विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 January 2024

#मराठा_स्वराज्य_विस्तारक आणि #भरतवर्षसम्राट_छत्रपती_थोरले_शाहू_महाराज

 

नवीन वर्षाची सुरुवात

#मराठा_स्वराज्य_विस्तारक
आणि #भरतवर्षसम्राट_छत्रपती_थोरले_शाहू_महाराज यांना त्यांच्या पत्र आणि नोंदीच्या माध्यमातून वंदन करून !!
● आपले पणजोबा महाबली शहाजी महाराज यांच्या समाधी वृदांवनाच्या व्यवस्थित देखभालीसाठी छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी ताकीद दिलेले १७३२-३३ सालचे पत्र उपलब्ध आहे.आपल्या पिता, आजोबा प्रमाणेच आपल्या पणजोबा यांच्याबद्दल आस्था आणि प्रेम असणारे कर्तव्यदक्ष, कुटूंबवत्सल भरतवर्षसम्राट छत्रपती थोरले शाहू महाराज ..
________________________________
● छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी वढू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे वृंदावन सन १७१५ पूर्वीच बांधून घेतले होते त्यासंदर्भातील दोन कागदपत्रे आहेत. त्यात नैवेद्य, धूप व बाग करण्यासाठी तसेच अन्नछत्रसाठी केलेल्या सोईची नोंद आहे तर १७३३ च्या एका कागदात वृंदावनाच्या झाडलोटीची देखील सोय केलेली नोंद आहे.
________________________________
● छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी संक्रात या सणावेळी तिळगुळ पाठवलेल्या सरदार आणि आप्त यांची यादी असलेली देखील नोंद आहे..
_________________________________
● साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. साहुकराकरिता राज्य अबदान होते.न मिळे वस्तुजात राज्यात येते. राज्य श्रीमंत होते. पडिले संकट परिहार होते. साहुकारांच्या संरक्षणामध्ये बहुत फायदा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर छोटेखानी ग्रंथ असलेल्या आज्ञापत्रातील ही वाक्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सावकार आणि व्यापार याविषयाचे धोरण स्पष्ट करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा दृष्टिकोन समोर ठेऊन छत्रपती थोरले शाहू महाराज यांनीही पाऊले उचलेले दिसतात. व्यापारी आणि सावकार लोकांना जोखमीचा व्यवहार करताना सुरक्षित राज्यकारभाराचे पाठबळ असणे आवश्यक असते आणि ते छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी त्यांना दिलेले दिसते. सावकरांनी आपल्या राजाधानीतच येऊन सावकारीचा व्यवहार करावा म्हणून त्यांना प्रोत्साहनपर पत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी लिहलेले आहे. त्याचा आशय असा की " मनोहरदास सावकार वसती सूरत यांस दिल्हे अभयपत्र ऐसे जे तुम्ही साताऱ्यास येऊन सावकारी करावी ऐसी उमेद धरून भवानीशंकर व मेहेरमहंमद यांची हुजूर येवून विदित केले. ऐशास तुम्हास सावकार लोकांचा संग्रह करावा. हे स्वामीस अगत्य आहे. तरी कोणी विशी शंका न धरिता येथे सावकारी व्यवसाय करून सुखरूप रहाणे, कोण बाबे आजार लागणार नाही " (१९ मे १७२५) या पत्रावरुन असे समजते की छत्रपती थोरले शाहू महाराजांना सातारा राजधानी वैभवसंपन्न करावी अशी इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जापत राज्यकारभार, राज्याची प्रगती आणि सुधारणा याचा दूरदृष्टीकोण छत्रपती थोरले शाहू महाराज जपत होते याचेच हे उदाहरण..
___________________________________
● "गाव जाळून गुरे ढोरे नेली, बायका आणि बंद नेला म्हणून विदित झाले. ऐशास गांवाचा सत्यानाश करावा, बंद धरून नेऊन नानाप्रकारचा उत्पात करावा हे गोष्ट काही बरे नव्हे. भावबंदाचा कजिया असेल तर त्यासीच समजोन द्यावा. मूलखाशी तालुखा काय आहे ? हल्ली हे पत्र सादर केले असे. मुलखात धामधूम न करणे. येथील मालमत्तेसी गुरे ढोरे नेला असेल तो फिरोन देणे " छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या एका पत्रातील हा सारांश खूपच बोलका आहे, रयतेविषयी असलेली काळजी आणि मुलखातील प्रत्येक घटनांकडे छत्रपती शाहू महाराज थोरले यांचे असलेले बारीक लक्ष या पत्रातून दिसून येते. छत्रपती घराण्याचा कर्तव्य आणि कर्तृत्व यांचा वारसा जपणारे भरतवर्षसम्राट छत्रपती शाहू महाराज थोरले.
_________________________________
● महाबली शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच राजाराम महाराज छत्रपती या भोसले घराण्यातील महापुरुषांनी रयतेसाठी अनेक लोककल्याणकारी ध्येयधोरणे राबवलेली दिसतात. आपल्या रयतेच्या अनेक संकटांचा, खाजगी तंटाचा न्यायनिवाडा करत मदत केल्याच्या देखील इतिहासात नोंदी आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी एका प्रसंगी शिळीमकर यांच्या कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी काही होनांची तसेच इतर मदत केलेली नोंद आहे, छत्रपती थोरले शाहू महाराजांनी असाच एक विवाह विषयक तंटा निकालात काढत आपली लोककल्याणकारी भूमिका बजावलेली एक नोंद देखील कागदपत्रात आढळते. सायगाव येथील मानाजी (?) घोरपडे पाटील यांच्या जानी नावाच्या कन्येचा विवाह दहीगाव येथील ज्योताजी सावंत यांच्याशी झाला असता काही कारणामुळे ज्योताजी सावंत हे आपल्या पत्नीला सोडून गेले, १०-१२ वर्ष वाट पाहूनही हे सावंत परत आले नाहीत. अशात जानी या महिलेचे आईवडील दोघेही मयत झाले आणि सावंत यांच्याकडील ही लोक त्या महिलेचा सांभाळ करेनासे झाले. जानी ही महिला आपले दुःख घेऊन छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्याकडे आली असता छत्रपती शाहू महाराजांनी मुठेखोरे येथील देशमुख देशपांडे आणि गोत यांना आज्ञा केली की या महिलेचा दुसरा विवाह लावून द्यावा. काही लोकांनी यावर आक्षेप घेतला होता त्यावेळी छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी भविष्यात कोणी या महिलेच्या दुसऱ्या विवाहावर काही आक्षेप घेऊ नये म्हणून त्या महिलेच्या दुसऱ्या पतीस अभयपत्र देखील दिले होते.उपरोक्त घटनेच्या कागपत्रातील नोंदीत " तरी तू व हे सुखरूप नांदून आपला संसार करणे " हे वाक्यच खूप मनाला भावून जाते, छत्रपती घराण्याच्या लोककल्याणकारी भूमिका आणि आपल्या रयतेची काळजी आणि प्रेम यावर या नोंदीवरून अधिक प्रकाश पडतो..
_____________________________________
● छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला तसेच प्रशासनातील लोकांना रयतेच्या गवताच्या काडीला ही हात लावू नये, जो काही माल, वस्तू विकत घ्यायच्या असतील त्या पूर्ण पैसे देऊन विकत घ्याव्यात असा आदेश दिला होता हे आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या माध्यमातून जाणतोच. छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी देखील असाच आदेश दिलेल्याची एक नोंद सापडते. सदाशिवगड येथील गडकर्यांनी बाजारात गेले असता त्यांनी काही घोंगडी बळजबरीने खरेदी केली होती आणि त्यांनी त्याचे निम्मेच पैसे द्यायचा वायदा केला. हि बातमी समजल्यानंतर छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी सदाशिवगडाच्या हवालदार आणि कारकून यांना पत्र पाठवून तंबी देत व्यापाऱ्याला पूर्ण पैसे द्यायचा आदेश दिला होता. या नोंदीत छत्रपती थोरले शाहू महाराज म्हणतात " ऐसीयास रयतेपासून घोंगडी निम्मे किंमत द्यावी हा कोण विचार ?? याउपरी वाजवी किंमत रुपये देणे " छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे आपल्या राज्यात चालणाऱ्या लहानमोठ्या बाबींवर किती बारीक लक्ष असेल याची प्रचिती आपल्याला या घटनेतून येतेच पण त्यांच्या रयतेविषयी असलेला कळवळा आणि लोककल्याणकारी स्वभाव यावर देखील प्रकाश पडतो.
______________________________________
अखिल भारतात ४०० वर्षे ठाण मांडून बसलेल्या यवनी सत्तेला उथलुन लावण्याचा आणि राज्यक्रांती घडवण्याचा मान महाराष्ट्राला लाभला आणि या राज्यक्रांतीचे नेतृत्व भोसले घराण्याच्या तीन पिढ्यांनी केले. महाबली शहाजीराजेंनी पाया घातला, शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले आणि छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्याचे रक्षण केले आणि यवन नामोहर केला. महाबली शहाजीराजे, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांनी अनेक लढे दिले बलाढ्य आणि संख्येने अधिक असलेल्या सेनेशी लढले कधी तह-करार केले परंतु या सर्व घडामोडीत आपले स्वातंत्र, इभ्रत आणि नेतृत्व यांना डाग लागू दिला नाही यामुळेच स्थानिक जनतेत देशाभिमान, आत्मविश्वास, युद्धकौशल्य यावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. (इतिहासाचार्य वा. सी बेंद्रे ). छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) मराठा स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात झाली. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणीबाईसाहेब सरकार यांनी मोगलांविरुद्ध प्रचंड मोठा लढा दिला आणि कैदेतून निघून आल्यावर छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी आपल्या ४२ वर्षाच्या छत्रपती कारकिर्दीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या बुद्धीकौशल्य, प्रशासनव्यवस्था आणि योग्य माणसांची पारख करत संघटन कौशल्याने मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर केले..
- राज जाधव

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...