचे बंदिवान होते. युद्धात परास्त झालेले जीत होते. निरुपाय होऊन त्यांना तह स्वीकारावाच लागला. याउलट आज आपण मोगलांपुढे शरणागती स्वीकारली असली, तरी संपूर्ण परास्त झालेलो नाही. बरेच काही गमावले असले, तरी आपले स्वतंत्र अस्तित्व आपण राखून आहोत. मोहीम कितीही मोठी आणि महत्त्वाकांक्षी असली, सेनापती कितीही थोर आणि कुशल असला, तरी ती कायम चालू ठेवणे बादशहाला शक्य नसते. सैन्य फार काळ घरापासून दूर राहू शकत नाही; त्यामुळे मिर्झाराजांची पाठ फिरताच आम्ही पुन्हा उचल खाणार आणि येरागबाळ्या सरदारांना न जुमानता गमावलेली दौलत सव्याज परत मिळवणार हे आपली फौज आणि रयत जाणते, तसेच आलमगीरसुद्धा हे पक्के ओळखून आहे. आता होणारी बोलणी जीत आणि जेता यांच्यामधील वाटाघाटी नसून दोन राज्यकर्त्यांमध्ये बरोबरीच्या नात्याने चालणारे राजकारण आहे. या संधीचा आपण फायदा उठवला नाही तर नियती आपल्याला क्षमा करणार नाही. बादशाही खजिना आणि फौजा अन् आपली युक्ती, बुद्धी वापरून जर कुतुबशाही आणि आदिलशाही बडवून तो मुलूख आपल्या कब्जाखाली आणता आला तर वावगे ते काय? जगदंब कृपेने जर हे राजकारण साधले, आणि बादशाही सही-शिक्क्यानिशी आमच्या हाती अधिकार आले तर गुलामी आणि लाचारीची सवय झालेल्या आणि सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी सरदार, वतनदार आणि जहागीरदारांना आपले स्वामित्व मान्य करण्यावाचून गत्यंतरच राहणार नाही. एकदा ते जवळ आले की, प्रेमात घेता येईल. आणि प्रेमात आले की, स्वराज्यात आणणे कठीण जाणार नाही. संधी येताच मोगली जोखड झुगारून दिल्लीला मोर्चे लावणे स्वप्न राहणार नाही.
महाराजांचा तर्क आणि राजकारण अगदी रास्त अन् बिनतोड आहे. पण धर्मांध, पाताळयंत्री, कावेबाज, दगलखोर आलमगीर हाच मोठा काळजीचा विषय आहे. इच्छेप्रमाणे राजकारण झाले तर भवानीच पावली. पण महाराज, फासे उलटे पडले आणि प्रसंग प्राणावर बेतला तर? याच चिंतेने जीव घाबरतो.
पंत, प्राणांची क्षिती कधीपासून वाटू लागली? फत्तेखान चालून आला, तेव्हा काय होते आपल्याकडे? आश्रयासाठी गडसुद्धा नव्हता धड. पण तेव्हा निभावून नेलेच ना आपण? फौजेसह अफजलखान बुडवला, सिद्दी जौहरचा वेढा तोडून निसटलो आणि राहत्या महालात घुसून शाहिस्तेखानास शास्त केली. हे सारे साधले ते जिवाची जोखीम घेतली म्हणूनच ना? त्या निकरामुळेच आई भवानीने यश दिले; मग आताच कच काय म्हणून?
आता तर बोलनंच खुंटलं म्हनायचं. पर म्हाराज, त्या वक्ताला आपन आपल्या मुलखात, आपल्या मानसात व्हतो. आता आग्र्याला जायाचं म्हन्जी थेट वागाच्या जबड्यातच की. निसटू म्हनलं तरी अंतर शेकडो कोस आनि समदा मुलूख गनिमाचा. कसं निसटावं मानसानं सलामतीनं?
एवढी एकच बाब आहे जी काळजी उत्पन्न करते. पण आबासाहेबांची शिकवण सर्वज्ञात आहेच, ‘काळजी घ्या. काळजी करू नका.’ मिर्झाराजांनी स्वत: बेल-भंडारा उचलून सलामतीची आणि रक्षणाची आण घेतली आहे. आग्रा मुक्कामी आम्ही त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव महाराज कुंवर यांच्या निगराणीत असू. हे सारे बादशाही मंजुरीनेच ना? आलमगीर कितीही पाताळयंत्री आणि कुटिल असला, तरी मिर्झाराजांसारख्या मातब्बर रजपुतास दुखावून रजपुतांना बिथरवणे या घडीला तरी त्यास परवडणारे नाही हे तो पक्के जाणून आहे; त्यामुळे राजकारण साधो न साधो, सुखरूप परतण्यात काही बाधा येईल असे वाटत नाही. पण, जगदंब न करो, आपले दुर्दैव उभे ठाकलेच आणि असा काही धोका निर्माण झाला तर त्याचीसुद्धा तजवीज झाली आहे. संपूर्ण उत्तरेत आपल्या नजरबाजांनी जी संपर्काची वीण निर्माण केली आहे तिचा उपयोग करून सुखरूप परत येणे शक्य होईल. साहसे श्री प्रतिवसति। काल कर्माजी हीच खबर घेऊन आला होता. आग्र्याच्या वाटेवरच कोणत्या स्थानी कोणास भेटावे आणि यासंबंधीचा तपशील पक्का करावा याची समूचित योजना त्याने तयार केली आहे. उत्तरेत बैरागी सहसा घोड्यावर हिंडतात; त्यामुळे बैरागी वेषात घोड्यावरून प्रवास सहज शक्य होणारा आहे. बैरागी गोसाव्यांची भाषा जाणणारी मंडळी आपल्यासोबत असणार आहेतच.
म्हणजे सारे पूर्वीच ठरलेले आहे तर. आमच्यासमोर फक्त उपचार पूर्ण करणे सुरू आहे म्हणायचे. शिवबा, वय वाढले, पण तोरण्याच्या वखती होता तो हूडपणा लवमात्र कमी झालेला नाही.
हास्याच्या लकेरीत सदरेवरचा ताण विरून गेला. बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्याच्या बेतावर शिक्कामोर्तब झाले. हुताशनी पौर्णिमेचा मुहूर्त मुक्रर झाला.
-
मिर्झाराजांना आलेल्या फर्मानात बादशहाने पडेल ती किंमत देऊन नेताजीस मोगली गोटात वळवून घेण्याचे आदेश दिले होते. फर्मान जसे बादशहाच्या संशयी स्वभावाचे द्योतक होते तसेच त्यातून त्याची दूरदृष्टी आणि अखंड सावधानता स्पष्ट होत होती. त्यात मिर्झाराजांना जाणीव करून दिली होती की, नेताजी हा प्रतिशिवाजी असल्याने त्याचे बाबतीत अजिबात गाफील राहू नये. तो मोगली गोटात दाखल झाल्यावर त्याला दिलेरखानाची निसबत सोपविण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले होते. याचे कारण उघडच होते की, दोन प्रबळ हिंदू, त्यातील एक बंडखोर वृत्तीचा, जर एकत्र आले तर तख्ताला आणि इस्लामला धोका निर्माण होऊ शकतो.
एक स्वतंत्र गुप्त खलिता खास दिलेरसाठी होता. त्यात नेताजीवर कशा प्रकारे नजर ठेवावी आणि मिर्झाराजांच्या संपर्कापासून त्याला दूर राखण्यासाठी कोणत्या मोहिमा सोपवाव्यात याचे बारीकसारीक तपशिलानिशी स्पष्ट दिग्दर्शन होते.
फर्माने येताच मिर्झाराजांनी हालचालींना सुरुवात केली. त्यांची विश्वासू माणसे निरनिराळ्या वेषांनी आणि मिषांनी नेताजींभोवती घिरट्या घालू लागली. घटना महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच वळण घेत होत्या. नेताजी महाराजांकडून संकेत मिळण्याची वाट पाहत मिर्झाराजांना झुलवू लागले. अधिकारपदे आणि जहागिरी मिळण्याच्या अटी घालू लागले.
मोगली हालचाली आदिलशाही मुत्सद्द्यांपासून लपून राहणे शक्य नव्हते; त्यामुळे आदिलशाही गोटात अस्वस्थ चुळबुळ सुरू झाली. नेताजींवर नजरा रोखल्या गेल्या.
आईसाहेबांच्या महालात महाराज प्रवेशले तेव्हा आईसाहेबांची नित्याची पूजा आटोपली होती आणि त्या जप करीत होत्या. शेजारी बसलेल्या शंभूराजांचे दूध पिणे सुरू होते. महाराजांनी आईसाहेबांचे पाय शिवले.
औक्षवंत व्हा. यशवंत व्हा. कीर्तिवंत व्हा. बैस शिवबा. भल्या पहाटे नजरबाज येऊन गेल्याचे कळले. काही विशेष?
अरे वा! दारुणी महालाचे हेर खाते जबरदस्तच आहे म्हणायचे. याचा बंदोबस्त तर करावाच लागणार. बातम्या आपल्या महाली येताहेत तोवर चिंता नाही, पण बातमीला पाय फुटून ती चारीवाटा जायला वेळ लागायचा नाही.
मंचावर बसता बसता महाराज बोलले. शंभूराजांनी लगेच पाय शिवले. महाराजांनी त्यांना हाताला धरून शेजारी बसवून घेतले.
तसे काही नाही रे बाबा. काल रात्री मोरोपंत आला होता. म्हणाला, ‘शंभूबाळास आग्र्यास सोबत न्यायचे आहे.’ जीव राहवेना म्हणून म्हटले तुम्हास पुसून खात्री करून घ्यावी. त्यासाठी सकाळीच यायचे होते तर बटकी सांगत आली की, महत्त्वाच्या नजरबाजाशी बोलणे सुरू आहे आणि मुलाखतीस बंदी केली आहे. तू म्हणतोस तेसुद्धा खरेच आहे म्हणा. काळजी ही घ्यायलाच लागणार. त्यात दिवस हे असे. खरेच का शंभूबाळास सोबत न्यायचे आहे?
होय आईसाहेब. शंभूराजे आता मोठे झाले आहेत. स्वाऱ्या, शिकारी, राजकारणाची त्यांना सवय झाली पाहिजे. त्यात आमचे हे असे कायम तळहाती जीव घेऊन हिंडणे. न जाणो कोणत्या वखती त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडेल.
उगीच सकाळच्या प्रहरी भरल्या घरात गृहस्थाने असे काही अभद्र बोलू नये.
अभद्र नव्हे आईसाहेब, ही तर रोकडी वस्तुस्थिती. जसे तुम्ही आम्हास लहानपणापासूनच तयार करण्यास सुरुवात केली होती तसे शंभूराजांना पण घडवायला नको का? शंभूराजे आता मोगलांचे पाचहजारी मनसबदार, जहागीरदार. त्यांचे नावेसुद्धा शाही फर्मान आलेले आहे. त्यांना दरबारात पेश करावे लागणारच. काय राजे, येणार ना आम्हासोबत आग्र्याला बादशहासमोर?
होय तर. आबासाहेब सोबत असताना आम्हास वाघाचीदेखील भीती वाटायची नाही. मग बादशहा तो काय?
क्रमश:
No comments:
Post a Comment