विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 3 January 2024

श्रीमंत सरदार चांदजीराव पाटणकर भाग दोन

 

 श्रीमंत सरदार चांदजीराव पाटणकर

भाग दोन 
ज्या शुर वीर पराक्रमी योध्यामुळे चालुक्य साळुंखे पाटणकर घराण्याचा इतिहास पुन्हा एकदा नावारूपास आला असे
वीर पराक्रमी श्रीमंत सरदार चांदजीराव पाटणकर सेनापंचसहस्त्री
राजाराम महाराज तक्ताधिपती झाल्याचे वर्तमान औरंगजेबाला समजलें.त्या वेळेस त्यानें प्रथम 'जिंजी' घेण्याचा बेत करून झुल्फिकारखान सरदाराबरोबर कांहीं सैन्य देऊन त्याला तिकडे रवाना केलें. झुल्फिकारखान जिंजीस आला, परंतु
वेढा घालण्यास पुरेसें सैन्य नाहीं, असें समजून त्यानें आणखी सैन्य मदतीकरितां बोलाविलें, त्यानें कांही लोक जिंजीचे नजीक ठेविले व त्रिचनापल्लीकडे स्वारी केली. इकडे कारभारी मंडळीनें मिरज, पन्हाळा वगैरे किल्ले घेऊन वाईचे सुभेदाराव छापा घातला व तो मुलूख मिळविला. त्यांनी देशमुख मोंगलांच्या मुलुखांत चौथाई हक्क वसूल करण्याकरितां काही लोक पाठविले. संताजीराव, धनाजीजाधव व चांदजीराव यांनी उत्तरेकडील मुलूख उद्ध्वस्त करून कित्येक प्रसंगी मोंगल लोकांचा पराभव केला. नंतर वीस हजार स्वार बरोबर
घेऊन ते साताऱ्यावरून थेट कर्नाटकांत गेले व जिंजीजवळ गेल्यावर धनाजी जाधव यानें सुमारें सात हजार घोडेस्वार, बरोबर घेऊन मोंगलाचें ठाणें घेतलें. संताजीराव
व चांदजीराव यांनीं आपल्या लोकांच्या दोन टोळ्या करून ते मोंगल लोकांची कर्नाटकांतील लहान मोठीं ठाणीं दोन्हींकडून उठवूं लागले, त्या वेळी चांदजीरावांनीं मोठ्या पराक्रमानें मुसलमानांशीं कित्येक ठिकाणी मोठ्या निकरानें व शौर्यानें युद्ध
केलें. मुसलमान लोक हजारोंनी मृत्युमुखीं पडले व जिवंत राहिलेले हतवीर्य होऊन जिंजीकडे थोरले फौजेस येऊन मिळाले. पुढें औरंगजेबानें आपला पुत्र कामवक्ष आणि वजीर जासदखान यांजबरोबरमोठें सैन्य देऊन जिंजीवर पाठविलें. झुल्फिकारखान हा ह्या प्रकारानें नाउमेद झाला. ह्या प्रकरणाचा फायदा घेऊन शिक्र्यांच्या मदतीनें राजाराममहाराज किल्ल्यांहून बाहेर निसटले व नंतर मोंगलांनी किल्ला सर केला.
चांदजीरावांनीं कर्नाटकांत दादोरी नांवाचा एक लहान किल्ला होता, ठिकाणीं संताजी घोरपडे यांनीं हुसकून लाविलेलें बरेंच मोंगल सैन्य आश्रयास राहिलें होतें, याला वेढा देऊन हल्ला केला. मोंगल लोक दरवाजे बंद करून राहिले होते. त्यांचे
जवळ धान्य फार थोडें होतें. सुमारें दोन महिने त्यांनीं मोठ्या निकरानें दम धरीला.चांदजीराव मोठ्या हिंमतीनें वरचेवर किल्ल्यावर हल्ला करीत. यामुळे आंतील सैन्याचा नाईलाज झाला व ते दार उघडून बाहेर आले. त्या ठिकाणीं मोठी चकमक
उडाली. मुसलमान लोक चढणीवर वरील बाजूस होते व चांदजीराव खालच्या बाजूनें त्यांच्यावर हल्ला करीत होते. चढणीमुळें त्यांचे लोक माघार घेऊन कच खाऊं
लागले व मुसलमान लोक ईर्षेनें पुढे सरसावले. इतक्यांत चांदजीरावांनी आपल्या लोकांस उत्तेजन देऊन, स्वतःपुढे होऊन शत्रूची फळी फोडली व कत्तल सुरु केली. थोड्याच वेळात चांदजीरावांच्या माऱ्यानें घाबरून जाऊन मुसलमान लोक सैरावैरां पळू लागले व चांदजीराव विजयी झाले.
ह्या हल्ल्याची बातमी औरंगजेबास समजतांच त्यानें तेथील लोकांस कुमक करण्याकरितां कांहीं सैन्य रवाना केलें होतें. परंतु संताजी घोरपडे यानें वाटेंतच त्या सैन्यावर हल्ला करून त्यांची अगदीं धूळधाण उडवून दिली. हा जय मिळविल्यावर चांदजीराव साताऱ्याकडे गेले. पुढें कांही दिवसांन छ.राजाराममहाराज मोठें सैन्य घेऊन साताऱ्याहून निघून उत्तरेकडील मुलखाचा बंदोबस्त करण्याकरितां निघाले. त्या वेळेस चांदजीराव यांनाही बरोबर नेलें होतें. त्यांनीं त्या स्वारींत अनेक धाडसाचीं कृत्यें करून राजाराम महाराजांना फार खुष
केलें. पुढे थोड्याच दिवसांनी ते कैलासवासी झाले. चांदजीराव शरीरानें उंच व धिप्पाड असून त्यांचा चेहराही उग्र होता. ते लढाईच्या वेळीं चिलखत व शिरस्त्राण घालीत. ते चिलखत,
शिरस्त्राण व लक्ष्मी नांवाचें त्यांचें खड्ग हे फार जड व प्रेक्षणीय असून ते बरीच वर्षे पाटणकरांच्या पाटण येथील वाड्यात ठेविले होते. काळांतराने त्यांच्या वंशजानी ते ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात जतन करण्यासाठी
दिल्याचा तपशील पाटण जहागिरीचे दप्तरात नोंद आहे. त्यांची धर्मावर मोठी निष्ठा होती. समर्थ श्रीरामदास स्वामींनीं त्यांना दर्शन देऊन त्यांना शब्दोधामृत पाजून अनुग्रह दिला होता. पुढें एके दिवशीं समर्थ श्रीरामदासस्वामी कोयना नदीच्या डोहांत
बुडाले. त्यांस कल्याणस्वामींनीं चौथ्या दिवशीं बाहेर काढिलें, त्यावेळेस त्यांनी एक राममूर्ती नदींतून वर आणिली व ती त्यांनीं चांदजीरावांना दिली. चांदजीरावांनीं मोठ्या भक्तीनें तिचा स्वीकार करून ते तिचें पूजन करूं लागले. तेव्हांपासून
हल्लीपर्यंत ती मूर्ती पाटणकर यांच्या देव्हाऱ्यांत असून त्यांचे वंशज आजही तिचें मोठ्या भक्तीनें पूजन करीत आहेत






No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...